अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- न्या. महादेव गोविंद रानडे!

वामन आबाजी मोडक यांच्या लेखनाविषयी गेल्या आठवडय़ात आपण जाणून घेतले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या चार पदवीधरांपैकी एक अशी त्यांची ओळख. या चारांमध्ये इतर तिघे जण होते- रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे आणि महादेव गोविंद रानडे. मुंबई विद्यापीठाचे हे पहिले चारही पदवीधर पुढे १८६७ मध्ये स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाशी जोडले गेले. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांतून मुक्त होऊन उन्नत धर्माकडे मनुष्याची वाटचाल व्हावी यासाठी प्रार्थना समाज प्रयत्नरत होता. रानडे यांची या विषयाचे विवेचन करणारी काही व्याख्याने झाली होती. त्यातील एका व्याख्यानातील हा उतारा पाहा-

‘‘आपल्या ह्य़ा प्रांती कांहीं मंडळीची विवेकाकडे अतिशय प्रवृत्ति. आमच्या इकडे पांडित्य, कोरडें ज्ञान फार माजलें आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे कीं, परमेश्वर कसा ओळखावा ही साधी गोष्टही कळत नाहींशी झाली आहे! परमेश्वराचें रूप कसें ओळखावयाचें त्याचा निर्णय विवेक फार माजल्यामुळेंच होत नाहीं. परमेश्वराच्या अस्तित्वाविषयीं व त्याच्या स्वरूपाविषयीं प्रथम जरी कांहीं ओलावा असला, तरी ह्य़ा शुष्क विवेकाच्या योगें तो नाहींसा होतो. तेव्हां विवेक नको आहे असें नाहीं. विवेक तर अवश्य असावा. त्याला प्रथम स्थान दिलें आहे. पण, तो नुसता विवेक नसावा. आपण सर्व जास्त विवेकी झालों ह्मणजें फार तर आपली चित्प्रभा, चिच्छक्ति वाढेल; पण तेवढय़ानें कार्य होत नाहीं. विवेकांत दुसरा कांहीं भाव नाहीं, असें कधीं होऊं नये. विवेकाबरोबर वैराग्य, वैराग्याचें बळ पाहिजे. आपल्यापैकीं कित्येकांस विरक्ति साधते. पण, नुसती विरक्ति नको. त्याच्या योगानें बळ कसें उत्पन्न व्हावें? विवेकाबरोबर वैराग्य पाहिजे, आणि तें धगधगीत पाहिजे, कीं त्याच्या योगानें कार्यभाग व्हावा.

धगधगीत निखारा हा कार्यकारी असतो; पण दुसरे कोळसे असे असतात कीं, त्यांतून ठिणग्या उडतात व ते फुटतात. हे दोषी निखारे. तसेंच वरील वैराग्य दोषी. ह्य़ा संबंधानें विचार करितांना आपण दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट अशी कीं, वैराग्य विवेकासहित आहे काय? तसें जर नसलें, तर मग सर्व लंगडें. दुसरी गोष्ट अशी कीं, त्या वैराग्याच्या योगानें बळ उत्पन्न झालें आहे काय? कांहीं लोकांत सारखे पंचेचाळीस दिवस उपवास करण्याची वहिवाट आहे. ह्य़ांतून जो कोणी वांचतो त्याचा मग बहुमान व गौरव होत असतो. हें वैराग्य जर कसोटीला लाविलें, तर त्यांत विवेकही नाहीं व बळहीं नाहीं, असें आपल्याला दिसून येईल.

आमच्या लोकांत आज जर कांहीं असलें, तर तो कोरडय़ा विवेकाचा भाग फार जास्त व खरें वैराग्य कमी. कोणी कोणाच्याविषयीं अनादर मानण्याचा हा भाग नव्हे. पण, नुसता विवेक, किंवा नुसतें वैराग्य, हें कांहीं कामाचें नाहीं. त्यांची सांगड नेहमीं असली पाहिजे. वैराग्याचा भाग प्रबल होण्यासाठीं विवेकाची हेळसांड करणें, हें ज्याप्रमाणें विचारास अनुसरून नाहीं, त्याचप्रमाणें विवेकावरच सर्व मदार घालून राहणें गैर आहे.

आपल्या येथें वास्तविक पाहातां खरा विवेकही नाहीं व वैराग्य व त्याचें बळही नाहीं. आपल्याला आज उज्वलितपणा व धगधगीतपणा ठेवणारा अग्नि पाहिजे. आपल्यांत जे जे दोष दिसतील ते वरील दोन गोष्टींच्या- १) विवेक वैराग्याची सांगड आपल्यांत आहे काय? आणि २) त्या वैराग्यापासून बळ उत्पन्न होत आहे काय?- कसास लावून ते घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’’

संत तुकारामांच्या ‘विवेकासहित वैराग्याचें बळ। धगधगीतोज्वळ अग्नि जैसा।। या अभंगचरणाचा संदर्भ घेऊन रानडे यांनी या व्याख्यानात विवेक आणि वैराग्याची सांगड घातली जावी, असे आवाहन केले आहे. प्रार्थना समाजात त्यांनी दिलेली ही व्याख्याने ‘न्या. महादेव गोविंद रानडे ह्य़ांची धर्मपर व्याख्यानें’ या संग्रहात वाचायला मिळतात. याच संग्रहातील विज्ञानविषयक विवेचन करणारे रानडे यांच्या व्याख्यानातील हा उतारा-

‘‘विज्ञानाचा व्याप मनुष्यसृष्टींत ज्ञानापेक्षांही अधिक आहे. शिष्टाचार, राजदंड, दंडनीति, गृहस्थिति यांचा पाया विज्ञान आहे. घरांतील कर्त्यां पुरुषानें आपल्या परिवाराचें संगोपन करावें वगैरे व्यवस्था विज्ञानवश आहे, हें सर्व गृहीत होईल. पण, विज्ञानसृष्टींत कोठें आहे? अशी शंका येते. सृष्टीमध्यें माधुर्य आहे; सौंदर्य आहे; पाहिजे असल्यास मन आहे असेंही ह्मणा; परंतु विज्ञान कोठें आहे? अंतश्चक्षूनें पाहिलें, तर सर्व सृष्टींत जर कांहीं दिसत असेल तर तें विज्ञान होय असें आढळेल. सृष्टींत होणाऱ्या व्यापारांवरून काय उद्देश दिसून येतो? ज्या गोष्टी केल्या असतां हित होतें त्यांच्याविषयीं तत्परता व ज्या अहितकर त्या न करण्याविषयीं दक्षता, हीं आपल्या दृष्टीस पडतात. आपण अव्यवस्थिपणें वागलों, तर वाईट परिणाम होईल असें समजून आपण सावध राहतों. दिव्याचा उपयोग प्रकाश मिळविण्यापुरताच करून घेत असतों; लहान अज्ञान मुलाप्रमाणें आपण त्याच्यावर हात धरून पोळून घेत नाहीं. या मनाच्या व्यापारांत आपण अंतश्चक्षूनें पाहिलें असतां काय दिसतें? सर्व प्राण्यांचे संगोपन व्हावें, शुद्धबुद्धीचा विकास व्हावा, प्रेम वाढावें, सर्वत्र कलह शांत व्हावेत, अशीच एकंदरीनें योजना आहे, असा बोध होतो. ज्यांत परब्रह्माचें स्वरूप आविर्भूत होत असतें असा विज्ञानमय कोश मनोमय कोशापलीकडचा आहे. तेंणेंकरून सृष्टि विज्ञानमय आहे, अशी प्रतीति होते. राजशासनाला आधार विज्ञानाचा असतो. तरी त्यांनीं विज्ञानमय होणारा फारच अल्प प्रदेश आहे; आणि त्याचा धम्र्यपणा विज्ञानमय कोश आहे, ह्मणूनच त्यांस प्राप्त होतो. पुण्यमार्गाकडे मन प्रवृत्त व्हावें व पापापासून परावृत्त व्हावें, असा स्वाभाविक कल असतो, त्याचें मूळ विज्ञानमय कोशांत आहे.’’

द्वा. गो. वैद्य यांनी हा संग्रह संपादित केला होता. याच वैद्य यांनी लिहिलेले ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ हे पुस्तक तर जिज्ञासूंनी आवर्जून वाचायला हवे. धर्मसुधारणेची गरज व्यक्त करणाऱ्या रानडे यांच्या एका व्याख्यानातील हा उतारा पाहा-

‘‘..ज्या धर्मसंबंधीं व सामाजिक बाबतींचा परस्परांशी आपल्या लोकांमध्ये अतिनिकट संबंध असतो त्यांत सुधारणा करण्याविषयीं इतकी खटपट व इतका हट्ट कां, हा प्रश्न सहजच निघतो, आणि त्यांत कांहीं अर्थ नाहीं, किंवा तो विचार करण्यासारखा नाहीं असें नाहीं. एक गोष्ट निर्विवाद आहे कीं, ही उठाठेव करण्याची संवय, सदोष असो वा निर्दोष असो, तिला चांगला गुण माना, अथवा वाईट खोड माना, पूर्वीपासून चालत आलेली आहे. असा प्रकार, अशी समजूत, आतां पाश्चात्त्य शिक्षण मिळाल्याचा परिणाम नसून पूर्वीपासून आहे. हें नवीन बंड उपस्थित झालेलें नाहीं, हें आपल्या देशाचा इतिहास पाहिला असतां बौद्ध, जैन हे धर्म, तसेच शांकर, रामानुज, माध्व, वल्लभ व स्वामिनारायण हे एकामागून एक झालेले संप्रदाय याच गोष्टीची साक्ष देतात. नाना प्रकारचे उद्योग, जलपर्यटन, यांत्रिक कला ह्य़ांमध्यें प्राविण्य, इत्यादि गोष्टींतून लक्ष कमी होऊन देवाचा सहवास व्हावा, त्याच्याशीं लडिवाळपणाचे बोल बोलावे, देवाचा व आपला संनिकट संबंध मनांत आणून त्यास आळवावें, एतदर्थ प्रयत्न करण्यास व नवीन नवीन धर्मव्यवस्था करण्यांतच आपला ऐतिहासिक काल गेला आहे, असें आपणांस दिसून येईल. ही धर्मसंबंधी चळवळ करण्याची चाल आरंभापासून आहे, आणि ती कबीर, नानक, चैतन्य, तुकाराम इत्यादिकांच्या चरित्रांवरून सिद्ध होते. देशांत अनेक वेळां राज्यक्रांति झाली, बहुत राजे आले व गेले; परचक्रें आलीं गेलीं; परंतु या कारणांमुळे आपल्या लोकसमाजास धर्मसंबंधीं बाबतींत चळवळ करण्याची जी संवय पडलेली आहे तिजमध्यें फरक झालेला, किंवा तिचें रूपांतर झालेलें आढळत नाहीं. विदेशी व विधर्मी लोक येथें सत्ताधारी झाले, त्यांपैकी कित्येक येथले स्थानिक झाले, तरी जसे तांदळांत मिसळलेले मूग पाटावर, अगर सुपांत घालून घोळले असतां वेगळे होतात, तद्वत् आमचे हिंदु लोक त्यांपासून अलग राहिले. हजारों वर्षांपासून आपल्या लोकांची समजूत ही कीं, आपल्या दु:खाचा व संकटाचा भार सर्वपरी देवाच्या डोकीवर घालावा, ह्मणजे काकळूत येऊन तोच त्याचा परिहार करितो. कित्येक लोकांस ही समजूत व तिच्यामुळें उद्भूत होणारी धर्मसंबंधी बाबतींतच चळवळ करण्याची मनाची प्रवृत्ति ही प्रापंचिक बाबींत प्रत्येक प्रगतीस अवरोध व ऱ्हास करणारी आहे कीं, ती आमचें भाग्य होऊन राहिली आहे, आणि आमचा उदय झाला तर तद्द्वाराच व्हावयाचा असें दिसतें..

देवाचा आपणांवर विशेष लोभ आहे, असें आपले लोक इतर धर्माच्या लोकांप्रमाणें मानीपणानें, अभिमानानें, अथवा अव्यवस्थित रीतीनें मानीत आलेले नाहींत, ही गोष्ट या संबंधानें आपण लक्षांत ठेविली पाहिजे. आणि हाच आपला विशेष गुण आहे. देवाचा व आपला संनिकट संबंध आहे; संसारांतील अरिष्टांत व दु:खांत देव आपला पाठीराखा आहे; त्याच्यावर भरंवसा ठेविला असतां तो आपला सर्व भार वाहील; कधीं अव्हेर करणार नाहीं, ही बुद्धि प्रत्येकाच्या ठिकाणीं जागृत आहे; हा विश्वास दृढ आहे; हें आपल्या लोकांचें भाग्यच समजलें पाहिजे. हा उपजत अंगस्वभाव, हा विशेषपणा टाकून देतां येत नाहीं, तर तो शुद्ध मार्गानें जाईल, अशी योजना केली पाहिजे; असें त्यास वळण दिलें पाहिजे. आपल्या अंगीं साहस, पराक्रम, सामथ्र्य वाढविण्यासाठीं निरंतर प्रयत्न केला पाहिजे. पण, तें अंगस्वभावास चांगली दिशा लावून काळ्याचें पांढरें करावयास केलेली खटपट पाण्यांत जाते तसें होईल. हें माप पदरीं पडतें खरें; परंतु त्यासाठीं खेद मानण्यास कारण नाहीं, असें मला वाटतें.. सारांश, धर्मसंबंधी चर्चा व चळवळ आपल्या लोकांत कोणत्यानाकोणत्या रूपानें अथवा दिशेनें पूर्वीपासून चालत आलेली आहे; ती नवीन शिक्षणाचा परिणाम आहे किंवा आजकालची आहे असें नाहीं.’’

रानडे यांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीतून झाले आहे. धर्मपर व्याख्यानांचा हा संग्रह आणि त्याआधी प्रकाशित झालेले ‘भागवतधर्मावर प्रार्थना समाजांत झालेले पहिले दोन उपदेश’ व ‘व्यापारासंबंधी व्याख्यानें’ अशी त्यांची तीनच पुस्तके मूळ मराठीत आहेत. असे असले तरी मराठी भाषा व वाङ्मय यांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींकडे रानडे यांनी कळकळीने लक्ष पुरवले. १८६४ व १८९८ मध्ये त्यांनी मराठी भाषा व वाङ्मय यांच्या स्थितीविषयी इंग्रजीतून लिहिलेले दोन वृत्तांतलेख यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. तसेच त्यांनी १८७८ साली लोकहितवादींना बरोबर घेऊन ‘मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी’ची स्थापना केली व त्याच वर्षी पुणे येथे ग्रंथकार संमेलन भरवण्यात पुढाकार घेतला. रानडे यांचे न. र. फाटक यांनी लिहिलेले विस्तृत चरित्र त्यांचे हे कार्य व जीवनदृष्टी समजून घेण्यासाठी वाचायला हवे.

संकलन प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com