अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे मराठी वळणकसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- कृष्णराव पांडुरंग भालेकर!

१८७३ साली महात्मा जोतीराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच वर्षी त्यांचे ‘गुलामगिरी’ हे महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक व १८६९ मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘ब्राह्मणाचे कसब’ या दोन पुस्तकांच्या परीक्षणांच्या मिषाने विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेतून जोतीरावांवर टीका केली. या टीकेत चिकित्सा कमी आणि टवाळीच अधिक होती. स्वत: जोतीरावांनी मात्र चिपळूणकरांच्या या टीकेला अधिक महत्त्व दिले नाही. याच काळात सत्यशोधक समाजाच्या अनुयायांमध्ये समाजाची भूमिका मांडण्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्रीय व्यासपीठ असावे, असे मत होऊ लागले होते. चिपळूणकरांच्या टीकेमुळे तर हे मत अधिक दृढ झाले. मुंबईतील सत्यशोधकांनी एक छापखाना खरेदी करून तो पुण्याला पाठवला; परंतु पुण्यातील सत्यशोधकांमध्ये वृत्तपत्र काढण्यात एकवाक्यता न झाल्याने, मतभेदांती तो छापखाना पुन्हा मुंबईला पाठवला गेला. असे असले तरी पुण्याजवळील भांबुर्डे गावातील एक तरुण सत्यशोधक कार्यकर्ता मात्र वृत्तपत्र काढण्याविषयी प्रचंड उत्सुक होता. त्याचे नाव कृष्णराव पांडुरंग भालेकर. सत्यशोधक समाजाच्या उपक्रमांत हिरीरीने सहभागी होणाऱ्या भालेकरांनी कर्ज काढून १८७७ च्या जानेवारीत ‘दीनबंधु’ हे साप्ताहिक पत्र सुरू केले. ब्राह्मणेतर चळवळीतील हे पहिले पत्र. भालेकरांचे हे कार्य अनन्यसाधारण आहेच; परंतु त्याच वर्षी त्यांनी लिहिलेल्या ‘बळीबा पाटील आणि १८७७ चा दुष्काळ’ या कादंबरीसाठीही भालेकरांचे महत्त्व आहे. या कादंबरीतून भालेकरांनी शेतकी जीवनाचा वेध घेतला आहे. तिच्या प्रस्तावनेत भालेकरांनी लिहिले आहे –

‘‘शेतकऱ्यांस सहजरीत्या मार्ग सुचून आपली सुधारणा करून घेता यावी, हाच उद्देश बाळगून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. खेडय़ातील लोक व त्यांचे पुढारी (पाटील) ह्य़ांनी आपले गावची व्यवस्था सर्वानुमते कशी ठेवावी हे ह्य़ांत चांगले दाखविले आहे. ऐकण्यापेक्षा पहाण्याने विशेष ठसते; म्हणून हिंदुस्थानातील इंग्रज सरकारच्या हद्दीतील एके गावचा बळीबा पाटील याने आपले पाटीलकीचे काम कोणत्या तऱ्हेने चालविले होते हे दाखविले आहे.’’

पुढे ते लिहितात-

‘‘आमच्या शेतकरी लोकांविषयी विचार केला तर खरोखरच फारच दु:ख वाटते. यांच्यावर आजपर्यंत जेवढे अम्मलकर्ते होत आले त्यांतील बहुतेकांना किंबहुना सर्वानाच शेतकऱ्यांच्या स्थितीची माहिती नव्हती, व ती नसतेच. तसेच आपणांवर राज्यकर्ते कोण व कोठील आहेत, कोण गेले व कोण आले, आमच्या जमिनीवर वसूल का घेतात, तो कोठे नेतात, त्याचे काय करतात, हेही शेतकऱ्यास असावे तसे माहीत नसते!! म्हणूनच या बलाढय़ समाजावर (हिंदुस्थानवर) परक्यांचे ऐष आराम निर्विघ्नपणे चालतात. यांच्या ऐषआरामात जरी व्यत्यय येत गेले तरी ते परस्थांकडून परस्परांच्या हेव्यादाव्यानेच येत गेले. आमच्या शेतकऱ्यांना त्याचे शुभाशुभ अद्याप नाही. कोठून असणार? अडाणी अथवा निर्दय धन्याच्या बैलास दु:ख होते म्हणून तो कधीच त्रासमुक्त होण्याचा योग्य इलाज करीत नाही. ज्ञान असेल तर उपाय सुचेल. आमचे शेतकरी पशुवत् असण्याचे कारण तरी हेच होय.’’

या अपूर्ण कादंबरीचे केवळ पहिले चार भाग उपलब्ध आहेत. परंतु त्यातून भालेकर इतिहास, ग्रामसंस्कृती, शेतकी जीवन, समाजव्यवस्था यांच्याविषयी त्यांना झालेले आकलन विस्कळीत अशा कथानकाद्वारे मांडताना दिसतात. त्यातील ग्रामजीवनाचे वर्णन करणाऱ्या भागातील हा उतारा –

‘‘एकंदरीने पाहिले असता खेडय़ातील लोकांस सुखाच्या गोष्टीचा अभावच आहे. बरे ते असून त्याच्या रितीभातीपासून त्यांना सुख आहे काय? तेही नाही. त्यांच्या रितीभातीही पुष्कळ अडाणीपणाच्या असतात. ह्य़ा लोकांना आनंदाचे दिवस शहरच्या लोकांप्रमाणे वरचेवर येत असतात असे नाही. तर त्यांचे फार झाले तर वर्षांतून सात-आठ वेळा संधी येत असते. ते दिवस त्यांच्या सोयीप्रमाणे व त्यांच्या उपयोगाप्रमाणे असतात. ते हे की, पोळा, शिराळशेट, शिमगा, दसरा आला म्हणजे ते दिवशी आपापल्या जनावरास धुतात, त्यांना काम न देता ते दिवशी त्यांना सुशोभित करून त्यांना गावात मिरवतात, व आपणही पोळी गुळवणी करून खातात. शिराळशेटचे वेळीही तसेच. एक मातीचा शिराळसेट करून त्यालाही मिरवत नेऊन बुडवितात. शिमग्यात आनंदाने खेळतात व होळीचा पोळीचा मान ज्याचा त्यास देतात. म्हणजेच होळीच्या विस्तवात पुरणाच्या पोळीस प्रथम टाकणे. तसेच गावात देवाचा उत्सव करून तो दिवस सुखाचा मानतात. आपल्या शेतात चांगले पिकले म्हणजे कोणेका दिवस नवसाच्या निमित्ताने जेवण देऊन आपणही आनंदाने जेवतात. ह्य़ा लोकांत हे बहुतकरून हिंदु धर्मातील असल्याकारणाने यांच्यात पुष्कळ भोळ्या चाली पडलेल्या आहेत. हे लोक आपल्या मुलांची लहानपणीच लग्ने करितात. व त्या लग्नास त्यांना नेहमी कर्ज काडावे लागते. हे जादु, मंत्र, थोतांडास फार भितात आणि शहरातील शूद्राप्रमाणे ब्राह्मण लोकांकडून फारसे नाडले जात नाहीत. याची कारण दोन आहेत. यांचेपाशी मुळीच द्रव्य नसते. दुसरे तेथे ब्राह्मणाची वस्तीही थोडी असते व ते ह्य़ा दरिद्री लोकांस फारसे निर्थक उत्तेजनही देत नाहीत. तरी ब्राह्मण लोकांचा बराच या लोकांमागे तगादा असतो. कोणतेही धान्य किंवा कोणताही माल झाला म्हणजे त्यातून थोडा तरी ब्राह्मणास प्रथम द्यावा लागतो. व ते मात्र उपयोगाचे असले पाहिजे. म्हणजे बरकत अशी ह्य़ा भोळ्या लोकांची समजूत करून ठेविली आहे.’’

ही कादंबरी १८८८ साली ‘दीनमित्र’ साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली. मात्र तिचे लेखन १८७७ साली झाले असल्याचे ‘दीनमित्र’च्या संपादकांनी नमूद केले आहे. या कादंबरीव्यतिरिक्त भालेकरांचे आणखी काही लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यात ‘पोवाडे’, ‘हितोपदेश’, ‘शेतकऱ्याचे मधुर गायन’ अशा पद्यलेखनाचा प्रामुख्याने समावेश होतो. याच काळात भालेकरांनी गंजिफा खेळाची अनोखी पद्धत प्रसिद्धीस आणली होती. त्या खेळाची माहिती देणारे भालेकरांचे ‘पंचखेळ’ हे पुस्तकही बरेच लोकप्रिय झाले होते.

याशिवाय भालेकर गावोगावी फिरून शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे कार्यही करत होतेच. ‘शेतकरी शेतकरी उठा उठा हो’ हेच भालेकरांचे कळकळीचे सांगणे होते. सप्टेंबर, १९०२ मध्ये वऱ्हाड प्रांतातील करजगांव येथे झालेल्या त्यांच्या व्याख्यानातील हा उतारा पाहा-

‘‘.. आपल्या शेतकऱ्यांची थोरवी सर्व बाजूनें मोठय़ा योग्यतेची असून, तेच सर्व बाजूंनी सर्वस्वी गांजले आहेत! तें कां? हा प्रश्न, या देशाची स्थिति बिघडण्यांची जीं अनेक कारणें आहेत, व त्यासंबंधांचे जे अनेक प्रश्न आहेत त्यात हा प्रश्न श्रेष्ठ आहे. परंतु याचें उत्तर अगदीं थोडक्यांत आहे. केवळ त्यांचें अज्ञान, हेंच एक उत्तर बस होत आहे. मग हें त्यांचें अज्ञान, या देशांत सर्वच मनुष्यें अज्ञान होतीं म्हणून हेही अज्ञान रहात आले म्हणा, किंवा शहाणे म्हणवीत असतील त्यांनी मुद्दाम यांना मूर्ख ठेविलें आहे म्हणा. दोहींतून एक घडलें असावें, असें मला वाटतें.. शेतकऱ्यांस साधारण प्रतीचें शिक्षण मिळवून देण्याचे कामीं सरकारकडून व या देशातील विद्वान् व धनवान् लोकांकडून लवकर प्रयत्न केले पाहिजेत. तसेंच त्यांच्या मोठाल्या गावीं लहान लहान उद्योगशाळाही सुरू झाल्या पाहिजेत. नाहीं तर एक-दोन पिढय़ांनंतर शेतकरी लोक इतके खालावले जातील कीं, ते आपल्या वतनी गांवांस म्हणजेच वतनी जमिनींस अजिबात मुकून भटकू लागतील! इतर धंद्यांचें ज्ञान नाहीं, सहवास नाहीं, वळण नाहीं आणि त्यासंबंधानें चौकसपणानें कधीं विचारही केला नाहीं; अशा शेतकऱ्यांवर इतर उद्योग करून पोटें भरण्याचा प्रसंग एकाएकीं गुदरल्यावर त्यांच्या हालअपेष्टेस काय पहावयाचें! आणि त्याप्रमाणें त्यांच्या अज्ञानपणामुळे त्यांचीं वतनें परकीय लोकांच्या हातांत जाण्याची सुरवातही जहाली आहे.’’

पुढे ते म्हणतात –

‘‘शेतकीशिवाय इतर धंदे करीत बसल्यास आम्हांस फुरसत मिळणार नाही, रात्रंदिवस शेतकीमध्यें जुंपलेले असतों असे जर कोणी म्हणतील, तर त्यांनाच मी विचारतों की, कित्येक गांवी दररोज, कित्येक गांवी प्रत्येक गुरुवारी, कित्येक गांवी प्रत्येक एकादशीस आपले शेतकरी रात्री तासांचे तास घसा ताणताणून टाळ पखवाजावर अगर ढोलकी तुणतुण्यावर गाणी गाण्यांत पुष्कळ वेळ दवडीत असतात. आणि अशाच कामांत घसे ताणीत व डोळे फोडीत बसण्यास त्यांच्याबरोबर ब्राह्मण लोक, किंवा पारशी लोक असतात काय? तसेंच महिना महिना दोन दोन महिने आपले कित्येक शेतकरी दूरदूरच्या यात्रा करीत फिरतात. तेव्हां त्यांच्याबरोबर ब्राह्मण, किंवा मारवाडी, किंवा पारशी वगैरे लोक फिरत असतात काय? कित्येक वेळां तमाशे होत असतातच, तेव्हां सबंध रात्रीची रात्र पुरुष, स्त्रिया, मुलें अशी हजारों मनुष्यें तिष्ठत कस्ची, उल्हासानें बसलेली असतात काय? त्यांत ब्राह्मणांची, किंवा मारवाडय़ांची किंवा पारशांची मनुष्यें असतात काय? गांवोंगांवचे उरूस यात्रा होऊ लागल्या म्हणजे, आपल्या शेतकरी मनुष्यांच्या झुंडीच्या झुंडी इकडून तिकडे व तिकडून इकडे धांवूं लागतात; तेव्हा त्यांच्याबरोबर ब्राह्मणांची, किंवा मारवाडय़ांची, किंवा पारशांची मनुष्यें धावत असतात काय? किती तरी तो वेळेचा नाश! आणि किती तरी तो फुकट खर्च? अशा निरुपयोगी पुष्कळ प्रकरणांत आपली बरीच शेतकरी मंडळी जुंपलेली असते. यांत नाही कां त्यांचा बराच वेळ खर्च होत? नुसता वेळच खर्च होत आहे असें नाही; बराच पैसा खर्ची पडत असून पुष्कळांना दु:खेंही भोगावी लागत असतात. म्हणून आपले लोकांस इतर धंद्यांत काही वेळ लक्ष्य पुरविण्यास फावणार नाही असें म्हणतां येणार नाही.’’

भालेकरांनी आयुष्यभर सत्यशोधकी विचारांशी निष्ठा राखली. हा विचार तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठीची धडपड त्यांच्या लिखाणात दिसून येते. भालेकरांनी उत्तरायुष्यात लिहिलेले ‘शास्त्राधार’ हे पुस्तकही त्याला अपवाद नव्हते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील हा काही भाग पाहा-

‘‘आजकाल ब्राह्मणवर्गासंबंधाने सर्वत्र सर्वसाधारण एक प्रकारचा तिरस्कार दिसू लागला आहे. कारणांचा विचार केला तर कोणासही या ब्राह्मणविषयक तिरस्काराचा तिरस्कारच वाटेल, आणि त्या न्यायाने मला पण सध्या फैलावत असलेल्या तिरस्काराविषयी वाईटच वाटत आहे. क्रिया-प्रतिक्रिया किंवा आघात-प्रत्याघात या सृष्टिनियमानुसार विचार केला तर उक्त ब्राह्मणी तिरस्काराविषयी, तो करणाऱ्या लोकांस नावे ठेवण्यास ब्राह्मणांस जागाच नाही. कारण त्यांचेविषयी लोकांत पसरलेला अनादर हा काही ढगांतून सर्प पडल्याप्रमाणे अकर्मप्राप्त झालेला नाही. ज्याप्रमाणे त्यांच्याविषयीचा आदर कष्टार्जित आहे, त्याचप्रमाणे अनादरही कष्टार्जित आहे हे विसरता कामा नये.’’

भालेकरांचे हे सारे लेखन ‘म. जोतीराव फुले समता प्रतिष्ठान’तर्फे प्रकाशित ‘कृष्णराव भालेकर समग्र वाङ्मय’ या ग्रंथात वाचायला मिळेल.  आजच्या महाराष्ट्राच्या स्थिती-गतीचा अन्वयार्थ लावण्यासाठी भालेकरांचे साहित्य नक्कीच उपयोगी पडणारे आहे.

prasad.havale@expressindia.com