अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- महादेव बल्लाळ नामजोशी!

मागील काही लेखांपासून आपण निबंधमालोत्तर काळातील, म्हणजेच १८७४ नंतरच्या मराठीतील लिखाणाविषयी जाणून घेत आहोत. या काळात मराठीत लेखक मंडळी आपल्या लिखाणातून विविध विषयांवर व्यक्त होत होती. हे लिखाण मुख्यत: नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असे. ज्ञानप्रकाश, ज्ञानचक्षू, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, अरुणोदय, सूर्योदय यांसारखी वर्तमानपत्रंही या काळात आपला प्रभाव राखून होती. मात्र या वर्तमानपत्रांपेक्षा आपले विचार वेगळे आहेत आणि ते समाजासमोर मांडणे आवश्यक आहे, असे पुण्यातील एका युवकास प्रकर्षांनं वाटत होतं. त्या प्रेरणेतूनच या युवकानं वयाच्या चोविसाव्या वर्षी उद्योगप्रियता व विचारस्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणारं साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केलं. ते सालं होतं १८७७. वर्तमानपत्र होतं ‘किरण’ आणि ते चोवीसवर्षीय तरुण संपादक होते – महादेव बल्लाळ नामजोशी. २६ ऑगस्ट १८७७ रोजी ‘किरण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. इंग्रजी व मराठीतून निघणाऱ्या ‘किरण’मध्ये अग्रलेख, स्फूट सूचना, बातम्या, पत्रव्यवहार, ठिकठिकाणचे वर्तमानसार, व्यापारविषयक माहिती, बाजारभाव, शास्त्रीय व कलाकौशल्याचे विषय, सरकारी नेमणुका, हवामान, स्थानिक घडोमोडी आदी सदरे प्रसिद्ध होत असत. त्यावेळी युरोपात सुरू असलेल्या रशिया-तुर्कस्थान युद्धाच्या बातम्या ‘ताज्या तारा’ या सदरात दिल्या जात होत्या. नामजोशी यांच्या लेखनशैलीचा नमुना म्हणून ‘किरण’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तलेखातील हा उतारा पाहा –

‘‘हल्लीं आम्हांवर करांचा बोजा तर विशेष वाढला आहेच. परंतु मिठावरील कराबद्दलच आम्हांस विशेष वाईट वाटतें. यांचीं कारणें दोन आहेत : पहिलें कारण असें कीं, मीठ ही जिन्नस सर्व अवश्य असल्यामुळें तिजवर बसलेल्या जकातीचा बोजा आम्हांवर बसल्याचें स्मरण हरवक्त होऊन इंग्रज सरकारचें हितचिंतनच करावेसें वाटतें व दुसरें असें कीं, या जिनसेसाठीं आम्हांस इतकीं दु:खें भोगावयास लावून स्वजातबांधवांची पोटें ७७७७! हें आम्हांस वाईट कसें वाटणार नाहीं.

जे अग्री लोक मीठ पिकवितात त्यांस दरमणीं दोन आणे मिळतात व सरकारास त्याच मणाबद्दल पूर्वी १४१३ मिळत होते व ते हल्लीं २।। रुपये मिळतात. ही गोष्ट किती दु:सह आहे हें सांगणें नको. एका सासूची व सुनेची गोष्ट प्रसिद्ध आहे ती अशी कीं, ‘गृहप्रपंचाचे कामाबद्दल सासू-सुनेचा हमेषा तंटा होऊं लागला. तेव्हां आपसांत समज करून दोघींनीं प्रकरण निकालास लावण्याकरितां सर्व कामें निमेनीम वांटून घेण्याचें ठरविलें व ठरावाप्रमाणें दोघी वर्तन करूं लागल्या व कामाची वांटणी होऊं लागली. अन्न सिद्ध करण्याचें काम सुनेकडे सोपवून खाण्याचें काम सासूनें पत्करिलें. एके दिवशीं कांहीं कारणानिमित्त खारका विकत घेतल्या व निमे वांटणी केली ती वरील न्यायानेंच; म्हणजे खारकांवरील मगज सासूने घेऊन आंतील बिया सुनेचे स्वाधीन केल्या.’ तद्वतच हा इंग्रज सरकारचा न्याय आहे.’’

पुण्यातील लोखंडी सामान व कागद व्यापारी केशव साठे यांच्या आर्थिक सहकार्यातून नामजोशी यांनी ‘किरण’ची सुरुवात केली होती. मात्र १८७८ साली सरकारने देशी भाषांतील वर्तमानपत्रांच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालणारा आणलेला कायदा आणि ‘किरण’ची विस्कळीत झालेली आर्थिक घडी यांमुळे लवकरच ते बंद पडलं. ‘किरण’ बंद पडल्याने नामजोशींचं लेखन थांबलं असं मात्र नाही. १८७९ मध्ये त्यांनी ‘डेक्कन स्टार’ हे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. पुढे १८८१ मध्ये चिपळूणकर, टिळक, आगरकर यांनी ‘केसरी’ हे मराठी व ‘मराठा’ हे इंग्रजी पत्र सुरू केलं, आणि नामजोशी त्यांच्यात सामील झाले. नामजोशींचे ‘डेक्कन स्टार’ ‘मराठा’त  विलीन झाल्याची नोंद ‘मराठा’च्या पहिल्या अंकात नमूद आहे. ‘केसरी’ व ‘मराठा’- मध्येही त्यांचे लेखन येत असे. तिथे ते स्थानिक राजकीय घडामोडी व उद्योगविश्वाविषयी लिहीत. शिवाय पुण्याच्या राजकारणात व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कामातही ते विशेष लक्ष घालत.

पुढे ऑक्टोबर, १८८७ मध्ये नामजोशींनी ‘शिल्पकलाविज्ञान’ हे मासिक सुरू केलं. औद्योगिक शिक्षणाला वाहिलेल्या या मासिकाच्या पहिल्या अंकात नामजोशींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यातील हा काही भाग पाहा –

‘‘आपल्या देशांतील उद्योगधंदे बुडालें, आपण भिकारी होऊन बसलों व आजची आपली दुर्दशा झालेली दृष्टीस पडत आहे तीहून पुढें अधिकाधिकच होत जाणार हें आज कोणास सांगावयास नको. प्रत्येकास स्वानुभवानें या गोष्टी आतां कळूं लागल्या आहेत. आपली अशी स्थिती होण्याचीं अनेक कारणें झालीं आहेत. परंतु त्यांपैकीं एक पदोपदीं आपल्या प्रत्ययास येतें. घरीं दारीं बाजारीं जिकडे पाहावें तिकडे पांच पन्नास वर्षांपूर्वी जे पदार्थ आपल्या दृष्टीस पडत होते ते आतां कोठें पडेनासे झाले आहेत; व त्यांच्या जागीं कोठे त्यांच्याहून सुबक, कोठें त्याहून फार स्वस्त, व कोठें त्याहून निराळ्याच रंगारूपाचे असे परदेशी पदार्थ मात्र आपल्या दृष्टीस पडतात. हा सर्व माल विलायतेहून येतो, अशी आमच्या व्यापाऱ्यांची व इतर लोकांची समजूत आहे व तो कां येतो असें विचारलें असतां ‘इकडे इतका सुबक, स्वस्त, व गिऱ्हाईकाच्या डोळ्यांत भरण्याजोगा माल होत नाहीं’ असें तेव्हांच उत्तर मिळतें. ज्या लोकांस परकीय मालाची विक्री करून उपजीविका करावयाची असते त्यांस यापलीकडे विचार करण्याचें कारणच नाहीं. परंतु ज्यांनीं आजपर्यंत स्वदेशी माल तयार करण्यांत आपलें भांडवल खर्चिलें, ज्यांच्या कारखान्यांत आजपर्यंत शेंकडों कारागिरांनीं आपलीं पोटें भरलीं, त्यांस व त्या कारागिरांस आज जो प्रश्न हृद्रोगाप्रमाणें जाचत आहे तो हा कीं, ‘आपला माल विलायती मालाच्या तोडीचा करण्यास कांहीं उपाय आहे काय?’ आतां विलायत या नांवाचा देश कोठें आहे, तेथें राहणाऱ्या साहेब लोकांत काय विशेष कसब आहे, ते कोणत्या विलक्षण यंत्रांनीं आपला माल तयार करतात वगैरे गोष्टींची ज्यांस बिलकूल माहिती नाहीं त्यांस वरील प्रश्नांचें उत्तर कळणें अशक्य आहे. ज्यांस इंग्रजी विद्येच्या अभ्यासानें या प्रश्नाचें उत्तर कळण्याजोगें होतें ते लोक गेल्या पांचपंचवीस वर्षांत या कारखानदार व कारागीर लोकांपासून इतके विभक्त होत गेले कीं, त्यांच्या ज्ञानाचा यांस मुळींच फायदा झाला नाहीं. यामुळें या अल्पकाळांत या प्रश्नाचा फारसा विचार कोणीं न केल्यामुळें व प्राप्त झालेल्या या अनिष्ट परिस्थितीचा प्रतिकार कसा करावा हें कोणास न सुचल्यानें शेंकडों कारागीर भुकेकंगाल होऊन देशोधडीस लागले व शेंकडों कारखानदार आपले कारखाने बंद करून विलायती मालाची दुकानें घालून बसले. जे थोडे कारखाने व कारागीर अद्यापि शिल्लक आहेत ते केवळ देशरिवाजाच्या कांहीं प्रकारच्या निश्चलतेमुळें किंवा विलायती लोकांस त्यांच्या पोटावर पाय आणण्यांत अधिक फायदा वाटत नसल्यामुळें अद्यापि जीव धरून राहिले आहेत. परंतु आज त्यांची जी स्थिति दिसत आहे तीच जर फार दिवस कायम राहिली तर तेही धंदे लौकरच खालीं बसतील असें अनुमान करण्यास हरकत नाहीं.

याप्रमाणें कारखानदार, कारागीर व हरहुन्नर लोकांची स्थिति होणें हें कोणत्याही प्रकारें आपणांस व आपल्या राष्ट्रास इष्ट नाहीं. ज्यांचे कारखाने किंवा व्यापार बुडाले किंवा बुडत आहेत आणि ज्यांची कारागिरी व हरहुन्नर कवडीमोल झाली आहे त्यांस ही स्थिति कदापि समाधान देणार नाहीं हें उघडच आहे. या संकटावस्थेंतून आपलें तारण करण्यास कांहीं उपाय आहे व तो सुसाध्य आहे असें त्यांस कळल्यास त्यांच्या जीवांत जीव येईल हें कोणास सांगावयास नको. परंतु वर सांगितल्याप्रमाणें एतद्देशीय उद्योगधंद्यांची स्थिति होणें हें सामान्य लोकांसही इष्ट नाहीं. ज्या मानानें उद्योगधंदे बंद पडत आहेत त्या मानानें शेतकी, नौकरी, व मजूरी यांकडे लोकांची भर पडत आहे. परंतु या तीनही धंद्यांत लागणारी लोकसंख्या नियमित असल्यानें व त्या नियमापलीकडे ती संख्या आजच गेली असल्याकारणानें दिवसांनुदिवस या धंद्यांत अधिक लोकांची सोय होत नाहींच, उलट वेतन मात्र कमी कमी होत चाललें आहे व एक एक कर्त्यां पुरुषाचे  अंगावर अनेक निरुद्योगी माणसांचा भार पडून सर्वच कंगाल बनत आहेत. दुसरें असें कीं, पूर्वी उद्योगधंद्यांत, कलाकौशल्यांत व बुद्धिमत्तेंत सर्व जगभर प्रतिष्ठा मिळवून एक किंवा अर्धे शतकपर्यंत कांहीं प्रकारें अधिक सुधारलेल्या व सर्व प्रकारें अधिक उद्योगी अशा परदेशीय लोकांशीं गांठ पडतांच आपण गलितवीर्य व निस्तेज व्हावें, आपले सर्व उद्योगधंदे त्यांच्या स्वाधीन करून आपण त्यांच्या तोंडाकडे पाहात बसावें व पारतंत्र्य आणि सेवा यांवांचून अधिक योग्यतेच्या कर्तव्यास आम्ही पात्र नाहीं असें आपण सर्व जगास  दाखवावें याहून अधिक लाजिरवाणी गोष्ट ती कोणती? शेतकी, नौकरी, व मजूरी यांतच जर आम्ही आपल्या जीविताचें साफल्य मानूं तर धिक्  आमचें जिणें, धिक्  आमची बुद्धिमत्ता, आणि धिक्  आमचें ज्ञान. आर्यवंशाच्या या आमच्या शाखेचें सिद्दी वगैरे रानटी लोकांवरही थोडें तरी महत्त्व राहण्यास आपणांस ज्ञानांत, उद्योगांत, व कलाकौशल्यांत इतर सुधारलेल्या देशांशीं कांहीं तरी बरोबरी केली पाहिजे.

ज्या परदेशास आमचे कारखानदार, व्यापारी, व कारागीर विलायत असें म्हणतात तो एकच देश नसून ते अनेक देश आहेत; व त्यांतला एकही देश आमच्या हिंदुस्थानाएवढा नाहीं. त्यांतले बरेच देश आमच्या मुंबई इलाख्याहूनही लहान आहेत आणि त्यांत एकही असा देश नाहीं कीं जो आपला सर्व पराक्रम शेतकीवर खर्च करून वस्त्रपात्राकरतां इतर देशांच्या तोंडाकडे पाहात बसला आहे. बेल्जम, स्वित्झरलंड, वगैरे देश आमच्या एकाद्या जिल्ह्य़ाएवढेही नसून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका यांशीं कांहीं व्यापारांत व उद्योगधंद्यांत टक्कर मारीत आहेत. आमच्या पूर्वेकडील जपानही पाश्चिमात्य ज्ञानाचा व यंत्रसाधनांचा उपयोग करून उद्योग व व्यापार यांत उत्कर्षांस  व स्वातंत्र्यदशेस येत आहे. या सर्व गोष्टी ध्यानांत आणिल्या असतां उद्योगधंद्यांत ज्यांची बरोबरी करण्याची आम्ही आकांक्षा बाळगीत आहोंत ते कोणी अमानुष पुरुष आहेत असें मानण्याचें कोणत्याही प्रकारचें कारण नाहीं. आपणांस त्यांचें ज्ञान, त्यांचें शिल्प, त्यांच्या कला व त्यांचें कौशल्य हीं मिळविलीं पाहिजेत. कारण या त्यांच्या साधनांशिवाय त्यांच्या बरोबरीस येणें हें आम्हांस अशक्य होणारें नाहीं. पाश्चात्य पद्धतीने कारखाने चालण्यास या सर्व साधनांखेरीज आणखी एक साधन म्हणजे भांडवल लागतें हें खरें आहे. आजपर्यंत उद्योगधंद्यांत आपण अज्ञानी व स्तब्ध राहून दारिद्र्यांत येऊन पोहोंचलों व आतां भांडवल पुष्कळ अंशीं नाहींसें झाल्यावर आपण सावध होत आहों हेंही खरें आहे. पण याप्रमाणें सावध होऊन आपले उद्योगधंदे पुन्हां सावरण्याची अद्याप संधि गेलेली नाहीं व जें थोडें भांडवल अद्यापि शिल्लक राहिलें आहे तेंच जर अर्थशास्त्राच्या ज्ञानाच्या विशेष प्रसारानें प्रसंगीं बेताबेतानें एकवट होत जाईल तर कोणत्याही प्रकारें निराश होण्याचें कारण नाहीं.’’

केवळ मासिक काढून नामजोशी थांबले नाहीत. पुढच्याच वर्षी त्यांनी पुण्यात एक औद्योगिक प्रदर्शन व परिषदही भरवली. पुढे १८८९, १८९० व १८९२-९३ सालीही अशा परिषदा त्यांनी आयोजित केल्या. नामजोशींच्या या साऱ्या कार्याची व त्यांच्या लेखनाची माहिती देणारं ‘महादेव बल्लाळ नामजोशी यांचें चरित्र’ हे गणेश महादेव नामजोशी यांनी १९४० साली लिहिलेलं पुस्तक उपलब्ध आहे. ते आवर्जून वाचायला हवं. त्यात ‘खटपटी आणि दीर्घ व्यासंगी’ असं नामजोशींचं वर्णन केलं आहे, ते अगदीच सार्थ आहे.

प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com