गेल्या आठवडय़ात आपण पंडिता रमाबाई सरस्वती यांच्या लेखनशैलीविषयी जाणून घेतले. १८८२ साली त्यांचे ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांचे ‘इंग्लंडचा प्रवास’ हे प्रवासवर्णनपर पुस्तकही प्रसिद्ध झाले. याच काळात लिहिल्या गेलेल्या आणखी एका प्रवासवृत्ताविषयी आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. ते प्रवासवृत्त म्हणजे ‘माझा प्रवास – १८५७ च्या बंडाची हकीकत’! खरे तर हे पुस्तक म्हणजे प्रवासवृत्त, इतिहास व आत्मकथन यांच्या सरमिसळीतून लिहिले गेले आहे. ते लिहिण्याचा काळ आहे १८८३ च्या सुमारासचा. परंतु त्यात ज्या कालखंडाविषयी लिहिलेय, तो आहे १८५७ ते १८६० दरम्यानच्या इनमिन तीन वर्षांचा. आणि त्याचे लेखक आहेत- विष्णुभट गोडसे.
विष्णुभट गोडसे हे पेण तालुक्यातील वरसई गावचे. पेशवाईत त्यांच्या कुटुंबीयांकडे पौरोहित्य व प्रशासकीय जबाबदारी होती. मात्र पुढील काळात कर्जबाजारी होऊन या कुटुंबास आर्थिक हलाखीच्या स्थितीस तोंड द्यावे लागले. त्यामुळे १८५७ च्या सुमारास ग्वाल्हेरच्या राणी बायजाबाई शिंदे या सर्वतोमुख यज्ञ करणार असल्याचे तेथील आप्तांकडून विष्णुभटांना कळताच ते अर्थार्जनासाठी आपल्या काकांबरोबर ग्वाल्हेरला जायचे ठरवतात. आणि त्यांचा उत्तर भारताच्या दिशेने प्रवास सुरू होतो. या प्रवासाचे वर्णन म्हणजेच गोडसे भटजींचे हे पुस्तक. ते लिहितात :
‘‘आम्ही पुढे चालते झालो तो दिवस शके १७७८ कालयुक्तनाम संवत्छरी माहे फाल्गुन व।। ५ मन्दवार. त्या दिवशीं खोपवली मुक्कामीं धर्मशाळेत वस्ती केली. तेथे जेवणे करून पहाटेस गाडीसह घाट चढोन मुक्काम दर मुक्काम करीत शहर पुणे येथे पोहोचलो. वरसईची गाडी भाडय़ाची होती ती परत पाठविली. त्या गाडीवानाबराबर तीर्थरूपास पत्र सविस्तर मजकुराचे देऊन मुगटा घरी पाठविला व पुण्यात पायजमा व आंगात घालण्याकरिता बंडी व रूमाल वगैरे सरंजाम केला व फराळाचे बराबर करून घेऊन कर्वे कुटुंबास सु।। व आम्ही दोघे व कर्वे याणी वाटेने जेवण करण्याकरिता घेतलेली बाई व कर्वे यांची आठ वर्षांची मुलगी इतकी माणसे एक ठिकाणी जेवणे राहणे होते. पुण्यात एक गाडीची ब्राह्मणांची सोबत लागली होती. असो. पुण्यास भाडय़ाची गाडी इंदूपर्यंत ठरावाची करून चैत्र शु।। ३ रोजी शहर पुणे सोडून वाघोली मुक्कामी गेलो..’’
अशा प्रकारे वाघोली, नगर, धुळे, सातपुडा असा प्रवास करत ते महूला येऊन पोहोचतात. तेथे त्यांची १८५७ च्या बंडात सामील झालेल्यांशी गाठ पडते. त्यांच्याशी गोडसे भटजींचे बोलणे होते. त्याविषयी त्यांनी लिहिलेली आठवण अशी :
‘‘ते दिवशी त्या बंगल्यात उतारू कोणी नव्हते. परंतु दोन असामी पलटणी शिपाई लोक उतरले होते. ते मुंबईस जाऊन आपले देशी जाणारे पाहून त्याजपाशी पानसुपारी खाण्याचे इराद्याने आम्ही दोनचार असामी जाऊन बसलो. देशान्तरी वगैरे चोहीकडील गोष्टी सांगत होतो. तेणेकरून त्या शिपायांचा स्नेह विशेष जाहला. नंतर त्या शिपायांनी आम्हास असे सांगितले की, आजपासून तिसरे दिवशी पृथ्वीवर राजक्रांती होणार. मारामारी लुटालुटी होईल, यात संशय नाही. त्यापेक्षा आम्हास असे वाटत आहे की, तुम्ही सर्व लोक आपले देशी परत जावे. असे आम्ही ऐकितांच, तुम्ही सांगितले हे सर्व खरे आहे तर आपण मेहेरबानीने आपल्यास ज्या खऱ्या बातम्या लागल्या असतील त्या आम्हास कळवाव्या. ते समयी ते सिपाई बोलूं लागले. एक सिपायाचे वय ५० सीचा सुमार होता व एक ३५ चा सुमार होता. दोहोंपैकी वृद्ध सिपाई याणे बोलण्यास आरंभ केला. इंग्रज सरकार आजदिनापर्यंत राज्य चांगल्या रीतीने करीत आले. परंतु थोडे दिवसावर सरकारची बुध्धी नष्ट जाहाली आहे. कारण गुदस्त साली म्हणजे पाचचार महिन्यावर सुमारे विलायतेकडून काही चमत्कारिक बंदुका म्हणजे कडामिनी, तुबुक अशा तऱ्हेच्या हिंदुस्थानात पाठविल्या. त्या बंदुकास गोळी सुमारे जांभळा एवढी लागते. त्याही गोळ्या विलायतेहून इकडे आल्या, त्या बंदुका व गोळ्या पाहून सिपाई लोकांस आनंद जाहला. कारण पहिल्या बंदुकापेक्षा दोनसे कदम गोळी जास्त जात्ये. याकरिता सर्व हिंदुस्थानात बंदुका वाटल्या गेल्या व त्या बंदुकाककरिता काडतुसे तयार विलायतेस करून इकडे सर्व छावण्यांतून पाठविली. ती काडतुसे दातांनी तोडून कार्य करावे लागते. हिंदुस्थानात कलकत्त्यापासून चार कोसावर दमदम म्हणून जे छावणीचे मोठे ठिकाण आहे, तेथे काडतुसे करण्याचा कारखाना सुरू केला आहे. तेथे येक गोष्ट अशी घडली की, कोणी एक ब्राह्मण सिपाई येके दिवशी येका तळ्यावर पाणी भरीत होता, तेथे एक चांभार येऊन त्याजपासी त्याचा लोटा पाणी प्यावयास मागू लागला. तेव्हा ब्राह्मण सिपाई याणे त्याला सांगितले की, मी जर आपला लोटा तुजपासी दिला तर तो विटाळेल, म्हणोन तो माझ्याने देववत नाही. ते ऐकून तो चांभार त्यास म्हणाला अहो, तुम्ही जात जात म्हणोन फार उडय़ा मारू नका. आता जी नवी काडतुसे करीत असतात, त्यास गाईची व डुकराची चरबी लावितात. आणि ती चरबी स्वता आपले हातानी काढून देतो. आणखी ती काडतुसे तुम्हाला दातांनी तोडावी लागणार, मग तुमचे सोंवळे ते कोठे राहिले. उगाच रिकामा डौल कशास पाहिजे. असे होता होता दोघे हातपिटीस आले. त्यांची मारामार चालली तेव्हा आसपासचे लोक बहुत जमले. त्यानी झालेला वृत्तांत ऐकिला. त्यासमयी पलटणी सिपाईही बहुत जमले होते. ही काडतुसे धर्माला नष्ट करणारी आहेत, असी खबर थोडय़ाच अवकाशात सर्व लोकांस कळली. ते समयी हिंदुंनी असा विचार मनांत अणिला कीं, आपल्यास परमदैवत गाई आहे. तिची चरबी काडतुसाबरोबर आपले तोंडात जाणार आणि आपले हातून महत्पाप घडणार. असे हिंदूस वाटून कोपायमान जाहाले. ह्य़ाच्या उलट कारण मुसलमानाकडे होते. म्हणजे ते डुकरास इतके नीच व अपवित्र समजतात कीं ते त्याचे नुसते नांव देखील घेत नाहीत. त्या डुकराची चरबी काडतुसाबरोबर आपले दातांस लागणार असे जेव्हा त्यास कळले तेव्हा ते अतिशय तप्त जाहाले. याप्रकारे करून सरकारच्या पलटणीमध्ये गवगवा जाहाला. सरकार आपणास युक्तिप्रयुक्तीने किंवा सक्तीने ख्रिस्ती करणार असे त्यांच्या मनांत बिंबून स्वधर्म-संरक्षणाचा विचार करून लागले. काडतुसाबा सर्व हिंदूस्थानात पलटणी लोकांस समजले. जेथे छावणी होती तेथे तेथे मुख्याधिकारी यास काडतुसे आम्ही घेत नाही म्हणोन सर्वानी सांगितले.. काळ्या शिपायांमध्ये जिकडे तिकडे काडतुसाच्या गोष्टी चालल्या आणि सिपाई लोकांची अंत:करणे संशयानी भरून गेली.’’
पुढे ते ग्वाल्हेरला पोहोचतात. तेथे आल्यावर आधी ठरलेला भव्य यज्ञ रद्द झाल्याचे त्यांना कळते. तरीही काही काळ तेथे राहून पुढे ते झाशीला प्रयाण करतात. तेथे झाशीच्या राणीचा त्यांना उदार आश्रय त्यांना मिळतो. मार्च, १८५८ मध्ये जनरल ह्य़ु रोझ झाशी काबीज करतो, तेव्हा गोडसे भटजी तिथेच असतात. या काळात तेथे जे जे पाहिले त्याचे वर्णन त्यांनी केले आहे. प्रवासी म्हणून विविध बारकावे टिपणारी त्यांची तीक्ष्ण नजर येथे जाणवते. झाशी शहराचे वर्णन करणारा हा उतारा वाचल्यास त्याचा प्रत्यय येईल :
‘‘.. या शहरची वस्ती फार दाट आहे. रस्ते सपाट, सडका बांधीवही काही काही आहेत. हलवाईपुरा व व कोष्टीपुरा चांगला आहे. या शहरात लोक सर्व प्रकारचे कसबी हुशार असून सावकारी वगैरे व्यवहारास सचोटीने पतीने वागण्याची रीत आहे. दक्षणेत पुणे व उत्तरेस झासी असा म्हणण्याचा पाठ आहे. या शहराची रीतभात फार चांगली आहे. सर्व हिंदुस्थानात गालिचे वगैरे वस्त्रे व पितळी उपकर्णी वगैरे भांडी इथे जसी घडली जातात असी कोठेही होत नाहीत. तसीच कागदावर वगैरे चित्रे जी काढितात तसी चित्रे जयपुराकडे मात्र निघतात, बाकी कोठे असी चित्रे निघत नाहीत. सर्व प्रकारे या शहरात लोक कारागीर कसबी आहेत. शहरात कोठेकोठे जागा विस्तीर्ण आहेत. त्यात फुलेझाडे लाऊन लहान लहान बागाही आहेत. भिडे यांचा बाग शहरात मध्यभागी असून भोवताली तट चांगला आहे. आत विहिरी पाच चार आहेत. शहरात चार चौकी वाडय़ाचे काम सरकारी आहे, तोही वाडा जुनाच आहे. सरकारी वाडय़ापुढे मैदान बहुत असून जागा सपाट आहे. याखेरीज सरकारी बाराद्वारी म्हणजे फौजदारी कामे होण्याकरिता जागा बांधिली आहे. ती जागा फार चांगली आहे. तशाच चौक्याही बांधीव बऱ्याच आहेत. बाजार सराफा बांधीव व्यवस्थित वसविला आहे. दक्षणी ब्राह्मणांची घरे सुमार २०० दोनसेपर्यंत होतील. या शहरास बहुधा धाबे नाही, कारण विंध्याचळ पर्वत जवळ असल्याकारणाने पज्र्यन्य बराच आहे. सबब सर्व वस्तीस खपरेल म्हणजे कौलारू घरे वाडे आहेत. काही काही गच्याही आहेत. बहुत करून मजल्याशिवाय घरे वाडे नाहीत. या शहरात पाणी फार आहे. जेथे खणावे तेथे साहा हातापासून आठ हात खणले म्हणजे पाणी महामूर लागते. सर्वाचे घरोघर विहिरी आहेत. शहराचे दक्षणेस दरवाज्याबाहेर मोठा तलाव आहे. त्या तलावातही दक्षण बाजूवर महालक्ष्मी देवीचे देवालय आहे. ही देवी झासीवाले यांची कुळस्वामीण असल्यामुळे पूजेचा वगैरे बंदोबस्त चांगला ठेविला आहे. नंदादीप चौघडाही तेथे आहे. देवालय बहुत खर्च करून बांधिले आहे. देवळाजवळ धर्मशाळा वगैरे इमारतीही काही बांधिल्या आहेत. आषाढापासून चैत्रपर्यंत देवीचे दर्शनार्थ जाणे जाहाल्यास नावेत बसून जावे लागते. चैत्रापुढे पायरस्ता थोडा होतो. शहराचे पूर्व बाजूवर मोठे मैदान आहे. शहरात दक्षण बाजूकडे किल्याचे आंगास नैॠत्य कोपऱ्यावर पाण्याचा चोपडा म्हणजे हौद आहे. पाणी महामूर आहे. या शहराबाहेर चारी आंगास मैदाने मोठी मोठी आहेत. शहरात गणपती, विष्णु, सिव, देवी, हनुमंत वगैरे देवांची देवालये बरीच आहेत. सर्व देवास नंदादीप नैवेद्याबो सरकारी नेमणुका आहेत. या शहराची रीत काही पुण्यासारखी आहे. बहुधा सर्व लोक सकाळी स्नाने करून मग सर्व व्यवहार पाहाण्याची रीत आहे. शहराभोवती बागा विशेष नसता बाजारात भाजीपाला स्वस्त आहे.’’
झाशीवरील रोझच्या आक्रमणानंतर गोडसे भटजी काल्पीला पलायन करतात. परंतु ते नगरही रोझ काबीज करतो. तेथून मग गोडसे भटजी उत्पन्नाच्या शोधात चित्रकूटला जाण्याच्या दिशेने निघतात. काही काळ तात्या टोपे यांच्या लवाजाम्यात सामील होत, पूर्व राजस्थानात फिरून ते १८५८ च्या अखेरीस बुंदेलखंडात परत येतात. येथे ते प्रयाग, बनारस, अयोध्या अशा तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन १८६० च्या सुरुवातीला आपल्या गावी परततात.
पुढे तब्बल २४ वर्षांनी, म्हणजे १८८३ मध्ये इतिहासकार चिंतामणराव वैद्य यांच्या आग्रहाखातर त्यांनी या थरारक प्रवासाचा अनुभव लिहून ठेवला. या मूळ मोडीतील मजकुराचे केलेले लिप्यंतर संपादित करून वैद्य यांनी ते १९०७ साली प्रकाशित केले. वैद्य यांच्याकडील मूळ मोडी हस्तलिखिते त्यांनी १९२२ साली भारत इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्द केली. पुढे १९४९ साली न. र. फाटक यांची प्रस्तावना जोडून या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. या आवृत्तीत मूळ मजकुरात वैद्य यांनी केलेल्या बदलांकडे फाटक यांनी लक्ष वेधले. पुढे १९६६ साली दत्तो वामन पोतदार यांनी मूळ असंपादित मोडी हस्तलिखिताचे देवनागरीत प्रतिलेखन करून नवी आवृत्ती व्हीनस प्रकाशनातर्फे प्रकाशित केली. या तीनही आवृत्ती आपण वाचाव्या, तसेच अगदी अलीकडे २००७ साली या पुस्तकाला १०० वर्षे व १८५७ च्या लढय़ाला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मृणालिनी शहा संपादित व राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आवृत्तीही वाचावी.
संकलन – प्रसाद हावळे
prasad.havale@expressindia.com