अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी-प्रो. विष्णु गोविंद विजापूरकर!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील लेखात आपण इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. त्यांनी जानेवारी १८९४ मध्ये ‘भाषांतर’ हे मासिक सुरू केले. त्यानंतर तीनच महिन्यांनी कोल्हापुरात प्रो. विष्णु गोविंद विजापूरकर यांनी ‘ग्रंथमाला’ हे मासिक सुरू केले. खरे तर, ‘भाषांतर’ मासिक संयुक्तपणे चालवण्याचा प्रस्ताव राजवाडे यांनी विजापूरकरांना दिला होता. परंतु विजापूरकरांच्या कोल्हापूरमधील सहकाऱ्यांना हा प्रस्ताव न पटल्याने त्यांनी स्वतंत्रपणे ‘ग्रंथमाला’ सुरू केले. १८६३ मध्ये जन्मलेले विजापूरकर हे राजवाडे यांना सर्वार्थाने समकालीन. इतिहास व भाषा हे राजवाडे यांच्या आस्थेचे विषय, तर स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षण हे विजापूरकरांच्या. १८८० साली मॅट्रिक व पुढे १८८६ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून बी.ए. पदवी घेतलेल्या विजापूरकरांनी पुढे अध्यापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये संस्कृत व इंग्रजीचे अध्यापन ते करू लागले. या काळात विजापूरकरांच्या पुढाकाराने ‘राजा रामियन क्लब’, ‘दी सदर्न बँक’, ‘सहकारी भांडार’ यांसारख्या संस्था कोल्हापुरात स्थापन झाल्या. तिथल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी ‘ग्रंथमाला’ सुरू केले. ‘ग्रंथमाला’च्या उद्देशाविषयी विजापूरकरांनी पहिल्या अंकात लिहिले होते-

‘‘हिंदुस्थान देशास कधींतरी चांगलें दिवस येणार असतील तर ते तेथील लोक अज्ञानांत राहून खचीत येणार नाहींत. त्यांच्यांत सत्यज्ञानाचा प्रसार होऊन त्यांची वेडगळ समजुतीपासून सुटका झाली पाहिजे. आज त्यांच्यांत जे गुण दिसत नाहींत तें गुण आले पाहिजेत. दृढ इच्छा, अचल निश्चय, व्यावहारिक कार्यदक्षता, चिरस्थायी क्लेशसंहत्व, अव्याहत उद्योग, विचारपूर्वक साहस, ‘न भंगें प्रसंगीं’ असें धैर्यबल, कर्तव्यपरायणता, स्वावलंबन, स्वहितत्याग, स्वत्वविस्मृति, परस्परविश्वास इत्यादि गुणांचा जिकडे तिकडे प्रादुर्भाव झाल्याशिवाय आमचें नष्टचर्य ढळणार नाहीं, व हें गुण उत्पन्न होण्यास ज्ञानप्रसाराशिवाय दुसरा गुण नाहीं.’’

ज्ञानप्रसाराचा उद्देश समोर ठेवूनच ‘ग्रंथमाला’ सुरू झाले. त्यात ऐतिहासिक साधने व संशोधनपर वाङ्मय, पुस्तक परीक्षणे प्रकाशित होते. राजवाडे यांच्या ‘मराठय़ांच्या इतिहासाची साधने’चे २, ३, ५, ६ व ८ असे पाच खंड त्यांनी ‘ग्रंथमाला’मधून प्रसिद्ध केले. हे विजापूरकर यांचे काम महत्त्वाचे. त्याशिवाय ‘ग्रंथमाला’मधून इंग्रजी ग्रंथांची भाषांतरे व इतर महत्त्वाचे ग्रंथ क्रमश: प्रसिद्ध होत असत. ‘युरोपचे संक्षिप्त इतिवृत्त’, ‘राणीच्या राज्याचा इतिहास’, ‘जगातील क्रांतिकारक लढाया’, ‘मराठय़ांच्या सत्तेचा उत्कर्ष’, ‘मराठी भाषेचे स्वरूप’ असे काही लक्षणीय ग्रंथ त्यातून प्रसिद्ध झाले. विजापूरकरांनी अनेक लेखकांना त्यातून लिहिते केले. विजापूरकरांनीही त्यात विपुल लिहिले. त्यांच्या एका लेखातील हा उतारा पाहा-

‘‘विश्वसाम्राज्य आणि मानवी ऐक्य या कल्पना ऐकावयास फार चांगल्या, परंतु आंतरराष्ट्रीय हिताहिताच्या आणि साम्राज्यवर्धिष्णु राष्ट्रांच्या अन्यायमूलक तृष्णेचा विचार करितां विश्वैक्य व विश्वप्रेम या कल्पना आणखी कांहीं शतकेंपर्यंत तरीं मृगजलवत् अशाच भासणार असें दिसतें. सर्व मानवजातीचें एक राज्य- ज्याला विश्वसाम्राज्य अशी संज्ञा देणें उचित होईल- तयार होईपर्यंत देशाभिमानापेक्षां अधिक व्यापक व अधिक उदात्त वृत्ति आजला तरी शक्य नाहीं ही गोष्ट कबूल पडेल. अधिक मोठय़ा संख्येचें कल्याण साधण्यासाठीं कमी संख्येच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करावयाचें हा मनोवृत्तीच्या उदात्त तत्त्वाचा निकष किंवा कस होय. कुटुंबासाठीं व्यक्ति, गांवासाठीं कुटुंब, प्रांतासाठीं गांव व देशासाठी प्रांत अशा रीतीनें त्यागाची तयारी असावी ही गोष्ट कोणासही कबूल पडेल. त्याग म्हणजे कष्टाशिवाय होणार नाहीं. परंतु ते कष्ट सोसण्यास तयारी असणें यांतच उत्तम नागरिकत्व आहे.’’

तब्बल १४४ अंक प्रसिद्ध करून एका तपानंतर- १९०७ साली ‘ग्रंथमाला’ बंद पडले. ‘ग्रंथमाला’ला विषयांची एक चौकट होती. सार्वजनिक विषयांवर लिहिण्यास ती चौकट अडथळा ठरू लागली, तसे विजापूरकरांनी १८९८ च्या जुलैमध्ये ‘समर्थ’ हे इंग्रजी-मराठी वर्तमानपत्र सुरू केले. संस्थानी राजकारण, वाङ्मय, राष्ट्रीय शिक्षण अशा विषयांवर त्यात लेख येत. ‘समर्थ’च्या पहिल्या अंकात विजापूरकरांनी लिहिले होते-

‘‘पत्रकर्ते म्हणजे राजा व प्रजा या दोन पक्षांचा सलोखा करून देणारे मध्यस्थ होत; राजकर्त्यांचे हेतु प्रजाजनांस व प्रजेचीं सुखदु:खें आणि गाऱ्हाणीं राज्यकर्त्यांस कळवून दोन्ही पक्षांस सुख होईल अशा रीतीनें राज्यशकट सुरळीतपणें चालविण्याची फार मोठी जबाबदारी पत्रकर्त्यांच्या शिरावर आहे. व एवढी मोठी जबाबदारी ते बजावतात, म्हणूनच त्यांस राजा, बडे लोकांची सभा, व प्रतिनिधींची सभा यांप्रमाणें राज्याचा चवथा आधारस्तंभ असें इंग्लंडांत समजतात. पत्रकारांचा सुधारलेल्या राष्ट्रांतहि इतका दरारा आहे कीं, त्यांनी एखाद्या गोष्टीविषयीं आपली नापसंती दर्शविली कीं, राजा असो, कीं प्रधानमंडळ असा, त्यांनाच नमतें घ्यावें लागतें. राजा व प्रजा या दोन तटांमध्यें समता राखण्यापेक्षांहि अधिक महत्त्वाचें म्हणजे लोकसमाजास सुशिक्षित करून त्यांच्या आचारविचारांस चांगलें वळण लावण्याचें काम पत्रकर्त्यांच्या हातीं आहे.’’

‘समर्थ’ वर्तमानपत्र नऊ वर्षे सुरू राहून १९०८ मध्ये बंद पडले. दरम्यानच्या काळात, १९०६ सालच्या एप्रिलमध्ये वा. म. जोशी यांच्या सहकार्याने ‘विश्ववृत्त’ हे नवे मासिक विजापूरकरांनी सुरू केले. केवळ २१ अंक निघालेल्या या मासिकात तत्कालीन बऱ्याच विद्वानांचे लेखन प्रसिद्ध झाले. ‘विश्ववृत्त’च्या पहिल्या अंकात विजापूरकरांनी लिहिले होते-

‘‘राष्ट्रभाषेचा व राष्ट्रोदयाचा फार संबंध आहे व पूर्वजांनीं जतन करून ठेवलेली वाङ्मयरूपी ठेवा गमावणें म्हणजे एक घोर पातक आहे. प्रत्येक राष्ट्रानें अनादि कालापासून केलेल्या कामगिरीचें प्रतिबिंब राष्ट्राच्या वाङ्मयांत जसें दृष्टीस पडतें व त्याच्या इतिहासाचे यथार्थ ज्ञानास वाङ्मयाचें जसें साहाय्य होतें व त्याच्या पुढील प्रवृत्ति कळून येणें वाङ्मयापासून जसें सुलभ होतें तसें दुसऱ्या कशानेंहि होत नाहीं. राष्ट्रास जें वळण लागतें तें राष्ट्रांतील वाङ्मयानेंच लागतें.’’

पुढच्याच अंकात ते लिहितात-

‘‘ग्रंथकर्तृत्वाच्या दिशेचा विचार करितां एक महत्त्वाची व अत्यंत जरूरीची गोष्ट लक्षांत येते. तिचाही उल्लेख करणें जरूर आहे. आपणांस परमेश्वरकृपेंकरून इंग्रजी भाषा बरीच चांगली येते व त्यामुळें इंग्रजी ग्रंथ व वर्तमानपत्रांतले लेख वाचतां येतात. त्यांच्या वाचनानें माझ्या मनावर एक गोष्ट बिंबली आहे ती ही कीं, आमच्या विषयीं लिहितांना इंग्रज लेखकांची समबुद्धि कायम राहत नाहीं. कित्येक वेळां निवळ अज्ञानामुळें गैरसमज होऊन त्यांच्याकडून भलभलतीं विधानें केलीं जातात. ही गोष्ट आमच्या संबंधानें जशी होते तशीच इतर राष्ट्रांविषयींहि लिहितांना झालीच पाहिजे. स्वत:ची माहिती स्वत:स जशी प्राय: पूर्णपणे असते तशी दुसऱ्याची नसते. आपल्याहून निराळ्या संस्था व संप्रदाय ज्या लोकांत आहेत त्यांच्या स्थितीची व विचारांची तंतोतंत कल्पना करणें म्हणजे सर्वथा आपण तद्राष्ट्रीय बनून लिहिणें किंवा बोलणें शक्य होत नाहीं. यामुळें आपल्या लेखांत व भाषणांत गौणपणा येतो ही गोष्ट कबूल करणेंदेखील कित्येकांस आपल्या अभिमानास कमीपणा आणणारें आहे असें वाटतें. परंतु ज्या आम्हांस या पक्षपाताचा किंवा कल्पनादौर्बल्याचा अनुभव आला आहे, त्यांनीं सर्व जगाविषयीं माहिती मिळवावयाची ती इंग्रजांच्याच द्वारानें सदैव मिळवून संतुष्ट कां रहावें? फ्रेंचांविषयीं, जर्मनांविषयीं, रशियनांविषयीं माहिती त्यांच्या त्यांच्या देशांत जाऊन जरी झाली नाहीं तरी खुद्द त्यांच्या त्यांच्या भाषा शिकून मिळविली पाहिजे. शिवाय इंग्रज यांच्याविषयीं ते काय म्हणतात हेंही कळून येण्याचें आपणांस साधन असलें पाहिजे. म्हणून परक भाषांचें अध्ययन व तद्वारां त्या त्या लोकांच्या माहितीनें आपलें राष्ट्र बहुश्रुत करण्याचें काम ग्रंथकारांचें आहे..

परखंडीय भाषेविषयीं बोलतांना व लिहितांना साक्षात् ज्ञानाची इतकी जरूरी भासते तर स्वखंडीय व स्वदेशीय भिन्न भिन्न भाषांच्या ज्ञानाची आवश्यकता केवढी आहे हें सांगणें नकोच.. हिंदी भाषा आपल्या देशात मोठय़ा भागांत बोलण्यांत येते यामुळें युरोपांत फ्रेंच आहे त्याप्रमाणें सर्वाच्या व्यवहारास ती उपयोगी पडेल असा सुमार आहे. परंतु हें कामसुद्धां ग्रंथकारांच्या मर्दुमकीवर अवलंबून आहे. हल्लीं हिंदुस्थानचें एकराष्ट्रीभवन जोरानें होण्याचा रंग आहे. प्रत्येक भागांत सर्व प्रमुख देशभाषांचा अभ्यास सुरू होईल.. इतर भाषांतील ग्रंथकारांपेक्षां मराठी ग्रंथकार अधिक योग्यतेचे ठरले तर मराठी भाषेचाच अभ्यास चोहोंकडे वाढेल. नामांकित ग्रंथ झाला म्हणजे तो वाचण्याची इच्छा सहजच होते.सारांश दुसऱ्या भागांत आपल्या हिंदु व मुसलमान बंधूंचे विचार काय चालले आहेत हें कळून घेण्यासाठीं व आपल्या ग्रंथांत त्यांचें प्रतिबिंब पाडण्यासाठीं कांहीं ग्रंथकारांनीं आपल्या देशांतील इतर भाषांचे अध्ययन करून तिकडील भांडारांचीं द्वारें आपल्या महाराष्ट्र वाचकांस खुलीं करून दिलीं पाहिजेत.’’

हे सर्व सुरू असतानाच, १९०५ साली विजापूरकरांनी नोकरीचा राजीनाम दिला व जून, १९०६ मध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करत ‘समर्थ विद्यालय’ सुरू केले. १९१० मध्ये सरकारने ही शाळा बेकायदा ठरवल्यामुळे ती बंद पडली. परंतु हार न मानता, १९१८ मध्ये विजापूरकरांनी ‘नवीन समर्थ विद्यालया’ची स्थापना केली. विजापूरकरांच्या राष्ट्रीय शिक्षणाविषयीच्या गृहितांबद्दल मतभेद होऊ शकतात. मात्र तरीही अखंड धडपड व मूलभूत विचार मांडण्याचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. ते जाणून घेण्यासाठी रामचंद्र गोविंद कानडे यांनी लिहिलेले ‘प्रो. विष्णु गोविंद विजापूरकर- चरित्र, कार्य व आठवणी’ हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

संकलन प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prof vishnu govind vijapurkar