अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- रघुनाथ भास्कर गोडबोले!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवडय़ात आपण ‘सूपशास्त्र’ या मराठीतील पाककलेवरील पहिल्या पुस्तकाविषयी जाणून घेतले. सूपशास्त्र १८७५ साली प्रकाशित झाले. त्याच्या पुढच्याच वर्षी मराठीतील पहिला चरित्रकोश प्रसिद्ध झाला. तो कोश म्हणजे-‘भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश’ आणि त्याचे कर्ते होते रघुनाथ भास्कर गोडबोले. चरित्रपर माहिती, इतिहास, त्यावरील भाष्य असे काहीसे संमिश्र स्वरूप या कोशाचे होते. निबंधमाला सुरू होण्याच्या आधी मराठीत इतिहासपर ५० पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यानंतरच्या पाव शतकात इतिहासविषयक ११० पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यात गोडबोले यांच्या कोशाचे स्थान अनन्यसाधारण होते. चरित्रकोश ही संकल्पना मराठीत रुजवण्याचे श्रेय गोडबोले यांच्याकडे जाते. या कोशाच्या प्रस्तावनेत त्यांनी कोशाच्या स्वरूपाविषयी लिहिले आहे. त्यातील हा भाग पाहा-

‘‘या ग्रंथाचे नांव भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश असें आहे. याचा अर्थ असा होय कीं, भरत वर्षांत पूर्वी आपणामध्यें जे जे प्रख्यात लेक होऊन गेले त्यांचा, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या, तसेच त्या देशांतील नद्या व पर्वत इत्यादिकांसहित, त्यांच्या जन्मापासून मरणापर्यंत जो इतिहास तो. यांत ज्या ज्या नांवावर जो जो इतिहास आहे, तो तो, समग्र लिहिण्याचें हें स्थळ नसल्यामुळें त्याचा त्याचा दर्शक जो मूळ ग्रंथ, तो यापुढें प्रसंगानुरूप अध्याय व श्लोकाच्या आंकडय़ासहित लिहून दाखविला असून सारांशानें लिहिला आहे, आणि श्रुतिस्मृतींस विरुद्ध किंवा पूर्वापार ग्रंथसंगतीस विरुद्ध अतएव कृतक (कोणी मनानें रचलेला) अथवा हस्तदोषादिकांनी अन्यथा लिहिला गेलेला तितका सूक्ष्मदृष्टीनें गाळून टाकून, व त्याची जुळणी करतांना अरबी व फारसी भाषेचे शब्द त्यांत अगदीं न येऊ देऊन, लिहिण्याविषयीं अतिशय सावधपणा ठेविला आहे.अशा जातीचा ग्रंथ स्वदेशांत असणें अतिशय उपयुक्त व महत्त्वाचें कार्य असतां, आजपर्यंत हा आमच्यांत लिहिला गेला नाहीं त्याविषयींचें कोणास आश्चर्य होऊं नये; त्याचे कारण असें आहे : कलियुग लागल्यावर थोडक्याच अवकाशानें आपण सर्व भरतखंडाच्या ज्या भूभागांत राहतों, येथें वेदविरुद्ध यास्तव कुत्सित असें बौद्धमत उत्पन्न होऊन त्यास कित्येक मूर्ख राजे अनुसरले, व अनुकूल कालाच्या योगानें त्यांची सत्ताहि अतिशय वाढली, तथापि ती, कुमारिल भट्टानें कुमारीपासून द्वितीयार्थक हिमालय पर्वतापर्यंत दक्षिणोत्तर आणि कोंकणी समुद्रापासून बंगाल्याच्या समुद्रापर्यंत पूर्वापार, शास्त्रीय वादविवादांनीं त्यांस जिंकून नाहींशी केल्यावर, शंकराचार्यानींहि तिचें राहिलेंसाहिलें बीज व अन्य पाखंडे नि:शेष करून वर लिहिलेल्या मर्यादेंत दिशापरत्वें च्यार मठ स्थापिले. तेणेंकरून बरीच स्वस्थता झालेली दृढ होत आहे तों, पुन: बौद्धमत पश्चिमेकडून मारवाडांत व तेथून गुजराथेंत शिरलें, आणि लागलेच मागून यवन लोकहि इकडे आले, त्या योगानें अशी कांहीं धामधूम या देशांत झाली कीं, धर्मसंबंधानें आमच्यावर त्यांचा अतिशय बलात्कारहि झाला. तेव्हां अर्थातच हा ग्रंथ लिहिण्यास कोणास कसा अवसर सांपडेल? मात्र सांप्रतच्या राज्यांत कित्येक अंशांनीं तसा प्रकार नसून, अशा जातीचा ग्रंथ लिहिण्याविषयीं त्यांचा प्रतिबंध नसतां विद्याही पुष्कळ वाढली असें असून, जेव्हां कोणाकडून हा स्तुत्य उद्योग झाला नाहीं, तेव्हां असें वाटतें कीं ज्या प्रमाणानें येथें विद्या वाढली त्याच प्रमाणानें तिजसमायमें वैदिक धर्मविषयक अश्रद्धाहि वाढली असावी, आणि त्याच कारणामुळें तो उद्योग झाला नसावा.’’

अशाप्रकारच्या कोशामुळे कोणते लाभ होतात, याविषयीही गोडबोले यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे-

‘‘देशामध्यें अशा जातीचा ग्रंथ असल्यापासून जे लाभ आहेत त्यांत पहिला हा होय कीं, आमच्या संस्कृत भाषेंत जे प्राचीन इतिहासांचे ग्रंथ आहेत, त्यांत ज्या गोष्टी श्लोकबद्ध सरणीमुळें मुग्ध (मोघम) लिहिल्या असतात, ह्मणजे पांडव अज्ञातवासार्थ मत्स्यदेशांत गेलें, चंपराजानें चंपानगरी स्थापिली, जनकराजा याज्ञवल्क्य ॠषीस शरण गेला, परंतु मत्स्यदेश तीन चार असल्यामुळें कोणत्या मत्स्यदेशांत पांडव गेले? चंप दोन असल्यामुळें कोणत्या चंपराजानें चंपानगरी स्थापिली, व जनकराजे अनेक असल्यामुळें कोणता जनकराजा याज्ञवल्क्यास कधीं शरण गेला? त्या सर्वाची निश्चयात्मक टीका, टीकाकारांस लिहिण्यास सांपडत्ये. हें साधन आमच्या देशांत अवश्य पाहिजे असतां तें नसल्या कारणानें, आजपर्यंत जेवढय़ा ह्मणून टीका झाल्या आहेत, त्यांचे कर्ते न्याय, मीमांसा, व व्याकरण, या विषयांतून उत्तम प्रवीण असतांहि इतिहासविषयक टीका लिहितांना त्यांस श्लोकांतील एक दोन अक्षरांपुढे इति, ह्मणजे जसें (धृतराष्ट्रेति) इतकेंच लिहून अंकांच्या ओळीच्या ओळी मांडून ठेवून स्वस्थ बसावें लागलेलें असल्याचें भारत पाहिलें ह्मणजे ध्यानांत येतें. ह्मणून ही अडचण ज्याच्या योगानें दूर होत्ये त्या ग्रंथाचा हा सामान्य उपयोग आहे काय?

दुसऱ्या लाभाच्या पोटात अनेक गोष्टी आहेत त्या येणेंप्रमाणें- प्रथम तर जसें भाषेस, व्याकरण व तिचा कोश असल्यानें तींत अन्य भाषांतील शब्द न मिसळतां तिची शुद्धता राहून दृढत्व असतें, त्याचप्रमाणें इतिहाससंबंधी कोश वारंवार अवलोकनांत असल्यानें प्राचीन इतिहासांत ग्राह्य़ व त्याज्य गोष्टी कोणत्या आहेत त्या समजून येऊन देशसुधारणेस अतिशय मोठा उपयोग होतो.’’

एकूण ७०७ पानांच्या या कोशातून अनेक पौराणिकव्यक्तिचरित्रांविषयी माहिती मिळते. त्यातील महाभारतातील ‘भीष्म’ या पात्राविषयी असलेल्या नोंदीतील हा उतारा पाहा-

‘‘भीष्म हा गुणांनी अतिशय उत्तम होता. त्यानें केलेली प्रतिज्ञा कधींच ढळत नसे. याच्या ब्रह्मचर्याची उपमा हाच असें ह्मटलें तरीं शोभेल. धनुर्वेदांत याची प्रवीणता पराकाष्ठेची असून त्यांत स्त्रियांवर शस्त्र धरणें नाहीं, हा जो याचा नियम होता; तो तर मरेपर्यंत बिघडलाच नाहीं. त्याविषयीं अंबा, शिखंडी होऊन पुरुषत्व पावली, तरी यानें त्यावर शस्त्र धरलें नसल्याचें उदाहरण स्पष्टच आहे. याचें श्रुत्यर्थस्मृत्यर्थविषयक ज्ञान मोठें अगाध असून, वक्तृत्व तर इतकें मनोरंजक होतें कीं, तें ऐकण्यास मोठमोठे ॠषि यासमीप येत. अनुशासन पर्वाचें वक्तृत्व चाललें असतां, यास एकदां घेरी आल्यामुळें तें पूर्ण करण्यास यानें कृष्णास सांगितलें. त्यावरून याच्या खालोखाल वक्तृत्व करणारा त्या वेळेस कृष्ण असून, यासही त्याचें वक्तृत्व मनोरंजक होई असें दिसतें. सारांश, इतके गुण जसे याच्यांत अमूल्य होते, त्याप्रमाणेंच, त्या सर्व गुणांचा मुकुटमणि जी परमेश्वरीं निष्ठा, तीही तशीच होती.’’

१८७६ साली निर्णयसागर छापखान्याने हा कोशग्रंथ प्रकाशित केला. या कोशाचा पुढचा भाग- ‘भरतखंडाचा अर्वाचीन कोश’ही गोडबोलेंनी लिहिला. तो १८८१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्या प्रस्तावनेतील हा काही भाग पाहा-

‘‘बौद्धमत वैदिक धर्माच्या जरी मागचें आहे, तरी तें लपून छपून बरेंच प्राचीन असल्याचें वाल्मीकि रामायणावरून दिसून येतें. त्या मतांतील लोकांच्या मनांतून अहिंसाधर्ममिषानें यज्ञ बंद पाडावेत असें तेव्हांपासून असतांहि त्या काळचे राजे व ॠषी यांच्यापुढें त्यांचा कांहीं उपाय चालेना. त्यामुळें तो ग्रह, ही संधि केव्हां येईल तिची मार्गप्रतीक्षा करीत असतां, गेल्या द्वापारयुगाच्या अंतीं भारती युद्धांत प्राय: सर्व राजे नाश पावले, तसेंच ॠषीहि अदृश्य झाले, असें पाहतांच चार्वाकाच्या व क्षपणकाच्या रूपानें प्रगट झाला. आणि त्यानें ईश्वर नाहीं, परलोक नाहीं इत्यादि प्रकारचे नास्तिक शास्त्र प्रवृत्त करून, लोकांस यज्ञकर्मापासून परावृत्त केलें असें वृत्त त्यांच्याच ग्रंथावरून दिसून येते. ही नास्तिक मताच्या आघाडीची चार्वाक-क्षपणकरूप जोडी युधिष्ठिर-शकाच्या सहाशें साठाव्या वर्षांच्या सुमारास प्रगट झाल्यावर, मागून बुद्ध व अर्हत् क्रमानेंच उत्पन्न झाले. त्यांनीं जरी त्यांच्या मताचें खंडन केल्याचें व ईश्वर आणि परलोक आहेत असें मानल्याचें जैनग्रंथांवरून दिसतें तरी वेद हे पौरुष होत, हा जो त्यांचा सिद्धांत, तो त्यांनीं जीवापलीकडचा समजून, अहिंसाधर्ममिषानें कर्मकांड बंद पाडलें. तें इतकें कीं, तो शब्द थोडक्याच काळांत कानांनीं मात्र ऐकावा, अशी दशा त्यास येऊन पोंचली. अर्थात् ज्ञानकांडहि त्याच पंथास लागून राहिलें होतें.याप्रमाणें कर्म आणि ज्ञान या दोहोंचा ऱ्हास करून, बौद्ध व जैन आपला तृतीय पंथ विस्तृत करीत सर्व भरतखंडांत सुमारें दीड हजार वर्षेपर्यंत एकसारखी धुमश्चक्री उडवीत असतां, त्याच संधींत वैदिक लोक मध्यम कांडास (उपासनाकांडास) अनुसरले, परंतु तें मध्यम कांड आगमोक्त व श्रुतीविरुद्ध असल्यामुळें, एकंदरींत सर्व गोंधळच होऊन गेला असें पाहून, स्वामी कार्तिक, ब्रह्मदेव आणि इंद्र, हे तिघे ईश्वराज्ञेनें प्रथम पृथ्वीवर पुढें आले व त्यांनीं कुमारिलभट्ट, मंडनमिश्र व सुधन्वा या नांवांनीं अवतीर्ण होऊन, तशीच कर्मकांडाची पूर्ववत् स्थापना करून, बौद्ध व जैन यांचा अगदीं धुव्वा उडवून दिला.’’

गोडबोले यांचा हा कोश रावजी श्रीधर गोंधळेकर यांच्या जगतहितेच्छु छापखान्याने (सूपशास्त्रचे प्रकाशक) प्रकाशित केला. याच छापखान्याने गोडबोले यांचे ‘विवेकसिंधु’ (१८७५) आणि ‘ज्ञानदेवगाथा’ (१८७७) हे दोन ग्रंथही प्रसिद्ध केले होते. या सर्वाच्या आधी गोडबोले यांनी आणखी दोन कोशांचे लेखन केले होते. त्यातील पहिला होता- ‘हंसकोश’ (१८६३) तर दुसरा होता- ‘मराठी भाषेचा नवीन कोश’ (१८७०). मराठीत कोशवाङ्मयाची सुरुवात १८१० साली प्रसिद्ध झालेल्या डॉ. कॅरी यांच्या मराठी-इंग्रजी कोशाने झाली. त्यात पुढे व्हान्स केनेडी, जे. टी. मोल्सवर्थ, बाबा पदमनजी, भिकाजी वासुदेव आठल्ये, विष्णुशास्त्री पंडित, विठ्ठल करंदीकर, भगवंत घुमरे, बाळशास्त्री घगवे, बाळकृष्ण बीडकर आदींच्या मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी व मराठी-मराठी कोशांनी भर पडत गेली. मात्र रघुनाथ गोडबोलेंचा ‘मराठी भाषेचा नवीन कोश’ हा इतर कोशांपेक्षा काही बाबतीत निराळा होता. याचे कारण त्यात रोजच्या उपयोगातील शब्दांचा समावेश केलेला होता, शिवाय इतर कोशांमध्ये अरबी, फारशी शब्दांचा समावेश नव्हता, तो या नवीन कोशात होता.

‘हंसकोश’ हा गोडबोले यांचा पहिला कोश. ‘हंसकोश म्हणजे महाराष्ट्रभाषेच्या कवितांमधील कठीण व निवडक शब्दांचा कोश’ अशी त्याची व्याख्या खुद्द गोडबोले यांनीच केली आहे. यात सुमारे ७००० शब्दांचा अर्थ दिला होता. त्यातील ‘ओवी’ या छंदाविषयीची ही नोंद पाहा-

‘‘महाराष्ट्रभाषेचे आद्यकवि, जयत्पाल राजाचे गुरु मुकुंदराज यांणी आचार्योक्तीवरून प्रथमत: ओवीबद्ध असा विवेकसिंधुनामक ग्रंथ रचिला व कांहीं अवकाशानें मागून परमामृत म्हणून लहानसें पुस्तक लिहिलें. त्या दोनहि ग्रंथांतील ओव्यांचा विचार करून पाहातां, संस्कृतमध्यें जो अनुष्टुभ छंद आहे त्याच्याच साम्यतेच्या त्या म्हणावयास चिंता नव्हती. परंतु त्यांचीं अक्षरें कधीं कधीं ३२ व कधीं कधीं तीन अक्षरांच्या फेरानें अधिक किंवा उणीं अशीं आढळतात. म्हणून व अन्य कितीएक कारणांवरून ओवीछंद हा संस्कृत छंदाहून अगदीं भिन्न आहे असाच निर्णय ठरला आहे.

दासबोधादि कितीएक लहानमोठे ग्रंथ विवेकसिंधूच्याच तोडीचे आहेत. परंतु ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत या ग्रंथांच्या ओव्या अनुक्रमानें विवेकसिंधूच्या ओव्यांहून नऊनऊ दाहादाहा अक्षरांनी उण्या व अधिक अशा आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरीची ओवी बावीस अथवा चोवीस अक्षरांची व भागवताची ओवी ४२ किंवा ४४ अक्षरांची आदिकरून आहे. आणि यावरून ओवीच्या परम लघुत्वाची व दीर्घत्वाची सीमा आतां लिहिलेल्या प्रमाणाहून अधिक अथवा उणी नसोन, ही कविता, कवीच्या मर्जीप्रमाणें म्हणजे स्वच्छंद कविता आहे असें सिद्ध होतें.’’

गोडबोलेंनी मराठीतील कोशवाङ्मय अशाप्रकारे समृद्ध केले आहे. खऱ्या अर्थाने मराठीतील कोशयुगाला त्यांनी सुरुवात करून दिली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

संकलन प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghunath bhaskar godbole role in growth of marathi language