अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- रामचंद्र भिकाजी गुंजीकर!
१८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. सुरुवातीला तिथे देशी भाषांचे शिक्षणही दिले जात होते. परंतु काही वर्षांतच देशी भाषा तिथून हद्दपार करण्यात आल्या. याच वेळी मुंबईत मराठीतून प्रकाशित होणारे ‘ज्ञानप्रसारक’ सोडले तर चांगले मासिक उपलब्ध नव्हते. मराठीच्या प्रसारासाठी, तिच्या विकासासाठी हा काळ तसा प्रतिकूलच होऊ लागला होता. अशा वेळी रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी १८६७ च्या जुलैमध्ये ‘विविधज्ञानविस्तार’ हे मासिक सुरू केले. या मासिकाने मराठीत एक स्वतंत्र युगच निर्माण केले. संपादक गुंजीकरांची मराठीविषयीची आस्था, तिच्या विकासासाठीची कळकळ त्यांच्या यातील लेखांमधून जाणवत राहते. विस्ताराच्या नोव्हेंबर, १८६७ च्या अंकातील ‘मराठी भाषा’ या लेखामधील हा उतारा पाहा-
‘‘सांप्रत काळीं भरतखंडामध्यें संस्कृतापासून उत्पन्न जाहलेल्या जितक्या भाषा चालू आहेत, त्या सर्वामध्यें महाराष्ट्र भाषा श्रेष्ठ होय, असें म्हणण्यास किं चित्ही संकोच वाटत नाहीं. कारण, पाहा गुजराती भाषा- तिचें स्थायिक स्वरूप म्हणून अद्यापि जाहलेलें नाहीं; तिजमध्यें कोश नाहीं, म्हणण्याजोगे व्याकरण नाहीं; लेखनमार्ग अद्यापि ठरलेला नाहीं. दिवसेंदिवस तिजमध्यें पराकाष्ठेचे इंग्लिश शब्द मिसळून तिचें स्वरूप मिश्रित अवयवांचें होत चाललें आहे. हिंदी किंवा हिंदुस्थानी भाषा राजकीय खरी; तिजमध्यें ग्रंथसंग्रहही पुष्कळ आहे; तथापि कोमलपणा तेथें दृष्टीस पडत नाहीं. भाषेची रचना अतिशयित उद्दाम. या दोहोंपेक्षा बरीच वरिष्ठ जी बंगाली, तीही मराठीच्या बरोबरीस लागणार नाहीं. तिजमध्यें बहुधा मराठींत आहे तसाच संस्कृत शब्दांचा भरणा पुष्कळ आहे; आज पुष्कळ दिवसांपासून सुधरत चाललेली आहे; तिजमध्यें अनेक विषयांवर अनेक ग्रंथ आहेत; तथापि त्या भाषेचें पुस्तक पाहिल्याबरोबर तिचा उणेपणा लक्षांत आल्यावांचून कधी राहणार नाहीं. ज्यांच्या लिपीमध्यें सौंदर्य म्हणून किंचित्ही नाहीं; लिहिण्याचें सौलभ्य पाहिलें तर, या लिपीपेक्षां त्रासदायक व ओबडधोबड अशी दुसरी कोणतीही लिपी हिंदुस्थानात कोठेंही आढळणार नाहीं. याप्रमाणें या तीन काय त्या उत्तर हिंदुस्थानांतील मुख्य भाषा. यांशिवाय पंजाबी, मारवाडी, इत्यादी किरकोळ भाषा, यांची योग्यता अद्यापि फार उणी आहे, हें तर तिजमध्यें सवरेत्कृष्ट नाहीं तरी चांगलाच कोश आहे; व्याकरण आहे; भाषा स्थायिक जाहली आहे; तिजमध्यें पाहिजेत ते विचार प्रकट करतां येतात. शास्त्रीय विषयांवर ग्रंथ करण्यास आमचे विद्वान् अमळ प्रयत्न करतील तर, तेही मराठींत उत्तम प्रकारचे होण्यास फार हरकत पडणार नाहीं. संस्कृत भाषेचें जें अमूल्य आणि अपार शब्दभांडार तें संपूर्ण आपल्या स्वाधीन ठेवून स्वेच्छानुरूप त्यांतील रत्नांचा विनिमय करण्याचं सामथ्र्य मराठीमध्यें किती आहे, हें वामन, मोरोपंत, इत्यादी कविवरांनीं उत्कृष्ट रीतीनें प्रदर्शित केलें आहे. संस्कृत भाषेशीं प्राचीन बालभाषेच्या द्वारें, भरतखंडांतील इतर सर्व भाषांपेक्षा मराठीचा विशेष जवळचा संबंध आहे; तिजमध्यें संस्कृत शब्द जितक्या शुद्ध स्वरूपानें आढळतात, तितकें शुद्ध स्वरूप-वकार आणि बकार, यकार आणि जकार; श ष आणि स, इत्यादीकांच्या उच्चारभेदाविषयीं अज्ञानी जे बंगाली, हिंदुस्थानी किंवा गुजराती,- यांच्या भाषांमध्यें कधींही सापडणार नाहीं.. संस्कृतांतील प्रौढ शब्दांचें शुद्ध स्वरूप सहन करून, त्यांच्या पंक्तीस आपले साधे प्राकृत शब्द नेऊन बसविण्याचें, असें म्हणा; किंवा त्या प्रौढ गंभीर शब्दांनाच आपल्या साध्या प्राकृत शब्दांच्या आटोक्यांत ठेवून, त्यांवर वर्चस्व चालवून, तद्द्वारें शब्दांचा दुबार भरणा करण्याचें; आणि अशा प्रकारें वरिष्ठ भाषेच्या अपरिमित मिश्रणापासून संभवनीय जो कर्कशपणा, किंवा विलगपणा, यांची शंकासुद्धां येऊं न देतां, उलट विशेष प्रौढी, कोमलता, आणि मनोहर सौंदर्य, हीं प्राप्त करून घेण्याचें सामथ्र्य आपल्या मराठी भाषेला आहे. निरनिराळे ध्वनि सूचित करण्यास, निरनिराळीं वर्णरूप चिन्हें नसणें हें जें भाषेच्या अपूर्णतेचें चिन्ह, तेणेंकरून ग्रासून गेल्यामुळें, युरोप खंडांतील सर्व भाषा, व मुख्यत्वेंकरून इंग्लिश भाषा लज्जित होऊन, अन्य सद्गुणांप्रमाणें उच्चारानुसार भिन्नभिन्न वर्ण लिहिण्याच्या गुणांविषयीं परिपूर्ण असलेल्या ज्या जगद्वंद्य संस्कृत भाषेची यथार्थ स्तुती करीत आहे, तिची तीच अप्रतिम देवनागरी लिपी, आपल्या मराठीच्या घरची किंवा विशेषत: मराठी भाषेचीच होऊन गेली आहे.’’
गुंजीकर या मासिकाचे सुमारे सात वर्षे संपादक राहिले. या काळात त्यांनी विविध विषयांवर लेखन केले. पण त्यात मराठी भाषेसंबंधीचे त्यांचे लेखन महत्त्वाचे आहे. त्या वेळी भारतात सर्वत्र राज्यकारभार एकाच भाषेतून करण्याविषयी चर्चा सुरू होती. त्यावर गुंजीकरांनी ऑगस्ट, १८७१ च्या अंकात ‘भरखंडामध्यें एक भाषा करण्याचा विचार आणि नवीन विद्वानांचा अविचारीपणा’ हा लेख लिहिला. त्यातील हा उतारा-
‘‘कितीएक लोक आपल्या हिंदुस्थानाचा विस्तार मोठा असल्यामुळें एथें अनेक भाषा आहेत ही गोष्ट कबूल करतात, परंतु शेवटीं ते म्हणतात कीं पुष्कळ भाषा शिकाव्या लागल्यामुळें राज्यव्यवस्था नीट चालण्याला मोठा अडथळा येतो. परंतु हें म्हणणें अगदीं पोरकट आहे; कारण हिंदुस्थानाच्या राज्यकर्त्यांना जर हिंदूुस्थानच्या भाषा शिकण्याचा असा कंटाळा, तर मग त्याबरोबर राज्य करण्याचाही कां कंटाळा येऊं नये? सुख जर पाहिजे तर त्याबरोबर थोडेंसें दु:खही सोसणें ही गोष्ट सर्वाना अवश्य आहे. हिंदुस्थानामध्यें चांगला राज्यकारभार चालण्याकरितां हिंदुस्थानच्या वीस कोटी प्रजेनें आपापली भाषा सोडून देऊन राज्यकर्त्यांची भाषा घ्यावी, यापेक्षां प्रजेचा निकट संबंध ज्यांना आहे अशा थोडय़ाशा राज्यकर्त्यांनींच त्या त्या प्रांताची भाषा शिकावी आणि नीट व्यवस्था ठेवावी ही गोष्ट वाईट असें कोण म्हणेल? यामध्यें ज्यांना आवडेल त्यांनीं इंग्रजी भाषा शिकूं नये असें कोणी म्हणत नाहीं; परंतु हजारों आणि लाखों रुपये पगार खाणाऱ्या राज्यकर्त्यांचे थोडेसे श्रम वांचविण्याकरितां, गरीब बिचारे दोन-चार रुपये मिळवून मोठय़ा कटाकटीनें उदरनिर्वाह करणारे खेडोखेडीं राहणारे पाटील कुलकर्णी वगैरे दीन प्राणी, यांणीं इंग्रजी भाषा शिकून सगळीं कागदपत्रें व हिशेब इंग्रजी भाषेनें लिहावे असें म्हटलें, तर त्यापासून लक्षावधि प्राण्यांची दुर्दशा होण्याचा संभव आहे, याकडे सर्वानी लक्ष दिले पाहिजे. वास्तविक पाहतां राज्यकर्त्यांना भाषांपासून कांहीं अडचण नाहीं. मुख्य मुख्य जे देश म्हणजे महाराष्ट्र, बंगाल, हिंदुस्थान, कर्नाटक, तैलंगण, गुजरात, इत्यादी भाग ते युरोप खंडांतील मोठमोठय़ा देशांहूनही विस्तीर्ण आहेत आणि त्यांतील एकेकांमध्ये एकेक भाषेची व्यवस्था ठेविली, व सध्या चालल्याप्रमाणें अगदींच थोडक्या विस्ताराच्या भाषा आसपासच्या भाषांमध्ये धरल्या तर सर्व सुरळीत चालेल व कांहीं अडचण येणार नाहीं.’’
राज्यकारभार आणि भाषा यांविषयी या लेखात गुंजीकरांनी मांडलेली मते आजही महत्त्वाची ठरतात. सध्याचे शासनव्यवस्थेतील मराठीचे किंवा एकूणच देशी भाषांचे स्थान पाहिले तर गुंजीकरांचा हा लेख प्रस्तुत वाटू लागतो. १८७१ मध्ये त्यांनी ‘दंभहारक’ हे मासिकही सुरू केले. त्याचवर्षी त्यांनी ‘मोचनगड’ ही ऐतिहासिक कादंबरीही लिहिली. त्याच्याआधी विविधज्ञानविस्ताराच्या ऑगस्ट, १८६९ च्या अंकापासून शेक्सपीअरच्या ‘रोमीओ अॅण्ड ज्युलिएट’ या नाटकाचे ‘रोमकेतु-विजया’ हे त्यांनी केलेले भाषांतर क्रमश: प्रसिद्ध होत होते. पुढे १८७३ मध्ये त्यांचा ‘आपल्या भाषेची स्थिती’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्यातील हा उतारा पाहा-
‘‘सांप्रत आपल्या राज्यकर्त्यांची जी इंग्रजी भाषा, तिच्या अभ्यासापासून चार पैसे मिळून सांसारिक कृत्यास मदत होऊं लागल्यामुळें, जो तो स्वभाषेचा अनादर करून इंग्रजी शिकूं लागला; यामुळें सरासरी इंग्रजी जाणणाऱ्यांची संख्या मात्र पुष्कळ झाली; पण त्या विद्येपासून देशाचें वास्तविक कांहींच हित न होतां, बहुतेक लोक निरुद्योगी मात्र झाले, व धंदा नाहींसा झाला. व ज्यांना खरोखरी इंग्रजीचें चांगलें ज्ञान आहे, त्यांतील बहुतेकांना स्वभाषेच्या अज्ञानामुळें, त्या शिकण्याचा कांहींच स्तुत्य उपयोग करितां येत नाहीं, ही मोठी लज्जेची गोष्ट होय. सध्यां बहुधा सर्वत्र अशी स्थिती आहे कीं, मोठमोठय़ा विद्वान् म्हणविण्याऱ्यांनीही पाव घटकाभर शुद्ध मराठी भाषेनें अस्खलित, किंबहुना तुटक तुटकही संभाषण चालविण्याची मोठीच मारमार. हें तर काय, पण कित्येक लोक असे आढळतात कीं, ‘आम्हास मराठी भाषा येत नाहीं,’ ‘आम्ही हल्लीं मराठी भाषा विसरलों’, असें म्हणण्यामध्यें त्यांना मोठी प्रतिष्ठा वाटते! ही गोष्ट सामान्य मनुष्यांचीच नव्हें, पण जे चारचौघांत पुढारी, विद्वान् म्हणविणारे त्यांचीसुद्धां ही दशा! यावरून त्यांना देशहिताची वास्तविक किती इच्छा असेल हें उघड दिसतें.’’
या लेखात इंग्रजीच्या आहारी जाऊन मराठीकडे दुर्लक्ष करू लागलेल्या नव्या सुशिक्षित वर्गाच्या मनोवृत्तीवर त्यांनी नेमके बोट ठेवले होते. मराठीच्या प्रसारासाठीची त्यांची ही कळकळ त्यांनी १८८९ मध्ये लिहिलेल्या ‘आपल्या भाषेचें पुढें काय होणार?’ या लेखातूनही दिसून येते. या लेखात त्यांनी- १)आमच्या भाषा म्हणजे काय? २) त्यांची सध्याची स्थिती कशी आहे? ३) त्याकडे दुर्लक्ष केल्याने काय परिणाम होण्याचा संभव आहे? व ४) त्यांच्यासंबंधांने आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य काय आहे?- असे चार प्रश्न उपस्थित करून, त्यांचा ऊहापोह केला आहे. त्यातील हा काही भाग-
‘‘आमच्या भाषांकडे आम्ही दुर्लक्ष केल्यानें काय परिणाम होणार आहे? प्रथमत: मुख्य मराठी भाषेविषयीं. मराठी भाषेची स्थिती पुष्कळ चांगली आहे असें वर म्हटलें आहे, तथापि तो तिच्या स्थितीचा चांगुलपणा उणा न होतां, दिवसेंदिवस जर वाढत चालला तरच तिची स्थिती नीट राहील. नाहीं तर एकदा जर का तिचें पाऊल मागें हटलें, तर सध्यांच्या वाढत्या इंग्रजी भाषेपुढें तिचें कांहीं चालणार नाहीं. मग ती मागें पडलीच! पोटभाषा तर असून नसल्यासारख्याच आहेत. त्यांच्यामुळें मुख्य मराठी भाषेच्या शुद्धतेला मात्र बट्टा लागत आहे. इतकाच त्यांपासून लाभ. दुसरें कांहीं नाहीं. या पोटभाषांची अशी ही दीन स्थिती फार शोचनीय आहे यांत संशय नाहीं. म्हणून या भाषांकडे जर सध्यां लक्ष न दिलें, तर दिवसेंदिवस त्यांची स्थिती अधिकाधिक बिघडत जाणार आणि तसल्या अव्यवस्थित भाषांच्या संसर्गामुळें शुद्ध मराठी भाषेलाही त्या त्या प्रमाणानें त्रास होत जाणार असें उघड दिसतें.
..त्या भाषांच्यासंबंधानें आपलें प्रत्येकाचें कर्तव्य काय? शुद्ध मराठीच्या संबंधानें आमचें मत असें आहे कीं, जर मराठी भाषेची विशेष सुधारणा झाली पाहिजे, तर त्या सुधारणेचा पहिला मार्ग हा- आपले लौकिक, धार्मिक, राजकीय, यांत्रिक, व्यावहारिक तसेंच अर्वाचीन नानाविध शास्त्रसंबंधीं जे अनेक विषय, त्यांचीं पुस्तकें, व्याख्यानें, निबंध, आणि ओतप्रोत चर्चा हीं शुद्ध मराठी भाषेनें करण्याचा उद्योग दिवसेंदिवस आपण वाढविला पाहिजे.’’
गुंजीकरांनी व्याकरणविचार, लिपीविचार, शुद्धलेखनविचार या विषयांवरही लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन ‘रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे संकलित लेख’ या काशिनाथ गुंजीकरांनी संपादित केलेल्या पुस्तकात वाचायला मिळेल. याच पुस्तकाला अ. का. प्रियोळकरांनी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना गुंजीकरांचा काळ, त्यांचे लेखन समजून घेण्यासाठी वाचायलाच हवी.
गेल्या काही वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठीला हा दर्जा मिळायलाच हवा, परंतु त्याने मराठीच्या अस्तित्वाचे सारे प्रश्न सुटणार आहेत या भ्रमात कोणी राहू नये. जगभर भाषानियोजन आणि भाषाविकास या क्षेत्रात काही भरीव काम चाललेले असताना, मराठीत मात्र त्यादृष्टीने आनंदीआनंद आहे. अशावेळी गुंजीकरांनी विचारलेला प्रश्न आपाल्यालाही विचारण्याची आवश्यकता आहे की, आपल्या भाषेचे पुढे काय होणार?
संकलन प्रसाद हावळे
prasad.havale@expressindia.com