अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- वामन आबाजी मोडक!

विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला’विषयी आपण गेल्या आठवडय़ात जाणून घेतले. मालेतील गद्य वैशिष्टय़पूर्ण होते, परंतु या गद्यलेखनाच्या काही मर्यादाही होत्या. त्यामुळे चिपळूणकरांच्या लेखनशैलीची स्तुती करणारा जसा एक वर्ग आहे, तसाच त्यावर टीका करणाराही वर्ग आहे. आणि हे चिपळूणकरांच्या काळातही होत होते. निबंधमालेतच चिपळूणकरांच्या लेखनाविषयी टीका करणारी वामन आबाजी मोडक यांची दोन पत्रे प्रसिद्ध झाली होती. त्यातील डिसेंबर, १८७५च्या अंकातील मोडक यांच्या पत्रातील हा भाग पाहा-

‘‘या देशांतील प्राचीन काळच्या वक्तृत्वाविषयीं ज्ञान केवळ काव्यें, पुराणें इत्यादि ग्रंथांवरून अनुमानाने होतें. तथापि शिष्टाईच्या वगैरे संबंधाने अंगद, कृष्ण, विदुर इत्यादिकांचीं जीं भाषणें रामायण-महाभारतादि ग्रंथांत आहेत, त्यावरून वक्तृत्वशक्ति आपल्या पूर्वजांतील पुढारी लोकांत बरीच होती असें दिसतें. परंतु ग्रीस किंवा रोम, इंग्लंड किंवा फ्रान्स, या देशांतील प्राचीन व अर्वाचीन वक्तव्यांची भाषणें जशीं विषयाच्या संबंधाने पराकाष्ठेची व्यापक असतात, तशीं भाषणे करण्याजोगें व्यापक ज्ञान प्राचीन काळीं आपल्या लोकांत असे, असें प्रतीतीस येण्यास कांहीं साधन नाहीं. वक्तृत्वाची विशेष आवश्यकता व प्रवृत्ति लोकसमाजास आकर्षण करण्याच्या संबंधानें असल्यामुळें, प्राय: प्रजासत्तात्मक राज्यांतच या कलेचा विशेष उदय झाला आहे यांत आश्चर्य नाहीं.

अलीकडील काळांत वक्तृत्वाच्या संबंधानें हरदास किंवा कीर्तन करणारे यांजविषयीं तुम्ही जें लिहिले आहे तें सर्वाशी बरोबर आहे असें मला वाटत नाहीं. काहीं काळापूर्वीच्या दोनतीन कीर्तन करणारांची नांवें त्यांच्या संबंधानें तुम्हीं काहीं लिहिलें आहे. ते स्वत: कवि असून कीर्तनांत आपण नवीन केलेली पद्यें वगैरे म्हणून त्याचा अर्थ लोकांस सांगून गायन, शब्दालंकार व भाषणाची मधुरता या गुणांनी आपल्या श्रोत्यांचे मनरंजन त्यांनी केलें असेल यांत संशय नाहीं, परंतु एकाद्या प्रतिपाद्य विषयाच्या संबंधानें व्यापक बुद्धीनें सर्व साधकबाधक प्रमाण योजून विषयप्रतिपादन करून श्रोत्यांच्या चित्ताची खात्री आणि तदनुरूप प्रवृत्ति करण्याची शक्ति त्यांचे अंगीं होती, असें त्यांच्या वेळेपासून चालत आलेला जो कीर्तनाचा पाठ त्यावरून दिसत नाहीं. कीर्तनांत दोन भाग मात्र जसे असावे तसे करण्याचा हेतु दिसतो; म्हणजे प्रथम एखाद्या धर्म किंवा नीतीच्या विषयाचें प्रतिपादन व नंतर त्यास समर्पक असा इतिहासांत किंवा पुराणांतील दृष्टांत. परंतु हा हेतु एकीकडेच राहून कीर्तनांत आधीं ब्रह्मज्ञान (किंवा ब्रह्मघोळ म्हटलें तरी चालेल) सांगण्याचा प्रघात आहे. यांत वक्त्यास आपला प्रतिपाद्य विषय कोणचा, त्यास साधकबाधक प्रमाणें कोणचीं, याचें भान न राहतां सर्व घोंटाळा होऊन जातो. यामुळे कीर्तनसंबंधीं वक्तृत्वांत हा मुख्य भाग असून तो ऐकण्याचे श्रोते टाळावयास सापडेल तितके टाळण्याचा यत्न करितात. यावरून कीर्तन करणारांचे वक्तृत्वाचें अनुमान सहज करितां येतें. तसेंच कीर्तनांत जे रस येऊं  नयेत ते कीर्तन करणारे नि:शंकपणे आणितात; व वेडय़ावाकडय़ा चावट गोष्टीही केवळ बालिश लोकांस हंसविण्याकरितां सांगतात.. कीर्तन करणारांनीं आपलें भाषेचें व प्रतिपाद्य विषयाचें ज्ञान पुष्कळ वाढविण्याविषयीं यत्न करून वर सांगितलेले दोष त्यांतून काढून टाकिले, तर धर्मसंबंधी वक्तृत्वाचा कीर्तन हा एक अति उत्तम प्रकार होईल यांत संशय नाही..’’

चिपळूणकरांनी ‘वक्तृत्व’ या विषयावर मालेतून ऊहापोह केला होता, त्यावर प्रतिक्रिया म्हणून मोडक यांनी ‘निबंधमालाहितेच्छु’ या नावाने हे पत्र लिहिले. चिपळूणकरांनी मालेतून तत्कालीन सुधारकांविरुद्ध उपहासपूर्ण व तारतम्यहीन टीका केली होती, त्याविषयी याच पत्रात मोडक यांनी लिहिले आहे-

‘‘आलीकडील सुधारणुकेच्या ज्या कितीएक पद्धति निघाल्या आहेत त्यांचीं कारणें, त्यांतील वास्तविक गुणाचा अंश व पुढें होणारा परिणाम या सर्व गोष्टींकडे ‘मार्मिक’ लक्ष न पुरविता त्यांची केवळ विटंबनाच करण्यांत तुम्हांस मोठे भूषण किंवा मौज वाटते, याचें मला मोठे आश्चर्य वाटतें! तुमची ‘निबंधमाला’ ही अशाच पद्धतींतली एक पद्धत आहे अशी प्राय: सर्वाची समजूत आहे. व तुमचा एकंदर विषयप्रतिपादन करण्याचा प्रकार पाहिला तर वृथा डौल घालण्याविषयीं जो दोष तुम्ही इतर सुधारणा करूं इच्छिणारांस लावतां तोच तुमच्यावरही येऊं  पाहतो.. आलीकडील राज्यरीति व धर्मसंबंधी स्थिती वक्तृत्वकलेच्या वृद्धीस अगदी प्रतिबंधक आहेत व पूर्वीची स्थिति होती तीच बरी, असें जें तुम्ही लिहिले आहे तें यथार्थ नाहीं. हल्लींची राज्यरीति व धर्मस्थिति इंग्लिश लोकांच्या इकडे येण्याने व इंग्रजी विद्येच्या अभ्यासानें झाली आहे, हें तुम्हीं उपक्रमीं सांगितले आहे. या गोष्टी तुम्हांस इष्ट आहेत कीं अनिष्ट आहेत याचा विचार केला तर, एकंदरीने त्या तुम्हांस इष्ट आहेत असें निबंधाचा उपक्रम व उपसंहार पाहतां दिसतें. हें ठीकच आहे. कारण ह्य़ा गोष्टी घडल्या नसत्या तर आज मित्तीस आपली ‘निबंधमाला’ व निस्पृहपणानें (पुष्कळ वेळां अविचाराने) विद्यमान व्यक्ति व स्थिती यांजविषयी लिहिण्याचा मार्ग कोणीकडे असता?..’’

पुढे ते लिहितात-

‘‘हल्लीं जी या देशांत अनेक प्रकारची खळबळ सुरू झाली आहे ही काय सर्वाशीं अकल्याणाची आहे? माझ्या मतें अशी गोष्ट खचीत नाहीं. तुम्ही आपल्या ‘निबंधमालेंत’ ‘लोकभ्रमा’विषयी वगैरे जें विवरण केलें आहे तेंही याच खळबळीची लहर तुमच्या अंत:करणांत उत्पन्न होऊन केलें आहे यांत संशय नाहीं. त्याचप्रमाणें ब्रह्मसमाज, प्रार्थनासमाज, वक्तृत्वोत्तेजक, व्यापारोत्तेजक, कौशल्यशिक्षक इत्यादि मंडळ्या व त्यांचे उद्योग त्याच खळबळीमुळे उपस्थित झाले आहेत व आपल्या देशांत धर्माचें आलीकडे जें अज्ञान व जी बजबज झाली आहे व त्याचे योगानें अनेक वेडसर व कित्येक अंशीं अनीतीच्या अकल्याणकारक चाली व त्यांस अनुकूल प्रतिपादक ग्रंथ प्रचारांत आले आहेत, त्यांपासून लोकांची मनें निवृत्त होऊन धर्म व नीती यांच्या तत्त्वांविषयी ज्ञान व आस्था उत्पन्न होण्यास कित्येक वास्तविक परोपकारी गृहस्थांनी ब्रह्मसमाज, प्रार्थनासमाज, बालविवाहनिषेधक मंडळी, विधवाविवाहोत्तेजक मंडळी इत्यादि प्रकारचे प्रयत्न चालू केले आहेत, ते केवळ डौल मिरविण्याकरितां व देशाच्या अकल्याणाकरितां मतलबीपणाने केले आहेत काय? व त्यापासून वाईट परिणाम तरी आजपर्यंत कोणते झाले आहेत?..

धर्मोन्नति इतर सर्व साध्य गोष्टींपेक्षां अत्यंत महत्त्वाची आहे, तशीच अत्यंत यत्नसाध्यही आहे. ती अति अल्प काळांत व्हावी अशी अपेक्षा करणें हें अविचाराचें काम होय. तुम्हीं ज्या गोष्टीचा मुळींच अनुभव घेतला नाहीं व जो विषय तुम्हांस अगदीं उपेक्षणीय वाटतो, त्याजविषयीं इतरांना नुकत्याच आरंभलेल्या उद्योगाविषयीं बरावाईट अभिप्राय देणें हें मला अगदीं साहसाचें काम वाटतें. व हीच गोष्ट इतर सुधारणेच्या यत्नांविषयीं आहे. त्यांत कोणी कांहीं मोठी चूक किंवा अन्याय करीत आहे किंवा नि:संशय केवळ प्रतिष्ठेसाठीं ढोंग करीत आहे, याविषयीं चांगल्या अनुभवांतीं खात्री होईल तेव्हां तेवढा दुर्गुण निस्पृहपणे (मर्मभेदकपणानें नव्हे) स्पष्ट करून दाखविणें आणि योग्य मार्ग सांगणें हें तुम्हांसारख्या निबंधकर्त्यांचें काम होय.’’

मोडक हे मूळचे रत्नागिरीचे. दापोलीस शिक्षण घेऊन ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या चार पदवीधरांपैकी ते एक. मुंबई विद्यापीठातून १८६७ मध्ये मराठी भाषेची हकालपट्टी झाली, त्याविरुद्ध नंतरच्या काळात सुरू झालेल्या चळवळीत मोडक यांनी हिरिरीने काम केले. प्रार्थना समाजाच्या प्रमुख प्रवर्तकांपैकी ते एक होते. मोडक यांनी फारच थोडे लिहिले आहे, पण त्यांचे जितके लेखन उपलब्ध आहे, त्यावरून तत्कालीन परिस्थितीकडे डोळसपणे पाहणाऱ्यांपैकी  ते एक होते, हे जाणवत राहते. त्यांनी ‘उत्तरनैषधचरित’ नावाचे एक गद्यपद्यात्मक नाटकही लिहिले होते. त्यातील हा काही भाग-

‘‘पहिला गृहस्थ- आणि सर्व व्यसनांची धर्मज्ञ पुरुषांनीं निंदा केली आहे तीहि यथायोग्य आहे.

दुसरा गृहस्थ- परंतु कर्मगति विचित्र होय. त्यामुळेंच नलराजानें पुष्कराशीं द्यूत खेळण्याचें मान्य केलें; आणि त्याचा असा परिणाम झाला!

प. गृ.- काय? द्यूत संपलें वाटतें?

दु. गृ.- संपलें इतकेंच नव्हे, तर त्याबरोबर आपुली पुण्यसामग्रीही संपली. नलराजाचा भाग्यसूर्य मावळला, व आमच्या नष्टचर्याचाही उदय झाला असें म्हटलें पाहिजे. असो. तो शेवटचा प्रसंग तर पाहावेना. जरी मी मोठा धैर्याचा म्हणवितों तरी माझे डोळे पाण्यानें भरून आले.

प.- कां? असें कां बरें झालें?

दु.- सांगतों ऐका. पुष्करानें सर्व संपत्ति राज्यपदासुद्धां पणानें जिंकून कांहीं उरलें नाहीं तेव्हां तो हंसून नलास म्हणाला :- ‘‘कां! अजून आपली खेळावयाची इच्छा आहे काय? असेल तर मी तयार आहें. परंतु आपलेपाशीं पण लावण्यास कांहीं आहे असें दिसत नाहीं. एक दमयंती मात्र आपली आहे. पाहिजे तर तिचा पण लावा आणि खेळूं या.’’

प.- मग तें ऐकून नलराजानें काय उत्तर दिलें? दमयंतीचा पण लावून तिला तर हारविली नाहीं ना?

दु.- नाहीं. तेवढी तरी दैवानें कृपाच केली म्हणा. पण नलासारखा दयाळु राजा तसें करील अशी मला तर भीति नव्हती, व तसेंच झालें.

प.- बरें मग नलानें काय उत्तर दिलें?

दु.- उत्तर कांहीच केलें नाहीं. परंतु क्रोधानें संतप्त होऊन अंगावरील सर्व वस्त्रभूषणें काढून पुष्करापुढें ठेविलीं, आणि आपण एका नेसलेल्या वस्त्रानें राजमंदिराबाहेर पडला.

प.- आणि देवी दमयंतीनें काय केलें?

दु.- तिनेंही सर्व वस्त्रभूषणें काढून दिलीं आणि एक वस्त्रानें तीही नलामागून निघाली. आतां तीं नगराबाहेर जाऊन पोंचलीं असतील.’’

हे नाटक व मोडक यांच्या व्याख्यानांचे काही संग्रह उपलब्ध आहेत, ते आवर्जून वाचायला हवेत.

संकलन प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com