अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- विनायक कोंडदेव ओक!

मागील दोन लेखांतून आपण लोकमान्य टिळक व गो. ग. आगरकर यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. १८८१ साली सुरू झालेल्या ‘केसरी’तून त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली होती. त्याच वर्षी मराठीत आणखी एक मासिक प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. हे मासिक लहान मुलांकरिता प्रकाशित केले जायचे. त्याचे नाव- ‘बालबोध’ आणि संपादक होते – विनायक कोंडदेव ओक. १८८१ च्या एप्रिल महिन्यात या ‘बालबोध’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यात ओक यांनी मासिकाचा उद्देश स्पष्ट केला होता, तो असा –

‘‘मुलांनो, ही तुमची आमची पहिली भेट आहे. आम्ही दर महिन्याच्या पहिल्या तारखेस तुम्हांला भेटायला येऊं आणि तुमच्या उपयोगी पडतील व तुम्हांला आनंद होईल, अशा थोडय़ाशा गोष्टी तुम्हांला सांगूं. तर आमचा हेतु सिद्धीस नेण्यास म्हणजे आमची भेट घेण्यास आणि आम्ही सांगूं त्या गोष्टी ऐकण्यास तुम्ही तयार असावें, हें तुम्हांपाशीं मागणें आहे.. शाळेंत कळत नाहींत, पण तुम्हांला कळल्या तर पाहिजेत, अशा लक्षावधि गोष्टी आहेत. त्यांतल्या थोडय़ा थोडय़ा आम्हीं दर खेपेस तुम्हांस अगदीं सोप्या व मनोरंजक भाषेंत सांगून तुमच्या अंगचे सद्गुण वाढावे, आणि दिवसेंदिवस तुम्हीं शहाणें आणि सुखी व्हावें, ह्य़ासाठीं हा आमचा प्रयत्न आहे.’’

‘बालबोध’मध्ये थोर व्यक्तींचे चरित्र, माहितीपर निबंध, कविता, काही चुटके व ‘लोक काय म्हणतात’ या शीर्षकाखाली रंजक व चमत्कारिक बातम्या असा मजकूर असायचा. ओक यांनी तब्बल ३४ वर्षे ‘बालबोध’चे संपादन केले. या काळात त्यांनी ‘बालबोध’मध्ये ४०२ चरित्रे, ४०२ कविता, ४०२ निबंध, ३७१ शास्त्रीय विषयांवरील निबंध, आणि इतर सुमारे ८०० हून अधिक लेख लिहिले.

ओक यांच्या लेखनाची सुरुवात तशी १८६६ सालीच झाली. तेव्हापासूनच इतिहास व चरित्रलेखन हे त्यांच्या विशेष आवडीचे वाङ्मयप्रकार दिसतात. ‘हिंदुस्थानकथारस’ (१८७१), ‘शिपायांच्या बंडाचा इतिहास’ (१८७४) यांसारखे त्यांचे ग्रंथ याची साक्ष देतात. याबरोबरच त्यांनी लिहिलेली अनेक चरित्रपर पुस्तके आजही उपयोगी पडणारी आहेत. ओक यांच्या वाचनव्यासंगामुळे त्यांनी लिहिलेल्या चरित्रांत वेगवेगळे संदर्भ येतात. ते त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़च आहे. १८८० साली त्यांनी लिहिलेले ‘महन्मणिमाला’ हे कॉर्नवॉलिस, सर जॉन माल्कम आदींवरील चरित्रपर पुस्तक त्यादृष्टीने पाहाता येईल. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच ओक यांनी चरित्रे का वाचावीत या विषयीचे विवेचन केले आहे. त्यातील हा काही भाग पाहा –

‘‘आपण थोर व्हावे आणि आपणांस लोकांनी थोर मानावे, अशी इच्छा बहुतकरून सर्व मनुष्यांस असते; आणि ती सफल होण्याकरितां ती यथाशक्ति प्रयत्न करीत असतात. जगामध्ये मनुष्यांच्या हातून जीं काहीं मोठी आणि चांगली कार्ये होतात, तीं ह्य़ा प्रकारच्या उद्योगांची फलें होत. ह्य़ा पृथ्वीच्या पाठीवर आज पावेतों सहस्रावधि थोर पुरुष होऊन गेले. त्यांच्या कथा अशा प्रकारच्या उद्योगांच्या वर्णनांनीं भरल्या आहेत. त्या वाचिल्या म्हणजे थोरपण संपादावयाची खरी साधनें मनुष्यास समजतात आणि त्यांच्या योगानें आपले मनोरथ सिद्धीस नेण्यांविषयीं त्यास इच्छा होते, ही चरित्रें वाचण्यापासून मोठा लाभ आहे.

आतां, सर्वाकडून थोर किंवा चांगले म्हणून घेणें हे माणसास दुष्कर आहे. आजपावेतों ह्य़ा जगांत अगदी निर्मल अंत:करणाचे असे कितीएक पुरुष होऊन गेले. त्यांचे हातून वाईट असें कोणाचें झालेंच नाही. तरी, जनांनी त्यांस कांही तरी कारणांवरून, थोडा म्हणा किंवा बहुत म्हणा, दोष दिला आहे. अगदी निर्दोष असा मनुष्य जगात अद्यापपर्यंत कोणी आढळला नाही.. तेव्हां, सर्वाकडून चांगलें म्हणून घेणें हें कठीण आहे, असें कबूल करणें भाग पडते. सर्व लोकांकडून सर्वाशी चांगलें म्हणून घेणं हे जरी इतकें अवघड आहे, तरी, त्या मानानें, आपल्या देशबांधवांकडून आपणास चांगलें म्हणविणें हे कठीण नाही. त्यांत मुख्य दोन धोरणें साधिली पाहिजेत. म्हणजे, जें काम हाती घ्यावयाचे ते शुद्ध देशहिताचें असलें पाहिजे, हें एक; आणि ते सिद्धीस नेण्याच्या कृत्यांत, आपल्या सुखाकडे न पाहतां, कायावाचामनेंकरून झटलें पाहिजे, हें दुसरें. ही धोरणें साधून मनुष्यानें आपले काम सिद्धीस नेलें, म्हणजे तो स्वदेशबांधवांच्या स्तुतीसच काय पण पूजेस ही पात्र होतो.

आपण आपल्या देशबांधवांच्या स्तुतीस पात्र व्हावें, अशी इच्छा नाहीं, असा एक देखील मनुष्य सांपडावयाचा नाही. आपलें नांव कोणत्या तरी उपायानें प्रसिद्ध व्हावें आणि मागें राहावें, असे प्रत्येक मनुष्यास वाटत असते. हें वाटणें सोपें आहे; परंतु त्याप्रमाणें घडवून आणणें फार कठीण आहे. तें साधण्यास तुकारामाप्रमाणे साधु झालें पाहिजे, कालिदासाप्रमाणें कवि झाले पाहिजे, शिवाजीमहाराजांप्रमाणे नवीन राज्य स्थापिलें पाहिजे, किंवा नापोलियन बोनापार्ताप्रमाणें स्वपराक्रमानें मोठय़ा पदवीस चढून राज्यें काबीज केली पाहिजेत. ही सर्व कृत्यें विशाल बुद्धीचीं आहेत. आणि मी अमक्यासारखा होईन असा हेतु धरल्याने मनुष्य तसा होत नाही. तर, अंगामध्ये तशी योग्यता आणि तीस अनुकूल असा कांही गोष्टीचा योग, ही सहाय असली पाहिजेत.. म्हणजे, सांगावयाचे तात्पर्य एवढेंच की, कोणत्या पुरुषाचे अनुकरण आपणास सुसाध्य आहे, ह्य़ाचा मनुष्यानें चांगला विचार केला पाहिजे.’’

ओक यांनी लिहिलेली परकीय महानुभावांची अनेक चरित्रे प्रसिद्ध असली तरी त्यांनी स्वकीयांची अशी केवळ दोनच चरित्रे लिहिली. त्यातील पहिले म्हणजे, ‘जावजी दादाजी चौधरी ह्य़ांचे चरित्र’ (१८९२) व दुसरे – ‘नामदार रावराजे सर दिनकरराव राजवाडे ह्य़ांचे चरित्र’ (१८९७). राडवाडे यांच्या चरित्रातील हा एक उतारा पाहा –

‘‘राष्ट्रामध्यें राजा आणि प्रजा असे दोन पक्ष असतात; त्यांचें हिताहित एकमेकांच्या हिताहितांत गुंतलेलें असतें. आणखी सगळें हित काय तें स्वातंत्र्य आणि संपत्ति ह्य़ांच्या संग्रहावर अवलंबून असतें. आणि ह्य़ा दोन्ही वस्तु राष्ट्रांत समाईक असतात; ह्मणजे त्यांजवर राजा आणि प्रजा ह्य़ा उभयतांची सत्ता असते. तेणेकरून त्या आपणांस अधिकाधिक मिळाव्या ह्मणून उभयपक्षांचे भगीरथ प्रयत्न चाललेले असतात.. हे दोन पक्ष राष्ट्रामध्ये जाज्वल्य असतात. ह्य़ांच्या सत्तेच्या मर्यादा राजनीतींत ठरलेल्या असतात; परंतु व्यवहारांत त्या मर्यादा अचल राहात नाहींत. मर्यादाभंग होतो; तो बहुधा प्रबल पक्षाकडून होतो; तो त्यास यथार्थ वाटत असतो; आणखी तो मर्यादाभंग दुर्बल पक्षास अशास्त्र वाटत असतो; आणि त्यास त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. अशा दोन पक्षांची सेवा करून त्यांस संतुष्ट ठेवणें हें कर्म परम दुष्कर आहे. ह्मणजे सिंह आणि व्याघ्र ह्य़ा दोघांची सेवा एकदम एकाग्रतेनें करून त्यांस संतुष्ट ठेवणें, हें एक वेळ माणसाला कदाचित् सुकर जाईल. कां कीं, ते कसे झाले तरी पशु, तेव्हां, युक्तिप्रयुक्तीनें, एकादे वेळेस तरी त्यांस झकवितां येईल. पंरतु, राजा आणि प्रजा ह्य़ांच्या सेवेंत तसें कांहीं चालावयाचें नाहीं. कां कीं, त्यांची उभयतांची दृष्टि एकसारखी कुशाग्र असते. ह्मणून, हें व्रत अगदीं प्रखर दुधारी तरवारीसारखें आहे. तें अगदीं नीट चालवायास पाहिजे.. इतके हें व्रत अतिशयित कठिण आहे, तरी तें उत्तम रीतीनें साधून यशस्वी होणारीं- ह्मणजे उभयतांची सेवा करून उभयतांकडून शाबास शाबास आणि धन्य धन्य ह्मणवून घेण्यास समर्थ – माणसें पृथ्वीच्या पाठीवर उत्पन्न होत असतात. तीं अगदीं थोडीं ‘वक्ता दशसहस्र्ोषु दाता भवति वा न वा’ अशीं असतात. परंतु, एका चंद्रानें जशी सगळ्या आकाशाला शोभा येते, तशी अशा प्रकारच्या माणसांची वृत्ति त्यांच्या सगळ्या राष्ट्रास अत्यंत लाभदायक आणि अत्यंत भूषणावह होते.’’

चरित्रांशिवाय ओक यांनी इतरही लेखन केले. त्यात ‘महाराष्ट्र ग्रंथसंग्रह’ (१८९७), ‘सांप्रतच्या लेखकांचे कर्तव्य’ (१९०९) अशी काही पुस्तके व ‘शिरस्तेदार’ ही लघुकादंबरी हे लेखन विशेष आहे. १९०६ साली त्यांचे ‘महाराष्ट्र वाङ्मय’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी मराठी वाङ्मयाच्या वाटचालीचे विवेचन केले आहे. त्यातील हा उतारा –

‘‘गद्यकालाचे दोन भाग कल्पावे. १८२६ पासून १८७३ पर्यंत एक, आणि १८७३ पासून आजपर्यंत दुसरा.. ह्य़ा दोन प्रकारच्या लेखकांच्या लेखांत एक मोठें अंतर दिसतें. तें हें कीं, पहिल्या भागांतल्यांचें ग्रंथ म्हटले म्हणजे तर्जुमें आहेत, किंवा रूपांतरें आहेत. ह्य़ाच्या पलीकडे त्यांत ग्रंथकारांचें स्वत:चें असें कांहीं सांपडावयाचें नाहीं. आणि जर सांपडलेंच, तर इंग्रजींतल्या विचारांच्या पुष्टीकरणाचें सांपडायाचें, त्याहून वेगळें किंवा त्याच्या उलट एक अक्षरही सांपडावयाचें नाहीं. ह्य़ाचा दोष त्या ग्रंथकारांकडे नाहीं. कां कीं, तेव्हां अगदीं नवी इंग्रजी होती. पाश्चात्य ज्ञानाचा प्रसार मुळींच झाला नव्हता. इंग्रजांनीं आपणांस जिंकिलें आहे, त्या पक्षीं त्यांचें सगळेंच आपल्यापेक्षा चांगलें आहे, असें सर्व लोकांस वाटत होतें. त्यांनीं आमच्या लोकांची नसती निंदा केली, तरी तीही खरी वाटत असे.. तेव्हांच्या आमच्यांतल्या विद्वानांस असें वाटत असे कीं, इंग्रजींत जें काहीं आहे, तें सर्व कांहीं मराठींत आणून टाकिलें, म्हणजे इंग्रजींतल्या ज्ञानभांडारानें जसे इंग्लिश लोक श्रेष्ठता पावले आहेत, तसे त्या ज्ञानाच्या योगानें महाराष्ट्रांतले लोकही कालेंकरून त्यांच्या इतके श्रेष्ठ होतील. जें पौष्टिक एकाला चांगलें मानवलेलें दिसत आहे, तें दुसऱ्यासही तसें मानवावें, असें मनांत येणें साहाजिक आहे.. पूर्वीचीं पुस्तकें विद्यार्थ्यांकरितां योजिलेलीं होतीं. शाळांतले अभ्यास, धर्मनीति, व्यवहारनीति इत्यादि विषयांच्या गोष्टी त्यांत सांगितलेल्या आहेत. आणि त्यांत स्वराष्ट्राच्या संबंधानें जें काय लिहिलें आहे, तें अगदीं साधें आणि सौम्य आहे. तीं बुहतेक इंग्रजीचीं भाषांतरें आहेत. परंतु, त्यानंतर पाश्चात्य ज्ञानाचा प्रसार होऊन, आपल्या देशाची खरी स्थिति आमच्या मंडळीस अधिकाधिक कळूं लागली, आमचें राष्ट्र इतर राष्ट्रांपेक्षां कोणकोणत्या विषयांत मागें पडलें आहे, आणि तें कां पडलें आहे, हें समजूं लागलें आहे, आणि तें मागें पडायास कारणें काय काय झालीं आहेत, हें हळू हळू लक्षांत येऊं लागलें, त्याप्रमाणें त्या धोरणाचीं पुस्तकें होण्यास आरंभ झाला. आणि तो प्रवाह आतां चांगला वाढीस लागला आहे,  हें फार इष्ट झालें आहे.’’

ओक यांचा लेखनप्रवास सुमारे पाच दशकांचा आहे. त्यांची लेखणी बहुप्रसव आणि शैली सुबोध होती. त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध झाले व त्यातील बहुतांश आजही उपलब्ध आहे. ते आवर्जून वाचावे.

संकलन प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com