अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- विष्णु परशुरामशास्त्री पंडित!

१८५५ मध्ये बंगालच्या पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवाविवाहाची मागणी करणारा अर्ज सरकारकडे सादर केला. १८५६ मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाहाचा अधिनियम मंजूर झाला. त्यानंतर बंगाल आणि महाराष्ट्रातही विधवा पुनर्विवाहाला चालना देणारी चळवळच उभी राहिली. या काळात मराठी समाजातील संवेदनशील मनांना स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह या विषयांचे गांभीर्य आणि निकड जाणवू लागली होती, आणि त्यातील काही आपापल्यापरीने याबाबत कर्तेपणही सिद्ध करत होते. अशा कर्त्यांमध्ये विष्णु परशुरामशास्त्री पंडित यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. ते मूळचे सातारचे. सुरुवातीच्या काळात त्यांनी व्याकरण व न्यायशास्त्राचे अध्ययन केले. पुढे पुण्याच्या सरकारी पाठशाळेत इंग्रजी शिक्षणही घेतले. काही काळ शाळाखात्यात नोकरी करून ते १८६४ साली सेवानिवृत्त झाले. त्याच वर्षी ‘एक स्वदेशहितेच्छु’ या नावाने ‘ब्राह्मणकन्याविवाहविचार’ हे पुस्तक विष्णुशास्त्रींनी लिहिले. त्यात त्यांनी प्रौढविवाहाविषयी मते मांडली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात,

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
General Dwivedi expressed his views on Pune on the occasion of Army Day at the parade ground of the Bombay Engineer Group Pune news
लष्करप्रमुखांकडून पुण्याचा गौरव, म्हणाले, लष्करासाठी पुणे ‘पॉवर हाउस’
Vasai, Bhayandar police , Vasai, Bhayandar police force,
वसई, भाईंदर पोलीस दलात मोठे फेरबदल; ३ अधिकारी परतले, ६ नवीन अधिकारी झाले कायम
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
thieves stole Metro pole in Shivajinagar area are arrested
शिवाजीनगर भागात मेट्रोचे खांब चोरणारे गजाआड, सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड
tigers missing tipeshwar wildlife sanctuary
टिपेश्वर अभयारण्यातील दोन वाघ बेपत्ता?

‘‘महान महान विचारी व दूरदर्शी अशा आपल्या शास्त्रकर्त्यांनी ज्या लोकांनीं अज्ञानतमांत न चांचपडावें म्हणून ढळढळीत शास्त्रदिपक लावून जिकडे तिकडे अक्षय प्रकाश पाडला आहे, ते लोक आपले डोळे घट्ट झांकून अंधारांत ठेंचा खात चालले आहेत. ‘‘खोटय़ा खडय़ास चमक अधिक’’ या म्हणीप्रमाणें वडिलांच्या चाली खऱ्या शास्त्रार्थापेक्षां अधिक तेजस्वी होऊन बसल्या आहेत. त्यामुळें एखाद्यानें सर्व शास्त्रांस संमत पण या चालीस यत्किंचित् विरुद्ध असें कांहीं लिहिलें म्हणजे त्याच्या कपाळीं पहिला डाग हाच कीं, हा लिहिणारा सुधारलेला आहे, नास्तिक आहे, याचा लेख वाचुं नये. तर अशा प्रकारचे दोष देणारांस आम्ही इतकेंच सांगतों कीं हा समज आपल्या पूर्वजांचा असता तर नास्तिक ग्रंथांची त्यांनीं केलेलीं हजारों हजार खंडणें आपल्या दृष्टीस पडतीं काय हें मनांत आणा आणि जें काय लिहिलें तें फुरसतीप्रमाणें वाचून पाहा..’’

या पुस्तकातील हा काही भाग पाहा-

‘‘विवाहसंस्कार हा स्त्रीपुरुषांमध्यें शास्त्रविहित एक संकेत अथवा करार आहे असें विवाहप्रयोग साकल्येंकरून पाहतां खचीत मनांत येतें, कारण करारास ज्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच प्रकारच्या गोष्टी त्या प्रयोगांत बहुत आढळतात. यांत स्त्रीपुरुष या उभयतांचा संबंध, उभयतांच्या संबंधाचे हेतु, उभयतांनी परस्परांशीं कसें वागावें इत्यादि गोष्टींचा उल्लेख फार व्यक्त रीतीनें केला आहे. आणि तो उभयतांपैकीं कोणा एकानेंहि मोडूं नये; यास्तव प्राचीन सांप्रदायाप्रमाणें शपथा घेतल्या आहेत व साक्षीहि ठेवले आहेत, आणि किती एक मुख्य मुख्य गोष्टींचा उच्चार त्या कायम असें दाखविण्यासाठीं त्रिवार केला आहे. व्यवहारांतील दुसरे कोणतेहि करार अथवा त्यांतील कांहीं अंश मोडिल्यास स्मृतींत ज्याप्रमाणें शिक्षा सांगितल्या आहेत, त्याप्रमाणें विवाहरूप संकेत किंवा त्याचा एखादा अंश मोडल्यास मोडणारांस यथायोग्य प्रायश्र्िचत्त सांगितलें आहे. सामान्य करारनाम्यापेक्षां यांत आणखी विशेष हा आहे कीं, हा त्याचप्रमाणें अगदीं सहज अथवा क्षुल्लक कारणानें मोडण्यासारखा नाही.

अशा प्रकारचा परस्परांशीं परस्परांचें बंधन करणारा करारनामा करण्याविषयीं स्त्रीपुरुष या उभयपक्षांची पूर्ण इच्छा असली पाहिजे आणि ती इच्छा तीं उभयतां जाणत्या वयांत आल्यानंतर झालेली पाहिजे. कारण अज्ञान स्थितींत असणाऱ्या लोकांनीं केलेला करारनामा त्यांस बंधनभूत होईल असें कोणत्या लोकांत मान्य होणार आहे?’’

या पुस्तकानंतर, पुढच्याच वर्षी त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ग्रंथाचे ‘विधवाविवाह’ हे मराठी भाषांतर प्रकाशित केले. या ग्रंथात धर्मशास्त्राचे दाखले देत पुनर्विवाहाचे समर्थन केले होते. त्यातील हा उतारा पाहा –

‘‘विधवाविवाह मन्वादि स्मृतिकर्त्यांच्या मतास वास्तविकच विरुद्ध नाहीं. इतकीच एक गोष्ट समजली पाहिजे की, दुसऱ्या वेळेस विवाह झालेल्या स्त्रियांस ते पुनर्भू म्हणत असत, आणि त्यांजपासून झालेल्या पुत्रांस पौनर्भव म्हणत असत, आणि पराशराच्या मताप्रमाणें अशा स्त्रियांस व अशा पुत्रांस कलियुगांत तीं नांवें नाहींत. हा एवढाच काय तो फरक पराशर व अन्य स्मृतिकर्ते यांच्या मतांत आहे. पराशराच्या मनांत कलियुगांत त्या संज्ञा चालवायच्या असत्या तर त्यानें अशा स्त्रियांस पुनर्भू हा शब्द लावला असता आणि सांगितलेल्या पुत्रांच्या प्रकारांत पौनर्भव पुत्रांचें परिगणन केलें असतें. कलियुगामध्यें अशा स्त्रियांस पुनर्भू असा शब्द लावावयाचा नाहीं, आणि त्याजपासून झालेल्या पुत्रांस पौनर्भव या प्रकारचें न मानितां औरसच मानावयाचें, हें चालू संप्रदायावरूनही सिद्ध आहे. पाहा कीं वाणीनें एखाद्या पुरुषास कन्या दिल्यानंतर विवाह होण्यापूर्वीच तो पुरुष मेला अथवा दुसऱ्या कारणानें त्याजबरोबर व्हावयाचा विवाह रहित झाला तर त्या कन्येचा विवाह दुसऱ्या पुरुषाबरोबर होतो. मागील युगांत अशा स्त्रियांस पुनर्भू व त्यांच्या संततीस पौनर्भव असें म्हणत असत.

..हल्लींच्या काळांत सात प्रकारच्या पुनर्भूपैकीं वाग्दत्ता, मनोदत्ता, कृतकौतुकमंगला आणि पुनर्भूप्रभवा या चार प्रकारच्या पुनर्भूचा विवाह धडका चालूच आहे. अशा स्त्रियांस जरी पूर्वीच्या युगांत पुनर्भू म्हणत असत, तरी आतां त्यास निराळें विशेषण लागत नाहीं, आणि सर्व गोष्टींमध्यें त्या, ज्यांचा प्रथमच विवाहसंबंध झाला आहे, त्यांजप्रमाणें मानल्या आहेत. आणि त्यांजपासून झालेले पुत्र पौनर्भव असें न मानतां सर्व गोष्टींविषयीं औरसच मानले आहेत. मातापितरांस पिंडदान करणें, त्यांच्या मालमत्तेचे वारस होणें वगैरे पुत्रानें करावयाच्या गोष्टी ते औरस पुत्राप्रमाणेंच करितात. त्यांस चुकूनही कधीं पौनर्भव असें म्हणत नाहींत.’’

विष्णुशास्त्रींनी हे भाषांतर प्रसिद्ध करताच महाराष्ट्रात मोठीच खळबळ झाली. याविषयावर सनातनी आणि सुधारक असे दोन गटच पडले, अन् या विषयाला खऱ्या अर्थाने वाचा फुटू लागली. त्यामुळे या भाषांतरीत ग्रंथाचे मूल्य महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात खूप आहे.

याच सुमारास विष्णुशास्त्री ‘इंदुप्रकाश’ या साप्ताहिकाच्या मराठी विभागाचे उपसंपादक म्हणून मुंबईत रुजू झाले. बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, जरठ-कुमारी विवाह आदी प्रश्नांविषयीचे त्यांचे लेखन त्यात प्रकाशित होत होते. १८६६ मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ‘पुनर्विवाहोत्तेजक मंडळी’ची स्थापना केली. लोकांचे औदासिन्य, भित्रेपणा व धर्मभोळेपणा या तीन बाबी पुनर्विवाह चळवळीच्या आड येतात, त्यामुळे त्या नाहीशा करण्यासाठी सुसंघटित प्रयत्न करणे हे या मंडळीचे मुख्य कार्य होते. याच काळात त्यांनी व्याख्याने, चर्चा, वादसभांच्या माध्यमातून या विषयांबाबत जागृती करण्यास सुरुवात केली. १८७० मध्ये ‘पुनर्विवाह सशास्त्र असल्याविषयीं पुणें व नाशिक येथें दिलेलीं व्याख्यानें’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. त्यातील हा उतारा पाहा-

‘‘विवाह होण्याविषयीं पुरुषांच्या व स्त्रियांच्या अंगीं जे गुण असले पाहिजेत म्हणून सांगितले आहेत त्यांत, सर्व सांसारिक कृत्यांची जबाबदारी स्त्रीपेक्षां पुरुषावर जास्ती असल्याचें मनांत आणून पुरुषाच्या आंगच्या गुणांची संख्या जास्त लिहिली आहे, आणि अर्थात स्त्रीच्या आंगच्या गुणांची संख्या कमी लिहिली आहे. यांजपैकी कांहीं कांहीं गुणांची परीक्षा फार बारकाईनें करण्यास सांगितलें आहे. परंतु कितीही बारकाई केली तरी अत्यंत अल्पज्ञ हा मनुष्य अनेक कारणांनीं चुकीस पात्र आहेच. यास्तव अशाप्रकारें चुक्या होअून विवाह घडून आल्यास त्यांतून आणि विवाहोत्तर आधिदैविक अथवा आधिभौतिक अित्यादि संकटें आलीं असतां त्यांतून त्यास पार पाडण्यास तसतसें मार्ग करून ठेविलेच आहेत. – म्हणजे विवाहित पुरुषाचा व विवाहित स्त्रीचा पुन: विवाह करण्यास मोकळीक दिली आहे. त्यांत ती पुरुषास दिली असल्याचें सर्वास माहीत असून वस्तूत: ती जितकी दिली आहे तिजपेक्षां स्वहस्तांतच सर्वदा नियम धारण करणाऱ्या पुरुषांनीं ती वाढविली आहे. ती आतां वाढतां वाढतां अशा अुच्चपदास येअून पोंचली आहे कीं, बिचाऱ्या हजारो अबला तेथून तीस बळी पडत आहेत. मुलीच्या विचारावांचून पाहिजे तितक्या वयाच्या व पाहिजे त्या ठोंब्यास मुली देण्याच्याच अेकटय़ा प्रघाताचा विचार केल्यासही मी म्हटलेल्या गोष्टीचीं अुदाहरणें हजारो सांपडतील. अस्तु.

पुरुषांप्रमाणेंच स्त्रियांसहि कितीअेक आपत्तींच्या प्रसंगीं पुनर्विवाहास स्पष्टपणें मोकळीक दिली आहे. ही मोकळीक देणारा साक्षात् वेदपुरुष आहे; व मनु, कात्यायन, वसिष्ठ, प्रजापति, शातातप, नारद, हारीत, व पराशर हे आठ महर्षि आहेत. तूर्त अितके अवगत आहेत; व शोधाअंतीं आणखीही बहुत अुपलब्ध होतील असा बहुत संभव आहे.’’

पुढे १८७२ मध्ये ‘आर्य लोकांच्या प्राचीन व अर्वाचीन रीति व त्यांची परस्परांशी तुलना..’ हा त्यांच्या व्याख्यानांचा संग्रह प्रकाशित झाला. त्यातला हा उतारा पाहा-

‘‘विवाहासंबंधांत जातिभेद अगर वर्णभेद प्राचीनकालीं मानीत नव्हते असें धर्मशास्त्रावरून व त्या काळच्या व्यवहारावरून निर्विवाद सिद्ध होतें. ब्राह्मणास ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चार वर्णाच्या; क्षत्रियास क्षत्रिय, वैश्य, शूद्र या तीन वर्णाच्या; व शूद्रास शूद्रवर्णाची अशा बायका करण्यास आज्ञा दिली आहे व ती प्राचीन काळीं चालू होती असें मन्वादि सर्व स्मृतींच्या आचाराध्यायांतील व व्यवहाराध्यायांतील वचनांवरून स्पष्ट होतें. याशिवाय क्षत्रियवंशांतील पुरुषही ब्राह्मणवर्णाच्या बायका करीत असत असें अितिहासांत आढळतें. ही चाल फार चांगली व लोकांस सुखावह होती. ती अर्वाचीन काळीं अगदीं बंद झाली, ती पुन: चालू करणें हें सर्वाचें कर्तव्य आहे.’’

यानंतर १८७५ मध्ये विष्णुशास्त्रींनी ‘स्त्रियांचे अधिकार’ या विषयावर दिलेले व्याख्यानही प्रकाशित झाले. त्यातला हा उतारा-

‘‘आपल्या सर्वसाधारण लोकांच्या प्रस्तुतच्या निकृष्ट प्रतीच्या मानसिक स्थितीच्या मानानें पाहतां कोणीही मनुष्य कसाही विद्वान अथवा प्रतिष्ठित असला तरी आजच्या व्याख्यानाच्या विषयांत त्याचेच विचार म्हणून कधीं अुपयोगी पडावयाचे नाहींत. तर ज्या महर्षीविषयीं त्यांची पूज्यबुद्धि अद्यापि नष्ट झाली नाहीं, त्यांचे विचार त्या विषयावर काय आहेत हेंच मुख्यत्वें लिहून प्रसंगविशेषीं स्वाभिप्राय द्यावा हें बरें वाटल्यामुळें तशीच आज योजना केली आहे.

आपणांस पसंत वाटत असून कन्येस पसंत वाटत नसेल तर तो वर सोडून कन्येस जो पसंत वाटत असेल त्यासच कन्या पित्यानें द्यावी, आणि तसेंच आपणांस आवडत असेल तीच कन्या मुलाच्या गळ्यांत न बांधतां त्यास जी आवडत असेल ती त्यास द्यावी. म्हणजे विवाहाच्या बाबतींत वधूस वर पसंत व वरास वधू पसंत असेल तरच त्यांचा विवाह करावा; नाहीं तर कसा तरी अेकदां विवाह करून दोन हातांचे चार हात (मुसक्या बांधण्याचें काम) करूं नयेत अशी या नियमाची आज्ञा आहे. तेव्हा आपणांस आवडेल तसाच नवरा बाप वगैरेकडून करून घेण्याचा किंवा स्वत: करण्याचा स्त्रियांस पूर्ण हक्क आहे. कन्येस यथायोग्य वर न मिळेल तर ती जन्मभर अविवाहित ठेवावी, परंतु अयोग्य वरास कधींही देअू नये..’’

१८६४ ते १८७६ या बारा वर्षांच्या काळात विष्णुशास्त्रींनी झपाटल्यासारखे पुनर्विवाहाच्या विषयावर काम केले. ‘त्यांची भाषा काहीशी खडबडीत, पण सरळ व सोपी आहे. त्यांच्या प्रत्येक लेखांत त्यांच्या अंत:करणाची तळमळ, आत्मविश्वास, शोधकता व व्यासंग स्पष्ट दिसतो,’ अशा शब्दांत गं. बा. सरदारांनी त्यांच्या ‘महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी’ या पुस्तकात विष्णुशास्त्रींचा गौरव केला आहे. त्यात विष्णुशास्त्रींच्या लेखन व कार्याचे विस्तृत विवचेन आले आहे. ते आवर्जून वाचायला हवे.

संकलन : प्रसाद हावळे

प्रसाद हावळे – prasad.havale@expressindia.com

Story img Loader