अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- विष्णुशास्त्री चिपळूणकर!
गेल्या आठवडय़ात आपण महात्मा जोतीराव फुले यांचे गद्यलेखन पाहिले. जोतीरावांच्या गद्यलेखनात महत्त्वाचे असलेले ‘गुलामगिरी’ हे पुस्तक १८७३ साली प्रकाशित झाले. या पुस्तकातून त्यांच्या विचारांची, ते पोहोचवण्यासाठी वापरलेल्या भाषेची दिशा स्पष्ट झाली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी -१८७४ मध्ये- विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘निबंधमाला’ हे मासिक सुरू केले. मराठी गद्यपरंपरेत महत्त्वाचं पर्व ठरलेल्या निबंधमालेतून ‘निबंध’ या साहित्यप्रकाराचा समर्थ आविष्कार विष्णुशास्त्र्यांनी केला. स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती व स्वइतिहास यांच्या प्रचारासाठी त्यांनी आपली लेखणी वापरली. मालेच्या पहिल्याच अंकात त्यांनी ‘मराठी भाषेची सांप्रतची स्थिती’ हा लेख लिहिला. त्यातील हा काही भाग पाहा-
‘‘१. हा विषय मोठा अगत्याचा आहे. सध्यांच्या वेळीं तर त्याविषयीं विचार करणें फारच जरूर आहे. कां कीं ही वेळ देशाच्या व भाषेच्या स्थित्यंतराची होय. आजवर या दोहोंत जे फेरफार होत गेले ते सर्व मिळून त्यांची एकच अवस्था मानली असतां चिंता नाहीं. कारण दोहोंत जरी पुष्कळ उलथापालथी झाल्या, तरी यापुढें जें एकंदर अवस्थांतर होण्याचा रंग दिसत आहे त्यापुढें ते कांहींच नाहींत म्हटलें असतां चालेल. यास्तव या मोठय़ा संधीस सुज्ञांनीं दोहोंच्या स्थितीकडे चांगलेंच लक्ष दिलें पाहिजे..
३. वरील दोन गोष्टींविषयीं आमच्या लोकांत प्रमुख म्हणविणारांचें बहुधा कायम मत केव्हांच ठरून गेलें आहेसें दिसतें. आम्हांस कित्येकांच्या तोंडून ऐकलेलें आठवतें कीं, मनांतील अभिप्राय खुबीदार रीतीनें स्पष्ट करण्यास मराठी अगदी अप्रयोजकक. तींत कांहीं जीव नाहीं. कित्येक शिक्षक इंग्रजींतील अर्थ मराठींत समजून देतांना निरुपाय होऊन हात टेकतात; त्यांतून जे कोणी अंमळ चणचणीत असतात, ते तर साफ सांगून जातात कीं, छे! मराठी भाषेंत याचें भाषांतरच होऊं सकत नाहीं. आपली भाषा फार भिकार पडली. आलीकडील विद्वानांनीं तर जुन्या शास्त्री लोकांवरही चढ केली! त्यांस देशभाषेचा विटाळही सोसत नाहीं. दहा वीस वर्षांमागें शिकलेल्या लोकांस मराठींत ग्रंथ लिहिण्याची बरीच हौस वाटत असे; पण आतां ती भाषा कोणास डोळ्यांसमोरही नको! आपले अमूल्य विचार प्रदर्शित करणें झालेंच तर इंग्लिश भाषेहून हलक्या द्वारानें ते लोकांच्या मनांत शिरकविणें त्यांस अगदीं आवडत नाहीं..
४. पण आपल्या भाषेची वरच्याप्रमाणें विटंबना व अवहेलना करण्याचें आह्मांस अगदीं प्रयोजन दिसत नाहीं. जी भाषा बोलणाऱ्यांनी दिल्ली-अटकेपर्यंत आपले झेंडे नेऊन लावले, जींत तुकाराम-रामदासांसारख्या भगवत्परायण साधूंनीं आपले श्रुतिवंद्य अर्थ ग्रथित केले, जींस मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत इत्यादी कवींनीं आपल्या रसाळ व प्रासादिक वाणीनें संस्कृत भाषेचीच प्रौढी आणली, त्या भाषेस आवेश, गांभीर्य व सरसता या गुणांकरितां कोणत्याही अन्य भाषेच्या तोंडाकडे बघण्याची खास गरज नाहीं अशी आमची खात्री आहे! हें मत कोणास उगीच फुशारकीचें वाटूं नये ह्मणून सर्वास खात्रीनें कळवितों कीं, ज्या कोणास आपल्या भाषेची खरी योग्यता जाणण्याची इच्छा असेल त्यानें मोलस्वर्थ व क्यांडी यांच्या कोशांतील प्रस्तावना वाचून पहाव्या. विशेषत: मोलस्वर्थकृत कोश तर शुद्ध मराठी भाषेचें मार्मिक ज्ञान आपणास होऊं इच्छिणारास फारच उपयोगाचा आहे.. याप्रमाणें स्वभाषेच्या लज्जास्पद अज्ञानास्तव व दुरभिमानास्तव आजपर्यंत मराठी भाषेची फारच हयगय होत गेली. व ज्यांनी तिच्या अभिवृद्धय़र्थ निरंतर उत्सहानें झटावें, त्यांच्यांत सुस्ती, कृतकृत्यताबुद्धि, पंडितंमन्यता वगैरे दोष अखंड वसल्यामुळें तिची मोठीच हानि होऊन ती क्षयाच्याच पंथास दिवसेंदिवस लागत चालली आहे.’’
याच निबंधात ते पुढे लिहितात-
‘‘६. या ठिकाणी आमच्या वाचणारांस एक मोठीच शंका येईल; तिचें निवारण केलं पाहिजे. ते विचारतील कीं, मराठींत मागेंहि दोन परभाषा- फारशी व आरबी- पुष्कळच मिसळल्या होत्या, मग आतां इंग्रेजीचेंच एवढें भय कसचें? ही शंका सकृद्दर्शनीं खरी वाटते; पण अंमळसा बारीक विचार केला तर ती अगदी शुष्क दिसेल. त्या परकी भाषांचा संबंध मराठीशीं ज्या प्रकारचा होता त्याहून इंग्रेजीचा संबंध फारच निराळा आहे. त्यांपैकीं आरबीचा संबंध तर दक्षिणेकडे मुसलमानांचेंच जोंपर्यंत प्राबल्य होतें तोपर्यंतच असून आतां मुळींच नाहींसा झाला आहे; सध्यां जे कांहीं आरबी शब्द आढळतात, ते फारशी भाषेच्या द्वारेंच आले असावे असें वाटतें. तसाच या दुसऱ्या भाषेचाही संबंध पेशव्यांच्या कारकिर्दीच्या अखेपर्यंतच असून तेव्हांपासून नाहींसा झाला आहे. यास्तव चालू मराठी भाषेंतून जुने परकी शब्द गेल्या पन्नास वर्षांत शेंकडों निघून जाऊन कांही वर्षांनीं तर ते आणखीहि कमी होतील असें दिसतें. पेशव्यांच्या राज्यांत दप्तर फारशी भाषेंत ठेवीत असल्यानें व ब्राह्मण लोक पुष्कळ त्यांतच चाकरीस रहात यास्तव, त्या भाषेचे शब्द प्रचारांत पुष्कळ येऊं लागले. पण त्या वेळचे लोक फारशी ज्या रीतीनें शिकत तीपेक्षां आतांची इंग्रेजी शिकण्याची तऱ्हा फार वेगळी आहे. त्यांचा ती परभाषा शिकण्याचा उद्देश केवळ व्यावहारिक होता,- ह्मणजे सरकारी काम बजावतां येण्यापुरतीच ती शिकत. सध्यांच्या लोकांत इंग्रेजींतील अनेक ग्रंथात निष्णात झालेले विद्वान् जसे शेकडों सापडतील तसे त्या वेळेस अगोदर कोणी असलेच तर फार असतीलसें वाटत नाहीं. बहुतके तर आतां जशी हिंदुस्थानी भाषा लोक शिकतात त्याप्रमाणेंच सरासरी बोलण्याचालण्यापुरती केवळ शिकत असतील असें दिसतें. तेव्हां अशा प्रकारें परभाषांचा संबंध कितीही काळ जरी असला, तरी त्यापासून चालू देशभाषेस भीतीचें कांहींच कारण नाहीं हे उघड आहे.
पण इंग्लिश भाषेची गोष्ट तशी आहे काय? या भाषेचें सामान्य ज्ञान तर आतांशा बहुधा प्रत्येक मनुष्यास जरूर झालें आहे. दिवसेंदिवस तर तींत निपुण होणें हा जीवनाचाच एक उपाय होऊं पहात आहे. चोहोंकडे प्रतिष्ठा मिरविण्याचें तर यासारखें सध्या दुसरें साधनच नाहीं. तेव्हां तिचा जो हल्लीं फैलावा झाला आहे, व होत चालला आहे, त्यापुढें वर सांगितलेल्या भाषांची गोष्ट काय बोलावी?.. या सर्व गोष्टींचा क्षणभर विचार केला असतां सहज ध्यानांत येईल कीं, मुसलमानांच्या सहवासानें आपल्या पेहेरावांत जितकी तफावत पडली तितकीच भाषेंतहि पडली. ह्मणजे मूळची साधी रीत जी दोनच वस्त्रें वापरण्याची ती जाऊन तीहून डौलाचा जो सध्यांचा आंगरखा, पागोटें, उपवस्त्र हा पोषाक जसा त्या लोकांपासून आपण उचलला, त्याप्रमाणेंच त्यांच्या भाषेंतून आपल्या भाषेंत कांहीं शब्द येऊन व तीस नवें वळण लागून तींत झोंकदारपणा व आवेश हे गुण मात्र जास्त आले. तेव्हां त्या भाषेच्या मिसळण्यानें आपल्या भाषेचें अहित न होतां हितच झालें, यांत संशय नाहीं. पण इंग्लिश भाषेचा प्रचार हाच आतां सार्वत्रिक होऊन मूळच्या भाषेचा लोप होऊं पहात आहे. कारण विचार, कल्पना यांची उत्पत्ति ज्या मनापासून तेंच इंग्रेजी बनल्यावर मूळच्या भाषेची प्रधानता कोठें राहिली? अर्थात्च नाहीं; तीस सर्व प्रकारें गौणत्व येऊन इंग्रेजी जिकडे नेईल तिकडे जाणें तीस प्राप्त झालें.’’
निबंधमालेचा पहिला अंक २५ जानेवारी १८७४ रोजी निघाला. ते पुढे सुमारे नऊ वर्षे सुरू राहून शेवटचा अंक डिसेंबर १८८२ मध्ये प्रकाशित झाला. या नऊ वर्षांच्या काळात मालेचे ८४ अंक निघाले. वीस पृष्ठांच्या या अंकात प्रारंभी निबंध, नंतर सुभाषिते, विनोदमहदाख्यायिका, अर्थसादृश, भाषापरिज्ञान, साहित्य, अप्रकाशित काव्य व निबंधांसंबंधीचा पत्रव्यवहार अशी सदरे असत. मालेतून विष्णुशास्त्र्यांनी भाषा, इतिहास, वाङ्मय, ग्रंथसमीक्षा असे विविध प्रकारचे लिखाण केले आहे. आधीच्या निबंधकारांपेक्षा हे लिखाण समृद्ध व समर्पक वर्णनांमुळे वाचकांना आकृष्ट करणारे ठरले.
महाविद्यालयात शिकत असल्यापासूनच विष्णुशास्त्रींच्या लिखाणास सुरुवात झाली. ‘पुणे पाठाशालापत्रका’तून त्यांनी लेखन केले. त्यांचे वडिल कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी लिहायला घेतलेली पण अपूर्ण राहिलेली ‘रासेलस’ ही भाषांतरित कादंबरी त्यांनी पूर्ण केली. शिवाय ‘संस्कृत कविपंचक’ ही लेखमालाही लिहिली. विष्णुशास्त्रींचा प्रखर राष्ट्रवाद आणि धार्मिक-सामाजिक प्रश्नांबाबतची परंपरानिष्ठ विचारसरणी यामुळे त्यांच्या लिखाणाची त्या काळात भुरळ पडली. मालेतील शेवटचा निबंध ‘आमच्या देशाची स्थिती’ हा होता. त्यातील हा उतारा पाहा-
‘‘आमच्या देशास काहीएक झाले नाही. त्याची नाडी अद्याप साफ चालत असून शरीरप्रकृतीस म्हणण्यासारखा कांहीएक विकार नाही. यास्तव आमच्या अर्वाचीन पंडित मंडळींनी डाक्तरी पद्धतीस अनुसरून एकावर एक जालीम दवे सुरू करून व शस्त्रक्रियेचे तीव्र प्रयोग करून त्याची जी हलाखी मांडली आहे व विनाकारण विटंबना आरंभिली आहे, ती सर्व सोडून देऊन साधारण पौष्टिकाचे उपचार त्याजवर सुरू झाले असता तो लवकरच पुन: पहिल्यासारखा सशक्त व तेजस्वी होईल याविषयी आम्हांस बिलकूल संशय नाही. हल्ली जी आमच्या राष्ट्रास विपत्तीची स्थिती प्राप्त झाली आहे ती आमच्या अंगच्या अनिवार्य दोषांमुळे झाली नसून ती यदृच्छेने कोणत्याही देशास येण्यासारखी आहे व आजपर्यंत आलीही आहे. इंग्रज लोक हे आम्हाहून अनेक प्रकारांनी बलिष्ट असल्यामुळे व आमचे दैव फिरल्यामुळे हल्लीच्या अवस्थेत आम्ही येऊन पडलो आहो- कालगती विचित्र आहे.’’
मालेत त्यांनी लिहिलेली ‘मोरोपंतांची कविता’ ही बारा लेखांची मालिका, ‘डॉ. जॉन्सन’ ही आठ लेखांची मालिका, याशिवाय ‘इतिहास’, ‘विद्वत्त्व व कवित्व’, ‘ग्रंथांवर टीका’, ‘गर्व’, ‘संपत्तीचा उपभोग’ आदी लेख आवर्जून वाचायला हवेत. मालेतील निबंधांचे स्वरूप खंडन-मंडनात्मक आहे. उपहास व वेधकशैली हे या निबंधांचे एक वैशिष्टय़ आहे. मार्मिक व तिखट भाषेमुळे या निबंधांची परिणामकारकता वाढली. एकप्रकारे मराठी गद्याला या लेखनाने नवे रूप दिले.
त्यांचे बंधू लक्ष्मण चिपळूणकर यांनी लिहिलेले ‘कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्य़ांचे चरित्र’ किंवा ग. त्र्यं. माडखोलकर लिखित ‘विष्णु कृष्ण चिपळूणकर- काळ आणि कर्तृत्व’ या चरित्रपर पुस्तकांतून विष्णुशास्त्र्यांचा काळ व त्यांचे कार्य याविषयीची विस्तृत माहिती आली आहे. वासुदेव विनायक साठे यांनी संपादित केलेला ‘निबंधमाला’ हा संग्रह, मा. ग. बुद्धिसागर यांनी संपादित केलेला ‘चिपळूणकर लेखसंग्रह’ यातून मालेतील निबंध वाचायला मिळतील. याशिवाय ल. रा. पांगारकरांच्या व्याख्यानावर आधारित ‘निबंधमालेचे स्वरूप व कार्य’ ही पुस्तिका व य. दि. फडके यांनी लिहिलेले व नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर’ हे छोटेखानी चरित्रही आवर्जून वाचायला हवे.
संकलन प्रसाद हावळे -prasad.havale@expressindia.com