मौज प्रकाशन आणि ‘सत्यकथा’ मासिकाचे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत यांच्या निधनाला नुकतीच चौदा वर्षे झाली. त्यांच्या निधनानंतर श्रीपुंच्या स्नेही सुनीताबाई देशपांडे यांनी त्यांच्या मैत्रीची जागवलेली सय..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्यारात्री राम कोल्हटकरांचा फोन आला, ‘श्री. पु. गेले.’
‘कधी?’ मी दचकून विचारले.
‘पंधरा मिनिटांपूर्वी.’
पुढल्या पाच-सहा मिनिटांत काही बातमीदारांचे फोन आले.. माझ्या प्रतिक्रिया मागणारे. अशा लोकांचा त्या क्षणी खरं तर रागच येतो. पण मग लक्षात येतं, की रोजचं वर्तमानपत्र ही तर आपली गरज असते- सकाळच्या चहाच्या जोडीने. मग त्या बातम्या छापण्यासाठी मजकूर गोळा करणाऱ्या या लोकांवर रागावून कसं चालेल?
श्री. पु. गेले? हो. जन्माला येणे हे कुणाही प्राण्याच्या हाती नसतं. पण त्यानंतर कधीतरी मृत्यू हा अपरिहार्यच. मग मागे राहणाऱ्यांसाठी शिल्लक राहतात त्या आठवणी. आपल्या मनात येत राहणाऱ्या.. सुखदु:खांच्या.
श्री. पुं.ची आणि माझी ओळख कधी झाली, आठवत नाही. पण हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत होत गेलं. एकमेकांची आठवण होत राहायला, मनमोकळ्या गप्पा मारायला, एखाद्या लिखाणाबद्दल चर्चा करायला, आपुलकीने एकमेकांच्या सुखदु:खात सामील व्हायला.. क्वचित एखाद्या मुद्दय़ावर आमचा मतभेदही होत असे, पण त्यावर खूप चर्चा होई, भांडण कधी झालं नाही. मी तशी काहीशी भांडखोरच. म्हणजे वाद घालत बसण्याची खोड असलेली. एवढय़ा तेवढय़ावरूनही. पण श्री. पुं.च्या बाबतीत त्यांनी मला कधी अशी संधीच येऊ दिली नाही. बोलण्याचं, गप्पागोष्टींचं वादात रूपांतर होणार अशी पुसटशी शंका आली तरी त्या वाटेला स्नेहाचं, प्रेमाचं वळण देण्याचं कौशल्य या माणसात कुठून आलं? हे कधीपासून आपल्या प्रत्ययाला येऊ लागलं, कोण जाणे. अनेकांच्या अनेक तऱ्हेच्या वर्तणुकीचा त्यांनी निषेध केलेला मला माहीत आहे. पण तोही इतक्या मृदु मुलायम आवाजात, की आपणही अंतर्मुख होऊन विचार करू लागावं. निषेध करावा तो वर्तनाचा- त्या व्यक्तीचा नव्हे, हे लक्षात आणून दिलं ते श्री. पुं.नी.
या आमच्या बोलण्यात कधीमधी खासगी गोष्टीही यायच्या. त्यांची पत्नी विमल ही मधुमेहाची पेशंट होती. त्यासाठी रोज एक इंजेक्शन घ्यावं लागायचं. ते बहुतेक लोक स्वत:चं स्वत:च घेतात, पण विमलला ते इंजेक्शन श्री. पु. देत! कुणालाही शब्दानीदेखील न दुखावणारा हा माणूस- प्रत्यक्ष आपल्या पत्नीच्या शरीरात चक्क इंजेक्शनची सुई टोचतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी मग खुद्द त्यांनाच विचारलं.
‘खरं सांगू का, विमलचे लहानपणी कधी लाड वगैरे झालेच नाहीत. तिचं बालपण तसं कोरडंच गेलं. मग तिच्यासाठी एवढंसं काही केलं तर त्यात काय बिघडलं?’
‘अहो, बिघडलं काहीच नाही. पण असे नवरे अपवादात्मकच. नवऱ्यांची सेवा वगैरे करणं हे बायकांकडून अपेक्षितच असतं. पण नवऱ्याने बायकोसाठी हा विचार करावा हे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीला मानवत नाही, हा माझा अनुभव.’
यावर ते थोडेसे हसले आणि त्यांनी विषयच बदलला. पुढे विमलला अर्धागाचा झटका आला, तेव्हा रोज तिच्या शेजारी बसून हा नास्तिक माणूस तिला रामरक्षा ऐकवायचा आणि तिलाही म्हणायला लावायचा.
त्यांचा मुलगा अशोक हा परदेशी असतो. आपले आई-वडील आता थकले आहेत, त्यांनी आपल्याकडेच येऊन राहावं असं त्याला वाटे. विमललाही मुलाचं म्हणणं पटत होतं. पण श्री. पुं.ना मात्र ‘मौज प्रकाशना’ला सोडून कुठेही कायमचं वास्तव्याला जाऊन राहणं मानवणारं नव्हतं.
खरं तर भागवतांची पुढची पिढी आता ‘मौज’चं सर्व काम आपसात वाटून घेऊन आपल्या परीने व्यवस्थित करत आहे. या सर्वाचं ‘मौज’ हे जणू घरच आहे. पण श्री. पुं.चा तो प्राण होता. ‘मौजेची प्रतिष्ठा’ हा त्यांच्या अस्मितेचा भाग होता. मी एकदा त्यांना म्हणाले होते, ‘विमल आणि अशोकपेक्षा मौजवर तुमचं प्रेम अधिक आहे श्री. पु.!’ त्यावर ते नुसते हसले आणि त्यांनी विषयच बदलला.
कुणाचं आणि कोणतं लिखाण उत्स्फूर्त आहे आणि कुणाचं इतरांच्या विचारांवर बेतलेलं आहे, यावर आमचं सहसा दुमत होत नसे. अनेकांचं अनेक तऱ्हेचं लिखाण त्यांच्याकडे येई. त्यातलं योग्य वाटेल ते स्वीकारताना तसं पत्र त्या व्यक्तीला ते पाठवीत. त्यात प्रोत्साहनाचा भाग न चुकता असे. त्याहीपेक्षा ज्यांचं लिखाण स्वीकारणीय वाटत नसे, ते परत करतानाही ती व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी न चुकता ते घेत असत.
प्रत्येकाच्या मर्यादा असतात. त्या जाणून घेऊन, ‘आपल्यासाठी योग्य शिखर कोणतं?’ याचा विचार हा ज्याने त्याने करावा. मग त्या दिशेने जाता जाता आपणालाच आपल्या कुवतीचा अंदाज येऊ लागतो आणि निराशेतून जास्तीत जास्त सुटका होऊ शकते. स्वत:च स्वत:ची ओळख करून घ्यावी, याहून उचित दुसरं काय?
श्री. पुं.च्या घरी आम्ही उभयता एकदाच गेल्याचं मला आठवतं. त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं तेव्हा. पण त्यांनी आमच्या घरी अधूनमधून येत राहणं, फोनवर गप्पा मारणं हे अनेकदा घडे. हा त्यांच्यादेखील आनंदाचा भाग आहे हे मला जाणवे आणि खूप आनंद होई.
मला आठवतंय, एकदा मी माझे भलेथोरले दोन लेख त्यांच्याकडे वाचायला पाठवले होते. त्या मजकुरात कोणताही फेरबदल न करता, क्वचित विरामचिन्हांची चूक तेवढी सुधारून त्यांनी ते परत पाठवले.
‘यातला आम्हाला कोणता देणार?’
मी म्हटलं, ‘तुम्ही सांगाल तो.’
‘मी एकदा दोन्ही चांगले आहेत म्हटल्यावर आता निवड मीच कशी करणार?’ ते हसून म्हणाले.
मग ‘छापा की काटा’ करून आम्ही निर्णय घेतला.
श्री. पुं.बद्दल किती आणि काय काय सांगावं याला अंतच नाही. ते यापुढे प्रत्यक्ष दिसू शकणार नाहीत, पण त्यांच्या जिवंत आठवणी माझ्या मनात सदैव सोबतीला असणार.
श्री. पु. गेल्यानंतर त्यांचा मुलगा अशोक परदेशातून इथे येऊन पोहोचेपर्यंत श्री. पुं.च्या पार्थिवाच्या दर्शनासाठी त्यांचा मृतदेह योग्य ती काळजी घेऊन ठेवण्यात आला होता. त्या काळात, ‘तुम्ही दर्शनाला येणार का? मी तुम्हाला नेऊन आणतो’ असा राम कोल्हटकरांचा आस्थेने पुन्हा फोन आला. पण मी नकार दिला.
श्री. पुं.च्या असंख्य आठवणी माझ्या मनात जिवंत असताना त्यांच्या मृतदेहाच्या दर्शनाच्या आठवणीची सावली त्यावर पडू द्यायला माझी तयारी नाही.
‘बरोबर आहे ना श्री. पु.?’
(हे अप्रकाशित लेखन राम कोल्हटकर यांच्या संग्रहातून साभार)