मराठवाडय़ातील बी. रघुनाथ ऊर्फ भगवान रघुनाथ कुलकर्णी म्हणजे प्रमत्त प्रतिभेचा धनी असलेला एक कवी आणि प्रखर वास्तवाला थेट भिडणारा एक कथाकार, आत्ममग्नतेला शब्दमुखर करणारा एक ललित लेखक, प्रचंड सामथ्र्य असलेला कादंबरीकार.निझामी राजवटीच्या काळात जगणाऱ्या समाजाचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या साहित्यातून उमटले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा विशेष लेख.
ज्यांचे विस्मरण अशक्य अशा मराठवाडी साहित्यिकांपकी एक नाव म्हणजे बी. रघुनाथ. त्यांचे संपूर्ण नाव भगवान रघुनाथ कुलकर्णी. त्यांची स्वाक्षरी बी.आर. कुलकर्णी अशी लफ्फेदार. अक्षर अतिशय सुंदर. समकालीन मित्रांत ते ‘बी.आर.’ आणि साहित्यक्षेत्रात बी. रघुनाथ म्हणून ओळखले जात. कथा, कविता, कादंबरी आणि ललितनिबंध अशी त्यांची चौफेर कामगिरी. विविधता आणि गुणवत्ता यांचा अपूर्व मेळ साधणारी त्यांची लेखणी मराठी साहित्यात ‘मराठवाडी लेणे’ म्हणून लौकिक मिळवून गेली.
बी. रघुनाथ यांचे लौकिक जीवन तसे अगदीच सामान्य. हैदराबाद संस्थानच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात टेंपररी मिस्त्री म्हणून कामावर लागलेला हा माणूस कनिष्ठ लिपिक म्हणून आयुष्यभर खर्डेघाशी करीत राहिला. कनिष्ठ मध्यमवर्गात त्यांचा जन्म झाला. सगळेच वातावरण प्रतिकूल. त्यात निजामी राजवट. कडवट अनुभवाशिवाय दुसरे काय मिळणार? राजकीय, सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक स्तरावर नुसता कोंडमारा. अंतर्बाह्य़ केवळ गुदमर. अशी सर्वदृष्टीने प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी सातत्याने दर्जेदार लेखन केले. ही त्यांच्या ठायी असलेल्या प्रतिभेची अपूर्व निर्माणक्षमताच म्हटली पाहिजे. ऐन वैशाखात, उजाड माळरानावर, जमिनीतील सर्व जीवनरस शोषून फुलून आलेल्या पळसासारखे त्यांचे जीवन पाहिले म्हणजे नवल वाटते. ‘परभणीत काही असो किंवा नसो, जीवन मात्र आहे’ हे त्यांनीच केव्हातरी काढलेले उद्गार किती सार्थ आहेत, हे त्यांच्या साहित्यातून कळते.
परभणी आणि बी. रघुनाथ यांचे असे काही विलक्षण नाते आहे, की खरी प्रादेशिकता म्हणजे काय असते याचा उलगडा होतो. निजामी राजवटीतील मराठवाडय़ाचा मर्मबंध शोधायचा तर बी. रघुनाथांकडेच वळावे लागते. मराठीतील प्रादेशिक कथा-कादंबरी यांचा मूळ आणि पहिला स्रोत बी. रघुनाथांनी लिहिलेल्या कथा-कादंबऱ्यांतून आढळताना दिसेल. मराठी नवकथेचा प्रारंभ िबदू देखील बी.रघुनाथच मानावा लागतो. संस्थानी राजवटीमुळे त्यांच्या साहित्याची पुण्या-मुंबईकडे दखल घेतली गेली नाही. याचे एक कारण म्हणजे निजामी राजवटीतील परिस्थिती. फडके- खांडेकरांच्या काळातील हा लेखक तसा दुर्लक्षित राहिला. म्हणावी तशी प्रसिद्धी त्यांना त्यावेळी लाभली नाही.
बी. रघुनाथ तसे अल्पायुषी. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ‘आडगावचे चौधरी’ ही त्यांची मरणोत्तर प्रसिद्ध झालेली शेवटची कादंबरी. त्यांनी लिहिलेल्या सात कादंबऱ्या वाचल्यानंतर लक्षात येते, की बी.रघुनाथ हे स्वत:ची शैली असलेले लेखक होते. ते जे जगले, त्यांनी जे भोगले, पाहिले तेच शब्दांतून मांडले. जीवनाच्या विशाल व्यापक कक्षांना स्पर्श करणारे लेखन करण्याची क्षमता असलेले बी. रघुनाथ विशिष्ट सामाजिक कनिष्ठ मध्यमवर्गीय वास्तवातच रमले, ही त्यांच्या प्रतिभेची मर्यादा नसून परिस्थितीसापेक्ष मनोधारणेची ती अपरिहार्यता होती. साधारणपणे १९३८ ते १९४८ या दशकातील मराठवाडी जनजीवनाचा आविष्कार त्यांच्या कथा, कादंबऱ्यांतून होताना दिसतो.
बी.रघुनाथ यांचा साहित्य प्रवास कवितेने सुरू झाला. ‘फुलारी’ या टोपणनावाने त्यांनी कविता लिहिल्या. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली नि कविता, कथा, कादंबरी, ललित निबंध अशी चौफेर मुशाफिरी केली. ‘आलाप आणि विलाप’, ‘पुन्हा नभाच्या लाल कडा’ (कवितासंग्रह) ‘साकी’, ‘फकीराची कांबळी’, ‘छागल’, ‘काळीराधा’, ‘आकाश’ ( कथासंग्रह) ‘अलकेचा प्रवासी’ (ललितनिबंध) ‘ओऽ’, ‘हिरवे गुलाब’, ‘बाबू दडके’, ‘उत्पात’, ‘म्हणे लढाई संपली’, ‘जगाला कळलं पाहिजे’, ‘आडगावचे चौधरी’ (कादंबऱ्या) एवढी ग्रंथसंपदा त्यांनी मागे ठेवली. (आज तीन खंडांमध्ये त्यांचे समग्र साहित्य उपलब्ध आहे.)
बी. रघुनाथांचे लौकिक जीवन तसे अगदीच सामान्य. ‘सातोना’सारख्या खेडय़ात एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. एका हैदराबादी नातेवाईकाकडे राहून त्यांनी मोठय़ा कष्टाने शालेय शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे मॅट्रिक होताच त्यांनी नोकरी केली. अवघ्या २० रुपये मासिक पगारावर त्यांनी प्रारंभ केला. हैदराबाद संस्थानच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात परभणी येथे ‘टेम्पररी मिस्त्री’ म्हणून ते रुजू झाले नि कनिष्ठ लिपिक (कारकून) म्हणून परभणीतच आयुष्यभर खर्डेघाशी केली. दुर्दैव असे की, त्याच कार्यालयात हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला.
बी. रघुनाथांचे जाणे तसे सर्वाना चटका लावून गेले. १५ ऑगस्ट १९१३ ला जन्मलेले बी. रघुनाथ ७ सप्टेंबर १९५३ रोजी हे जग सोडून गेले. अवघे ४० वर्षांचे आयुष्य!
आज बी. रघुनाथांचे स्मरण करताना, त्यांचे लेखन पुन्हा वाचताना एक गोष्ट सातत्याने जाणवते, ती म्हणजे आंतरिक स्थिती आणि बाह्य परिस्थिती यातील संघर्षांची करुण, विदारक अशी अभिव्यक्ती म्हणजे बी. रघुनाथांचे लेखन.
बी. रघुनाथांनी कविता लिहिल्या खऱ्या पण त्यांची ओळख कथाकार म्हणूनच अधिक आहे. स्वतविषयी लिहिताना त्यांनीच म्हटले आहे – ‘मी एक कथालेखक आहे. कथांखेरीज मला वेगळा परिचय नाही.’ त्यांचे कादंबरीलेखनही खास बी. रघुनाथी शैलीचे आहे. आणि ही ‘शैली’ त्यांनी स्वत: निर्मिलेली आहे. ‘आत्मोपहास’ हे या शैलीचे वैशिष्टय़ आहे. त्यांचे –
‘मी एक धटिंगण कथालेखक आहे. (माणूस केव्हा केव्हा स्वत:विषयी खरे बालून जातो!)’ हे उद्गार बघावेत. त्यांच्या कथा, कादंबऱ्यातील पात्रेही स्वत:विषयी असेच बोलताना दिसतात. आपल्या कथांतील पात्रांत बी. रघुनाथ असा प्रवेश करतात की जणू ते स्वत:चेच मनोगत, विचार बोलू लागतात. असे घडणे कलात्मकतेच्या दृष्टीने वैगुण्य मानले जाते, पण इथे ते प्रस्तुत नाही.
बी. रघुनाथांचे हैदराबादी वास्तव्य, निजामी राजवटीचा कालखंड आणि परभणी शहर आणि परिसर हा आसमंत याचा हा अटळ परिणाम वाटतो. शिवाय उर्दू सहित्याचे वाचन विशेषत: कथा (उर्दूत अफसाना) याचा हा प्रभाव तर नसावा? उर्दूची म्हणून एक खास शैली (बाज) आहे. बी रघुनाथांनी कळत न कळत तो बाज उचलला असावा.
बी. रघुनाथांची स्वत:ची एक स्वप्नभूमी होती. त्या स्वप्नभूमीत ते मनसोक्त वावरत नव्हे, तर विहरतच होते. या स्वप्नभूमीत काय नव्हते? उपेक्षेत गवसलेले चतन्य, असफलतेची वेदना खलून कळ्या-फुलांना हरितश्री करणारी प्रेरणा, अंतरंगीच्या रंगसंगतीत दंग होणारे मन, ‘पूर्वेचे’ अपूर्व तेज, विदग्धतेतील विदग्धता, निरपेक्षांचे सुगंध, फूल झालेली सांज, रंगरमेचे नाना विभ्रम, स्वप्नातील तुकडा न् तुकडा जोडून साकारलेली ही स्वप्नभूमी. स्वप्न आणि वास्तव यांचा मनोरम खेळ पाहावा, रमावे, रमवावे, जगावे, जागवावे, तरल, धूसर असे काही भास श्वासात भिनवावे ही असोशी असलेले बी. रघुनाथ लिहितात तेव्हा कथा कादंबऱ्यांपेक्षा वेगळाच स्वर लावतात. त्यांची स्वप्नभूमी जणू त्यांना साद देते नि ते तिला प्रतिसाद देत म्हणतात –
‘ये भवितव्या, रूप इथुनि ने
तुझे हंसित हे माझे गाणे
अमर माझिया मी मरणाने’
‘तम सिंधुचा’ तळ उपडा पाडीत बी. रघुनाथ गाऊ लागतात –
‘पुन्हा नभाच्या लाल कडा’
विकलता, विफलता गळून साफल्याचे जुळून आलेले स्वर वेचित हा कवी गाणे गातो –
‘वर्ष नवे ! वर्ष नवे
या वर्षी हर्ष नवे
या वर्षी दर्श नवे
या वर्षी स्पर्श नवे’
नवता व नावीन्याची आस लागलेली त्यांची कविता हा त्यांच्या ठिकाणी असलेला प्रचंड आत्मविश्वास व्यक्त करते. एक नवी उषा अवतरते. बी. रघुनाथ म्हणतात –
‘पलकांतिल सुटलेली स्वप्ने
उडुनि जाहली सुवर्ण किरणे
नव्या निशेस्तव नवीच क्षितिजे
प्रभा नि प्रतिभा बघू लागली
उषा अशी मज दिसली!’
प्रमत्त प्रतिभेचा धनी असलेला एक कवी आणि प्रखर वास्तवाला थेट भिडणारा एक कथाकार, आत्ममग्नतेला शब्दमुखर करणारा एक ललित लेखक प्रचंड सामथ्र्य असलेला कादंबरीकार, अशी चौपदरी घेऊन आयुष्यभर जे मागत राहिला ते दान कधी त्याच्या पदरात पडले नाही.
‘आज कुणाला गावे?’ असे म्हणत ‘तुजवर लिहितो कविता सजणी’ असे गुणगुणत दारुण आयुष्य हा प्रसादक्षण मानत सतत लिहिता राहिला, सहकंप शोधीत जागेपणी स्वप्न पाहणारा नि स्वप्नात जागा असणारा प्रतिभासंपन्न साहित्यिक स्वप्नवास्तवाचा वेध घेत ‘दीप्तीमोही’ म्हणून उरला. एक दीप्तीमान अक्षरलेणे साकारून गेला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा