प्रशांत कुलकर्णी
prashantcartoonist@gmail.com
सर्जिओ अरागोनास याचा जन्म स्पेनमधला. पण सामाजिक अशांततेमुळे तो स्पेनमधून फ्रान्समाग्रे मेक्सिकोत पोहोचला. तो पाच भाषा उत्तम बोलू शकतो. विशेष म्हणजे त्याने कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये जाऊन चित्रकलेचं रीतसर शिक्षण घेतलेलं नाही. पण चित्रं काढणं आणि गोष्टी सांगणं हे त्याचे आवडते छंद होते. त्यातूनच त्याने मेक्सिकोत कॉमिक्ससाठी काम करायला सुरुवात केली. त्याला अमेरिकेत जाऊन काम करण्याची इच्छा होती. शिक्षणानं आर्किटेक्ट असला तरी त्याला व्यंगचित्रकारच व्हायचं होतं. अनेक टक्केटोणपे खात यथावकाश तो सुप्रसिद्ध ‘मॅड’ या व्यंगचित्र मासिकामध्ये पोहोचला!
खिशात केवळ १८ डॉलर्स घेऊन तो अमेरिकेमध्ये काम शोधण्यासाठी आला आणि धीर करून त्याने त्याची कार्टून्स ‘मॅड’च्या संपादकांसमोर ठेवली. त्याची अंतराळवीरांवर केलेली सगळी व्यंगचित्रं संपादकांना आवडली. त्यांनी ठरवलं, आपण ही कार्टून्स समोरासमोरील दोन पानांत छापू. आणि त्यांनी ती छापलीसुद्धा! ‘मॅड’चा नियम होता की एका पानाला चित्रकार आणि लेखक यांना समसमान ५० डॉलर्स मानधन द्यायचं. सर्जिओ हा स्वत: लेखक- म्हणजे कल्पना सुचवणारा आणि चित्रकार होता. त्यामुळे त्याला दोन पानांचे दोनशे डॉलर्स मिळाले!! हरखून गेलेला सर्जिओ रात्रभर झोपला नाही. त्याऐवजी जागं राहून त्याने पुन्हा नवीन कल्पनांवर भरपूर चित्रं काढली. त्याचा हा सिलसिला शेवटपर्यंत चालू राहिला. आणि त्याला जीवनाचं ध्येय सापडलं. ते ध्येय होतं भरपूर व्यंगचित्रं काढण्याचं! ‘मॅड’नेही त्याला भरपूर जागा दिली. पण सर्जिओचा व्यंगचित्रं काढण्याचा वेग इतका जबरदस्त होता की ती चित्रं छापण्यासाठी ‘मॅड’ला जागा अपुरी पडू लागली. सर्जिओचा इंग्रजीचा जरा प्रॉब्लेम असल्याने त्याची बहुतेक चित्रं ही शब्दविरहितच होती. याचा विचार करून ‘मॅड’च्या मॅड संपादकांनी एक मॅड कल्पना अमलात आणली.
सर्जिओची चित्रं खूप लहान करायची आणि ती वर, खाली, आजूबाजूला समासामध्ये छापायची. म्हणजे एखादं मोठं आर्टकिल किंवा कॉमिक स्ट्रिप सुरू असेल तर त्याच्या दोन पट्टय़ांमध्ये जी जागा असते, त्या अत्यंत चिंचोळ्या जागेमध्ये सर्जिओची चित्रं अक्षरश: बसवायची.. किंवा खरं तर कोंबायची!! ही चित्रं इतकी लहान असत, की ती नीट दिसायची नाहीत. इतर मोठय़ा पॅनलमध्ये ती दबली जायची. पण एकदा का वाचकाला त्यांतली गंमत कळली की मग तो अक्षरश: डोळे फाडून हमखास ती बघितल्याशिवाय राहायचा नाही. यामुळे अर्थातच त्यांना ‘मार्जनिल कार्टून्स’ किंवा ‘आय स्ट्रेनर्स’ असं म्हटलं जाऊ लागलं.
वास्तविक आपली चित्रं अशी अतिलहान केली जाताहेत किंवा कुठंही, कशीही छापली जाताहेत यावर एखाद्या व्यंगचित्रकारानं आक्षेप घेतला असता. पण समासातल्या या जागेचा सदुपयोग सर्जिओने इतका छान करून घेतला, की त्यासाठी त्याने आपल्या चित्रांची स्टाईलच बदलली. किंचित जाड पेनानं तो चित्रं काढू लागला. म्हणजे चित्र कितीही लहान झालं तरी त्याच्या परिणामामध्ये बाधा येत नसे. त्याने खास या जागेची उपलब्धता लक्षात घेऊन इंग्रजी ‘एल’ आकारात बसतील अशा चित्रकल्पनांनाही जन्म दिला आणि अर्थातच वाचकांची अशा चित्रांना पसंती मिळाली.
विषयांचा तुटवडा सर्जिओकडे कधीच नव्हता. प्राणी, गाडय़ा, सैनिक, फुलं, मासे, माणसं यांच्यामधले समज-गैरसमज, घडून गेलेले प्रसंग किंवा घडणारे प्रसंग इत्यादीभोवती त्याची चित्रं फिरतात आणि ती सदैव ताजी व नवीन वाटतात.
याचा अर्थ सर्जिओ अशी छोटी छोटी, दोन-तीन पात्रांचीच चित्र काढतो असं अजिबात नाही. हजारो जणांच्या गर्दीची रेखाटनं असलेली त्याची व्यंगचित्रंही विलक्षण प्रेक्षणीय आहेत आणि ती संख्येनं मोठय़ा प्रमाणावर आहेत. आणि या प्रचंड गर्दीतलं प्रत्येक पात्र त्याने अगदी कॅरेक्टर म्हणून रेखाटलेलं आहे. सर्जिओची कार्टून्स ही साधारणपणे GAG कार्टून्स- म्हणजे थोडीशी गंमत करणारी कार्टून्स या प्रकारात मोडतात.
‘GAG कार्टून काढताना तो एक साधा विनोद आहे हे मी सदैव लक्षात ठेवतो. म्हणूनच चित्रातल्या अनावश्यक रेषा मी काढून टाकतो. मात्र, चित्रातील पात्राच्या एक्स्प्रेशनला प्रचंड महत्त्व देतो. त्यामुळे ती जिवंत वाटतात,’ असं तो म्हणतो.
‘त्याची चित्रं ही चित्र म्हणून अतिशय BALANCED असतात,’ असं मत विख्यात कॉमिक आर्टिस्ट स्टॅन ली यांचं म्हणणं आहे. ते सर्जिओचे जबरदस्त फॅन आहेत. त्यांच्याकडे सर्जिओची अनेक मूळ चित्रं आहेत, हे ते अभिमानानं सांगतात.
मोठी तीन-चार पानांची चित्रं काढताना मात्र सर्जिओ एकदम परफेक्शनिस्ट वगैरे होतो आणि चित्रांकडे विशेष लक्ष देतो. आर्किटेक्ट असल्यानं त्याला ते सोपं जात असावं. पण चित्रांच्या सजावटीमध्ये तो मूळ विनोद हरवू देत नाही, हे महत्त्वाचं. पात्रांचं रेखाटन करताना तो त्यात फार गुंतून पडत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे अतिशयोक्त हावभाव तो जरूर दाखवतो. त्याच्या चित्रांतल्या विविध क्षेत्रांतल्या सिच्युएशन्स किंवा प्रसंग त्याला इतक्या मोठय़ा प्रमाणावर कसे सुचतात हे एक आश्चर्यच आहे. माणसाचं अंतर्मन त्याची सावली दाखवतं अशी कल्पना करून त्याने अनेक चित्रं काढली आहेत. ही जवळपास सर्व चित्रं हॅट्स ऑफ म्हणावीत अशी आहेत. उदाहरणार्थ, खडूस बॉसला श्रद्धांजली वाहताना कर्मचाऱ्याला होणारा आनंद त्याने सावलीच्या माध्यमातून नेमका पकडलाय. (आभार : सर्जिओ अरागोनास ऑन परेड, प्रकाशक : वॉर्नर बुक्स)
‘व्यंगचित्रात मी काहीही दाखवतो. उदाहरणार्थ, पक्षी हसताना मी त्याचे दात दाखवतो, जे केवळ अशक्य असतं. रेल्वे इंजिनाचं चित्र काढायचं असेल तर मी तासन् तास रेल्वे स्टेशनवर जाऊन चित्र काढतो, वाचनालयात जाऊन संदर्भ चाळतो आणि प्रचंड प्रॅक्टिस करतो. पण या माझ्या कष्टांपेक्षा लोकांना मी पाच सेकंदात रेल्वे इंजिनचं चित्र काढतो याचं कौतुक आणि आश्चर्य वाटतं,’ असं सर्जिओ गमतीने सांगतो.
व्यंगचित्र काढणं आणि एखादा सिनेमा निर्माण करणं यामध्ये कमालीचं साधर्म्य आहे असं निरीक्षण तो नोंदवतो. ‘उदाहरणार्थ, आम्ही कॅरेक्टर निर्माण करतो, त्याचे कपडे, बॅकग्राऊंड, भाषा, कॅमेरा अँगल आणि मुख्य म्हणजे एखादी गोष्ट- हे सारं सिनेमाप्रमाणेच आम्ही करतो की!’ असं तो सांगतो.
सर्जिओची बरीच चित्रं ‘मॅड’च्या संपादकांनी रिजेक्ट केली. पण या बहाद्दराने त्याबद्दल वाईट वाटून न घेता दुप्पट जोमाने चित्रं काढली. नंतर एका पुस्तकात त्याने ‘ही बघा माझी रिजेक्ट केलेली कार्टून्स..’ म्हणून ती छापलीदेखील आहेत!
चित्रं काढण्यासाठी सर्जिओ सदैव तयारच असतो. कल्पना सुचली रे सुचली की ताबडतोब जे समोर असेल ते- म्हणजे उदाहरणार्थ, वर्तमानपत्रांमधली मोकळी जागा किंवा पेपर नॅपकीन किंवा रुमाल, मेनू कार्ड- त्याच्यावर लगेच चित्र काढायला तो सुरूच करतो. सर्कस, ज्योतिषी, ऑलिम्पिक, अग्निशमन, सुपरमॅन, कुत्रे, मिरवणूक, कचरा इत्यादी असंख्य विषय आणि त्यावरची हजारो चित्रं आणि त्यातला ताजेपणा, नावीन्य हे सर्जिओच्या व्यंगचित्रांचं वैशिष्टय़!!