डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांचे भवतालातील घटितांची दखल घेणारे साप्ताहिक ललित सदर..
सकाळची ९ ची वेळ.. गाडी विद्यापीठाकडे निघालेली. पाऊस कोसळत होता.. ऐरोलीच्या पुलाच्या अलीकडे टोल भरण्यासाठी लागलेली लांबच लांब रांग.. टोलपाडा की टोळधाड, काय म्हणावे. माझा चडफडाट.. इतक्यात माझे लक्ष काचेतून पलीकडच्या रस्त्याच्या कडेला रचलेल्या सिमेंटच्या पाइपांच्या उतरंडीवर गेले. पांढऱ्या शुभ्र अक्षरात ‘पंचर ९४२२२’ ही अक्षरे दिसली. पुढेही दोन-तीन पाइपांवर तोच अक्षरपट्टा गिरवलेला. ‘पंक्चर’ हा शब्द लिहितानाही रंगारी पंक्चरलेला असावा असे वाटले. पण क्षणात मार्केटिंगची ही नवी क्लृप्ती विस्मयचकित करून गेली. कर्त्यांचे नाव नाही, कारागिराचा पत्ता नाही, कार्यालयाची वेळ नाही. फक्त संपर्कासाठी मोबाइल नंबर.. ज्याला गरज लागेल त्याने फक्त नंबर घुमवायचा.. सेवा हजर. सेवा अहोरात्र.. ऊन-पावसाची तमा न बाळगता.. सेवेची जाहिरात कमीतकमी शब्दात.. पंक्चर झाल्यावर.. घामाघूम होत, मागच्यांच्या शिव्याशाप ऐकत, गळ्याच्या टायची गाठ सल करत तुम्ही तुमची गाडी ढकलत ढकलत.. स्टिअिरग हलवत रस्त्याच्या कडेपर्यंत आणलीत की आता काय बरे करावे, या तुमच्या मनातल्या प्रश्नाला नेमके उत्तर.. सिमेंटच्या पाइपावर तयार. ‘रथचक्र उद्धरू दे’.. म्हणणाऱ्या कर्णासारखा झालेला तुमचा अवतार आणि वस्त्रहरणाच्या अडचणीच्या क्षणी कृष्णासारखा धावून येणारा तो मोबाइल नंबर.. कमीतकमी शब्दांत तुमची गरज भागविणारा.. उगाच ‘he care for your deflated tyre & inflated ego’ किंवा ‘डोंट फायर युअर टायर’ अशी कोणतीही दिलखेचक वाक्ये नाहीत. ‘आपले मुख्य कार्यालय ऑफिस अमुक ठिकाणी असून इतक्या उपनगरात तितक्या शाखा आहेत’ वगरे विस्तारवर्णने नाहीत.. किंवा ‘आमची इतरत्र कोठेही शाखा नाही’ ही दर्पोक्ती नाही. ‘सेवा दुपारी १२ ते ४ बंद’ ही धमकीही नाही.. फक्त सेवेचे वर्णन करणारा एक शब्द आणि मोबाइल नंबर.. क्या बात है? मार्केटिंगच्या जगात नवीन कल्पनांचे नेहमीच कौतुक होते, ही कल्पना तर बक्षिसास पात्र ठरावी.
नरसी मोनजी इन्स्टिटय़ूटमधून मार्केटिंगच्या तंत्राचे शिक्षण घेताना POP – advertisement – Point of purchase… जसे ग्राहक विक्री केंद्रावर खरेदीला जातो, तेथे त्याला शेवटचा प्रयत्न केल्यावरही आपल्या प्रॉडक्टची आठवण करून द्यायची, जेणेकरून तो मागताना आपल्याच ब्रँडचा उल्लेख करेल.. मग अनेकदा प्रतिस्पर्धी कंपनीच्या गाडीच्या शोरूमबाहेरच्या रस्त्यावरच्या खांबावर दुसऱ्याच कंपनीची जाहिरात झळकते किंवा आजकाल ट्रकवर एका खांबावर चढविलेल्या मोबाइल बोर्ड जाहिरातीमधून POP चा प्रयत्न करण्यासाठी तो ट्रक नेमक्या जागेवर उभा केला जातो.
.. यातली कोणतीही स्पर्धा, द्वंद्व येथे नाही. येथे आहे, ‘Service when you need it most’ ही संकल्पना आणि सेवेकरीही नावाने नाही, तर मोबाइल नंबरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचताना.. मार्केटिंगचे बजेट नाही, कोणत्या एजन्सीची नेमणूक नाही.. क्रिएटिव्ह डायरेक्टरची मिजास नाही.. क्रिएटिव्हीटीची मात्र ही कमाल आहे. पांढरा किंवा काही ठिकाणी अंधारात दिसावा म्हणून पिवळा फ्लुरोसंट रंग वापरलेला..
‘रात्रंदिन आम्ही आपुल्याच सेवेशी,
नंबर असू द्यावा चित्ती अपुल्या’
अशीच काहीशी ही सोय.
.. सुदैवाने आजपर्यंत मला या सेवेचा लाभ घेण्याची वेळ आली नाही. पण परवा एका मित्राची गाडी हाजी अलीपाशी पंक्चरली आणि समुद्रात भराव म्हणून टाकलेल्या ट्रायपॉडवर त्याला धीर देणारे शब्द दिसले, ‘पंचर ९४२२२’ त्याने फोन केला आणि पाच मिनिटांत अण्णा हजर. हाजी अलीच्या अण्णाचा नंबर ऐरोलीला कसा, हे कोडे मला पडले आणि मी ते शेवटी अण्णाला विचारता झालो. ‘‘वो क्या है न साब, हम टायरवाले अन्ना लोगों की असोसिएशन है, जब तुम नंबर घुमाता है न तो हमारे कंट्रोलवालेकू जाता है, वो गाडी का पता पूछकर उधर के अन्ना को इन्फार्म करता है।’’ माझ्या ज्ञानात भर पडली आणि कोणत्याही शासकीय नियमांशिवाय skilled, unorganized sector आपली मोट कशी बांधतो, याचे प्रत्यंतर आले.
काल संध्याकाळी रश्मीनभाईंच्या नव्या फíनचर लॅमिनेट्सच्या दुकानाचे उद्घाटन होते. माझा अन् त्याचा अनेक वर्षांचा स्नेह.. मी आवर्जून हजेरी लावली. दुकानात बसलेलो असताना ढोलकी वाजवत, टाळ्या पिटत तृतीयपंथीयांचे टोळके आले. रश्मीनभाईने शंभर रुपयांच्या करकरीत नोटा ओवाळून त्यांच्या हातात दिल्या आणि का कुणास ठाऊक, ‘‘ओ भाईजान, ये हमारे बडे डॉक्टरसाब है’’ म्हणून माझा त्यांना परिचय दिला. टाळ्या वाजविणाऱ्या धिप्पाड तृतीयपंथीयाने कमरेला खोचलेल्या साडीच्या घडीमधून एक व्हिजिटिंग कार्ड काढून मला दिले. ..‘‘ये हमारा कार्ड और मोबाइल है, आपके घर में शादी होगी, बच्चा पदा होगा, या कभी भी हमारी जरूरत पडेगी, तो बस नंबर घुमा देना’’.. हे ऐकल्यावर माझा चेहरा पंक्चरलेल्या कर्ण-अर्जुनापेक्षाही कावराबावरा झाला. मार्केटिंगच्या या तंत्राने माझी बृहन्नडा झाली.
मार्केटिंग
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांचे भवतालातील घटितांची दखल घेणारे साप्ताहिक ललित सदर..
First published on: 26-01-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marketing