पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीरीत्या स्वारी करून भारताने आपली मंगळयान मोहीम फत्ते केली. भारतीय अवकाश संशोधनाच्या इतिहासातील या सुवर्णक्षणाचा ‘ऑंखों देखा हाल’ टिपणारा आणि या दिग्विजयी मोहिमेची महत्ता कथन करणारा लेख..
बुधवार. २४ सप्टेंबर २०१४. पहाटेचे सव्वाचार वाजलेले.. इस्रोच्या बंगलोरमधील टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड सेंटरमध्ये वैज्ञानिकांची एकच धावपळ चालू होती.. तेथील मोठय़ा पडद्यांवर वेळेचे लाल अक्षरातील आकडे उमटत होते. सकाळचे सात वाजले तशी सर्वाच्याच चेहऱ्यावरील उत्सुकता आणि काहीसा ताण वाढत गेला. गेल्या नऊ-दहा महिन्यांतील स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्यास अवघा सतरा मिनिटांचा अवधी उरला होता. देशासाठी अभिमानाचा क्षण साकार होत असताना पंतप्रधानही वैज्ञानिकांची ही कामगिरी बघण्यासाठी केंद्राच्या सज्जात हजर होते. ज्येष्ठ वैज्ञानिक यशपाल या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुद्दाम उपस्थित होते. अखेर केंद्रातील संगणकांच्या पडद्यावर बरोबर ७ वाजून १७ मिनिटे अन् ३४ सेकंद झाले आणि मंगळयानावरील लिक्विड अपोजी मोटर प्रज्वलित करण्याचा संदेश अचूक पाळला गेला. पाठोपाठ आठ छोटय़ा मोटारीही प्रज्वलित झाल्या. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत रिव्हर्स रोटेशनने यानाचा अँटेना पृथ्वीच्या दिशेने वळवला गेला. सर्व काही अगदी ठरल्याप्रमाणे पार पडत होतं. ‘मॉम’ या भारतीय यानाकडून मंगळाच्या कक्षेत सुखरूप पोहोचल्याचा संदेश आला. केंद्रातील वैज्ञानिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधानही उत्सुकतेनं बघत होते. वैज्ञानिक अॅलेक्स त्यांना सर्व समजून सांगत होते. पंतप्रधानांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या अन् सर्वाच्या चेहऱ्यावरचा ताण एकदम नाहीसा झाला. तणावाची जागा आनंदानं घेतली.. इस्रोचे अध्यक्ष राधाकृष्णन यांनी विजयाची खूण केली. वैज्ञानिकांनी एकमेकांना आनंदानं आिलगन दिलं. राधाकृष्णन जिना चढून सज्जात गेले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आनंदानं आिलगन देऊन त्यांची पाठ थोपटली. लगेच पंतप्रधान प्रत्यक्ष नियंत्रण कक्षात आले आणि त्यांनी सर्व वैज्ञानिकांशी हस्तांदोलन केलं.
अंतराळयुगाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला जाणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचा थरार साऱ्या भारताने अनुभवला. इस्त्रोतील भारलेल्या वातावरणात एका स्त्री वैज्ञानिकाच्या डोळ्यात आनंदानं तरळलेलं पाणी लपून राहू शकलं नाही. प्रयत्न सार्थकी लागल्याचं आत्मिक समाधान मोहिमेतील प्रत्येक वैज्ञानिकाच्या चेहऱ्यावर विलसत होतं. जिथे आकडेमोडीतली लहानशी चूकही सर्व खेळ खलास करू शकते, अशा मोहिमेत आपण यश मिळवलं होतं.
खरं तर कुठल्याही देशाला मंगळमोहीम पहिल्याच टप्प्यात यशस्वी करता आलेली नाही, ती भारतानं करून दाखवली, हे या मोहिमेचं सर्वात मोठं वैशिष्टय़ आहे. आतापर्यंतच्या ५२ मोहिमांपकी केवळ २१ मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर इस्रोने मंगळावर यान पाठवून शिवधनुष्य पेललं आहे, असं म्हणायला हरकत नाही.
युरोपीय स्पेस एजन्सी, नासा, ग्लावकॉमसमॉस या संस्थांनंतर भारताची इस्रो ही मंगळावर यशस्वीपणे यान पाठवणारी जगातील चौथी, तर पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणारी जगातील पहिली संस्था ठरली आहे. आशिया खंडात चीन, जपान या प्रगत देशांना मागे टाकून मंगळावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर विक्रम साराभाई, होमी भाभा यांच्यासारख्यांना हाताशी धरून ज्या विज्ञान संशोधन संस्था उभ्या करण्यासाठी प्रयत्न केले, त्याचं हे फलित आहे. इस्रो ही सरकारी संस्था असली तरी तिथली कार्यसंस्कृती वेगळी आहे. केवळ पे पॅकेजेस पाहून काम करणारी, क्युबिकलपुरती संकुचित अशी ती संस्कृती नाही. झोकून देऊन पूर्वसुरींची स्वप्नं साकार करण्यासाठी समर्पण भावनेनं काम करणारी ही सांघिक कार्यसंस्कृती आहे.
मंगळावर यान पाठवण्याचा निर्णय ४ ऑगस्ट २०१२ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बठकीत घेण्यात आला. त्यानंतर २०१३ च्या स्वातंत्र्यदिनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या योजनेची घोषणा लाल किल्ल्यावरून केली. त्यानंतर अवघ्या १० महिन्यांत यान मंगळावर पाठवणं ही खरं तर खूप आव्हानात्मक गोष्ट होती. योजनेचा खर्च होता साडेचारशे कोटी. त्यावर अनेकांनी नाके मुरडली. ज्या देशात अनेक लोक दरिद्री आहेत त्या देशानं अशा मोहिमा हाती घेऊ नयेत असे सूर उमटले. अशा वेळी आपण सोयीस्करपणे एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे अवकाश संशोधनानं आतापर्यंत आपल्याला काय दिलं आहे! जे दिलं, त्याचं मोल पशांत करता येत नाही. ओडिशातील फायलिन वादळाच्या वेळी आपल्याला उपग्रहांनी सावध केल्यामुळे फार कमी हानी झाली. काश्मीरच्या पुराच्यावेळी सगळा संपर्क तुटलेला असताना इस्रोतील वैज्ञानिकांनी कमरेइतक्या पाण्यातून जाऊन चार ठिकाणी संदेशवहन यंत्रणा उभारून जगाशी तुटलेला संपर्क पूर्ववत केला.
मावेन यान अमेरिकेच्या नासा या संस्थेनं पाठवलं, त्याचा जो खर्च आहे त्या खर्चात किमान नऊ मंगळयानं पाठवता आली असती. गेल्या वर्षी ऑस्कर विजेता ‘ग्रॅव्हिटी’ हा हॉलिवूडपट तयार करण्यासाठी जेवढा खर्च झाला त्याच्या कितीतरी कमी पशांत आपण ही मोहीम साध्य केलेली आहे. हे यान पाठवताना आपल्याला किलोमीटर मागे चार ते पाच रुपये इतका कमी खर्च आला आहे. ही गोष्ट कितीतरी बोलकी आहे.
या मोहिमेवर होत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करीत मंगळयानाने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी श्रीहरीकोटा येथील अवकाश केंद्रावरून झेप घेतली. १ डिसेंबर २०१३ रोजी ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडून मंगळाकडे मार्गस्थ झालं. त्यानंतरचं ६६ कोटी किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापताना अनेकदा त्याचा मार्ग अपेक्षेनुसार राहिला. त्यात अनेक आव्हानात्मक टप्पे होते. पण अखेर १४-१५ सप्टेंबरच्या सुमारास हे यान ९८ टक्के अंतर कापून मंगळाजवळ पोहोचलं. आणि या अंतिम टप्प्यातच या मोहिमेची खरी कसोटी होती. कारण मंगळावर संदेश यायला व येथून तिथे जायला १२ मिनिटं लागतात. त्यामुळे या शेवटच्या टप्प्यात जे करायचं होतं, त्याच्या आज्ञा संगणकाला आधीच देण्यात आल्या होत्या. मात्र ३०० दिवस बंद असलेली लिक्विड अपोजी मोटर जागी होणार का, हा प्रश्न होता. पण सोमवारी ही मोटार ४ सेकंदांसाठी प्रज्वलित करण्यात यश आलं, तेव्हाच आपली मंगळ मोहीम यशस्वी होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. २४ सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यातही या मोटारीने सर्व आज्ञा निमूटपणे पाळल्या आणि यानानं मंगळाची कक्षा गाठली. यातून भारतीय वैज्ञानिकांचं तंत्रकौशल्यातील वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झालं.
अमेरिकेने अलीकडच्या काळात मंगळ संशोधनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आता परत एकदा मंगळाच्या संशोधनाची गरज जगभरातील अनेक देशांना वाटू लागली आहे. मंगळावर वस्ती करता येऊ शकते अशी आशा अवकाश संशोधनात अग्रेसर असलेल्या जगभरातील देशांना आहे. त्यामुळे चीन, जपान या सगळ्यांनी मंगळावर यान पाठवण्याचे प्रयत्न केले, पण पृथ्वीचा सहोदर असलेल्या मंगळाशी दोस्ती करण्याचे त्यांचे प्रयत्न पूर्णपणे फसले. रशियाच्याही अनेक मोहिमा अशाच फसलेल्या आहेत.
मंगळावर एकेकाळी दाट वातावरण होतं, आता ते फारच विरळ आहे. गॅलिलिओने जेव्हा मंगळाच्या दिशेनं पहिल्यांदा दुर्बीण रोखली तेव्हा त्याला तिथे पाणी वाहिल्याच्या खुणा दिसत होत्या. तेव्हाच तेथील वातावरणात मिथेन व पाणी असावं याचा अंदाज वैज्ञानिकांना आला होता. मग ते गेले कुठं याचा शोध या मंगळ मोहिमेत घेतला जाणार आहे. तसेच डय़ुटेरियम व हायड्रोजन या पाण्याचे पुरावे देणाऱ्या मूलद्रव्यांचा शोध घेतला जाणार आहे. मंगळाच्या ध्रुवांवर बर्फ आहे. हा ग्रह कमालीचा थंड व कोरडा आहे. तिथे एकेकाळी सूक्ष्म पातळीवर का होईना पण जीवसृष्टी असावी असा वैज्ञानिकांचा विश्वास आहे. त्यामुळेच २०३० ते २०५० पर्यंत मंगळावर वस्ती करण्याचा जगातील वैज्ञानिकांचा निर्धार आहे. अमेरिकेतील स्मिथसॉनियन हवाई व अवकाश संग्रहालयाचे अवकाश इतिहासकार रॉजर लॉनिस यांच्या मते, मंगळाचे संशोधन हे त्याला दुसरी पृथ्वी बनवण्यासाठी चाललेलं आहे. पूर्वी हा ग्रह वसाहतयोग्य होता आणि आता त्यात काही बदल झाले असले तरी पुन्हा तो वसाहतयोग्य करता येईल, असं वैज्ञानिकांना वाटतं. एक घर असताना दुसरं कशासाठी असाही प्रश्न काहींना पडू शकतो. पण वीकएन्ड होमसारखाच मंगळ हा कालांतरानं अवकाश पर्यटनातील एक केंद्र ठरू शकतो. शिवाय विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या मते, पृथ्वीवर एखादा आघात झाल्यास माणसाला सुरक्षित असं पर्यायी ठिकाण आतापासून शोधून ठेवायला हवं. हाही हेतू या मंगळ मोहिमेमागे आहे. मंगळावर वस्ती करणं ही आज जरी अशक्य गोष्ट वाटत असली तरी ती काही वर्षांनी प्रत्यक्षात येईल, यात शंका नाही.
मंगळाचंच संशोधन का? जवळच्या शुक्राचं का नाही? यावर इस्रोचे वैज्ञानिक गुरूप्रसाद यांचं म्हणणं असं की, शुक्राचं तापमान ४५० अंश सेल्सियस आहे. तेथील वातावरणाचा दाब पृथ्वीच्या १०० पट आहे आणि तिथल्या वातावरणात कार्बन डायॉक्साइडही अधिक आहे. त्यामुळे शुक्राजवळ जाताच यान जळून जाण्याची शक्यता आहे. याउलट मंगळाचं आहे. तेथील वातावरण विरळ आहे. हा ग्रह थंड आहे. मरिनर ९ यानाने १९७१ मध्ये मंगळावर आपल्या माउंट एव्हरेस्टच्या तीन पट उंचीचा ऑिलम्पस हा पर्वत असल्याचं दाखवून दिलं आहे. तो ज्वालामुखीच्या उद्रेकानं बनलेला आहे. मंगळावर काही भागात बर्फाच्या टोप्या दिसतात, म्हणजे तिथे काही काळापूर्वी पाणी होतं. मग आता ते गेलं कुठे, हे कोडे वैज्ञानिकांना सोडवायचं आहे. शिवाय तेथील दिवस आणि पृथ्वीवरील दिवसाच्या कालावधीत फार थोडा फरक आहे. तेथील ऋतू पृथ्वीसारखेच आहेत. आयर्न ऑक्साइडमुळे मंगळ लाल दिसतो. आणखी एक प्रश्न अनेकांना पडू शकतो की, मग चंद्राचे एवढे गोडवे का गायले जात होते? त्याचं कारण असं आहे की, नंतरच्या संशोधनातून पुढे आलेली माहिती. चंद्रावरील वातावरण विरळ आहे. त्यामुळे चांद्रमोहिमा अर्धवट सोडाव्या लागल्या. शिवाय मंगळासारखी तिथं (साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी का असेना) जीवसृष्टी असल्याची कुठलीही शक्यता आतापर्यंत वर्तवण्यात आलेली नाही.
भारताच्या मंगळ मोहिमेत संशोधनासाठी पाच पेलोड आहेत, ते पूर्णपणे भारतात तयार झालेले आहेत. त्यात मीनल संपत या महिला वैज्ञानिकाने मोठी कामगिरी पार पाडली आहे. या मोहिमेत एकंदर ५०० वैज्ञानिक आहेत, त्यात दोन टक्के महिला आहेत. त्यामुळे या यशस्वी मंगळमोहिमेतून अवकाश संशोधनाकडे क्वचितच वळणाऱ्या महिलांनाही प्रेरणा मिळू शकेल. पण एक मात्र खरं, स्त्री असो वा पुरुष या मोहिमेत सर्वानीच रोज १८-१८ तास राबून प्रसंगी प्रयोगशाळेतच झोपून अफाट काम केलं आहे. झपाटून काम केल्याशिवाय यश मिळत नाही याचा अनुभव इस्त्रोतील वैज्ञानिकांनी घेतला आहे. आता पुढची चांद्रयान दोन मोहीम, त्याआधी ‘जीएसएलव्ही’चं आणखी एक उड्डाण, नंतर माणसाला अवकाशात पाठवणं अशा अनेक योजना इस्रोपुढे आहेत.
स्वदेशी तंत्रज्ञान हे या मोहिमेचं वैशिष्टय़ आहे. शिवाय लाखो किलोमीटर अंतर कापून मंगळावर यान पाठवणं, पृथ्वीवरून अगोदरच संदेश देऊन ते कार्यान्वित करणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नव्हत्या. पण तंत्रज्ञानातील अचूकता भारताने साध्य करून चीन व इतर देशांवर मात केली आहे. शिवाय अगदी कमी इंधनात हे यान पाठवलं आहे. ते वर्षभर मंगळावर राहणार आहे. त्यातून मंगळाची छायाचित्रं, तेथील पृष्ठभागातील घटक, वातावरणातील मिथेन व पाणी या घटकांची शक्यता अशा अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला होणार आहे.
१९९१ मध्ये भारतावर अमेरिकेने अणुस्फोटाच्या कारणास्तव तंत्रज्ञान र्निबध लादले होते, रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिनं देऊ नयेत असाही इशारा दिला होता. आणि काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला होता. तेच नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून कालपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत, तेही अमेरिकेच्याच खास आमंत्रणावरून. या पाश्र्वभूमीवर त्यांचं पंतप्रधान म्हणून अमेरिकेने स्वागत करणं, हा एक प्रकारे जुळून आलेला योग आहे. अमेरिकेच्या मावेन यानापाठोपाठ भारताचं ‘मॉम’ यान मंगळावर जाणं, ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. यातून जागतिक पातळीवर भारताची एक सकारात्मक प्रतिमा तयार होण्यास मदत होईल.
संशोधनातील राजकारणाचा हा भाग अनेकांना गौण वाटेल, पण परावलंबित्व हे पारतंत्र्यासारखंच असतं. त्या तांत्रिक गुलामीतून आता आपण अवकाश क्षेत्रात पूर्णार्थानं स्वावलंबी झालो आहोत. कारण भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाची चाचणी काही महिन्यांपूर्वी यशस्वी करून भारताने एक मोठाच टप्पा गाठला आहे. त्यामुळे आपल्याला यापुढे मोठे उपग्रह सोडण्यासाठी कुठल्याही देशावर अवलंबून राहावं लागणार नाही. उलट, इतर देशांचे उपग्रह आपल्या केंद्रांवरून सोडून आपण आता परकीय चलन मिळवत आहोत. अर्थात यात पसा मिळवणं हा एकमेव हेतू नाही तर स्वयंपूर्णता महत्त्वाची आहे. भारत महासत्ता होण्याची आपण स्वप्नं पाहत आहोत, पण त्यात तंत्रज्ञानातील कुशलता हा एक महत्त्वाचा पलू असणार आहे. त्यातील एक टप्पा आपण यशस्वी मंगळ मोहिमेनं गाठला आहे. थोडक्यात काय, मंगळ मोहिम यशस्वी करून भारताने अवकाश तंत्रज्ञानात मंगळावर झेंडा रोवला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा