– डॉ. राममनोहर लोहिया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताबद्दल आस्था असणाऱ्यांचे लक्ष २२ जानेवारीला अयोध्येकडे असेल. ही आस्था केवळ मूर्तिपूजेपुरती नसून, भारतीय संस्कृतीत रुजलेल्या ‘सगुण-साकार’ दैवताकडे अनेकांनी कसे पाहिले, त्या दैवताचे कोणते गुण जाणले, याविषयीच्या चर्चेकडे जाणारी आहे. अशा चर्चेतला महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या ७० वर्षांपूर्वीच्या लेखासह, आध्यात्मिक व सामाजिकाची सांगड घालणाऱ्या विनोबांच्या परंपरेला राम कसा दिसतो, याचाही मागोवा..

राम, कृष्ण आणि शिव खरोखरच कधी होऊन गेले आहेत काय, हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही. कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राम-कृष्ण-शिव यांच्या अनेक लहान-मोठ्या कथा-कहाण्यांचा गेली शेकडो वर्षे जबरदस्त प्रभाव आहे, ही वस्तुस्थिती आहे. या तिघांइतक्या जनमानसावर प्रभुत्व असलेल्या अन्य व्यक्ती हिंदूस्थानच्या इतिहासात सापडणारच नाहीत. इतिहासकालीन व्यक्तींची नावे माहीत असणारे लोक फारतर शंभरात पंचवीस असतील आणि त्या व्यक्तींसंबंधीच्या कथा-कहाण्या माहीत असणारे तर त्याहूनही कमी म्हणजे हजारात फार तर एक-दोनच असतील; पण पुराणकालातील राम, कृष्ण, शिव यांची केवळ नावेच नव्हेत तर त्यांच्या शेकडो कथा सर्वाना माहीत असतात.

राम, कृष्ण, शिव यांची नावे धर्माशी जोडलेली आहेत म्हणून काही केवळ त्या व्यक्ती लोकप्रिय झालेल्या नाहीत. मानवी जीवनातील आदर्श म्हणून या त्रिमूर्तीकडे भारतीय जनता पाहात आली आहे. जीवनातील प्रत्येक व्यवहारांच्या प्रसंगी या तीन व्यक्तींची जीवने आदर्श म्हणून जनतेच्या नजरेसमोर उभी असतात व कळत नकळत लोक या आदर्शाचे अनुकरण करीत असतात. विचारपूर्वक मानलेल्या आदर्शापेक्षा अशा प्रकारचे नकळत स्वीकारलेले आदर्शच अधिक प्रभावी असतात. राम, कृष्ण, शिव या तिघांच्या केवळ आदर्शाचे भारतीय लोक स्मरण करतात. एवढेच नव्हे तर, त्यांच्या अनेक लहान-मोठ्या कथा आणि त्याचे बारीकसारीक तपशीलही त्यांनी आठवणीत साठवून ठेवलेले असतात.

हेही वाचा – मागील पानावरून पुढे?

तसे तर प्रत्येक देशाला स्वत:चा असा इतिहास असतो. राजकीय, सामाजिक आणि अन्य घटनांनी तो बनलेला असतो. त्यांची एक लांबलचक साखळी असते. देशाची परंपरा अशाच घटनांनी बनते आणि तिचा त्या देशांतील जनतेच्या मनावर प्रभाव पडलेला असतो. परंतु या इतिहासकालीन घटनांबरोबरच परंपरेच्या या दीर्घ शृंखलेत दुसरी आणखी एक महत्त्वाची कडी असते. ती कडी म्हणजे काल्पनिक कथा-कहाण्यांची. हिंदूस्थानातील हितोपदेश व पंचतंत्र यांतील गोष्टी हा त्यातलाच एक प्रकार होय. या कथा मोठ्या गोड आहेत. यातील माणसांची, पशू-पक्ष्यांची नावेही मनोहर आहेत, यांतील एक गोष्ट मला आठवते. त्यांत गंगदत्त नावाचा एक बेडूक प्रियदर्शन नावाच्या एका सापाला एका राजाच्या नोकराबरोबर निरोप पाठवितो. तो नोकर सापाला म्हणतो, ‘‘हे बघ, गंगदत्त काही इतका मूर्ख नाही. तो पुन्हा मुळीच विहिरीत उतरणार नाही. बुभुक्षित माणसाला धर्माचे बंधन नसते.’’ हितोपदेश व पंचतंत्रातील अशा कथा मुलांची मने बनवीत असतात. या कथांनीच हिंदूस्थानचे नीतिशास्त्र घडविले आहे. पण आता मी ज्या राम, कृष्ण, शिव यांची चर्चा करीत आहे, त्यांच्या कथा-कहाण्यांचा नीतिशास्त्राशी तसा प्रत्यक्ष संबंध नाही.

अशा महान कथा-कहाण्यांत देशातील माणसांचे हास्य आणि स्वप्ने कोरलेली असतात. हास्य आणि स्वप्ने यांपेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. राष्ट्र हसते तेव्हा ते प्रसन्न, समाधानी असल्याचे प्रतीक असते; त्या वेळी त्याचे काळीजही विशाल असते. राष्ट्र स्वप्न पाहत असते तेव्हा ते आपल्या आदर्शामध्ये कल्पनांचे रंग भरून कथा गुंफीत असते.

उदात्त आशा-आकांक्षा व जीवनशक्ती असलेल्या अदम्य व्यथा आणि देशाचा प्रादेशिक आणि दैवी इतिहास यांची नोंदवही म्हणजे पुराणे. पुराणे म्हणजे निव्वळ लोककथा नव्हेत की लघुकथा-कादंबरी नव्हेत. लोककथेचा उद्देश मनोरंजनाचा असतो. पुराणांचा हेतू सर्वसमावेशक असतो. श्रेष्ठ पुराणकथा म्हणजे महाकाव्य व लोककथा, लघुकथा व कादंबरी, नाय्य आणि पद्य यांचा एक प्रकारचा मनोज्ञ संगम होय. पुराण म्हणजे कधी अंतच नसलेली कादंबरी, जनतेच्या रक्तामांसाच्या पेशी. अशी पुराणेच सामान्य जनतेची समर्थ सांस्कृतिक शक्तिकेंद्रे असतात.

धर्म आणि राजकारण, परमेश्वर आणि राष्ट्र वा जनता यांची गल्लत सर्व जगभरच सदासर्वदा होत आली आहे. परंतु भारतात ती जरा अधिक प्रमाणात झालेली आहे. एवढ्या खंडप्राय देशात ऐक्य घडविण्याचे कार्य आपल्या पूर्वजांपुढे होते. या विलक्षण हेतूनेदेखील पुराणे रचण्यात आली असतील. पुराणे ही महान मानवतेची महान गाथा आहे. सारी मानवजात एकमेकांशेजारी एकेकाळी राहात होती हे दाखवून देणारी आणि आता ती जात एकमेकांपासून विखरून दूर राहत आहे, असे सांगणारी शोकांतिका आहे. पण विश्वव्यापकता स्थानिकतेतूनही बोलते हेही लक्षात ठेवले पाहिजे.

राम-कृष्ण-शिव या महान व्यक्ती काही एका दिवसात घडलेल्या नाहीत. हजारो वर्षे हिंदू माणसे त्या व्यक्तींच्या काल्पनिक मूर्ती घडवीत आली आहेत. सामान्यपणे आपण असे समजतो की, राम-कृष्ण-शिव यांनी हिंदूस्थान बनविला आहे. एका मर्यादेपर्यंत ते खरेही आहे. पण त्यापेक्षा असे म्हणणे अधिक वास्तव आहे की, कोट्यवधी हिंदूवासीयांनी युगानुयुगाच्या कालात, हजारो वर्षांत, राम-कृष्ण-शिव यांना निर्माण केले आहे. त्यांच्या व्यक्तित्वात आपल्या प्रसन्नतेचे, स्वप्नांचे आदर्शाचे रंग त्यांनी भरले आणि त्यांतूनच या व्यक्ती त्यांनी घडविल्या.

राम व कृष्ण ही विष्णूची रूपे आहेत तर शिव महेशाचे. भारतीयांच्या कल्पनेप्रमाणे राम व कृष्ण हे, जे जे चांगले व मंगल आहे त्याच्या रक्षणाचे व पोषणाचे प्रतीक आहेत, तर शिव हे वाईटाच्या व अमंगलाच्या विनाशाचे, संहाराचे चिन्ह आहे. या चर्चेत मी इथे पडत नाही. काही लोकांना असल्या गोष्टींतून अर्थ शोधून काढण्यात मजा वाटते. मी अशा प्रकारे अर्थ लावीत बसणार नाही. त्यामुळे माझे कथन कदाचित निर्थकही वाटण्याचा संभव आहे. पण ते जितके निर्थक होईल तितके बरेच असे मला वाटते. हास्य व स्वप्ने अर्थशून्यच असतात. परंतु तरीदेखील माणसाच्या मनावर त्यांचा केवढा प्रभाव असतो! त्याने माणसाचे अंत:करण विशाल बनते. मानवाने आपल्या पुराणातील काल्पनिक कथांची उजळणी करून आपले हृदय उदार बनविले तर त्याहून अधिक हितकारी काय असू शकेल?

राम-कृष्ण-शिव यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या परिशीलनातून काही विशिष्ट राजकीय, सामाजिक अथवा तात्त्विक तात्पर्य काढावयाची माझी इच्छा नाही. हजारो वर्षे आमचे पूर्वज या तिघांबद्दल कथा-कहाण्यांतून जे सांगत आले आहेत ते काय आहे तेवढे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.

रामाला मर्यादापुरुषोत्तम म्हणतात. या त्याच्या नामाभिधानातच रामाचे सर्व- श्रेष्ठत्व व्यक्त होते. राम मन मानेल तसे वागत नाही. त्याची शक्ती अबद्ध आहे; त्याच्या वर्तनाला रेखांकित परीघ आहे. नीती वा शास्त्र अथवा धर्म वा व्यवहार यांच्या परिघांत रामाची शक्ती मर्यादित आहे. आधुनिक शब्दात सांगायचे तर रामाने कायद्याच्या मर्यादा सांभाळल्या आहेत. विधानसभा व लोकसभेवर जशा घटनेच्या मर्यादा असतात, त्यांनी केलेल्या कायद्यांवर जसे घटनेचे नियंत्रण असते- तसे रामाने आपल्या वागणुकीवर व कार्यावर कशाचे तरी नियंत्रण मान्य केले आहे. हे नियंत्रण कोणते आणि ते रामाने का स्वीकारले या चर्चेत तूर्तास आपण पडूया नको. राम अपूर्ण होता. जुने सनातनी लोकसुद्धा त्याला आठ कलांचा अवतार म्हणतात. आणि कृष्णाला सोळा कलांचा अवतार समजतात- संपूर्ण समजतात. दोघेही विष्णूचे अवतार. पण एकाला आठच कला अवगत होत्या असे मानतात. वास्तविक एकदा अवतार म्हटल्यानंतर अपूर्ण कसले आणि संपूर्ण कसले? परंतु एकाला आठ व दुसऱ्याला सोळा कला येत होत्या असे म्हटले जाते तेव्हा तसे म्हणणाऱ्यांना त्यातून काही तरी निष्कर्ष काढायचा असतो असे मानले पाहिजे.

भागवतात एक मोठी वेधक कथा आहे. सीता हरवल्यानंतर रामाला अत्यंत दु:ख झाले. जरा प्रमाणाबाहेर अधिक दु:ख झाले. प्रमाणात झाले असते तर समजण्याजोगे होते. त्या प्रसंगी लक्ष्मण हे सारे पाहात होता. रामाने उघडपणे अश्रू ढाळावे आणि वृक्षांशी बोलावे हे जरा विचित्र वाटते. राम एकांतात रडता तर ती गोष्ट वेगळी. पण लक्ष्मणाच्या देखत झाडाशी बोलणे आणि रडणे जरा अधिकच वाटते. कोणाला माहीत, कदाचित वाल्मीकी व तुलसीदास यांना रामाच्या या कृतीद्वारे त्याचे थोरपण दाखवायचे असेल. वाल्मीकी व तुलसीदास यांच्यात फरक आहे. वाल्मीकीची सीता आणि तुलसीची सीता यांच्यात दोन ध्रुवांइतके अंतर आहे. गेल्या तीन-चार हजार वर्षांत सीतेचे व्यक्तित्व आपल्या देशाच्या वाड्मयात कसे बदलत गेले आहे त्याचे संशोधन करून कोणी एखादे पुस्तक लिहिले तर ते किती मनोवेधक होईल? अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले पाहिजेत.

राम म्हणजे मर्यादित व्यक्तित्व पूर्णत्वास पोहोचल्याचे प्रतीक आहे. नियोजन, व्यवस्था व बाह्याचारावर कायदे-कानूंचे बंधन आणि अंतराचारावर स्वविवेकबुद्धीचे नियंत्रण यांचा राम हा प्रतीक आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ही उभय नियंत्रणे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. राम हा उत्कृष्ट श्रोता होता. थोर माणसाने तसेच असले पहिजे. रामाला मौनातील जादू माहीत होती. रामाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे दुसऱ्याला आपल्यात सामावून घेण्यापेक्षा आपल्या मर्यादित व संयत व्यक्तिमत्त्वाची दुसऱ्यावर छाप पाडण्याची आणि विस्तारापेक्षा ऐक्यावर भर देणारी महान कथा आहे.

हेही वाचा – उस्ताद, तिहाई बडी जल्दी ले ली..

मर्यादापुरुषोत्तम राम म्हणजे एक अद्भुत राजकीय व्यक्तिमत्त्व होते. रामराज्यातील कायदे व नियम यांचा आदर करण्याच्या हेतूनेच त्याने सीतेचा त्याग केला. अर्थात् कायद्याच्या, नीतिबंधनांच्या मर्यादा सांभाळण्याचा आणखीही एक मार्ग त्याला उपलब्ध होता. सीतेचा त्याग करण्याऐवजी रामाने राज्यत्याग करून परत वनवास पत्करावयास हरकत नव्हती. परंतु पुराणातील काय किंवा इतिहासातील घटनांविषयी काय, अशी जर-तरची भाषा निर्थक होय. अनिर्बंध व असंगत वर्तणुकीपेक्षा मर्यादांचे बंधन पाळणारे वर्तन हे नेतृत्वाच्या दृष्टीने कधीही श्रेष्ठच होय.

माझा एक मित्र मला म्हणाला, ‘‘साबरमती किंवा काठेवाडीतील नद्यांच्या पुत्राचे यमुनेच्या किनारी दहन झाले. आणि यमुनेच्या बालकाचे काठेवाडीमधील नदीच्या किनारी दहन झाले.’’ या दोन्ही प्रसंगांच्या दरम्यानच्या काळात हजारो वर्षांचे अंतर आहे. काठेवाडी नदीचा पुत्र व यमुनेचा पुत्र या दोहोंमध्ये काही साम्यही नसेल. काही वर्षांपूर्वीपर्यंत माझ्याही ते लक्षात आले नव्हते. कारण गांधीजींनी स्वत: निरंतर रामालाच पूजिले. मृत्युसमयी ‘हे राम’च म्हटले. गांधीजींना कृष्ण व शिव प्रिय नव्हते असा याचा अर्थ नाही. परंतु गांधींना हिंदूस्थानपुढे महानतेचे एक सीमित चित्र ठेवायचे होते; म्हणून त्यांनी मर्यादापुरुषोत्तमाचा आदर्श ठेवला. मर्यादापुरुषोत्तम राम म्हणजे स्वत:वर नीती, धर्म व व्यवहाराचे निर्बंध घालून घेणारी शक्ती होय !

(‘मॅनकाइंड’ या इंग्रजी मासिकात ऑगस्ट १९५५ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘राम-कृष्ण-शिव’ या लेखाचा संपादित अनुवाद. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या ‘ललित लेणीं’ या ग्रंथातून.. ‘प्रेस्टिज प्रकाशन’ मधून साभार)

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maryada purushottam ram ram maintained the limits of law ssb
Show comments