‘मास्तरांची सावली’ या कृष्णाबाई सुर्वे यांच्या पुस्तकाची पाचवी व सुधारित आवृत्ती सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशित होत आहे. कवी नारायण सुर्वे यांच्या ‘अखेरच्या दिवसांचे’ कथन कृष्णाबाईंनी त्यात केले आहे. हा भाग या नव्या आवृत्तीत समाविष्ट केला आहे. त्यातील संपादित अंश.
‘कहाणी कवितेची’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाची तारीख ठरवणं सुरू होतं. मास्तरांना पुस्तकाच्या प्रकाशनाला जाणं कितपत झेपेल, काहीच कळत नव्हतं. प्रकाशन समारंभाच्या आठ -दहा दिवस आधीच मास्तरांना बघायला आणि पुस्तकाची पहिली प्रत घ्यायला म्हणून डिंपल पब्लिकेशनचे अशोक आणि नम्रता मुळे, नेहा सावंत घरी आले होते. त्यांनी मास्तरांची एकंदर तब्येत पाहून प्रकाशन समारंभाची घाई केली. मास्तरांनी त्यांच्याशी गप्पा केल्या. पण पायाला सूज असल्यामुळे त्यांना फार वेळ बसवत नव्हतं. कार्यक्रमाला ‘मी नक्की येणार’ असं मास्तर ठामपणे म्हणत होते. मुळे पती-पत्नी मास्तरांचा निरोप घेऊन घराबाहेर पडले. पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी मला दिसत होती.
घाईघाईतच अशोक मुळेनी १३ जुलैला प्रकाशन समारंभ ठेवला होता. पावसाळ्याचे दिवस होते, कार्यक्रमाला किती माणसं जमतील, किती नाही याचा विचार त्याने केला नव्हता. कारण त्याला खात्री होती की मास्तरांचा कार्यक्रम म्हणजे लोक येणारच. मास्तरांवर त्याचा अगदी पूर्वीपासूनच जीव होता. अगदी तो प्रकाशक होण्याआधीपासूनच त्याच्या कुटुंबीयांचे आणि आमचे अगदी घरोब्याचे संबंध होते. मास्तरांचीही त्याच्यावर तितकीच माया होती. पूर्वीपासूनच त्याचा कष्टाळू आणि धडपडय़ा स्वभाव. मास्तरांना त्याने शब्द दिल्याप्रमाणे अगदी दणक्यात कार्यक्रम केला. आम्हाला नेण्या-आणण्यासाठी त्याने खास गाडीची सोय केली होती. अगदी संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवणाचीही सोय केली होती. कार्यक्रमाला मोठमोठे मान्यवर लोक आले होते. त्यामुळे मास्तर अगदीच खूश होते. त्या दिवशी, १३ जुलैला डिंपल पब्लिकेशनतर्फे तीन पुस्तकांचं प्रकाशन होतं. कवयित्री नीरजाचं ‘चिंतन शलाका,’ कवी अशोक बागवेंची कादंबरी ‘प्रिय सालस..’ आणि मास्तरांचं ‘कहाणी कवितेची’. या कार्यक्रमाला कवी मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, नीरजा, अशोक बागवे, अरुण साधू, महेश केळुसकर, नंदा मेश्राम अशी अनेक साहित्यिक मंडळी आली होती. रवींद्र नाटय़मंदिरचं मिनी थिएटर अगदी माणसांनी गच्च भरून गेलं होतं. भर पावसात इतकी माणसं कार्यक्रमाला आली होती. मास्तर अगदी आनंदून गेले होते. पण नेरळ ते दादर प्रवासाने ते थकलेही होते. नुकतेच आजारातून उठले होते ना! मास्तरांना पाहून सगळ्यांना वाईट वाटत होतं, कारण त्यांना इतकं थकलेलं कुणीच पाहिलं नव्हतं. स्टेजवरही त्यांना धरून न्यावं लागलं होतं. पण आपल्या सगळ्या साहित्यिक मित्रांना पाहून त्यांना मनोमन आनंद झाला होता. या वेळी भाषण करण्याइतकी ताकद त्यांच्यात नव्हती. मास्तरांनी ‘मर्ढेकरांशी बातचीत’ ही कविता म्हटली. पण एरव्ही ज्या जोमात ते काव्यवाचन करायचे तो जोम आणि जोश या वेळी नव्हता. तेव्हा मात्र मला खरंच भरून आलं. समाधान एकच वाटत होतं की पाडगावकरांची आणि मास्तरांची भेट झाली. लोकांना दोन कवींचं काव्यवाचन ऐकता आलं. पण हे काव्यवाचन आणि असा जाहीर सार्वजनिक कार्यक्रम मास्तरांच्या आयुष्यातला शेवटचाच असेल याची मात्र कुणालाच कल्पना नव्हती.
‘कहाणी कवितेची..’च्या प्रकाशनानंतर घरी परतायला खूप रात्र झाली होती. कविता सोबत होती. मास्तर खूपच थकले होते. दोन दिवस झोपूनच होते. सारखं आपलं नवं पुस्तक हातात घ्यायचे, दोन पानं उलटायचे आणि बंद करून ठेवायचे. वाचायचीही ताकद नव्हती त्यांच्यात. मला म्हणाले, ‘‘किशा, कसं गं सुचलं तुला हे पुस्तक करून घ्यायला? माझं हे लेखन मी विसरूनच गेलो होतो. आताशा काही आठवतच नाही. किशा, पण तू मात्र किती निगुतीने हे कागद सांभाळून ठेवले होतेस गं. नाहीतर हे कागद कधी तरी तुला चण्याच्या पुडीत दिसले असते.’’
‘‘हो, तुम्ही नेहमीच असं म्हणायचा, पण चण्याच्या पुडीला ते कागद कधी येतील तेव्हा येतील, आता मी त्यांचा अपमान का करू? मास्तर, हे पुस्तक आलं तर मला त्याचा काही फायदा होणार नाही. पण लोक वाचतील आणि अभ्यास करणाऱ्या माणसांना त्याचा नक्कीच फायदा होईल. ही किशा अडाणीच राहिली, पण तिला शिक्षणाचं मोल कळतंय म्हणून तिने इतका आटापिटा केला.’’ माझ्या बोलण्यानं मास्तरांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.  अलीकडे मास्तरांच्या हालचालीही कमी झाल्या होत्या. अलीकडे त्यांना आठदहा वेळा तरी हॉस्पिटलला अ‍ॅडमिट केलं होतं. हॉस्पिटलच्या सारख्या वाऱ्या करून ते कंटाळले होते. औषधं, इंजेक्शनं यांचा त्यांनी धसकाच घेतला होता. कधी लघवीचा त्रास, कधी बी.पी.चा त्रास, कधी पडल्याचं निमित्त तर कधी श्वसनाचा त्रास.. एक ना अनेक कारणांनी त्यांना अ‍ॅडमिट करावं लागत होतं. अगदी गांजून गेले होते ते. चार दिवस बरे तर चार दिवस आजारी. आताशा त्यांनी निरवानिरवीची भाषा सुरू केली होती. मला म्हणायचे, ‘‘किशा, किती करतेस गं तू! अजूनही तू माझ्या भोवती नि भोवतीच असतेस. जेव्हा मी या जगात नसेन तेव्हा काय होईल गं तुझं?’’
मग मीच त्यांना दम द्यायची, ‘‘मास्तर, माझं काय होईल ते पुढे बघता येईल. आता तुम्ही शांतपणे झोपा. आणि माझी काळजी तुम्ही करू नका. तुम्ही आहात हाच मला आधार. बाकी तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही.’’
एक दिवस मास्तरांनी आपल्या लेकीला सांगून माझ्यासाठी हिरवं पातळ मागवून घेतलं. छान पातळ होतं ते. मला म्हणाले, ‘‘किशा, हे एकदा नेस हं, आपण मग छान फोटो काढू.’’ ते असं म्हणाले आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मनात चरकलं. क्षणभर वाटलं मास्तर मला ‘कसलातरी’ संकेत तर देत नाहीयेत ना! त्यांच्या त्या कवितेतले शब्द तर खरे करू पाहात नाहियेत ना! हा विचार मनात आला अन् मला ते पातळ नेसावंसंच वाटलं नाही. पण मास्तरांना दुखवायला नको म्हणून म्हटलं, ‘‘आता लगेचच नको, दोन दिवसांनी नेसते. तुम्हाला जरा बरं वाटू दे.’’
त्यावर मास्तर म्हणाले, ‘‘किशा, आयुष्यभर तू तुझ्या मनाला, आवडीला मुरडच घालत आलीस. मी तुला कधी डोळे भरून पाहिलंच नाही की कधी तुला आरशात निरखून पाहतानाही पाहिलं नाही.’’
‘‘मास्तर, आरशात निरखून पाहायला सवड होतीच कुणाला? आणि तुम्हीच म्हणायचात ना, ‘किशा, आपलं आयुष्य हे दागिने, छानछौकीचे कपडे घालून मिरवण्यासाठी नाहीच आहे. अगं, यातच माणसाचं माणूसपण नसतं गं.’ आठवतंय ना! त्यामुळे मीही कधी तुमच्याकडे बांगडी, पातळ, दागिने काहीच मागितलं नाही. मग आता का म्हणताय की मी तुला काहीच दिलं नाही म्हणून? विचारांचं धन दिलंत ना या अडाणीला? आता मागच्या आयुष्याचा जमाखर्च मांडून स्वत:च्या जिवाला त्रास करून घेऊ नका.’’ असं म्हणून मी त्यांची समजूत काढायचे खरी. पण खरंच पुढे काय होणार, या जाणिवेनं मन उदास व्हायचंच.