आजपर्यंत मी अनेक वेळा आणि वेगवेगळ्या वेळेला- पाणबुडी आणि हेलिकॉप्टरवगळता- भारतात उपलब्ध असलेल्या दळणवळणाच्या जवळपास सर्व साधनांनी प्रवास केला आहे. प्रवासाला ‘दळणवळण’ हा शब्द का वापरला जातो बरे? आजपर्यंत प्रवासात वळणं अनेक वेळा पाहिली आहेत, पण दळण घेऊन जाणारा किंवा येणारा प्रवासी काही माझ्या पाहण्यात नाही. किंवा कुणीतरी कुणाला तरी दहा किलो गहू दळून एका गावाहून दुसऱ्या गावाला पाठवले आहेत असंही कुठं मी ऐकलेलं नाही. पूर्वी नाटकाच्या निमित्तानं कधी बाहेरगावी जायला निघालो की घरून ‘चाललाच आहेस सांगलीला, तर थोडी हळद घेऊन ये..’ एवढीच मागणी असायची. ‘तिथून का?’ असं विचारल्यावर ‘तिथे चांगली दळून मिळते. भेसळ नाही अजिबात..’ असं सांगितलं जायचं. पण माझ्या आईने मला सांगलीहून चांगली दळून मिळते म्हणून आणायला सांगितलेल्या पाच-दहा किलो हळदीमुळे अख्ख्या भारतातील प्रवासाला ‘दळणवळण’ हे नाव पडलं असण्याची शक्यता मला कमी वाटते. मग हे नाव कसं काय पडलं? मी माझ्या एका मित्राला ‘दळणवळण’ या शब्दाबद्दल माझ्या मनात उडालेला कल्लोळ वर्णन करून सांगितला. त्यावर त्याने ‘मराठीतील गूढ-गहन शब्दांची मीमांसा’ या शीर्षकाचा एक ६०० पानी  ग्रंथ लिहिला. त्याला दोन-तीन विद्वानांनी चर्चात्मक उत्तरंही दिली. ‘दळणवळण’ऐवजी ‘प्रवास’ किंवा ‘येणे-जाणे’ असा सोपा शब्द वापरला असता तर महाराष्ट्र वर सांगितलेल्या एका महान ग्रंथाला मुकला असता. अर्थात त्यात विवादास्पद असे काही नव्हते; अन्यथा पुढे तो जाळलाही गेला असता. हल्ली बरेच ग्रंथ जाळण्याच्या कामीच जास्त उपयोगी येतात. त्यानिमित्ताने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची क्षीण झालेली ताकद पुन्हा एकदा नव्याने उजाळून घेता येते.

अर्थात आपल्या वाटय़ाला दळणवळण म्हणण्यासारखं काही येत नाही. आपण करतो तो साधा प्रवास. आणि त्याला झकास हिंदी पर्यायी शब्द मात्र आहे- ‘यातायात’! अगदी रेल्वेचा प्रवास घ्या. तुम्ही कुठल्याही गाडीने कितीही वाजता जाणार असाल तरी स्टेशनवर लोकांची झुंबड उडालेली असते. काही प्रवाशी चक्क झोपलेले असतात. त्यांना कुठली गाडी पकडायची असते? झोप यावी इतक्या आधी ते का येतात? कुणाची तिकिटे सापडत नसतात, तर कुणाची नुकतीच सापडून हरवलेली असतात. गाडीची जी घोषणा होते त्यातलं एक अक्षरही नीट कळत नाही. आरक्षणाचा एक चार्ट असतो. तो फलाटावर सगळ्यात गैरसोयीच्या ठिकाणी लक्तररूपात लोंबत असतो. आपल्या नावाची काय काय रूपं होऊ  शकतात हे बघायचं असेल तर तो चार्ट बघावा. ‘गजेंद्रगडकर’ वगैरे आडनाव असेल तर बघायलाच नको. चला! ते एक कठीण नाव आहे; पण ‘राम पै’ असं साधं- सोपं नाव असलं तरी ते ‘राम्पाई’ किंवा ‘रा पीम’ असं होऊनच त्या चार्टवर अवतरतं. आपल्या प्रत्येकाला जन्मापासून एक नाव असतं तसं रेल्वेच्या गाडय़ांनाही असतं. पण रेल्वेचा नावावर विश्वास नसतो; नंबरावर असतो. त्यामुळे आपण ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’ म्हटलं की समोरचा रेल्वेवाला ‘३२४१ अप?’ असं म्हणून आपल्याला बुचकळ्यात पाडतो. हे ‘अप’ आणि ‘डाऊन’ नेमकं काय प्रकरण आहे, देव जाणे. मला पूर्वी वाटायचं की पुण्याला जाणारी गाडी घाट चढून जाते म्हणून ती ‘अप’! पण मग मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या गाडीला काय म्हणणार? कारण दोन्ही शहरं समुद्रसपाटीवरच आहेत. रेल्वेच्या असंख्य सूचनांच्या पाटय़ा ठिकठिकाणी लावलेल्या असतात. आपल्याकडे त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असतात. तुम्हाला येत नसेल तरीही त्यातली कळायला सगळ्यात सोपी पाटी इंग्रजीत असते. अन्यथा गंतव्य स्थान म्हणजे काय? निर्गमन म्हणजे काय? तसेच आपण ज्याला टी. सी. म्हणतो तो टी. सी. म्हणजे ‘तिकीट चेकर’ नाही, रेल्वेच्या मते तो असतो- टी. टी. ई. ट्रेन तिकीट एक्झामिनर. मग आपल्याला परीक्षेला असतो तो एक्झामिनर कोण? कारण तो परीक्षेचा पेपर तपासत नाही, पण रेल्वेचं तिकीट तपासतो. बरं, हिंदी धरून बसायचंय ना, मग ‘पार्सल बाबू’, ‘तिकीट बाबू’ हे अर्धवट कशाला? ड्रायव्हर रेल्वे चालवतो; मग गार्ड नेमकं काय करतो? सगळ्यात शेवटी ज्याचा डबा असतो त्याला पुढे काय झालंय किंवा काय चाललंय हे कसं कळणार? आणि गार्ड या आपल्या हुद्दय़ाला जागून तो कशाचं रक्षण करणार? डब्यांना एस-१ एस-२, एस-३ क्रमांक असतात. ते त्याच क्रमाने का लावत नाहीत? एस-५ आणि एस-६ च्या मधे ‘फौजीभाई’ असा डबा लावून का गोंधळ वाढवायचा? गंमत म्हणजे जिवाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे फौजी रेल्वेप्रवासात मात्र मधे. सुरक्षित. असं का? सगळ्या गाडय़ांना एकसमान न्याय का नाही? काहींचा पहिला वर्ग पुढे, काहींचा मधे, काहींचा शेवटी- असं का? सगळ्या गाडय़ांचे त्या- त्या क्रमाने डबे लावले तर तिकीट देतानाच एस-४ पाचवा डबा किंवा ए-६ सातवा डबा असं नाही का करता येणार? अजूनही काही काही गाडय़ांवर खडूने नंबर लिहितात. पावसाळ्यात ते धुतले जातात आणि मग मधल्या कुठल्या तरी स्टेशनवर लोक आपापले डबे शोधत सैरावैरा पळत असतात. ही कुणाच्या मनोरंजनाची सोय रेल्वेने केली आहे? ए. सी. टू टायर आणि थ्री टायर डब्यांमध्ये बर्थजवळ एक-एक दिव्याची सोय आहे. लोकांना वेळ घालवण्यासाठी वाचता यावं यासाठी ती असेल तर उत्तम आहे. पण आपलं वाचन झाल्यावर तो दिवा बंद करायला जावं तर आपल्याला हमखास चटका बसतो. प्रवास चटका लावून गेला असं वाटावं अशी तर रेल्वे खात्याची इच्छा नसेल? काही गाडय़ांना खाण्याचा डबा असतो, काही गाडय़ांना नसतो. असं का? पुण्याला तीन तासात गाडी जाते त्या गाडय़ांना तो आहे. पण कोल्हापूरला दहा तास लागतात, त्या गाडय़ांना नाही. असं का? रेल्वेच्या खाण्याच्या डब्यात जो मेन्यू असतो तो कोण ठरवतो? तीन-चार पोस्टकार्डस् एकत्र चिकटवून तळून काढली तर ती चवीला जशी लागतील तशा चवीचा दालवडा नावाचा एक पदार्थ रेल्वेत विकतात. तो पोस्टात नोकरी करणारे प्रवासी तरी खात असतील का? रात्री तीन वाजता ‘कचोरी-सामोसे’ असा पुकारा करत आडगावातल्या स्टेशनवर विक्रेते का येतात? लोणावळ्यातल्या विक्रेत्यांना मानवाचा जन्म फक्त शेंगदाणा आणि काजू-बदामची चिक्की खायला झाला आहे असं का वाटतं? टी. सी.ला रेल्वे खात्याकडून एक चांगलं पेन का देऊ  करत नाहीत? कायम ते अर्धवट तुटलेल्या पेनाने का लिहितात? गाडी जेव्हा लेट असते तेव्हा ती का आणि किती लेट आहे, हे आपल्याला का कळू देत नाहीत? गाडीत जितक्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या विकायला येतात तितक्या नद्या तरी भारतात आहेत का? या सगळ्या विक्रेत्यांच्या आवाजाला जो विशिष्ट खर्ज असतो तो त्यांना कुठे शिकवतात? कधी पातळ आवाजाचा विक्रेता आपल्याला ऐकायला मिळतो का- जो मुलायम आवाजात वस्तू विकेल? म्हणजे तलत मेहमूदच्या आवाजात वडा विकावा असं माझं म्हणणं नाही; पण प्रवाशांच्या अंगावर वस्सकन् ओरडू नये एवढीच माफक अपेक्षा असते.

अर्थात आपल्या अशा खूप अपेक्षा असतात, आहेत; पण सगळ्याच कुठे पूर्ण होतात, नाही का? आपल्यालासुद्धा दुसऱ्यांना मिळते तशी सुंदर बायको असावी असं नाही का वाट.. नको. इथेच थांबतो.

संजय मोने

sanjaydmone21@gmail.com