संजय मोने

आजकाल जो एक प्रकारचा कोरडेपणा म्हणा किंवा ‘आता उरका!’ हा भाव बऱ्याच शिक्षकांत दिसतो तो त्या काळात कोणाच्याही स्वभावात नसायचा. कुणा मुलाची तब्येत किंचित बिघडली तर आजच्यासारखं पालकांना फोन करून जबाबदारी संपली, हा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. शक्यतो तिथेच मुलाला थांबवून घेऊन जुजबी उपचार करणं हे शिक्षकांच्या वैचारिक जडणघडणीतच होतं.

माझी शाळा घराच्या अगदी जवळ होती. लहानपणी आजूबाजूला फारशा इमारतीही नव्हत्या. त्यामुळे शांतताही होती. वाडय़ा होत्या. मळे होते. पाच-सहा विहिरीही होत्या. शाळेची घंटा घरात ऐकू यायची. तिचा आवाज ऐकला की पाटी-दप्तर आणि पुढे मग वह्य-पुस्तकं घेऊन आम्ही भावंडं तीन-चार मिनिटांत शाळेत पोचायचो. शाळेच्या त्या शंभर मीटरच्या रस्त्यावर काही रानझुडपं होती. त्यावर आमच्या सपासप पट्टय़ा चालवत आम्ही ‘लढाई.. लढाई’ खेळत शाळेत जायचो. इयत्ता वाढत गेली तसतसं दप्तराचं ओझं कमी होत गेलं. आपण जसं जास्त शिकायला लागतो, पुढच्या इयत्तेत जातो तसतसं  दप्तराचं ओझं वाढत न जाता कमी कमी कसं होत जातं, या प्रश्नाचं उत्तर आज शाळा सोडून चाळीसहून अधिक वर्ष झाली, माझी मुलगी आणि इतर मुलं शाळेत जाऊ लागली तरी अद्यापि मला मिळालेलं नाही. असो.

तर ती माझी शाळा माझ्या रोजच्या फिरायच्या रस्त्यावर आहे. एक दिवस ‘ती आता बंद होणार’ अशी बातमी कळली. शहानिशा करण्यासाठी मी शाळेत जाऊन चौकशी केली. बातमी खरी होती. ऐकल्यावर क्षणभर काही सुचेना. एक-दोन नाही, तर बालवर्गाची दोन आणि पुढची दहा तसंच नव्या १० + २ + ३ या शिक्षण पद्धतीचे पहिले कुर्बानीचे बकरे आम्हीच होतो.. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाचं अजून एक अशी तेरा वर्ष त्याच शाळेत मी सुरुवातीला सहावीपर्यंत साडेबारा ते पाच आणि सातवीपासून सकाळी सात ते साडेबारा असा खडतर प्रवास केला होता. त्याच शाळेत मला शिक्षकांनी ज्ञान दिलं होतं आणि वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांनी अक्कल शिकवली होती. कसं शिकायचं ते माझ्या गुरुजनांनी शिकवलं होतं; आणि काय शिकायचं याचा बोध बरोबरच्या मुलामुलींनी दिला होता. तीनमजली इमारत होती आमच्या शाळेची. आणि त्यातल्या प्रत्येक मजल्यावर कधी ना कधी तरी माझा कुठला ना कुठला वर्ग होता. तळमजल्यावर चित्रकला, शिवण व गायनाचा वर्ग होता. ‘कार्यानुभव’ नावाचा एक भीषण प्रकार आमच्या वाटय़ाला आला होता. त्याचाही वर्ग तिथेच बाजूला होता. त्या कार्यानुभवातून आम्ही काहीही शिकलो नाही, हे आज मी अभिमानाने सांगू शकतो. तो वर्ग घेणाऱ्या शिक्षकांचं नावसुद्धा मला आठवत नाही. मात्र, आज शाळेत मुलांना प्रोजेक्टस् देऊन पालकांना हैराण करून सोडणारे प्रकार तेव्हा नव्हते. जो काय त्रास असेल तो आमचा आम्हाला व्हायचा आणि बिचाऱ्या शिक्षकांना! शाळा साधी होती आमची. आसपासच्या परिसरात दोन-तीन नावाजलेल्या शाळा होत्या. त्यांचा फार दबदबा असायचा.. आजही आहे.

बालवर्गात आम्हाला ओकबाई होत्या. त्यांना आम्ही ‘इंदूताई’च म्हणायचो. कारण त्यांना सगळे त्याच नावाने ओळखायचे. अत्यंत मंद आवाजात त्या प्रेमाने आणि आमच्या कलाने शिकवायच्या. आजही शाळेच्या पहिल्या दिवशी भोकाड पसरत वर्गात जायचं, ही देदिप्यमान परंपरा जिवंत आहे. पण आमच्या ओकबाई अगदी दोन-तीन दिवसांत मुलांचं हे रडणं बंद करायच्या.

पहिलीला पागेबाई होत्या. थोडय़ा स्वभावाने कडक. पण बहुधा पुढे जाऊन आपली मुलं काय करणार आहेत याचा त्यांना अनुभवाने अंदाज आल्यामुळेच त्यांच्या स्वभावात तो कडकपणा आला असणार.

दुसरीला बेलूरकरबाई होत्या. आजकाल जो एक प्रकारचा कोरडेपणा म्हणा किंवा ‘आता उरका!’ हा भाव बऱ्याच शिक्षकांत दिसतो तो त्या काळात कोणाच्याही स्वभावात नसायचा. शाळेत कुणा मुलाची तब्येत किंचित बिघडली तर आजच्यासारखं पालकांना फोन करून जबाबदारी संपली, हा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. शक्यतो तिथेच मुलाला थांबवून घेऊन जुजबी उपचार करणं हे त्यांच्या वैचारिक जडणघडणीतच होतं.

आम्हाला तिसरीला कदमबाई होत्या. त्यांच्याकडे एक औषधाची बाटली असायची. कसला तरी ओवा अर्क वगैरे. कुणाला उलटी झाली किंवा थोडी थंडी वाजली की तो ओवा अर्क आम्हाला त्या पाजायच्या. फार छान चव लागायची त्याची. चविष्ट असं ते मी आजवर घेतलेल्या औषधांतलं एकमेव औषध.

चौथीच्या वर्गात गेलो तेव्हा फडकेबाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या. अत्यंत नाजूक आणि सावळ्या. मंद, किणकिणता आवाज.  काही दिवस त्या गैरहजर राहिल्या आणि ‘सौ. रिसबूड’ होऊन परतल्या. त्या वर्षी शिष्यवृत्तीची परीक्षा होती. त्यात त्यांनी मुलांची उत्तम तयारी करवून घेतली होती. आम्ही बरीच मुलं त्या वर्षी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो.

मेढेकरबाई पाचवीला होत्या. आतापर्यंत आम्ही जरा मोठे झालो होतो वयाने. त्यामुळे नुसता शब्दांचा मार आम्हाला आटोक्यात ठेवू शकत नव्हता. त्या वर्षी मी आयुष्यात पहिल्यांदा एका स्पर्धेत भाग घेतला. अन्यथा मी अत्यंत लाजाळू असल्यामुळे कायम मागे मागे असायचो. माझ्यापेक्षा एक वर्षांने पुढे असलेल्या सतीश जोशी नावाच्या मुलाने त्या स्पर्धेत ‘नटसम्राट’ नाटकातला एक प्रवेश केला होता. त्याच्याकडे बघून मला पहिल्यांदाच आपणही असं नाटकात काम करावं असं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच वर्षी आमच्या गणेशोत्सवात मी पहिल्यांदा नाटकात काम केलं. वैद्यकाका हे माझे पहिले दिग्दर्शक. हा- तर मी सतीशबद्दल सांगत होतो.. त्यानंतर मी बरेच ‘नटसम्राट’ पाहिले. त्यातल्या एक-दोन जणांपेक्षा सतीश जास्त चांगला करायचा असं आजही माझं मत आहे.

आम्हाला आता वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळे शिक्षक शिकवायला येऊ लागले होते. दुसरी-पहिलीत सगळे विषय एकच शिक्षिका शिकवत. चित्रकलेची परीक्षा आहे आणि मला काहीही येत नाहीये- हे स्वप्न आजही मला मध्यरात्री जागं करून सोडतं. समोर एखादं भांडं ठेवून त्याचं चित्र काढायचा प्रसंग एकदा माझ्यावर गुदरला होता. मी त्या भांडय़ावर बसलो असतो तरी मला ते जमलं नसतं. सरळ रेष काढून दाखवणं हे माझं कैक वर्ष उराशी जपलेलं स्वप्न होतं. आजही ते स्वप्नच राहिलंय. ‘देशभक्ताचं चित्र काढा..’ असा आदेश एकदा आम्हाला आला. मी एक  पांघरूण काढून शिक्षकांकडे ते चित्र घेऊन गेलो. पुढचा माझा आणि शिक्षकांचा संवाद झाला तो येणेप्रमाणे..

‘‘हे काय आहे?’’ – शिक्षक.

‘‘देशभक्त.’’ माझे बाणेदार उत्तर.

‘‘कोण आहेत?’’

‘‘माहीत नाही, कारण ते गुप्त देशभक्त आहेत.’’ सुटीत वाचलेल्या पुस्तकांत ‘भूमिगत’ वगैरे शब्द माहीत झाले होते.. त्या ज्ञानाला खंबीरपणे टेकून माझं उत्तर.

‘‘पण हे असे का आहेत?’’

‘‘कारण देशसेवा करून करून ते थकले आहेत आणि आता विश्रांती घेत आहेत.’’

त्यानंतर ‘गुरासारखा मार खाणे’ म्हणजे काय, याचा अर्थ मला पहिल्यांदा शारीरिक पातळीवर उमजला.

सातवीला कावलेबाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या. त्यांनी आमच्याकडून बालनाटय़ बसवून घेतलं आणि आम्हाला आंतरशालेय स्पर्धेत बक्षीस मिळालं. त्या नाटकात विनय येडेकर होता. सतीश जोशी म्हणजे आमच्या शाळेचा जणू गणपतराव जोशीच. जयश्री शिलोत्री होती. विश्वास गोरे होता. इतरही होते.. मुळे, कदम. यापैकी मी आणि विनय सोडल्यास पुढे जाऊन कोणीच नाटकात कामं केली नाहीत. कावलेबाईंनी मला आयुष्यात पहिल्यांदा नाटक शिकवलं. मी त्याबद्दल आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन. कावलेबाईंनी वक्तृत्व स्पर्धेत मला बोलायला शिकवलं. थोडक्यात, पुढच्या आयुष्याचा मार्ग त्यांनी दाखवून दिला. फार छान इंग्रजी शिकवायच्या त्या. त्यांच्यामुळे मी हकलबरी फिन, डॉन किओते (किंवा काय जो उच्चार असेल तो!), टॉम सॉयर आणि बरंच इंग्रजी साहित्य वाचलं. ‘क्लर्क म्हणू नका. क्लार्क हा खरा उच्चार आहे..’ हे त्यांनीच सांगितलं. त्यानंतर मी ‘pygmalion’ वाचलं. त्या वयात ते नाही कळलं.

हिंदी शिकवायला देशपांडेबाई होत्या. त्यांनी फार सुंदर हिंदी शिकवलं आम्हाला. त्यामुळे ‘‘गाडी वळाके लेलो..’’ असं हिंदी आम्हाला कधीच बोलावं लागलं नाही. मगर आणि सुसर यांना हिंदीत काय म्हणतात हे त्यांनी हातातलं घडय़ाळ दाखवून सांगितलं. घडय़ाळाकडे हात दाखवत त्या म्हणाल्या, ‘‘सुसर म्हणजे घडीयाल आणि मगर म्हणजे मगरमच्छ.’’ उद्या जर मला या दोघांपैकी कोणी खाल्लं तर त्यांच्या पोटात जाताना मी नेमका कोणाच्या आहाराचा भाग झालो आहे ते मला नक्की कळेल. ‘‘कविवर्य नीरज की प्रसिद्ध रचनाएं कौनसी कौनसी है?’’ या त्यांच्या प्रश्नावर मी ‘प्रेमपुजारी’ चित्रपटातलं ‘फूलों के रंग से.. दिल की कलम से’ हे गाणं म्हणून दाखवलं आणि त्यानंतर मार खात खात गुलाबाच्या फुलासारखा लाल झालो होतो. त्यावेळेला फार गंमत वाटली होती. पण अनेक वर्षांनी विशाल इनामदारच्या एका हिंदी चित्रपटाचे संवाद लिहिताना एकदाही मला संदर्भासाठी काही चाळायची गरज पडली नाही तेव्हा देशपांडेबाईंनी आम्हाला काय शिकवलं ते माझ्या लक्षात आलं होतं.

असे अनेक शिक्षक आज आठवतात. हल्ली मुलांना तुम्ही चेचून काढू शकत नाही. तसा कायदा आहे म्हणे! पण आम्ही जे काही होतो ना, त्यांना न मारण्याचा कायदा करणे म्हणजे शिक्षकांची अवस्था कवचकुंडलं नसलेल्या कर्णासारखी झाली असती. शिवाय त्या बिचाऱ्या शिक्षकांना कर्णासारखं पांडवांशी लढायचं नव्हतं, तर आमच्यासारख्या कौरवांशी त्यांचा सामना होता..

पण ते नंतरच्या भागात. माध्यमिक आणि प्राथमिक असे नाही तरी दोन भाग असतातच ना?

(पूर्वार्ध)

sanjaydmone21@gmail.com