या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय मोने

आज छोटय़ा पडद्याने अनेकांना मोठे करून सोडले आहे. आणि जे साधे, सरळ मोठे होते, ते ‘महान’ बनले आहेत. एकंदरीत अनेक अंगांनी छोटय़ा पडद्याने उलथापालथ घडवून आणली आहे. इव्होल्युशन किंवा रिव्होल्युशन म्हणता येईल अशी चळवळ या पडद्याने घडवून आणली आहे. त्याने आपले रीतिरिवाज, सणवार साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. हल्ली आपल्याकडच्या आधुनिक लग्नांत पंजाब प्रांतात होणारे ‘संगीत’ असते. ते हिंदी मालिकांतून आपल्या मराठी समाजात झिरपले आहे. खरे तर आपण ते ‘संगीत’ वगैरे साजरे करायची गरज नाही. पंजाब प्रांतात ते होते, कारण तिथली सततची युद्धजन्य परिस्थिती.. तसंच गहू-मका यांची लांबच लाब शेतं, रोटय़ा आणि तंदूर चिकन, रात्रभर शिजून तयार होणारी ‘मा की दाल’, शिवाय त्यांच्या केशभूषेला लागणारा वेळ यांत संगीताला त्यांच्या आयुष्यात जागाच उरत नाही. त्यामुळे लग्नाच्या निमित्ताने ते आपली संगीताची हौस भागवून घेतात. आपल्या महाराष्ट्रात तसे नाही. गळक्या नळासारखे संगीत सतत कुठे ना कुठे तरी ठिबकत असते. मराठी सिनेमातला शेतकरी आणि त्याची बायको तर ‘निसर्गराजा ऽऽऽ’ वगैरे गाणी गाऊन झाल्यानंतर शेतीच्या कामाला लागतात. आणि आता छोटय़ा पडद्याने ते सारे घराघरांत नेऊन पोहोचवले आहे. शेतकऱ्याची बायको गात गात, लचकत, मुरडत आपल्या नवऱ्यासाठी ‘डोईवरी पाटी, पाटीत भाकरी..’ छापाचे गाणे म्हणत दुपारचे जेवण घेऊन जाते. हे केवळ छोटय़ा पडद्यावर सातत्याने दाखवल्या जाणाऱ्या मराठी आणि हिंदी चित्रपटांतून मराठीजनांच्या लक्षात आले. हिंदी मालिकेतल्या स्त्रिया बघून आज महाराष्ट्रातही ठिकठिकाणी भांगात कुंकू लावले जाते आणि त्यामुळे आपल्या महान संस्कृतीचे संरक्षण होते, हे आपल्याला नजरेआड करता येणार नाही.

भाषेच्या बाबतीत तर आपण एक जागतिक मराठी भाषाच निर्माण केली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. छोटय़ा पडद्यावरच्या कार्यक्रमांतील (मग त्या मालिका असोत वा रिअ‍ॅलिटी शोज्!) माणसांचे मराठी ऐकून मला त्यांच्याबद्दल अतीव आदर वाटायला लागलाय. बरेच मराठी शब्द- जे ही मंडळी उच्चारतात-  मराठी भाषेत होते, हे आजवर कुणाच्या लक्षातही आले नव्हते. या कार्यक्रमांतून ते जगाला कळले. आणि पर्यायाने मराठी ‘अति’समृद्ध झाली. असे कार्यक्रम झाले नसते तर ‘ऑसम’, ‘ग्रेट’, ‘शेअर’ हे शब्द मराठी आहेत हे कुणालाच कळले नसते. त्या कलाकारांची, निवेदकांची आणि परीक्षकांची मराठी भाषा ऋणी आहे.

छोटय़ा पडद्याने अनेकांना आपल्या धार्मिक भावना वाढीस लावायला उद्युक्त केले आहे. मालिकेतल्या घरांत एखाद्या पात्राचे निधन झाले असले (बऱ्याच वेळा हे पात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या इतर ठिकाणच्या कामांमुळे किंवा सेटवरील आपल्या वागणुकीमुळे अचानक निधन पावते.. अगदी तडकाफडकी म्हणावे असे!) तरीही त्यांच्या घरात साग्रसंगीत गणरायाचे आगमन होते. ‘जाणारा जात आहे’ हा विचार इतकी वर्षे आपण वाचत आलोय; पण तरीही आपल्या घरातील कोणी निवर्तल्यावर आपण दु:खाचे चार अश्रू ढाळतोच. छोटय़ा पडद्यावरील पात्रांनी मात्र तो विचार तंतोतत प्रत्यक्षात आणून दाखवला आहे.

मराठी नाटकांत पूर्वी पोलीस खात्यातला कुणीही रंगमंचावर प्रवेश करता झाला आणि त्याने येताक्षणी ‘आय सी!’ असे म्हटले नाही तर ती भूमिका पडली असे प्रेक्षकांना वाटायचे. छोटय़ा पडद्यावर मात्र बऱ्याचदा जेव्हा पोलीस अवतरतात- आणि जर ते प्रमुख भूमिकेत नसून केवळ एक दुय्यम पात्र म्हणून असतात- तेव्हा त्यांना ती भूमिका मिळायचा प्रमुख निकष आणलेला गणवेश त्यांच्या मापाचा आहे, हाच असतो. त्यांचा तो अवतार बघून त्यांनाच पकडून न्यायला कोणीतरी पोलीस मागवावा असे प्रेक्षकांना वाटत राहते. डॉक्टरबिक्टर लोक तर त्याहून गमतीदार असतात. ते कायम आपल्या दवाखान्यात बसून असतात आणि एकंदर मानवी जीवनावर लंब्याचवडय़ा गप्पा छाटत असतात. आणि डॉक्टर कुठल्याही शाखेचा असला तरी त्याच्या दवाखान्याच्या भिंतीवर एका तान्ह्य बालकाचे चित्र व एक निसर्गचित्र असतेच. न्यायालयाचे दृश्य असेल तर त्यातली वकील मंडळी न्यायालयाच्या बाहेर मापाला न येणारा काळा डगला घालून चोवीस तास बसलेली असतात. शिवाय त्यांचे संवादही लेखकाच्या अज्ञानामुळे ‘तुमची केस मी वाचली आहे, सगळे पुरावे आपल्या बाजूने आहेत..’ अशा छापाचेच असतात.

एखादा उद्योगपती दाखवला असेल तर त्याच्या टेबलावर संगणक असतो. आणि त्यावर तो पूर्वीच्या चित्रपटांत नायक आणि नायिका पीठ मळल्यासारखी बोटांची हालचाल करून पियानोवर गाणी गायचे तशी बोटे हलवत बसलेला असतो. तो संगणक कित्येक वर्षे मृतावस्थेत आहे हे तेवढय़ातही दिसून येते. शिवाय त्याच्या तोंडी ‘त्या असाइनमेंटचं काय झालं?’ किंवा ‘काय? अजून डिलिव्हरी झाली नाही?’ एवढेच शब्द असतात. आणि डिलिव्हरी न झाल्याची त्याची काळजी उद्योगपतीची न वाटता एखाद्या डॉक्टरचीच वाटते. शिवाय त्याच्या उद्योगधंद्यात उलाढाल जरी करोडो रुपयांची दाखवली असली- अर्थात तोंडीच असते ती- तरी ती तो एकटाच सांभाळत असतो. फार फार तर अजून एखादा माणूस- जो  ‘मॅनेजर’ या बिरुदाखाली इतस्तत: फिरत असतो.. मात्र त्याच्या चेहऱ्यावर भाव कारकुनाचे असतात. कदाचित त्यामुळेच तो उद्योगपती अधूनमधून ‘अहो! असं काय करता? तुम्ही मॅनेजर आहात..’ असा त्याच्यावर खेकसत असतो. अगदी सुरुवातीला तो उद्योगपती एखाद्या उंची गाडीतून येताना दाखवतात. नंतर मात्र का कुणास ठाऊक, त्याची गाडी अंतर्धान पावते आणि पुढे कायम तो आधीच येऊन आपल्या खुर्चीवर बसलेला आपल्याला दिसतो. शिवाय त्याला ठरावीक चार किंवा पाच कपडे असतात. मालिका दहा वर्षे चालली तरी कपडे तेच! कदाचित पैशांची उधळपट्टी न करता काटकसर हा जीवनाचा एक भाग बनवा, असा संदेश त्याला द्यायचा असावा.

शिवाय कुणाच्याही घरात पाळीव प्राणी नसतो. जो आजकाल जरा चार पैसे मिळाले की कुठलाही माणूस घरात पाळतो आणि बोलायला विषय उरलेले नसल्याने त्या प्राण्याबद्दल इतरांशी थोडय़ाशा गर्वानेच बोलतो. किंवा घरातल्या लोकांशी वितंडवाद घालण्यापेक्षा त्या पाळीव प्राण्यांशीच तो संवाद साधतो. बऱ्याच वेळा मालिकेत आपण पाहतो- की एखाद्या घडवून, उबवून आणलेल्या समस्येची उकल आता होणार.. होणार असे वातावरण निर्माण केले जाते. बघणाऱ्यांना वाटते, की आता सुटलो! तेवढय़ात भाग संपतो आणि मग पुढच्या दिवसावर ती उकल ढकलली जाते. किंवा शनिवारी असे घडले तर त्यासाठी सोमवापर्यंत वाट बघायला लागते. हे बरे नाही! अहो, आजकालच्या जगात- आजकालच्याच का म्हणा- माणसाच्या जीवाचा काही भरवसा नाही. एखादा पिकलेला माणूस मधल्या काळात जर या पृथ्वीतलावरून नाहीसा झाला तर जाताना त्या समस्येचे काय झाले असेल, या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळण्याची शक्यता संपुष्टात येते. आणि त्याच्या क्रियाकर्मात गुंतलेल्या त्याच्या घरच्यांचा पुढचा भाग चुकतो. तेव्हा असे करू नका. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावा आणि सगळ्यांना मोकळे करा असे वाटून जाते.

अजून भरपूर लिहिता येईल. एखाद्याला कोणावरचा राग काढून घ्यायचा असला तर तो स्तंभातून अजून नावानिशी आगपाखड करेल. पण याला दुसरी बाजूही आहे. वयपरत्वे आता ज्यांना वाचनाची आवड असूनही डोळ्यांनी नीटसे दिसत नाही म्हणून ती खुंटली असेल तर छोटा पडदा हा त्यांचा आधार ठरलेला आहे. आजकाल वाहतूक इतकी बिकट झाली आहे, की संध्याकाळी जरा पाय मोकळे करायला जाणे अनेक वरिष्ठ नागरिकांना बिकट वाटते. आता त्यांना घरबसल्या आजूबाजूला काय चालले आहे याची माहिती मिळते.

उत्तम गाणारी काही लहान मुले पूर्वी केवळ संधी मिळत नाही म्हणून आपल्या हौसेला आणि कलेला थोडीफार मुरड घालून बसायची. छोटय़ा पडद्यावरच्या कार्यक्रमांमुळे ती लहान मुले आता (‘लहान-महान’ यमक जुळवण्याच्या आनंदात ‘महान’ म्हणायचा मोह टाळून) चांगले गायक-गायिका होतील. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आणि ट्विटरवर घालवायला भरपूर वेळ आहे, पण घरातल्या माणसांशी बोलायला वेळ नाही अशा आपल्या मुलानातवंडांकडे संवाद साधावा म्हणून आशेने बघायची नामुष्की म्हाताऱ्या आजी-आजोबांवर आता येत नाही. याचे कारण हा छोटा पडदाच आहे. बरे-वाईट सगळ्यात आहे; आपण चांगली बाजू बघावी. कुठल्याही गोष्टीबद्दल कुरकुर केली की माझी आई नेहमी एक म्हण वापरायची- ‘आपण वडाच्या झाडाकडे बघावं, त्यावरच्या जखिणीकडे नाही.’ आता कुठे त्याचा खरा अर्थ मला कळायला लागलाय. कदाचित माझी मुले मोठी होतील आणि मी जेव्हा म्हातारा होऊन ‘कोण माझ्याशी बोलणार?’ या अवस्थेला येईन तेव्हा या म्हणीचा अर्थ अजून नीट कळेल.

sanjaydmone21@gmail.com