संजय मोने sanjaydmone21@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हल्ली कलाकारांवर फार आरोप होत आहेत. नाही, नाही! मला ‘मी टू’बद्दल नाही बोलायचंय. माझा रोख आहे तो दुसऱ्या एका आरोपाबद्दल. आणि तो म्हणजे- कलाकारांवर ते लेखक असल्याचा आरोप काही वर्षांपासून होत आहे. बरं, कलाकार तो आरोप खोडून न काढता लिहीत सुटले आहेत. वाचकही त्याला मान तुकवून मान्यता देत आहेत.
प्रवासवर्णन हा प्रकार साहित्यात धरला जावा का? करोडो लोक प्रवास करतात. अगदी जिवावर बेतून घेऊन करतात. मुंबईत जितकी माणसं रोज रेल्वेतून ये-जा करतात, तितकी माणसं गोव्याच्या एकूण लोकसंख्येच्या बरोबरीने भरतील. कदाचित जास्तच! पण तो दैनंदिन प्रवास असतो. नोकरी-व्यवसायासाठी केलेला. त्यात साहित्य कुठून असणार? कारण अशी प्रवासवर्णनं ही स्वत:ची परवड नोंदवणारी ठरतील. गोडसे भटजींचे १८५७ च्या उठावानंतरच्या प्रवासाचे एक प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. त्यातून फक्त लढाई झाली, इतकीच माहिती मिळते. फार तर त्यावेळी कशी लुटालूट झाली किंवा त्यात माणसांना काय काय भोगावं लागलं याचं वरवरचं दर्शन होतं. त्यात सामाजिक भानबिन काही नव्हतं.
आताही आपण रेल्वेने वा बसने जास्त प्रवास करतो. टॅक्सीचा प्रवास असेल तर तो एक तर दोनेकशे किलोमीटपर्यंत असल्यास करतो, किंवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी आरक्षित करतो. काही भाविक मंडळी देवस्थानांची यात्रा करायला समूहाने गेले तर टेम्पोवजा वाहन करतात. त्यातसुद्धा अमुक अमुक ठिकाणं ‘करून आलो’ असं म्हटलं जातं. ‘करून आलो’ हा वाक्प्रचार मला नेहमीच खटकतो. ‘करून आलो’मध्ये थोडासा ‘उरकून आलो’चा वास येतो. त्याची काही वर्णनं वेगवेगळ्या दिवाळी अंकांत दरवर्षी छापून येतात. बऱ्याचदा त्यात गाडी बिघडली आणि तिथली कुठली तरी अवेळी होणारी आरती चुकणार, तोच अचानक कुठून तरी कोणीतरी आला, गाडी दुरूस्त झाली आणि आरतीला वेळेवर पोचलो ही त्या अमुक तमुक देवाची कृपा.. या छापाचा मजकूर असतो. यालाही प्रवासवर्णन म्हणता येणार नाही. कारण आपण नास्तिक आहोत असा बाणा बहुतेक लेखकांना अंगी बाळगावा लागतो. ते घरी गणपती आणतात ते मुला-नातवंडांची हौस म्हणून, असाही पवित्रा त्यांना घ्यावा लागतो.
बोटीचा प्रवास आपल्याकडे जवळपास नाहीच. नाही म्हणायला पूर्वी कोकणात बोटी जायच्या. त्याची उदंड छोटेखानी प्रवासवर्णनं आपण विविध लेखकांच्या लेखांतून वाचली असतील. कोकणातल्या अनेक मान्यवर लेखकांनी केलेली- म्हणजे लिहिलेली प्रवासवर्णनं बघितली तर त्यात बंदराचे नाव वेगळे असते; बाकी तिथला कलकलाट, तांबडा चहा, स्थानिक मासेमारी करणाऱ्यांची रेखाटलेली व्यक्तिचित्रं वगैरे अगदी हुबेहूब म्हणावी अशीच असतात असं आपल्या लक्षात येईल. एखादा त्या परिसराचं थोडंसं हृदयद्रावक चित्रण करून, तिथल्या गरिबीवर चार अश्रू ढाळून मानवतावादी वगैरे लेखक होण्याची आयती चालून आलेली संधी सोडत नाही. त्या- त्या लेखकांची ही समस्त प्रवासवर्णनं नीट एकापुढे एक वाचून काढली आणि ज्या काळात ती त्यांनी लिहिली असतील तो कालखंड नेमका लक्षात घेतला तर असं लक्षात येईल की बहुतेक लेखन हे त्या- त्या लेखकांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात केलं गेलेलं आहे. म्हणजे अगदी खडूस निष्कर्ष काढायचा झाला तर आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये जरा ‘हात साफ करायला’ ही बोटीची सेवा त्यांच्या आयतीच कामी आली आहे असं वाटू शकेल. जिथे बोटी नाहीत तिथले लेखक आपापल्या भागात उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर आपली लेखणी घासूनपुसून पुढच्या कारकीर्दीसाठी स्वच्छ करून घेताना दिसतात. मग त्यात एसटी, रेल्वे कामी येते. या आपल्या सगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवा जर इतक्या गबाळ्या नसत्या तर मराठी साहित्यक्षेत्र अनेक साहित्यिकांना मुकलं असतं.
शिवाय शालेय जीवनात आपल्या शाळेकडे जाताना वाटेवर दिसणाऱ्या सायकलरिक्षा व त्या ओढणारे चालक आणि त्यात बसलेली त्यांच्या वर्गातली श्रीमंतांची मुलं यांचे प्रवास लिहून काही लेखक नावारूपाला आले. त्या लेखांत आपल्याला पावलोपावली जाणवणारं सामाजिक वा आर्थिक विषमतेचं विदारक चित्रण त्या काळात त्यांना एका पावलीइतकंही जाणवलं असेल का, असं त्यांच्या कारकीर्दीच्या पुढच्या काळातले लेख वाचून वाटत राहतं. मात्र, मघाशी म्हटलं तसं त्यांनी आपले ‘हात साफ’ करून घेताना फारच चलाखी केली असणार. नंतर सगळं बस्तान व्यवस्थित बसल्यावर- म्हणजे विविध समित्या आणि इतर मोक्याच्या ठिकाणी नेमणुका झाल्यावर त्यांना उमाळा अनावर दाटून आला आणि त्या उन्मनी अवस्थेत (या ‘उन्मनी’ शब्दात छायाप्रद असलेला ‘मनी’ हा शब्द त्यांना त्यातून मिळालेल्या आर्थिक मानधनाचा उल्लेख म्हणून केलेला नाही. त्यांच्या ओढून आणलेल्या मानसिक अवस्थेचं ते वर्णन आहे, हे जाता जाता नम्रपणे सांगावंसं वाटतं.) त्यांच्या हातून काही भावपूर्ण आणि जळजळीत सत्य मांडणारे लेख लिहिले गेले. आज त्या जिवावर मिळवलेले असंख्य पुरस्कार हे त्यांच्या शहरातल्या नव्याने वसणाऱ्या भागात त्यांनी हौसेने बांधलेल्या आणि ‘निवारा’, ‘गावरान’ वा तत्सम कुठल्या तरी पूर्वीच्या हालअपेष्टा सुचवून जाणाऱ्या नावाच्या बंगल्यातल्या प्रशस्त दिवाणखान्यातल्या अलमारीत निवांत पहुडलेले दिसतात, ते केवळ पोटासाठी अक्षरश: रक्त ओकणाऱ्या रिक्षावाल्यांच्या मेहरबानीमुळे! जवळजवळ निरक्षर किंवा अर्धशिक्षित असलेल्या त्या बिचाऱ्या वाहकांवर आज मराठी साहित्यात लिहिलेली शेकडो पुस्तकं आणि हजारो शब्द लोळत पडले आहेत.
मराठी लेखकांना परदेशप्रवास एकेकाळी अप्राप्य होता. त्यामुळे त्या प्रवासाहून परतून मायदेशात आलेल्या जवळपास सर्व लेखकांनी भरभरून प्रवासवर्णनं लिहिली आहेत. त्या बहुतेक प्रवासवर्णनांत त्या देशांतली सुबत्ता, शिस्त, देखणेपणा आणि सरकारी पातळीवर न दिसणारा आळशीपणा यावर भर दिलेला आहे. याचं एकमेव कारण म्हणजे तो प्रवास त्यांनी स्वत:च्या खिशाला खार लावून केलेला नव्हता. आणि इतर वेळी आपल्या इथल्या दीनतेचा गहिवर ढाळणाऱ्या त्यांच्या लेखण्या म्यान होऊन तिथल्या गोष्टींच्या निब मोडेपर्यंत केलेल्या स्तुतीत लीन झाल्या. आचार्य अत्रे दोन वर्ष लंडनमध्ये होते. पण ते स्वत:ची पदरमोड करून गेले होते. त्यामुळे पाच खंडांच्या त्यांच्या आत्मचरित्रात लंडनमधल्या वास्तव्याबद्दल फक्त त्यांचे कॉलेज आणि तिथलं शिक्षण इतकीच माहिती मिळते. इथून तिथे गेलेल्या लेखकांची बऱ्याचदा तिथल्या कुठल्या तरी भारतीय कुटुंबात राहायची व्यवस्था होते- असंही त्या प्रवासवर्णनांवरून दिसतं. त्या लेखकांनी आपल्या तिथल्या वास्तव्यात काय काय वागणुकीची चुणूक स्थानिक ‘टेम्पररी’ यजमानांना दाखवून दिली, हे यदाकदाचित त्या यजमानांनी जर त्यांच्या लिखाणातून दर्शवून द्यायचं ठरवलं तर फारच गोंधळ उडेल! आजकाल मात्र उठसूठ कलाकार परदेशात जात असतात. तिथे जाऊन आल्यावर त्यांना तिथल्या आपल्या वास्तव्यात वास्तवाचं जे दर्शन होतं त्यावर लेख लिहिले जातात. त्यातही त्यांच्या वैयक्तिक गुणांचं तिथल्या रसिकांना जे दर्शन झालं त्याचंच वर्णन जास्त असतं. ते वाचून कधी कधी असं वाटतं, की हे त्या देशाला भेट द्यायला गेले होते, की तो देशच त्यांच्या भेटीला आला होता!
पण हल्ली कलाकारांवर फार आरोप होत आहेत. नाही, नाही! मला ‘मी टू’बद्दल नाही बोलायचंय. माझा रोख आहे तो दुसऱ्या एका आरोपाबद्दल. आणि तो म्हणजे- कलाकारांवर ते लेखक असल्याचा आरोप गेल्या काही वर्षांपासून होत आहे. बरं, कलाकार तो आरोप खोडून न काढता लिहीत सुटले आहेत. वाचकही त्याला मान तुकवून मान्यता देत आहेत. अशा परिस्थितीत कलाकाराचा सुरुवातीपासून आतापर्यंतचा कलाप्रवास हाही प्रवासवर्णनातच मोडावा लागणार. त्यामुळेच या लेखाच्या प्रारंभी मी प्रश्न विचारला होता- ‘प्रवासवर्णनं हा साहित्यप्रकार धरावा का?’ तर- संख्येच्या जोरावर तो धरावा लागणार. मग वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणारे- पावसाळ्यात शूटिंगसाठी गाडीत बसून केलेला व नेहमीप्रमाणे अर्ध्या तासात होणारा प्रवास साडेतीन तास कसा चालला, हे वर्णनही थरारक प्रवासवर्णनातच मोजावे लागणार.
सर्वात भीतीदायक प्रवासवर्णन म्हणजे अमुक तमुक नटाचा अभिनयप्रवास! त्यात काय काय वाचावं लागेल याचा विचारसुद्धा अंगावर काटा निर्माण करेल. कारण कलेवर केलेलं नितांत प्रेम (मृतदेहालाही ‘कलेवर’ म्हणतात. ते नक्की वेगळंच ना?), अव्यभिचारी निष्ठा, ध्येयाची पाठराखण, तत्त्वांसाठी कधीही न केलेली तडजोड या शब्दांचा धुरळा डोळ्यांत जाऊन चुरचुर होईल. डॉ. लागू, मामा तोरडमल, सतीश दुभाषी, दत्ता भट, डॉ. घाणेकर हे कायम अभिनय करत राहिले. त्यांना ना कधी मुलाखती द्याव्या लागल्या, ना कधी अभिनयाचे प्रवासवर्णन लिहायला लागले.
माझा एक मित्र आहे- सतीश गरवारे नावाचा. त्याने आपल्या व्यवसायाच्या सुरुवातीला जो काही प्रवास केलाय आणि ज्या हालअपेष्टा सोसल्या आहेत, त्या त्याच्या तोंडून ऐकताना पूर्वी अंगावर काटा आला होता. आज तो फार आरामात राहतो. त्याला एकदा मी म्हटलं होतं, ‘‘लिहून काढ सगळं एकदा.. इतरांना उपयोगी येईल.’’ त्यावर तो थंडपणे म्हणाला, ‘‘मग हजारो लोकांना हे लिहावं लागेल. व्यवसायात हे सारं करावंच लागतं. आणि त्यात कोणाला रस असणार? आरामात परदेशात गेलो पुढेमागे- तर लिहीन.’’
आजही त्याने प्रवासवर्णन लिहिलं नाहीये. त्याला सांगितलं पाहिजे एकदा- ‘मराठी साहित्य एका लेखकाला मुकलंय!’