संजय मोने sanjaydmone21@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या कुणी काय बोलायचं,कुणी काय लिहायचं, कुणी कसं वागायचं, कुणी कुठला सण साजरा करायचा की नाही, आपण इतकी वर्ष ज्यांना वंदनीय मानत आलो त्यांना आता तो मान द्यायचा की नाही.. या सगळ्या सगळ्यावर एक अंकुश आला आहे.

सध्या सगळ्या गोष्टींवर एक समांतर सेन्सॉर बोर्ड कार्यरत आहे. कुणी काय बोलायचं, कुणी काय लिहायचं, कुणी कसं वागायचं, कुणी कुठला सण साजरा करायचा की नाही, आपण इतकी वर्ष ज्यांना वंदनीय मानत आलो त्यांना आता तो मान द्यायचा की नाही.. या सगळ्या सगळ्यावर एक अंकुश आला आहे. त्यामुळे आपल्याला जे व्यक्त करायचं आहे त्याला आपल्या मनाची चौकट घालून चालत नाही, तर ‘त्या’ माणसांना जी हवी ती चौकट गृहीत धरून आपलं म्हणणं मांडायला लागायची वेळ आली आहे. एक प्रकारची सामाजिक आणीबाणी लादली जात आहे. यामुळे आता इथून पुढे काय प्रकारांनी माणसांनी स्वत:चे विचार मांडायचे, काही कळेनासं झालंय.

एका लहान मुलाने लिहिलेलं प्रवासवर्णन  असं आहे.

मामाच्या गावाला जाऊ या..

सकाळी आम्ही सगळे स्टेशनवर आलो. गाडीला खूप गर्दी होती. कसेबसे आम्ही डब्यात चढलो. जागा आरक्षित होती. सगळे जण गाडी सुटल्यावर आपापल्या जागी स्थिरावले. पण कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. कारण बोलायला सुरुवात करायची म्हणजे एकमेकांची नावं विचारायला लागणार. आणि नावाबरोबर आपली जात ताबडतोब लक्षात येते. तेव्हा त्यावरून वाद होणार. म्हणून मी असं म्हणतो की.. डब्यात गर्दी अजिबात नव्हती. आम्ही एकटेच होतो. म्हणजे मी, आई-बाबा आणि माझी भावंडं. गाडी सुटल्यावर काही वेळाने काही खाण्याचे पदार्थ विकायला आले. त्यातले काही शाकाहारी लोकांना चालतील असे पदार्थ होते आणि काही मांसाहारी लोकांना चालतील असे. पण त्यांची नावं लिहिली तर काही लोकांच्या भावना दुखावतील म्हणून मी असं म्हणतो की, डब्यात काहीच विकायला आलं नाही. गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली. काही वेळाने एक स्टेशन आले. त्याचे नाव होते.. नको! कारण आता त्या स्टेशनचे नाव बदलावे म्हणून काही लोकांनी आग्रह धरला होता. त्यामुळे मी असं लिहितो की, स्टेशन आलेच नाही. पण काही लोक आत चढले, काही उतरले. पण आम्ही कोणाशीच काहीही बोललो नाही. कंटाळा आला होता. तेव्हा काहीतरी वाचावं म्हणून एक पुस्तक काढलं आणि चपापून लगेचच माझ्या पिशवीत टाकून दिलं. कारण पुस्तक ऐतिहासिक होतं. त्यावरूनसुद्धा अलीकडे वाद झाल्याचं ऐकलं होतं. तेव्हा खिडकीतून बाहेरचा निसर्ग बघायचं ठरवलं. एक गोष्ट चांगली आहे : निसर्ग जातपात, धर्म, पंथ मानत नाही. झाडांना, पक्ष्यांना, प्राण्यांना माणसांना असलेल्या बाधा झालेल्या नाहीत. पण डबा वातानुकूलित असल्यामुळे निसर्गही स्वच्छ दिसत नव्हता. पण माणसामाणसांत जिथे पारदर्शकता नाही, तिथे ती निसर्गात कुठून असणार? प्रवास संपवून मामाच्या गावाला पोचलो. तिथे टांगे होते. पण प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांवर मध्यंतरी कुणीतरी खवळून उठला होता, त्यामुळे टांगा करायचा नाही असं ठरवलं. मग आता जाणार कसं? मामाच्या साठीच्या वाढदिवसाला जायचं होतं.. आणि तेही त्याला न कळवता. कारण त्याला सुखद धक्का वगैरे द्यायचा असं आमच्या आई-वडिलांनी ठरवलं होतं. मामाचं घर स्टेशनपासून अगदी जवळ होतं. इतक्या जवळ रिक्षा यायला तयार होत नाहीत. कारण त्यांच्यासाठी इतकं कमी भाडं फायदेशीर नसतं. त्यांच्या या पिळवणुकीबद्दल तिथल्या नुकतीच सत्ता हातून गेलेल्या स्थानिक नेत्याने आंदोलन केलं होतं. तेव्हा श्रमिकवर्गाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून तंगडतोड करत मामाच्या घरापर्यंत पोचलो. मामाने आम्हाला बघून आश्चर्य व्यक्त केलं. तीन दिवस तिथे राहून परत आलो. येताना डब्यात गर्दी होती, पण माणसं कोणीच नव्हती. त्यामुळे आम्ही कोण, काय जातीचे, वगैरे प्रश्नोत्तरं झालीच नाहीत. मुंबईत आल्यावर आमच्या घरच्या ड्रायव्हरने रजा घेतली होती तेव्हा पुन्हा चालतच यावं लागलं. एकंदरीत थोडे हाल झाले, पण कोणाच्याही भावना दुखावल्या न गेल्यामुळे आम्ही सगळे आनंदात होतो. आमचे पाय दुखत होते. पण अवयवाच्या दुखण्यापेक्षा भावना दुखावणं वाईट नाही का?

ऐतिहासिक नवनाटय़

एका नाटकाला गेलो होतो मध्यंतरी. नावावरून नाटक काय असू शकतं याचा पूर्वी अंदाज यायचा. आता कधी कधी संपूर्ण नाटक पाहिलं तरी आपण नेमकं काय पाहिलं, हे कळत नाही. तर या नाटकातली पात्रं होती ऐतिहासिक; पण त्यांच्या अंगावर कपडे प्रेक्षकांच्या अंगावर होते तसे होते. कुणीही कुणाला नावानं हाक मारत नव्हतं. शिवाय कुणाचा व्यवसाय काय आहे किंवा हुद्दा काय आहे, हे कळायला मार्ग नव्हता. कारण म्हणे, कुठलाही व्यवसाय दाखवला असता तरी त्यामुळे कुणाच्या तरी भावना दुखावल्या जाण्याची भीती होती! स्वराज्याचा ऊहापोह चालला आहे, हे त्या पात्रांच्या संवादावरून अंधूक जाणवत होतं. शत्रू मोघल असावेत असं माझ्यासकट सगळ्या प्रेक्षकांना वाटत होतं, पण त्याचा उच्चार कुणीही करत नव्हतं. कारण काळाच्या हिशोबात आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, मोघल हे भारताच्या धारेत मिसळून गेले आहेत असं ठरलं असल्याने ते आता स्वराज्याचे शत्रू उरले नव्हते. त्यामुळे युद्ध, त्यात कुणाचा तरी पराभव, कुणाचा तरी मृत्यू, त्यानंतर तह आणि त्याच्या अटी हे सगळं गैरलागू ठरलं होतं. मोघलांची आणि नाटकातल्या लोकांची एकमेकांच्या राज्यांना भेट देऊन परस्परांची ख्यालीखुशाली विचारण्याचा विचार पात्रं करत होती. नाटकातले महाराज आले.. म्हणजे त्यांचा तसा उल्लेख केला गेला नाही, पण उरलेली पात्रं उठून उभी राहिल्यामुळे ते कुणीतरी राजे असावेत असा प्रेक्षकांनी अंदाज बांधला. पण ते येऊन उरलेल्या पात्रांशी वार्तालाप करू लागले. ते आल्याची ललकारीसुद्धा कुणी दिली नाही. म्हणजे दिली गेली, पण कुणाला एकही शब्द ऐकू आला नाही. कारण एक पात्र उभं राहिलं आणि त्यानं फक्त मुकाभिनय केला आणि त्यावर संगीत वाजलं. कारण ललकारीमधल्या काही शब्दांवर कुणीतरी आक्षेप घेतला होता. मग कुणीतरी चार लोक आले. त्यांची नुकत्याच आलेल्या माणसानं विचारपूस केली. तुमच्यावर काही अन्याय होत नाहीये ना, वगैरे. त्याला सगळ्यांनी ‘नाही. आम्ही सगळे सुखी आहोत. आमच्या गावात सगळ्या धर्माचे आणि जातीचे लोक एकोप्याने राहतात. पाण्यावरून वाद नाहीत. सगळ्यांच्या प्रार्थनेच्या वेळा आम्ही ठरवून घेतल्या आहेत..’ असं उत्तर दिलं. सगळं झालं. मग मोठय़ाने संगीत वाजलं आणि ‘सर्वधर्मीय स्वराज्याचा विजय असो’ अशी आरोळी देऊन नाटक संपलं. एक नवा इतिहास लिहिला जात होता आणि आम्ही मूठभर प्रेक्षक त्याचे साक्षीदार होतो.

आजी आणि नात यांचा गोष्ट ऐकताना झालेला संवाद..

आजी- एका गावात एक म्हातारी बाई राहत होती.

नात- त्या गावाचं नाव काय होतं?

आजी- नाव होतं, पण नको बाळा विचारूस. उद्या ते बदललं गेलं तर..? तेव्हा होतं एक गाव. आजीला एक मुलगी होती. एक दिवस तिनं ठरवलं की, आपल्या लेकीच्या गावाला जायचं.

नात- त्याही गावाला नाव नव्हतं ना?

आजी- हुशार गं माझी बाय! चटकन् लक्षात आलं बघ तुला. तर ती निघाली लेकीकडे. जाताना तिनं मुलीला आणि तिच्या घरच्यांना द्यायला काही भेटवस्तू घेतल्या.

नात- काय काय घेतलं तिनं आजी?

आजी- बऱ्याच गोष्टी होत्या गं!

नात- पण म्हणजे काय?

आजी- आता त्या ज्या वस्तू बनवणारे कारागीर आहेत ना, त्यांचा एक मोठा संघ तयार झाला आहे. त्यांना व्यवसायाच्या नावाने संबोधलं तर चालत नाही.

नात- आलं लक्षात. लाकडाची वस्तू बनवणाऱ्या माणसाला..

आजी- श्श्श्! नाव घ्यायचं नाही. अं! अं! प्लास्टिकच्या वस्तू घेतल्या बरं!

नात- आजी नाही चालणार.. कारण प्लास्टिकवर बंदी आहे ना?

आजी- हो गं बाई. तर ती निघाली आणि गाडीत बसून आपल्या मुलीच्या गावी गेली. तिथे चार दिवस राहिली आणि परत आली. संपली गोष्ट.

नात- नाही! नाही! आई म्हणते, तू तिला लहानपणी ही गोष्ट सांगायचीस तेव्हा त्या बाईला वाटेत वाघ भेटतो आणि मग ती येताना भोपळ्यात बसून परत जाते आणि वाघाला फसवते.. ती सांग ना गोष्ट!

आजी- बाळा! आता काळ बदललाय. वाघबिघ गोष्टीत असून चालणार नाही. मुक्या प्राण्यांना आजकाल आपल्यापेक्षा बरे दिवस आले आहेत. त्यांना फसवलं तर त्यांच्या भावना नाही का दुखावणार?

नात- पण आजी, या गोष्टीत काहीच गंमत नाहीये.

आजी- ती तर हल्ली सगळ्याच गोष्टींत हरवलीय. प्रत्येकाला काही ना काही कारणांवरून सगळ्याचा राग येतो. आयुष्यात गंमत असते यावर कोणाचा विश्वासच उरला नाहीये. जा आता पास्ता मागव आणि जेवून घे. बरोबर थोडी कोशिंबीर घे. तीसुद्धा तब्ब्येतीला बरी असते.