‘तू इडली सांबार किंवा वडा, डोसा खातोस का?’ सकाळी सव्वासात वाजता भर बाजारात माझ्या मित्राने मला प्रश्न विचारला. आपल्या आसपासच्या नव्याण्णव टक्के लोकांनी याचं ‘हो’ असं उत्तर दिलं असतं; पण मला काय बोलावं ते सुचेनासं झालं. म्हणजे मी त्या उरलेल्या एक टक्क्यातला अजिबात नाहीये. पण त्याच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे मला कळेना. कारण हा माझ्या आयुष्यात आल्यानंतर.. (खरं तर अशा लेखात साधारणपणे आयुष्याला ‘आयुष्य’ न म्हणता ‘जीवन’ म्हणायची पद्धत आहे. पण काही वर्षांपूर्वी टोळीयुद्धात सोळा वार होऊन ठार झालेल्या एका गुंडाला श्रद्धांजली वाहताना एका राजकीय पक्षाच्या फलकावर ‘जीवन ज्यांना उमगले (लिहिताना ‘उगमले’ असं लिहिलं गेलं होतं. पण घाऊक भाषिक अज्ञानामुळे ती चूक कळण्यात आली नव्हती.) त्या आमच्या भाग्यादादांना साश्रू वंदन..’ हे शब्द वाचले आणि त्यानंतर ‘जीवन’ हा शब्द लिहायला हात धजावत नाहीत.) ..तर या मित्राचं आगमन माझ्या आयुष्यात झाल्यानंतर तो जेव्हा जेव्हा भेटला आणि त्याचा प्रश्न ऐकला की मी किंकर्तव्यमूढ होत असे.
‘तू इडली सांबार, वडा, डोसा खातोस का?’ त्याने पुन्हा प्रश्न टाकला.
हा माझा मित्र जरा घातक आहे. खतरनाक म्हटलं तरी चालेल. कुणालाही कुठलाही प्रश्न कुठे विचारावा याची पोच त्याला जरा कमीच आहे. शिवाय एकटा जीव. लग्न झालेलं नाही. ना आगा ना पिछा. त्याच्यात काही दोषबिष नाही. चांगल्या घरातला, व्यवस्थित शिक्षण झालेलं. एकुलता एक. मुंबईत स्वत:चं- म्हणजे वडिलोपार्जति घर. घरही छान चार-पाच मोठय़ा खोल्यांचं. म्हणजे बाल्कनी बंद करून एक खोली वाढवतात तसं नाही. थोडक्यात, लग्नाला अत्यंत लायक. दिसायलाही अगदी लाखात नसला तरी हजारात उठून दिसेल असा. शिवाय मधल्या काळात त्याच्या एका मावशीने पृथ्वीवरून कायमचं प्रस्थान ठेवताना मागे याच्यासाठी जन्माची ददात मिटेल इतका पसा ठेवलेला. एक-दोनदा प्रेमबीम करून झालं. ते कुठल्या सिनेमाला जायचं, यावरून झालेल्या वादात मोडलं. नंतर घरच्यांनी नाद सोडला. शिवाय त्याचा स्वभाव पाहता त्याने त्याचं ठरवलेलं बरं, या निर्णयाप्रत घरचे येऊन ठेपले. गल्लीतल्या एका माणसाने त्याला एक स्थळ सुचवलं. त्याला भेटायला जायला तो निघणार होता तेव्हाच त्या माणसाच्या मुलीबद्दल काहीबाही ऐकू आलं होतं. ती कोणाबरोबर तरी वेळी-अवेळी फिरते, वगरे. पण सांगणार कसं? काहीही झालं तरी त्या मुलीच्या वडिलांना सावध केलं पाहिजे यावर सगळ्यांचं एकमत झालं. पण गळ्यात घंटा बांधायची कोणी? याने ती जबाबदारी अंगावर घेतली. एके दिवशी संध्याकाळी भर रस्त्यावर तिच्या बापाबरोबर त्याचा संवाद सुरू झाला..
‘घरात कर्ता पुरुष म्हणतात ते आपणच का?’
‘हा प्रश्न विचारणारे आपण कोण?’ बापाने प्रतिसवाल टाकला.
‘कळेल. आपण बापू ना?’
‘बापूसाहेब.’ – वडील.
‘साहेबबिहेब तुमच्या घरी किंवा ऑफिसात. प्रणाली का बिणाली तुमची मुलगी ना?’
‘तिचं काय?’
मागचे चार दिवस ती घरी काय सांगून बाहेर पडत होती आणि त्याऐवजी कुठे जात होती त्याचा सगळा वृत्तान्त त्याने घडाघडा वाचला. बापूसाहेब तीन कांद्यांनंतर उठले. पुढे यथावकाश प्रणाली किंवा बिणाली- जी कोण असेल ती- घरातून पळून गेली. घरच्यांनी ‘‘तू आम्हाला आणि आम्ही तुला मेलो!’’असा डायलॉग हाणून तिचं नाव टाकलं. दोन-तीन वर्षांत तिला एक मुलगी झाली. आजी-आजोबांचा राग वितळला. आणि आता सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ती घरी येते. बापूसाहेब निवृत्त झाल्यामुळे आता नुसतेच ‘बापू’ म्हणून उरलेत. नातीला घेऊन ते टेचात फिरत असतात. आमच्या मित्राला एकदा रस्त्यात भेटले तेव्हा- ‘तुमच्यामुळे हे सगळं झालं. तुमचे उपकार कसे फेडू सांगा?’ असं म्हणाले. मित्राचा चेहरा दाणकन् आवाज होऊन पडला. हा सगळा अर्जुन उलूपी विवाहाचा इतिहास माझ्या डोळ्यासमोरून तरळत होता तोच-
‘मी तुला विचारतोय. तो खातोस का नाही? शेवटचं विचारतोय. बोल!’
या माझ्या मित्राला आपला आवाज कुठे आणि कसा लावावा याचं काहीही सोयरसुतक नाही. कदाचित त्याचे शेजारी गुजराती असल्यामुळे असेल. मला मात्र अजून योग्य उत्तर सापडत नव्हतं.
‘हो खातो. पण अधूनमधून. नेहमी नाही.’
‘एकदाच केलं तरी पाप ते पापच.’
ही असली वाक्यं त्याला बरोबर वेळेवर टाकता येतात.. आणि सुचतातही.
‘खरं सांगू का? मला आताही खावंसं वाटतंय. रंभा भुवनमध्ये एव्हाना पहिला डोसा त्याने तव्याला वाहिला असेल.’
‘ही लाचार मराठी मनोवृत्तीच आपला आणि आपल्या संस्कृतीचा घात करते. एका क्षुद्र आंबवलेल्या दाल-तांदळाच्या गोळ्यासाठी तुम्ही आपला बाणा विसरता? अरे! आपल्या महाराष्ट्रात काय खायला मिळत नाही? साधे पोहे चार प्रकारचे मिळू शकतात. शिवाय सांजा आहे. नकोच असेल तर आंबोळ्या, घावन, थालीपीठ आहेत. हे काय अन्न नाही? आणि मिसळ म्हणजे तर या सगळ्यांचा बाप आहे बाप.’
‘अरे, पण ते पदार्थ हॉटेलात आपल्याला पसे देऊन खातानासुद्धा ओशाळायला होतं. बेंद्रे आरोग्यधाममध्ये आपण गेलो होतो तो किस्सा आठवतोय ना?’
‘आमच्या येथे उत्तम घरगुती पदार्थ वनस्पती तुपात तयार आहेत..’ अशी पाटी वाचून एका रविवारी आम्ही दोघे आरोग्यधामात गेलो. माणसांची ठेच गर्दी होती. तिथले वेटर शेंदुरगुंठित कपाळ मिरवत फिरत होते.
‘किती इसम?’ एकाने विचारले. आम्ही ‘माणूस’ नसून त्याच्यासाठी ‘इसम’ होतो, हे जरा आम्हाला खटकलंच.
‘दोन.’ आपला आवाज किती क्षीण होऊ शकतो ते पहिल्यांदा जाणवलं मला. त्याने मानेनेच एका कोपऱ्यातले टेबल दाखवले.
‘तिथे दोन माणसं बसली आहेत.’ मी उगाच त्या बिचाऱ्या अनोळखी माणसांना का उगाच ‘इसम’ म्हणायचं म्हणून सांगितलं.
‘ते खायला आलेत, राहायला नाही. उठले की बसा.’ वेटर आम्हाला उद्देशूनही बाजूच्या वेटरकडे बघत म्हणाला.
‘पाणी मिळेल का?’
‘बसल्यावर मिळेल. खायला आलाय का नुसतं पाणी पाहिजे?’
मुकाट जाऊन आम्ही रिकाम्या जागेवर बसलो. बराच वेळ कुणीच येईना. पाणी लोकांच्या अंगावर सांडायची आपली जबाबदारी पार पाडून पाणीवाला पोरगा ग्लास आपटून गेला. मी एव्हाना जरासा अस्वस्थ झालो होतो.
‘चल! दुसरीकडे जाऊ.’
‘आपल्या माणसांना सहन केलं पाहिजे आपण!’ आता हे म्हणणारा माझा मित्र इतर वेळेला आपली सहनशक्ती कुठे विसरून येतो, देव जाणे! नोकरीत होता तेव्हा साहेबाच्या मुलाला बघून- ‘साहेब! पोरगा बावळट आहे तुमचा. आणि जरा काणाही आहे डोळ्यांनी. नोकरीत आहात तेवढय़ात लग्नाचं जमवून टाका त्याच्या. एकदा तुम्ही रिटायर्ड झालात की कुत्रं विचारणार नाही त्याला..’ असं म्हणताना कुठे गेली होती त्याची सहनशक्ती?
‘काय पाहिजे? इथे टाइम नाही माझ्याकडे. सगळे घरी खायला मिळत नसल्यासारखे आलेत.’ मराठी बाणा दाखवत वेटरने पुढे होणाऱ्या वादाचा पूर्वरंग मांडला.
‘दोन थालीपीठ आणि चहा.’
‘आधी काय आणू? नंतर कटकट नाय पाहिजे.’
‘चहा नंतरच घेतो ना आपण?’
‘काय काय लोकांचं जगाच्या उलटं असतं.’ आज त्या वेटरने बहुधा भांडण करायचंच असं ठरवलं असणार.
‘जे तुला जमेल तसं आण.’ मी हतबुद्ध होऊन त्याच्या थंडपणाकडे बघत होतो. ‘सरणं गच्छामि’ म्हटलं नाही, एवढंच.
‘अरे, काय झालंय तुला? एरवी तू त्यांचा प्राण घेतला असतास.’
‘नाही रे! इथे प्रश्न अस्मितेचा आहे. आपणच जर दुसरे पदार्थ खाऊ लागलो तर सगळा व्यवसाय त्यांच्या हाती जाईल.’
इतक्यात गल्ल्यावरून दणदणीत आवाज आला. बहुधा बेंद्रे कुटुंबवृक्षाची एखादी पारंबी कडाडत होती..
‘दोन हजाराची नोट कसली नाचवता पंधरा रुपयांच्या चहासाठी? शिकलेसवरलेले वाटता, पण अक्कल वाटत होते तेव्हा काय झोपला होता काय? कुठून आणू सुट्टे? ही काय टांकसाळ वाटली तुम्हाला?’
टांकसाळीत सुटे पसे मिळतात, हे आजच कळलं होतं. गिऱ्हाईक शरमेनं लाजून उभं होतं.
‘घ्या! पुन्हा याल कधी.. नाही आलात तर उत्तमच.. तेव्हा सुट्टे पसे आणा.’ या त्यांच्या वाक्यावर तमाम वेटरवृंद कामकाज बाजूला ठेवून खदाखदा हसला.
‘साहेब! थालीपीठ एकच प्लेट आहे.’ ‘साहेब’ असं म्हणूनही समोरच्याचा पाणउतारा कसा करता येतो याचा नमुना वेटरने दाखवला.
‘अरे, इतक्या वेळाने काय सांगतोस? लगेच का नाही सांगितलंस?’ मी जरा चिडलोच होतो.
‘एका थालीपीठामागे धावायला आपला जन्म नाही झालाय. आणि आहे ते तुम्ही एकटेच खाऊन घ्या. यांच्याकडे बघून वाटत नाही- यांना ते झेपेल. तुम्ही फक्त चहा घ्या साहेब!’ या वेटरच्या वाक्यांवरून तो आपल्या गावच्या उत्सवातल्या नाटकात काम करणारा एखादा नट वगरे असणार असं वाटत होतं.
‘ए, आता कानाखाली आवाज काढीन हा एक शब्द बोललास तर!’
माझ्या मित्राला आत्ता त्याचा आतला आवाज सापडला होता. तो चालत गल्ल्यावर गेला.
‘बेंद्रे, असे वागलात ना तर हॉटेल बंद करायला लागेल. त्या वेळेला धावपळ व्हायला नको म्हणून हे पसे घ्या. आणि आत्ताच एक कुलूप विकत आणा. तुमच्यापेक्षा ते उडुपी बरे. देत असतील तेही शिव्या; पण निदान भाषेमुळे कळत तरी नाहीत. चल रे!’
शेवटची आज्ञा मला होती. आरोग्यधामाच्या पायऱ्या उतरताना म्हणालो मी- ‘मेलेल्याला मारणं बरं नाही, तरीही- ‘अरे, अस्मिता का काय तरी म्हणालास ना?’
तितक्यात समोरून एक मंजूळ आवाज आला. ‘अरे! तुम्ही? इथे? सकाळी सकाळी? कसे आहात?’
मित्राने ओळख करून दिली- ‘ही स्मिता शेट्टी. आताच परत आल्ये.. अमेरिकेहून कायमची. आणि हा माझा मित्र.’
‘इथे फार छान खायला मिळतं. तुमच्या मराठी टाईपचं. जाऊ या?’
..आता आमचा मित्र अस्मिता जपणार की स्मिता?
sanjaydmone21@gmail.com