मागील तीन लेखांत मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वाचकांना अत्यंत विनोदी वाटल्या असतील. मात्र चित्रपट बनवणं ही फार कठीण गोष्ट आहे. त्यातही ‘हिट’ चित्रपट घडवणं तर महाकठीण. हल्ली चित्रपट दोन-तीन आठवडय़ांत काही कोटी गल्ला जमवतो, पण त्यात गंमत नाही. ‘शोले’ कसा तीन वर्ष चालू होता, इतर चित्रपट त्याच्यापुढे झाकोळले गेले होते! मराठीत असा चित्रपट निर्माण झाला तर? मराठी साहित्यकार, निर्माते आणि दिग्दर्शक तो कसा रचतील? बघू या. स्वप्न बघायला कुठे पैसे पडतात!
नाटककार बाळासाहेब कोल्हटकर यांनी जर ‘शोले’ बनवला तर?
त्याचं नाव असेल- ‘उजळले निखारे सारे’! नऊ अक्षरी. त्यात ठाकूर बलदेवसिंग (संजीव कुमार) याच्या तोंडी पुढील ओळी असतील :
‘जय-वीरूच्या जोडीसंगे रचिला सूडाचा डाव रे।
शस्त्र पेलेले, ज्यांतील काही उजवे काही डावरे।
गब्बरसिंगच्या डोळा दिसती पराभवाचे हे तारे।
रामगडाच्या स्फुल्लिंगाचे उजळले निखारे सारे।।’
ठाकूरचा नोकर रामलाल (सत्येन कप्पू) हा कृष्णरूपी श्रीखंडय़ा दाखवून तो सांगितलेली कामं चमत्कार करून पटापट करून टाकतो, असंही दाखवलं असतं. शिवाय जय (अमिताभ बच्चन) हा बसंतीला (हेमा मालिनीला) बहीण मानतो, हेही त्यात असतं!
जयवंत दळवी यांनी जर ‘शोले’ची कथा लिहिली असती तर त्यात एखादे पात्र अंग खाजवताना (अगदी कराकरा) दाखवलं असतं. शिवाय त्यांची सगळी गोष्ट सावंतवाडीच्या आसपास घडली असती. एखादे पात्र किंवा बरीच पात्रं वेडगळ आहेत, असं लिहिलं असतं. शिवाय गब्बरसिंगचे (अमजद खान) एखादे भावीण किंवा गुरवीण प्रेमपात्र रंगवले असते. शिवाय सांभा रोज रात्री कंदील घेऊन त्याच्या सोबत देवळाच्या मागच्या बाजूला जातो आणि एकटाच चिलीम ओढत बसतो, असंही दाखवलं असतं! मध्येच त्यांचं एखादं पात्र विहिरीत जीव देऊन मोकळं झालं असतं किंवा कुठेतरी गायब झालं असतं. बसंती आपलं अंग न्याहाळत अंघोळ करते आणि ते एखादा गावकरी चोरून बघतो, हेसुद्धा कदाचित त्यात असतं.
महेश एलकुंचवार यांनी जर कथा-पटकथा लिहिली असती तर चित्रपटाचं नाव ‘ठिणगी, निखारे आणि कोळसा’ असं ठेवलं असतं. (खरं तर त्यांना चित्रपटात काम करण्याचा जबर अनुभव आहे. एका चित्रपटात त्यांचा अभिनय मी पाहिला आहे. त्याबद्दल जास्त न लिहिणं सगळ्यांच्या हिताचं आहे.) त्या कथेत गब्बरसिंगने एक काकाकुवा पाळलाय आणि त्याच्या बरोबर तो आपला एकांतवास विसरण्यासाठी खूप बोलतो. शेवटी तो आपल्या बोलण्यापेक्षा त्याचं बोलणं जास्त सयुक्तिक वाटल्यामुळे त्याच्या डोक्यात वडा-भातातला भला थोरला वडा घालून त्याचा जीव घेतो आणि पुन्हा एकटा जगायला लागतो, असं काहीसं लिहिलं असतं. एकटा जगताना ठाकूर बलदेवसिंगचं कुटुंब एकत्र राहतं आणि त्यांची अजून वाताहात झाली नाही, हे गब्बरला दिसतं आणि त्या दु:खात वेडापिसा होऊन तो सगळ्यांना ठार मारतो, असं रंगवलं असतं. मात्र ठाकूर बसंती आणि वीरू याचं लग्न लावून शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करतो व सगळे एकत्र राहू लागतात आणि ते कुटुंब सुखात राहू लागतं, हे काही त्यांना रुचलं नसतं म्हणून गब्बरला ठार मारल्यानंतर ठाकूर एक सिंह घरात पाळतो, थेट गब्बरने काकाकुवा पाळला होता तसा. तो सिंह एक दिवस सगळ्यांना खाऊन टाकतो.. आणि इथेच त्यांचा चित्रपट संपला असता.
जब्बार पटेलांनी जर ‘शोले’ बनवला असता तर त्याचं नाव ठेवलं असतं- ‘मुक्तबंध’ (‘बंधमुक्त’च्या नेमकं उलट)! त्यात कथा साधारण अशी असती : उत्तर भारतातल्या एका आदिवासी जमातीतला राजकारणी पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावात दहशत निर्माण करून राहिला आहे. त्याच्या हातून एका सनिकाची हत्या झाली आहे. त्या सनिकाच्या पलटणीतला सहकारी- ज्याचे दोन्ही हात झाडावरून माडी उतरवताना जायबंदी झाल्याने कापावे लागलेत- सूडासाठी त्या गावात येतो. त्याचे नाव ठाकूर बलदेवसिंग आहे. त्याच्याबरोबर दोन जवानमर्द आहेत (ते तसे आहेत हे समजून घ्यायचे, प्रत्यक्षात असतीलच असं नाही). त्यातल्या एकाला आदिवासी मुलींबरोबर उत्तम ढोल वाजवता येतो. दुसऱ्याला खरं तर चांगली नोकरी असते, पण त्याच्या पत्नीच्या अस्तित्वाच्या कक्षा रुंद झाल्यामुळे व ती त्याला हवी तशी वागायची थांबल्याने ते विभक्त होतात आणि आता तो काहीतरी करायचं तर सूड घेऊ म्हणून ठाकूर बलदेवसिंगबरोबर येतो. शेवटी सगळ्यांचा संहार होऊन गब्बर मृत्युमुखी पडतो. मग त्या गब्बरच्या गावाला ठाकूर दत्तक घेतो व त्याला ‘हरित गाव’ किंवा ‘तंटामुक्त गाव’ करण्याचा विडा उचलतो (विडा खराखुरा उचलला जाणार नाही, कारण तेवढे एक पान हरित क्रांतीच्या आड येऊ नये) आणि चित्रपट संपतो.
इथेच त्यांची दुसरा चित्रपट तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. शिवाय या चित्रपटात उत्तर भारतात जन्माला आलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कलाकारांसाठी दक्षिण भारत किंवा पार मिझोराम, आसाममधले कलाकार निवडले जातील आणि त्यांना पुण्यातल्या कोणाचे तरी उसने आवाज दिले जातील. परिणामी गब्बर आणि बलदेवसिंग यांच्या भाषेबद्दल एक प्रकारचा संभ्रम निर्माण होईल व ती भाषा कुणालाच न कळल्याने समीक्षा करताना समीक्षक (म्हणजे ज्यांना करता काही येत नाही, पण बोलता भरपूर येतं ते) ‘हा चित्रपट ‘पॅन इंडियन’ आहे’ असं कोणालाच न कळणारं वाक्य टाकून सगळ्यांचं अज्ञान झाकून टाकतील!
केदार शिंदेने ‘शोले’ निर्माण केला तर? म्हणजे कथा, पटकथा, संवाद सगळं तोच. तर, त्यात निरंकुशपणे अंकुश चौधरी आणि भरत जाधव जय आणि वीरूचं काम करतील. ठाकूर बलदेवसिंग आणि गब्बर या कामांसाठी एकाच कलाकाराची निवड केली जाईल आणि ते काम बहुधा दिलीप प्रभावळकर यांना दिले जाईल. प्रभावळकर आपल्याला दोन व्यक्तिरेखा, म्हणजे दोन गेटअप्स करायला मिळणार म्हणून अत्यंत हर्षभरीत होऊन ताबडतोब त्या भूमिका स्वीकारतील. सुरमा भोपाली (जगदीप) आणि जेलर (असरानी) या भूमिकांसाठी केदार शिंदे यांना तुटवडा पडणार नाही. कारण त्यांच्याजवळ विनोदवीरांची पलटण कायमच तयार असते. दोन नायिकांना तर तुटवडाच नाहीये. त्यांचा ‘शोले’ हा गंमतजंमत करत घेतलेला सूड या पद्धतीत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शिवाय जेलर असरानी याच्या तोंडी जितेंद्र जोशी लिखित-
‘जेलर नाचला!
दहा फूट उडाला!
हाती धरून काठी!
लेफ्ट-राईट, लेफ्ट-राईट, लेफ्ट-राईट!’
– असं गाणंही असेल.
अमोल पालेकरांनी जर ‘शोले’ बनवला तर त्याचं नाव ‘हळूहळू जळणारे निखारे’ आहे असं आधी जाहीर केलं जाईल व नंतर त्याचं फायर प्ले ‘आम्ही तयार आहोत’ असं नव्यानं बारसं होईल. सगळ्या घटना ‘आम्हाला दाखवायची घाई नाही, तुम्ही पाहायची करू नका’ या थाटात पडद्यावर दिसतील. ठार मारायचंय? सावकाश! सूड घ्यायचाय? सावकाश! घोडय़ावरून पाठलाग आहे? सावकाश! सगळं संथ! म्हणजे ‘संथ वाहते कृष्णामाई’पेक्षाही. चित्रपटाची कथा काय असेल? एकतर ती नेमकी कोणी लिहिली आहे हे कळणार नाही. तर ठाकूर बलदेवसिंगचे गाववाले आणि गब्बरसिंगच्या प्रदेशातले लोक यांना शहरात जाण्यासाठी एकच मार्ग आहे. गब्बरचे लोक त्याचा टोल मागतात. त्यावरून दोघांत बारीकसारीक कुरापती चालू असतात. अचानक त्या गावात दोन सामाजिक कार्यकत्रे येतात. वीरू आणि जय अशी त्यांची नावं असतात. आल्यावर वीरू त्या गावातल्या टांगेवालीबरोबर लग्न करण्याचं ठरवतो. मात्र त्यामागे बहुजन समाजाचा उद्धार हा एकमेव विचार असतो. त्या लग्नासाठी जो खर्च येणार असतो तो करायची त्याची ऐपत नसते. म्हणून ठाकूर त्याला एका अटीवर साहाय्य करायला तयार होतो. ती अट म्हणजे- गब्बरबरोबरचा वाद कायमचा मिटवून टाकायचा. शांत-गंभीर जय एक क्रिकेटचा सामना घेऊन विजेत्याला टोल मिळावा असा प्रस्ताव मांडतो. सगळ्यांना ही कल्पना पसंत पडते. इतर सर्वसामान्य गल्लाभरू चित्रपटांसारखा सामन्याचा निकाल लागत नाही. खरं तर, ‘कोणीही जिंका, पण एकदा काय ते दाखवा!’ असं प्रेक्षकांना वाटल्याशिवाय राहणार नाही. त्या सामन्यात गब्बर जिंकतो आणि टोलचा हक्क त्याच्याकडेच राहतो. थोडक्यात, समाजाची कायम पिळवणूक होतच राहते असा संदेश लोकांपर्यंत- जेव्हा चित्रपटावर पालेकर भाष्य करतील तेव्हाच- जाईल. तोपर्यंत कोणालाच काहीच कळलेलं नसणार. कारण चित्रपट कधी आला आणि का आला, याची उत्तरं कोणाकडेच नसतील.
.. तर हे असं आहे. जिप्सी म्हणजे जो एका ठिकाणी स्थिरावत नाही तो. चित्रपटाच्या निमित्ताने तो तब्बल चार आठवडे एकाच ठिकाणी थांबला. पुढच्या आठवडय़ात मात्र दुसऱ्या ठिकाणी!
– संजय मोने
sanjaydmone21@gmail.com