आपल्याकडे सहा ऋतू असतात असं शाळेत असताना शिकलो होतो. वसंत, शिशिर, हेमंत, वर्षां, ग्रीष्म आणि शरद. त्यांचा क्रम काय आहे.. म्हणजे कुठल्या ऋतूनंतर कुठला येतो, हे मात्र आता नाही सांगता येत. आपण एक राष्ट्र म्हणून गेली पन्नास र्वष प्रगतिपथावर आहोत आणि पाश्चिमात्य राष्ट्रं प्रगती पावून समृद्धीच्या मार्गावर सुसाट धावत आहेत. त्यामुळे त्यांचं अनुकरण करणं हे आपलं कर्तव्य झालं आहे. त्यानुसार आपल्याकडे त्यांचे ऋतू रुजलेले आहेत. काही इंग्रजी वर्तमानपत्रांत अगदी नित्यनेमाने या बदलत्या मोसमाबद्दल संपूर्ण माहिती विविध स्तंभांतून आपल्यावर ओतली जाते. मराठी समाजाला इंग्रजीचा जोरदार डोस पाजायचा आणि गावागावांतून मराठी माणसाला पूर्ण नाही, निदान अर्धवट इंग्रजी भाषेचं अमृत पाजायचं, या ध्यासाने काही मराठी वर्तमानपत्रंही कंबर कसून सज्ज झाली आहेत. त्यांनी आपले मराठी रूपडे फेडून देवनागरी इंग्रजी ही नवीन भाषा शोधून, त्या भाषेत वर्तमानपत्र चालवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या दृष्टीनेही भारतात ‘स्प्रिंग’ आणि ‘विंटर’ आणि ‘ऑटम’ वगैरे ऋतू येऊन दाखल झाले आहेत.
भारताला सुमारे आठ हजार मैलांचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यात आपला देश उष्ण कटिबंधात आहे. त्यामुळे या प्रांताला बर्फ वगैरे फ्रीजमध्येच बघायला मिळतो! तरीही आपण ‘विंटर’ वगैरे रेटून म्हणत राहतो. मनाने भारत सोडून सगळीकडे राहणारे आणि केवळ नाइलाज म्हणून देह इथंच वागवणारे अनेक व्यायामवाले, आहारतज्ज्ञ, केवळ पाटर्य़ाच्या छायाचित्रांतून दिसणाऱ्या नटय़ा (ज्यांनी वेळीच धनाढय़ नवरा गटवून मनोरंजन, कला आणि जीवन यांचा चलाख ताळमेळ साधला आहे अशा!) आणि साठीच्या असणाऱ्या, पन्नाशीच्या दिसणाऱ्या आणि प्रत्यक्षात स्वत:ला तिशीच्या समजणाऱ्या काही ललना न शोभणाऱ्या उत्साहाने या तमाम ऋतूंमध्ये काय खावं, काय प्यावं, काय ल्यावं हे आपल्या बोडक्यावर मारत असतात. वेगवेगळे परदेशी पदार्थ वापरून आणि तोंडाने ‘यम्स्! यम्मी! ऑसम!’ असे शब्द वापरात आणून काहीतरी पाकक्रिया छापलेल्या असतात. तपमान (की तापमान? खरं तर काहीही म्हटलं तरी जीव हैराण होतोच.) चाळीसच्या आसपास असताना स्वेटर्सचे सेल लागतात, शरीराला अत्यंत अहितकारक असणारी शीतपेये, आइसक्रीम्स ‘लो-कॅलरी’ या नावाखाली प्यायला-खायला सांगतात आणि आपणही मागचा-पुढचा विचार न करता.. असो. तो विषय वेगळा आहे. नंतर कधीतरी..
आपल्याकडेही आता तसं बघायला गेलं तर वर्षां आणि वसंत हे दोनच ऋतू उरले आहेत. ‘निदान शहरात तरी..’ असं म्हणायचंही काही कारण नाही. कारण देशातल्या प्रत्येक गावाला (खरं तर ‘गावकुसाला’ हा शब्द वापरला पाहिजे. कारण ‘गाव’ या शब्दाला कुसाची बेगड लावायची नवीन पद्धत सध्या जोशात आहे. जसं महाराष्ट्र या राज्याचा कारभार आता ‘शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असं म्हटल्याशिवाय सुरळीत चालूच शकत नाही.) आता शहर बनायची हाव सुटली आहे. त्यामुळे शिशिर, हेमंत, शरद आणि ग्रीष्म हे फक्त नवीन जन्माला येणाऱ्या मुलांना नावं ठेवण्यापुरतेच उरले आहेत. त्यातही ‘ग्रीष्म’ हे नाव पालकांना म्हातारपणी उच्चारायला जरा कठीणच आहे. त्यामुळे तो बिचारा आपलं सगळं अस्तित्वच गमावून बसला आहे. त्यामुळे जे उरले आहेत ते दोन ऋतू जिवंत ठेवायचं काम फक्त दोन जमातींनी केलं आहे. वसंत ऋतूवर साहित्यिकांचा हक्क आहे. विशेषत: कवींचा! आणि वर्षां ऋतूवर हक्क आहे तो सहली काढणाऱ्यांचा! त्यात पुन्हा हे दोन ऋतू अलीकडे हवामान खात्याच्या अंदाजाला न जुमानता आपली हजेरी लावतात. (हवामान खाते हे सरकारी खाते.. ज्यावर करोडो रुपये खर्च होतात. ते अंदाजच का देतात? नक्की काय ते का नाही सांगत? उद्या आपल्या फडणवीस- साहेबांनी आपल्या पक्षात किती आमदार आहेत हे नक्की न सांगता नुसता अंदाज सांगितला तर? अर्थात, त्यांनाही खरे तर त्यातले आपल्या बाजूने किती, याचा नुसता अंदाजच असणार. असो.) वसंत ऋतूला तसं काही करायचं नसतं. किंवा हल्ली काही करायला उरलेलं नाही. त्यामुळे त्याची हजेरी जाणवत नाही. वर्षां ऋतू मात्र हजेरी लावून आणि न लावून अशा दोन्ही तऱ्हेने सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवतो.
या दोन्ही ऋतूंपैकी वसंत हा ऋतू सगळ्यात महत्त्वाचा. ‘मासानां मार्गशिर्षोस्मी ऋतूनां कुसुमाकर’ असं भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी म्हटलंय. याचा अर्थ भगवद्गीता सांगितली गेली ती ऐन वसंत ऋतूत. नंतर अगदी ‘केतकी गुलाब जूही चंपक बन फुले’ किंवा ‘कोयलिया मत कर पुकार, लागी करेजवा कटार’ अशी वर्णनं करून वसंत ऋतूची महती अनेकांनी सांगितली असली तरी एकंदरीत वसंत ऋतू हा लढाईसाठी उत्तम काळ असावा. कारण भगवद्गीतेनंतर महाभारताची भीषण लढाई लढली गेली. शिवाय ‘केतकी गुलाब जूही..’ हे गाणंदेखील ‘बसंतबहार’ सिनेमात जुगलबंदीसाठी वापरलं आहे.. म्हणजे एक प्रकारची संगीत लढाईच! ‘करेजवा कटार..’ या चीजेत तर कटारीचा स्पष्ट उल्लेख आहे. आजही सरकारविरोधातले मोर्चेही याच ऋतूत निघतात. रोजच्या प्रवासात जीव आंबून निघत असताना कुठल्या फुलांचा सुगंध येणार? आणि आता कोकीळ भर वस्तीत ओरडतात. सगळ्या ऋतूंत. नाही म्हणायला काही काव्यसंमेलनांना कवी आपल्या नव्याकोऱ्या कविता घेऊन वातानुकूलित सभागृहात येऊन त्या वाचतात. त्यातही तुझ्यापेक्षा माझी उजवी हा विचार असतोच. मात्र, शेतकी पिकं (खरीप किंवा रब्बी यापैकी कुठलं तरी एक) नुकतीच येऊन गेल्याने कवितांचं बेणं ऐन भरात रुजलेलं असतं. घे एखादं बन (शहरात ‘बन’ हा जंगलाऐवजी पावाला जवळचा शब्द आहे!), पकड चार कोकीळ आणि लाव त्यांना ओरडायला अशा छापाच्या कविता झाडाला चिंचा लटकतात तशा लटकत असतात.
एकेकाळी हा वसंत ऋतू अनेक कवींच्या उदरनिर्वाहाचा हंगाम होता. स्वत:च्या घराच्या कोपऱ्यावरही न फिरकणारा कवी पंधरा-सोळा ओळींतून जग फिरवून आणायचा. आम्ही शाळेत असताना यमक साधून छंदोबद्ध काव्य केलेलं असायचं. पुढे क्रियापद नसलेल्या काही ओळी एकाखाली एक लिहिणं म्हणजे कविता असं समीकरण पुढे रूढ झालं. त्यामुळे केमिस्ट, डॉक्टर आणि ज्यांचे अक्षर लागत नाही असेही काही महाभाग कवी झाले. हल्ली तर कवितेत हिंदी-इंग्रजी शब्दांच्या उपम्यात एखादा मराठी शब्द काजूइतकाच विरळा सापडतो! मग चारोळ्यांचं आगमन झालं आणि कवींची बोट फुटली. निरनिराळ्या आकारांची पुस्तकं छापली गेली, हेच फक्त त्या काव्यातलं वैविध्य होतं! ‘आमचे ‘हे’ एकदम रसिक आहेत..’ पासून ‘एकदा दिला छापून काव्यसंग्रह. आता तरी शांत बसेल घरी!’ इथपर्यंतच्या कारणांनी मराठी साहित्यातल्या काव्यतणांना बाजारपेठ मिळाली. लगेच अनेक संमेलनं भरली. त्यात पुन्हा फुटीर, विद्रोही, आत्मध्यासी असे तट पडले. म्हणजे पुन्हा एक प्रकारची लढाईच!
दुसरा ऋतू म्हणजे वर्षां ऋतू! सगळ्यांसाठी अत्यंत आणीबाणीचा ऋतू. हा प्रसन्न झाला तर उरलेलं वर्ष नीट जातं. या ऋतूला जरा जरी उशीर झाला तरी वर्तमानपत्रांत ‘वरुणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा’ असा मथळा असलेली आणि भेगा पडलेल्या जमिनीच्या पाश्र्वभूमीवर सुरकुत्या पडलेला एखादा वृद्ध शेतकरी अशा छायाचित्रासहित बातमी लगेच हजर होते. विनोदाचा भाग सोडा, पण कुठल्याच तरुण शेतकऱ्याला पावसाची चिंता नसते? सोबतचं छायाचित्रसुद्धा कधी कधी मागच्या कुठल्या तरी काळातलं असावं अशी शंका येऊन जाते.
पण पावसाची काहीही अवस्था असली तरी या काळात वर्षांसहली निघतात. दोन दिवसांची सहल. त्यात जाणे आणि येणे मिळून एक दिवस जातो. उरलेल्या दिवसात ठरलेले काही कवी मुसक्या बांधून आणले जातात. काही तात्पुरते लोकप्रिय असलेले कलाकार आणले जातात. एखाद्या बंद वाहनातून पाऊस बघत बघत जायचं आणि मग कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये राहायचं. अत्यंत निरिच्छपणे मग ते भाडय़ाने आणलेले कलाकार गंमतजम्मत करणार. त्यांच्याबरोबर पूर्वी सह्य घेण्याइतकी जवळीक साधली जायची; आता सेल्फीकरता लगट केली जाते. त्यांची ती जुलमाची सांस्कृतिक गडबड संपली, की ‘गावरान मेजवानी’ या नावाखाली काहीतरी पोटात ढकलायचं. मग ज्या कुणा रसिक इसमांना आपली कला सादर करायची आहे त्यांना संधी दिली जाते. त्याच्या आधी ‘निसर्गाच्या कुशीत, या हिरवाईच्या साक्षीने आणि आपल्या मर्मबंधातल्या माणसांबरोबर..’ छापाची निवेदनं होतात. आणि मग जो काही वानवळा सादर केला जातो- काव्य-विनोद वगैरे- सगळं सगळं भयाण असतं. अध्र्याहून अधिक कविता ‘तू गेलीस आणि मी बरबाद झालो’ अशा तरी असतात किंवा ‘तुझ्या साथीने जीवन उजळून गेले सखये’ हा तरी खपाऊ माल असतो. मात्र, सादर करणाऱ्यांना आपण थेट कालिदासाचे वंशज आहोत असंच वाटत असतं. एकदा मी एका ठिकाणी पावसाळ्यात जाताना वाटेत थांबलो होतो. त्यावेळी हा सगळा प्रकार बघितला. तेव्हा वाटलं, जमिनीच्या खालून पाऊस यायची सोय झाली पाहिजे, तरच या वर्षांसहली थांबतील. अर्थात या अशा सहली आवडणाऱ्या माणसांची संख्या अगणित आहे, हेही नक्कीच. असो. काहींना तिखटजाळ मिसळ आवडते, तर काहींना गोड गोड खीर आवडते.
– संजय मोने
sanjaydmone21@gmail.com