संजय मोने
अभिनयाच्या व्यवसायात असल्यामुळे मी गावोगावी फिरलो आहे. महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा वगळता उरलेल्या सर्व जिल्ह्यांत मी प्रयोग केले आहेत. या इतक्या वर्षांच्या प्रवासात मी सतत मनन, चिंतन करत होतो, भूमिकेचा विचार करत होतो असंही लिहिता आलं असतं, पण उगाच खोटं का बोला!
नाटकांच्या प्रयोगांच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्राचं पाणी आम्हाला चाखायला मिळतं. (बघा, आम्ही बारा गावांचं पाणी पितो, हे कसं फिरवून सांगितलं!) तर, या पाण्याबरोबर विविध ठिकाणी खायलाही मिळतं. मला या इतक्या वर्षांत असे अनेक अनवट प्रकार चाखायला मिळाले आहेत. ते आठवलं, की आजही तोंडाला पाणी सुटतं. अहो, साधा बटाटावडा! तोही चवीत गावागावांनुसार बदलताना आढळतो. गिलके म्हणजेच शिराळे आणि दोडका म्हणजे शिराळ्याचा लहानपणी जत्रेत हरवलेला जुळा भाऊ, हे कळायला तीन जिल्हे प्रवास करावा लागला. पुणे म्हणजे आता तसं मुंबईच झालं आहे; पण लहानपणी जेव्हा मी पुण्याला जायचो तेव्हा पाण्याची चव बदललेली कळायची. आता नाही कळत. एक तर पुण्याचं पाणी तरी बदललं किंवा आम्ही तरी जिभेने बदललो! पुण्यात नाटक असे तेव्हा नाटकानंतर तिथे एक जोशी नावाचा गृहस्थ आम्हाला रात्री जेवण देई. नुकतंच त्याचं निधन झालं. आमच्या व्यवसायाशी निगडित तो एक ‘अनसंग हीरो’च म्हणायला हरकत नाही. प्रयोग साडेबाराला संपतो, पण काही महत्त्वाची कामं बाकी असतात ती उरकून घ्यायला थोडा वेळ लागतो. म्हणजे तिथला सर्व व्याप उरकायला त्याला अडीच-तीन वाजत असत. परंतु कधीही त्याच्या तोंडून तक्रारीचा सूर आलेला कुणीही ऐकला नाही. जे जेवण तो द्यायचा त्याला अख्या महाराष्ट्रात तोड नाही! अनाथ मूल जसं आपोआप वाढतं तसं वरण आपोआप होतं, पण जोशीकडे वरण म्हणजे तिखट-मिठाचं श्रीखंडच जणू!
पुणेकर हे रसिक आहेत, हुशार आहेत किंवा विक्षिप्त आहेत यावर दुमत होईल, पण ते पक्के खादाड आहेत हे नक्की. खरं तर ते जगात अग्रेसर झाले असते, परंतु प्रत्येक पदार्थावर शेव टाकून खाण्याचा आग्रह त्यांनी सोडला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे, पुण्यात जी भेळ म्हणून मिळते त्याला त्यांनी ‘भेळ’ म्हणणं सोडलं पाहिजे. मात्र, महाराष्ट्रीय थाळी खावी तर पुण्यातच! ‘आशा डायनिंग’, ‘पूना बोर्डिग’ ही शाकाहारी थाळीची महत्त्वाची ठिकाणे. कार्पोरेशनचं ऑफिस आहे त्याच्यासमोर एक ‘भरवनाथ’ नावाचं हॉटेल आहे. तिथे भर दिवसाही कृष्णजन्माच्या वेळी होता तितका अंधार असतो. त्या जागी बसून ‘स्वछता’ हा शब्द लिहायला घेतला तर शब्द कागदावर उमटत नाही, पण तिथे जे काही मिळते त्याच्या जवळपासही येणारं दुसरीकडे मिळत नाही. तिथे एक पदार्थ ‘चायना राईस’ या नावानं विकला जातो. ही गोष्ट जर कुठल्या कम्युनिस्टाने खाल्ली तर रागाने त्याचा तिळपापड किंवा चीनमध्ये ज्यापासून पापड बनवत असतील तो पापड होईल. पिंपरीत एका चौकात एक सिंधी माणूस पॅटीस, छोले आणि जिलब्या विकतो. गरम तांबडा थर्र (त्या तांबडय़ाला ‘थर्र’ हाच शब्द योग्य आहे) असलेले छोले, बरोबर लाल कांदा, गोड-तिखट चटणी आणि तुपात न्हाऊन निघालेल्या जिलब्या!
नाशिकला कधी गेलात तर ‘सायंतारा’ नावाच्या ठिकाणी साबुदाणावडा खायला विसरू नका; मुळात लाजू नका, कारण तिथे जो जोरात ऑर्डर देतो त्याला पहिलं खायला मिळतं. शिवाय ‘इनायत’ नावाच्या मुंबई-नाशिक रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये ‘खिचडा’ हा प्रकार बिर्याणीचा नक्षा उतरवून जातो. नाशकात मिसळ ही पापडाच्या सोबतीनं खाल्ली जाते. पहिल्यांदा मी जेव्हा ती जोडी बघितली तेव्हा साशंक मनानं पहिला तुकडा मोडला आणि त्यानंतर मी दरवेळा ती खात आलो आहे. पुणे-नाशिक रस्ता म्हणजे तुमच्या संयमाचा अंत पाहणारा रस्ता. तिथे वाटेत एक ‘बोटा’ नावाचं गाव लागतं. तिथली मिसळ म्हणजे झणझणीत! क्लीनरसुद्धा खाताना विचार करतात. पण मिसळ हा प्रकार अविचार म्हणूनच खायचा असतो. घोडेगावनजिकच्या एस.टी. थांब्याजवळची मिसळही अशीच. पहिला घास पोटात गेला, की घरातल्या आपल्या पूर्वजांच्या बाजूला आपलाही फोटो लागेल की काय, असं वाटून जातं! मालेगावला एका प्रयोगानंतर आम्ही ‘संतोष’ नावाच्या धाब्यावर गेलो होतो. शाकाहारी ढाबा. पण तिथल्यासारखी आलू-टमाटर दाल बहुधा स्वर्गातच मिळत असेल व एक बिस्किटासारखी रोटी, जी परत कुठेच मिळाली नाही.
कोल्हापूर-सांगली-सातारा हा तसा समृद्ध प्रदेश; पण खरंच आज-काल तिथे नाव घ्यावं असं फार काही मिळत नाही. तिथले हॉटेलवाले मुंबईच्या चवीचे पदार्थ विकून आपले नाव घालवायच्या मागे मग्न आहेत. स्टेशनसमोर ‘राजपुरुष’ हॉटेल आहे. तिथली शाकाहारी थाळी मात्र खरंच पोटभर आहे. आणि झकास. काळाचा महिमा बघा! एकेकाळी हा कोंबडय़ा-बकऱ्यांनी भयभीत होऊन जगण्याचा प्रदेश होता, आज तिथे मांसाहारी काही मिळालंच तर ते चिकन अंगारी नाही तर चिकन तंदुरी असं असतं. कोल्हापुरात ‘पेरीना’ आणि ‘सोलंकी’ ही दुकाने दूध कोल्ड्रिंक (कोल्ड आणि ड्रिंक हे दोन वेगळे शब्द आहेत हे त्यांना मान्य नाही!) फार छान देतात.
जळगावला ‘शेवभाजी’ नावाचा एक फर्मास प्रकार मिळतो. शाकाहारी लोकांना मांसाहारी पदार्थाची चुणूक हवी असेल तर ती जरूर खावी. ‘द्वारका’ नावाच्या एका छोटय़ा हॉटेलमध्ये मिळणारा अजून एक मस्त प्रकार म्हणजे- ‘मुर्गा तरंग’! माझा जळगावचा मित्र कै. भय्या उपासनी एकदा जळगावहून तो तरंग घेऊन गाडी मारत मारत भुसावळला आला होता आणि आमचं जेवण होईपर्यंत वीस मिनिटं ट्रेन थांबवून ठेवली होती. (त्याविषयी याच सदरात मी लिहिलं होतं.) हल्ली तसं चिकनही मिळत नाही आणि गाडय़ा थांबवून ठेवणारे मित्रही! त्याच जळगावला एक ‘गोरसधाम’ नावाची खानावळ आहे. त्या खानावळीत जेवणाचे दोन भाग आहेत. म्हणजे ती खानावळ दोन भागांत विभागलेली आहे आणि जिथे तिची फाळणी झाली आहे तिथे एक पाटी आहे ठळक अक्षरांत- ‘फक्त ऑफिसर्स आणि सभ्य लोकांकरिता’! आपण नेमके यात कुठे मोडतो, हे न कळल्यामुळे माझं आजपर्यंत तिथे जाणं झालेलं नाही. बडनेरा स्टेशनवर एक ऑम्लेटवाला आहे. तो ते खरपूस झालं की शेवटच्या क्षणाला हाताचा असा काय झटका त्या तव्याला देतो, की त्या ऑम्लेटचा आकार बदलून ते त्रिकोणी होतं.. थोडंसं चण्याच्या पुडीसारखं! मग तो ते ऑम्लेट लांबलचक पावात खुपसतो. वर काहीतरी चटणी ओततो. ‘काही तरी’ या शब्दाशिवाय त्या चटणीला काही दुसरं नाव नाही, पण ते अवर्णनीय होऊन जातं.
जळगाव आलं, की ओघानं विदर्भ आलाच! विदर्भात, म्हणजे नागपूरला माझं एक स्वत:चं हक्काचं असं कुटुंब आहे देवधर नावाचं. धनंजय आणि संजय हे दोन भाऊ आणि आता धनंजय यांचा मुलगा अनिकेत आणि त्यांचे कुटुंबीय. ते व्यवसायाने हॉटेलच्या धंद्यात आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे घरी आणि हॉटेलमध्ये असे दोन्ही ठिकाणी पाहुणचाराचे अनेक प्रसंग आम्ही साजरे केले आहेत. शशांक केवले नावाच्या माझ्या मित्राच्या घरी खाल्लेली सांबार-वडी आजही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. सोलापूरला रेवणसिद्ध शहाबादे नावाच्या मित्राने लिंगायत कुटुंबातली पापडासारखी भाकरी खायला घातली होती शेंगाचटणीबरोबर. सोलापूरच्या बाळीवेसजवळ मिळणारं पत्थर मटन आणि मिठातलं मटन म्हणजे जिभेवर पडता क्षणी विरघळणारं. ‘जय भवानी’ नावाचं एक हॉटेल म्हणजे मटन आणि चिकनच्या हौतात्म्याचं लाजवाब ठिकाण. त्यांनी मरावं तर अशा ठिकाणी!
या सगळ्या ठिकाणांबरोबर मला आवडतं ते कोकण! तिथे प्रयोग खूप उशिरा सुरू व्हायचे. त्यामुळे सगळं संपवून जेवायची वेळ तीनच्या सुमारास यायची. तरीही शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ गुण्यागोविंदाने एकाच ताटात नांदतात ते फक्त कोकणात. वरण-भात, भाजी आणि बरोबर माशाचा तुकडा एकाच मानाने ताटात नांदतो तो तिथे. याचा त्रास त्याला नाही, की त्याची अडचण याला होत नाही. मालवणची ‘चतन्य खानावळ’, कणकवली बाजारपेठेतलं छोटंसं हॉटेल एकाहून एक सरस.
चिपळूणच्या वास्तव्यात तिथल्या ‘अभिषेक’ हॉटेलशी ऋणानुबंध जुळला तो त्या हॉटेलचे मालक तटकरेंच्या प्रेमळ स्वभावामुळे. एकदा असाच एका खासगी कामासाठी जात होतो. कोकण रेल्वेत एक गृहस्थ भेटले. बापू खेडेकर. शिवसेनेचे जुन्या काळातले ते आमदार. आता असे राजकारणी स्वप्नातही भेटत नाहीत. त्यांनी जेवणाचं आमंत्रण दिलं. सहा प्रकारचे मांसाहारी आणि तितकेच शाकाहारी पदार्थ ताटात आले. काय खावं ते कळेना. शेवटी काही पदार्थ चाखले आणि लाज बाजूला सोडून उरलेले पदार्थ मी बांधून मागितले. आजही चिपळूणला गेलो तर माझा बापूंना एक फोन जातो. मत्रीसाठी की खाण्यासाठी, माहीत नाही. रत्नागिरीच्या प्रयोगानंतर मौसमात उत्तम भटजी फणसाची भाजी करत.
हे आणि असे अनेक प्रकार खाऊन आणि पचवून मी नाटकं करत आलो आणि राहीन. उगाच भूमिका कशी झाली, लोकांनी ती कशी स्वीकारली, कसे आम्ही जीव धोक्यात घालून प्रवास करत लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून मरत असतो, कलाकार म्हणून आम्ही कसे उपेक्षित आहोत.. याचं रडगाणं, याच्या चर्चा करण्यापेक्षा हे जास्त बरं. कारण नाटक बघायला मिळालं म्हणून माणूस मेल्याचं एकही उदाहरण नाही!
sanjaydmone21@gmail.com