रावसाहेब ताटे, म्हणजे माझे पती दोन वर्षांपूर्वी वारले. मी गावातल्या हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. रावसाहेब माझ्यापेक्षा जवळपास १५ वर्षांनी मोठे होते. आता मी पन्नाशीत आहे. ते किडनीच्या आजाराने गेले. मी लग्नाच्या आधी बी.ए. झाले होते. लग्नानंतर त्यांनी मला बी.एड्. करायला लावले. ते समाजसेवक म्हणून तेव्हाच प्रसिद्ध होते. ओळखीही खूप होत्या. मला शिक्षिका म्हणून गावातल्याच शाळेत त्यांनी नोकरी मिळवून दिली.
आमचे गाव पूर्वी तालुक्याचे ठिकाण होते. आता जिल्ह्याचे झाले आहे. त्याला शहराचे रूप आले आहे. आम्हाला मूलबाळ झाले नाही. आम्ही दोघेच घरात. त्यामुळे माझ्या पगारात घरखर्च भागत असे. रावसाहेब अधूनमधून खूप पैसे आणत. कुठून ते मी विचारले नाही. आता वाटते, ते हुशार होते. मला नोकरी त्यांनी का लावली याचे उत्तर मला सापडले होते, पण थोडे उशिरा. आता सांगायला हरकत नाही, पण मूल व्हावे म्हणून आम्ही उपासतापास, नवस वगैरे केले होते. एकदा तिरुपतीलाही जाऊन आलो होतो. पण रावसाहेब म्हणाले की, ही आपली खासगी बाब आहे. कुठे उल्लेख करायची गरज नाही. मी का, ते विचारले नाही. मला माहीत होते की, ते अनेक ठिकाणी अनेक विषयावर भाषणे देतात. त्यात एक भाग अंधश्रद्धा निर्मूलन हाही होता.
आता मलाच मला विचारावे वाटते की, मी का काही नवऱ्याला विचारत नव्हते? त्यांचे म्हणणे खोडून काढणे तर दूर पण कशाबाबत जराशी शंकाही घेत नव्हते? याचे उत्तर एकच की मी त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबले होते. आई-वडील लहानपणीच मरण पावलेल्या आणि नातेवाईकाच्या घरी आश्रितासारख्या वाढलेल्या माझ्यासारख्या गावंढळ मुलीचा त्यांनी लग्न करून उद्धार केला होता.
शाळेत असतानाच मला वाचनाची आवड होती. लग्नानंतर शिक्षिका झाले. लायब्ररीत बसू लागले. वाचू लागले. शाळेत सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमाचे संयोजन आणि संचालन करू लागले. गावात एकदा कोजागरीनिमित्ताने स्थानिक कवींचे कविसंमेलन होते. मला कविता वगैरे काही करता नव्हती येत. पण इंदिराबाई संत यांची कविता मी वाचली होती एक.
तिथे असे लिहिले होते-
फूल फुलता एकदा
पुन्हा कळीपण नाही
उघडल्या पाकळीला
पुन्हा मीट ठावी नाही.
या ओळी मला खूप आवडल्या होत्या. मग मी घट्ट वरणात पाणी घालून ते पातळ करावे त्याप्रमाणे या ओळीच ताणून ताणून एक कविता लिहिली आणि म्हटली. कोणाच्या नजरेत ही चोरी आली नाही (असे मला त्या वेळी वाटले). कवितेतील एकदाच फक्त फुलण्या-मिटण्याची कल्पना काही जणांना आवडली आणि चार-दोन जणांनी टाळय़ा वाजवल्या, ही गोष्ट भरल्या मनाने रावसाहेबांना सांगितली तर ते म्हणाले की ‘ही कोजागरी-फिजागरी म्हणजे रिकामचोट मध्यमवर्गीय लोकांनी दूध आणि शेंगावर ताव मारण्यासाठी केलेले चोचले आहेत. कविता-फिविता सोडा. जरा गंभीर वाचन-बिचन करत जा.’
मी हिरमुसून गेले.
यानंतर एकदा मी कथा लिहिली होती. ‘कलासुमन’ नावाचे एक स्त्रियांचे मासिक होते. त्यांनी कथा-स्पर्धा आयोजित केली होती. मी ‘त्रिकोण’ नावाची कथा लिहिली. नवरा-बायको-प्रेयसी असा त्रिकोण आणि त्यामुळे तणाव आणि दु:ख अशी सरधोपटच कथा होती. बक्षिसाचे जाऊ द्या, पण छापून आल्यावर कोरडे ओढणे नको म्हणून कागदावर लिहिलेलीच कथा मासिकाकडे पाठविण्याआधी रावसाहेबांना वाचायला दिली. वाचून ते करडय़ा आवाजात म्हणाले, ‘मी नैतिक गुणांवर जगभर भाषणे-बिषणे देतो आणि तुम्ही अशा व्यभिचाराच्या कथा-बिथा लिहा..
या लिखाणाने काय भले होणार समाजाचे..’ मी कोमेजून गेले.
मग मी माझ्या आनंदाचे ठिकाण निश्चित केले. ग्रंथालय! पीरियड नसला की इतर शिक्षिका घोळक्याने साडी, समारंभ, पी. एफ., इन्क्रिमेंट, एच. एम., संस्था या गप्पांत मग्न. मी ग्रंथालयात. गावात ग्रंथ प्रदर्शन लागले तेव्हा मी भीत भीत एच. एम. ना म्हटले, ‘सर मी निवडू का पुस्तके? हेडसर म्हणाले, ‘अशी पुस्तके निवडा ज्यावर ४० किंवा ५० टक्के सवलत मिळेल.’ मग मी एका अनुभवानंतर तो नाद सोडून दिला.
संस्थेचे सचिव, जे एक नामांकित वकील आहेत, म्हणाले की ‘मॅडम, तुम्हाला पुस्तकांची हॉबी आहे, असे ऐकले. जवळच्या शहरात ग्रंथजत्रा भरली आहे. आपण जाऊन ऑर्डर बुक करू. पुस्तके आपल्याला संस्थेच्या पत्त्यावर येतील. कारने जाऊ. कारने येऊ.’ मोठय़ा मुश्किलीने रावसाहेबांनी परवानगी दिली. सचिवांनी कारच्या मागील सीटवर आग्रहाने बसविले. ड्रायव्हर गाडी चालवत होता. पुन:पुन्हा सचिवांचा उजवा हात माझ्या मानेमागे सीटच्या वरच्या भागावर पसरत होता आणि त्यांचे बोट माझ्या केसांना, कानाच्या पाळीला, ब्लाऊजच्या अर्धगोलामुळे उघडय़ा मानेखालील पाठीच्या उघडय़ा त्वचेला स्पर्श करीत होते. स्त्रिया बोलत नाहीत, पण त्यांच्याजवळ सहावे की कितवे इंद्रिय असावे- त्यामुळे हलक्या किंवा पुसटशा स्पर्शामधलाही नेमका संदेश त्यांच्या मेंदूपर्यंत पोचतो, असे मला वाटते. मी शांतपणे ड्रायव्हरला म्हटले, ‘थांब थोडा.’ तो स्टेअिरगच्या वरच्या मध्यभागी असलेल्या छोटय़ा आरशात मागील सीटवरील हालचाली पाहत होता. तो गडबडून ‘हो’ म्हणाला आणि मालकाला न विचारता त्याने गाडी थांबवली. मी दार उघडून उतरले. गाडीला अर्धा वळसा घातला. ड्रायवरच्या बाजूच्या सीटवर समोर बसले. दार लावून घेतले. मागे वळून सचिवांना शांतपणे म्हणाले, ‘सर, तुम्ही आता आरामात बसू शकता किंवा झोपू शकता. तुम्हाला डुलक्या येत होत्या नं..’ सचिव हडबडले आणि काही न सुचून लवंडले.
हा प्रसंग गंमत म्हणून किंवा सहजपणे का नाही नवऱ्याला सांगितला? कारण नंतरच्या प्रतिक्रियेचा अंदाज मी करू शकत होते. नवरा तर नवरा.. मी सचिवांबरोबर जाऊन आले एवढे पुरे होते. माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहणाऱ्यांची संख्या वाढली होती. मी पहिल्या दिवशी पुन:पुन्हा पाहिले पदरावर किंवा चेहऱ्यावर कुठे डाग किंवा कचरा किंवा खडू लागला होता का? तर नव्हता. पण लागला होता. अदृश्य रूपात. मी हादरून गेले.
रावसाहेबांच्या निधनानंतर देवढेसर एकदा घरी आले. माझ्या त्या कवितेतील ओळीमागे इंदिरा संतांच्या ओळी आहेत, हे त्यांनी एकदा सांगितले होते. स्थानिक महाविद्यालयात ते मराठीचे विभागप्रमुख होते. समीक्षा, टीका, संशोधन असे त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायचे. ते परगावीसुद्धा व्याख्यानांसाठी जायचे. त्यांच्या समीक्षा-ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. गावात त्यांना मान होता. तर ते एकदमच म्हणाले, ‘तर मॅडम, रावसाहेब आता गेलेत. तुमच्या आयुष्यातले एक पर्व संपले. तुम्ही काही सांगू नका. ते कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता, ते समाजसेवा म्हणजे काय नि कशी करीत होते; सत्कार आणि पुरस्कार कसे मिळवीत होते हे तुम्हाला जसे माहीत आहे तसे जगालाही माहीत आहे. मी तुमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करीत आहे असे समजू नका, पण तुमचा संसार कसा झाला हेही मला माहीत आहे. मी आज वेगळा प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे आलो आहे. तुम्हाला लेखन-वाचनाची आवड आहे, मला माहीत आहे असो. मी असे आग्रहाने म्हणतो की, तुम्ही आत्मचरित्र लिहा. ते नीट प्रसिद्ध होईल.. ते मी पाहतो..’
मी थक्कच झाले. मला सुचेना काय बोलावे ते. आणखीही बरेच बोलून ते चहा घेऊन निघून गेले. ते पुन्हा आले. नंतर येत राहिले. बोलत राहिले. त्यांच्या बोलण्याच्या प्रभावाने मी आत्मचरित्र लिहावे या निर्णयापर्यंत आले होते. पण मी विचार करू लागले. शाळेचा काळ सोडला तर आता माझ्याजवळ भरपूर वेळ होता. देवढेसरांचा आग्रह प्रामाणिक होता, हे माझ्या लक्षात आले होते. पण माझ्या आत्मचरित्रात काय हवे हे देवढेसर नुसते सांगू नाही तर ठरवू पाहत आहेत, हे माझ्या लक्षात येऊ लागले अन् मी अस्वस्थ झाले.
देवढेसर सतत पुरुषी मानसिकता, पुरुषी वर्चस्व, पुरुषी वृत्ती यांचे दर्शन रावसाहेबांच्या व्यक्तिचित्रणातून व्हावे असे सांगत होते. मला प्रश्न पडला की मग माझे काय? सरांचे म्हणणे असे की रावसाहेब प्रसिद्ध होते, प्रतिष्ठित होते, म्हणून या आत्मचरित्राला वाचक भेटतील. हे ऐकून तर मला अपमानित झाल्यासारखेच वाटले. बरेचदा तर असे व्हायचे की त्यांना जे वाटत असे तसे काही नसायचे. मग ते मी कसे सांगू? देवढेसर एकदा हळूच म्हणाले की ‘आताचे युग स्त्रियांच्या धाडसाचे, धैर्याचे युग आहे, तेव्हा तुमच्या संसारात म्हणजे शरीरसंबंधात रावसाहेबांकडून काही विकृती वगैरे.. तर तेही तुम्ही निर्भयपणे मांडा..’ मी विषण्ण हसले. मनातल्या मनात म्हणाले, ते संबंध तर केव्हाच त्यांनी थांबवले होते. त्यांना मी क्षुद्र आणि उपकृत जीव वाटत होते. प्रकृतीच नव्हती उरलेली तर विकृती काय सांगणार? पुढे पुढे तर देवढेसर पुरुष किती प्रकारे स्त्रीचे शोषण करू शकतो यांवर माझा क्लास घ्यायला लागले. आणि त्यातले किती प्रकार आमच्या संसारात घडले याची यादी करा आणि टिपणे काढा, असे सांगायला लागले. मला समजेना की असे करणे म्हणजे नवऱ्याने केलेल्या शोषणाचे दर्शन आहे की माझ्या झालेल्या शोषणाचे प्रदर्शन आहे? इतर प्रतिष्ठित पुरुषांचे अनुभव- म्हणजे सचिवांबरोबरचा प्रसंग वगैरे सांगून बुरखा फाडावा असेही देवढेसर यांनी सुचविले. मला असे वाटायचे की मी प्रसंगावधान राखून कसे त्यांना ओशाळवाणे केले हे सांगावे.. पण नाही. देवढेंचा एकच धोशा ..पुरुष..पुरुष..पुरुष..
मला वाटले की जगाला सांगावे की मी पुरुषाशिवाय जगले. पुरुषाबरोबर राहिले फक्त. मला नोकरी होती. आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होते. पण तसे करावेसे वाटले नाही. कारण वृत्ती उदासीन होत गेली होती. मी माझे जग भोवती साकारले होते. त्यात मी सम्राज्ञी होते. पुरुष कसे असतात हे बाईला जन्मल्यापासूनच कळायला सुरुवात होते. आणि बायकांचे काय? एकदा स्टाफरूममध्ये आम्ही चार-पाच जणीच होतो. आवडता हीरो आपापला सांगावा असा सूर निघाला. तर मी म्हणाले, ‘आमिर खान’! तर दोघी-तिघींनी नाके मुरडली. एक मॅडम तर करवादल्या, ‘काय बाई, या ताटेमॅडम! पाहून पाहून कोण निवडला.. तर मुसलमान, त्याच्यापेक्षा आमचा हृतिक रोशन कितीतरी पटीने बेस्ट नं..’
अशा वेळी काय करावे? वाटले आत्मचरित्र लिहायचे झाले तर मग माझ्याजवळ कितीतरी सांगण्यासारखे आहे. बालपणीची शाळा आहे, लगोऱ्या आहेत, भुलाबाईची गाणी आहेत, मावशीने केलेली आत्महत्या आहे, दळभद्री म्हणून नातेवाईकांनी केलेली हेटाळणी आहे, मामीने पाठीत बुक्का मारल्याने तोंडातून ताटात पडलेला घास आहे, कंदिलाच्या लवंडण्याने पेटलेली चादर आहे.. खूप काही. मला आपलं वाटायचं की स्त्री असो की पुरुष-सर्वानीच माणसासारखं वागावं! नाही वागत आता काही जण तसं.. तर काय? पाचही बोटं सारखी असतात का?- हे सगळं मी देवढेसरांना सांगितले तर ते म्हणाले, ‘ताटेबाई, हा भाबडेपणा आहे. तुम्हाला जीवनव्यवहारही कळत नाही आणि साहित्यव्यवहारही. असं मवाळ आणि ताकासारखं फुळ्ळुक आत्मचरित्र कोण वाचणार आहे. तुमच्या सुदैवाने तुमचं लग्न एका प्रसिद्ध आणि..’
मी देवढेसरांना थांबवलं. ‘सर, मला काहीच कळत नसेल पण माझं मन मला कळतं. तेवढंच माझ्याजवळ धन आहे. मला माझ्या मनासारखं वागता आलं पाहिजे. आणि मनात आलंच तर सर मी दोन आत्मचरित्र लिहीन. माझे आत्मचरित्र-भाग १-‘मी’. माझे आत्मचरित्र भाग २ – ‘पुरुष’. त्यात रावसाहेबांपासून तुमच्यापर्यंत सगळे येतील.’ देवढेसर चपापले.
हळूहळू निघून गेले.
माझ्या मनात विचार आला की एक असे आत्मचरित्र लिहावे ज्याच्या मुखपृष्ठावर असे नाव टाकावे : लेखिका : मीरा ताटे किंवा सुधा साठे किंवा शांता बाठे..
मीरा ताटे यांचे मनोगत
.. ‘मला काहीच कळत नसेल पण माझं मन मला कळतं. तेवढंच माझ्याजवळ धन आहे. मला माझ्या मनासारखं वागता आलं पाहिजे. आणि मनात आलंच तर सर मी दोन आत्मचरित्र लिहीन.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-11-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meera tate expressing her feelings