‘‘रतन टाटा दिलगिरी व्यक्त करू इच्छितात…’’असं फोनवर वेंकट म्हणाला आणि पोटात धस्स झालं. वेंकट तेव्हा रतन टाटा यांच्या कार्यालयाचा प्रमुख होता. ‘टाटायन’ लिखाण पूर्ण झालेलं होतं आणि प्रतीक्षा होती रतन टाटांच्या मुलाखतीची. एक भाग झालेलाही होता. दुसरी भेट ठरली आणि त्याआधी अर्धा तास हा फोन. मी म्हटलं, मुलाखत रद्द! पुन्हा पहिल्यापासून तयारी, वाट बघणं वगैरे आलं. ते कसं करायचं याचे विचार मनातल्या मनात लगेच सुरूही झाले. वेंकट पुढे बोलायला लागला म्हणून ते विचार थांबले. ‘‘…रतन टाटा यांना यायला १५ मिनिटं ते अर्धा तास उशीर होणार आहे, काही हरकत नाही ना… टाटांनी त्या विलंबासाठी दिलगिरी व्यक्त केलीये.’’ असं म्हणून तो थांबला.
काहीही काय? हा इतकासा उशीर होणार म्हणून टाटा खंत व्यक्त करतायत? अगदी ते न सांगता फिरकलेही नाहीत तरी त्यांना काय फरक पडणारे?
या अशा मुद्द्यांनी एरवी थक्क व्हायला झालं असतं, पण एव्हाना पहिली भेट झालेली होती आणि मूर्तिमंत टाटा सौजन्य म्हणजे काय ते पाहायला मिळालं होतं. त्यामुळे त्यांचा हा उशीर होणार असल्याचा निरोप अगदी सच्चा आहे… त्यामागे जराही देखावा नाही, हे लक्षात येत होतं. पाश्चात्त्य संस्कृतीतल्या उच्च जीवनमूल्यांचा संस्कार झालेली माणसं जेव्हा भारतीय संस्कृतीत वावरू लागतात, तेव्हा ती बऱ्याचदा ‘आपली’ वाटत नाहीत. त्यांचा साधेपणा ‘पुटॉन’ वाटतो. आम्ही ‘तुमच्यासारखे’ भारतीय कसे नाही, समोरच्याचा पाहा किती आदर करतो… वगैरे अव्यक्त भावना त्यामागे असाव्यात असं वाटतं आणि कान तयार असेल तर त्या ऐकूही येतात.
हे ही वाचा…प्रचारक… संघाचा कणा!
रतन टाटांबाबत असं कधीही झालं नाही. ‘टाटायन’साठी जेव्हा भेटी सुरू झाल्या तेव्हा वास्तविक ते ‘बॉम्बे हाऊस’मधनं बाहेर पडले होते. म्हणजे टाटा समूहाच्या प्रमुखपदावरनं पायउतार झाले असल्यानं मुख्यालय असलेल्या ‘बॉम्बे हाऊस’मधला आपला मुक्काम त्यांनी हलवला होता. हे टाटापण… जेआरडींनी ज्या दिवशी आपली राजवस्त्रं रतन टाटांच्या अंगांवर चढवली त्या दिवसापासून त्यांनी ‘बॉम्बे हाऊस’मध्ये येणं थांबवलं. रतन टाटा यांनीही तेच केलं.
का?
…तर आपल्या अस्तित्वामुळे आपल्या उत्तराधिकाऱ्यावर, त्याच्या निर्णयावर, त्याला भेटायला येणाऱ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून! यातली उदात्तता लक्षात घ्यायला हवी. एकदा सत्ता सोडली की मागे वळून पाहायचं नाही आणि उत्तराधिकाऱ्यावर दबाव येईल असं काही करायचं नाही! आणि जेआरडी, रतन यांनी सहज सोडलेल्या सत्तेचा आकार किती होता याची कल्पना करणंही अनेकांना शक्य होणार नाही, इतकी ती प्रचंड होती. आणि इथे हे टाटा अंगावरचा शर्ट काढून ठेवावा इतक्या सहजपणे आपली राजवस्त्रं सहज काढून ठेवत होते.
आणि गंमत अशी की, हे असं करायला त्यांना कोणी सांगितलेलं होतं का? तर तसंही नाही. स्वत:च घालून घेतलेला नियम. वयाची ७५ वर्षं पूर्ण झाली की हातातले निर्णयाधिकार सोडायचे. स्वत:चे हे नियम स्वत: सोडून इतरांनाच कसे लागू होतात, हे आपण आसपास पाहातो आहोतच.
पण रतन टाटा हे असे ‘आसपास’च्यातले नव्हते. त्यांनी हा नियम पाळला आणि कंपनीची सूत्रं उत्तराधिकाऱ्याहाती दिली. मग ‘बॉम्बे हाऊस’मध्ये येणं त्यांनी थांबवलं. हुतात्मा चौकात एका अरुंद गल्लीतल्या इमारतीत स्वत:साठी त्यांनी कार्यालय थाटलं. पुस्तकासाठीच्या भेटी तिथेच व्हायच्या. ही गल्ली इतकी अरुंद, नाठाळ गर्दीची की टॅक्सीतनं त्या इमारतीपर्यंत पोहोचायचं म्हटलं तरी वैताग यायचा. स्वत:च्या गाडीतनं तर जाऊच नये असं वाटायचं. पण आपण गाडीतल्या गाडीत बसून चडफडत, आसपासच्या बेशिस्त गर्दीच्या, कसलाही आकार-उकार नसलेल्या समूहाच्या नावे बोटं मोडत कसंबसं त्या इमारतीपर्यंत पोहोचतोय, तर तिथे सर्व काही कसं उत्तम आहे असं वाटावं अशा प्रफुल्लित चेहऱ्यानं रतन टाटा आलेले असायचे. उशीर होणार असला तरी आल्यावर जणू पायघड्यांवरनं आत आलेत इतके ते प्रसन्नचित्त! त्यांना तसं पाहून स्वत:ला प्रश्न पडायचा- मग आपली ज्यावरनं चिडचिड झालेली होती, ती परिस्थिती काय होती? तिचा यांना काहीच कसा त्रास झालेला नाही?
त्यावेळी काही ना काही निमित्ताने रतन टाटा भेटत गेले. एकदा राज ठाकरे यांच्या ‘ब्लू प्रिंट’चं त्यांच्यासमोर सादरीकरण होणार होतं. त्यासाठी त्यांनी बराच वेळ काढलेला. महाराष्ट्राच्या विकासासाठी काय काय करायला हवं, काय आणि कसं करता येईल… असं बरंच काही ते सांगत गेले. त्यातला एक मुद्दा होता महाराष्ट्रानं पर्यटनाकडे कसं लक्ष द्यायला हवं हा! पर्यटन क्षेत्राची रोजगार निर्मिती क्षमता किती प्रचंड आहे याची सोदाहरण माहिती ते सहज देत गेले. अगदी आकडेवारी आणि बारीक-सारीक तपशिलांसह. किल्ल्यांचं काय करता येईल, कोकणातला सागरी पट्टा कसा अधिक पर्यटक आकर्षित करू शकेल वगैरे… आणि त्या सगळ्या मांडणीमागे एका यशस्वी उद्याोगपतीचा आग्रह अजिबात नव्हता. अशा एका चर्चेनंतर निघताना त्यावेळी त्यांनी ‘काय, पुस्तकाचं कुठवर आलंय?’ हे विचारल्यावर वाटून गेलं, काय या माणसाला याची गरज आहे? इतकी पुस्तकं लिहिली गेलीयेत टाटा समूहावर… ती सुद्धा इंग्रजीत… आणि हे मराठी पुस्तक तर त्यांनी वाचण्याची शक्यताही नाही… तरी रतन टाटा नावाची आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्ती हे असं विचारतेय…!
हे ही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : तिसरा डोळा…
अद्भुतच होता तो माणूस ! पाहिलं तरी काही तरी वेगळं वाटायचं. साधा कॉटनचा, चौकडीचा शर्ट. त्याला साजेशी विरोधी रंगातली पँट- तीही कॉटनची. दोघांचेही रंग अजिबात दिलखेचक वाटणार नाहीत असे. हलके. फिके पेस्टल कलर. उठून उभे राहिले तर डावा हात खिशात ठेवून बोलायची सवय. उंचीमुळे पाठीला किंचितसा बाक आलेला. एरवी कोणा सामान्य माणसाची देहबोली अशी असेल तर त्याची गणना ‘पोकाड्या’ अशा खास शब्दात कोणी केली असती. पण हे असं किंचितसं पुढे झुकणं रतन टाटांना शोभून दिसायचं. आणि या पेहरावाच्या आत लालबुंद अशी गोरी कांती. जोरात हसले तर चेहराही लालसर व्हायचा. सर्वसाधारणपणे इतक्या सामाजिक उंचीचा दुसरा कोणी भेटला तर त्याच्याशी संवाद साधताना त्याच्या उंचीचा अडथळा येतो. अगदी इतक्या मोठ्या माणसासमोर चहा प्यायचा झाला तरी चहाचा ओठातनं सुटलेला एखादा चुकार थेंब कपावरून आपल्या कपड्यावर तर ओघळणार नाही ना, ही भीती आपल्याला साधा चहाही सुखानं पिऊन देत नाही. रतन टाटांसमोर मात्र अशी कोणतीही अनामिक भीती वाटायची नाही. समोरचा आपल्या व्यक्तिमत्त्वानं आधीच दबून गेलाय… त्याला आणखी लहान वाटेल असं काही आपण करायला नको, असं बहुधा त्यांनी स्वत:लाच बजावून ठेवलेलं असणार. त्यामुळे मोर जसा पिसारा सहज वागवत वावरतो, तसं रतन टाटा स्वत:चं हे साधेपण वागवायचे. हे टाटा नावातलंच काही वैशिष्ट्य असावं. त्यांचे भाऊ नोएल हेही असेच. एक अधिकारी सांगत होता, ‘सीसीआय’ क्लबमध्ये येऊन बसले तरी अनेकांना कळतही नाही हे नोएल टाटा आहेत ते. त्यांच्या मुलाचं मध्यंतरी लग्न झालं तर त्याची चार ओळींची बातमीही नाही कुठे. नाहीतर… असो! परत आपल्याकडची गंमत अशी की ऑन रेकॉर्ड साधे असणारे, कॅमेऱ्यासमोर तो साधेपणा मिरवणारे ऑफ रेकॉर्ड वेगळेच असतात. पत्रकारितेतल्या चार दशकांनी ऑन रेकॉर्ड आणि ऑफ रेकॉर्ड यातली दरी किती रुंद असते हे अनेकदा दाखवून दिलंय. रतन टाटा हा या वास्तवाचा सन्माननीय अपवाद. एकदा टाटा समूहासंदर्भात लिहिताना काही संदर्भ हवा होता. पण आता तर मुलाखत होणार नव्हती. वेंकटच्या कानावर घातलं. त्यानं फोन नंबर दिला. ‘‘या नंबरला कर, मार्ग निघेल.’’ म्हणाला. त्याला विचारलं… ‘‘कोण असेल या नंबरवर? त्याचं नाव सांग, म्हणजे त्यांना तुझा संदर्भ देईन.’’ या प्रश्नावर वेंकटच्या उत्तरानं माझा शब्दश: आ वासला. तो म्हणाला, ‘‘कोण असतील म्हणजे काय? रतन टाटा.’’
‘‘ते स्वत: फोन उचलतील?’’ या माझ्या प्रश्नानं त्यानं होकार दिल्यानं तो आणखी मोठा झाला. माझी प्रतिक्रिया पाहून तो म्हणाला, ‘‘इतकं जर ऑकवर्ड वाटत असेल तर त्यांच्या खासगी आयडीवर मेल कर… ते उत्तर देतील.’’ रतन टाटा यांनी ते खरोखर दिलं. माणसांतला साधेपणा, त्याचं प्रेमळ असणं हे सगळं खरं असेल तर ते माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं. म्हणजे माणसांची बनवेगिरी एकवेळ माणसांना कळणार नाही. प्राण्यांना ती बरोब्बर कळते. माणसाचा खरेपणा खरा नसलेली माणसं प्राण्यांना जवळ ओढओढून छायाचित्रं काढून घेतात आपल्या प्रसिद्धीसाठी. खरा प्राणीप्रेमी केवळ कॅमेऱ्यासाठी साधा असूच शकत नाही. रतन टाटांकडे पाहिलं की हा मुद्दा लक्षात येईल. ते बॉम्बे हाऊसमध्ये येताना पाहणं हा एक रम्य सोहळाच असायचा. त्यांची गाडी आली की त्यात रतन टाटा आहेत हे आसपासच्या कुत्र्यांना कसं कळायचं हे सांगता येणं अशक्य. पण ते आले की आसपासच्या दहावीस कुत्र्यांचा गराडा पडायचा गाडीला. आणि हे मग उतरल्यावर जणू कोणी वर्गमित्र असावेत असं त्यांना हाय-हॅलो करत करत बॉम्बे हाऊसमध्ये शिरणार. मागे कुत्र्यांचं लटांबर तसंच… आतपर्यंत साथ द्यायचं. नंतर तर रतन टाटांच्या सांगण्यावरनं बॉम्बे हाऊसच्या तळमजल्यावर या रस्त्यावरच्या कुत्र्यांची कायमचीच व्यवस्था केली गेली. बऱ्याचदा शनिवारी गेट वे ऑफ इंडियापाशी अनेकांना रतन टाटा दिसलेही असतील. ते, त्यांचे दोन कुत्रे मोटारीतनं उतरायचे आणि छोट्याशा स्वत:च्या खासगी बोटीतनं अलिबागला जायचे. आपण बरं आणि आपले कुत्रे बरे…! लंडनला बकिंगहॅम पॅलेसमध्ये प्रिन्स चार्ल्सच्या भेटीचं कुत्र्यांची गैरसोय होईल म्हणून निमंत्रण नाकारणारा हा माणूस… सभ्यता, सुसंस्कृतता अंगात नसानसांत भिनलेली. एकदा त्यांना त्यांचा टाटा आणि सिंगापूर एअरलाईन्सचा भारतात स्वतंत्र विमान कंपनी काढण्याचा विचार का सोडून द्यावा लागला, यावर खूप छेडलं. त्यावेळच्या केंद्र सरकारातील दोन मंत्र्यांचा टाटांच्या विमान कंपनीला विरोध होता. का, ते समजून घेणं अवघड नाही. त्यांच्या ‘अपेक्षां’कडे टाटांनी पूर्ण दुर्लक्ष केलं. त्या अपेक्षांची पूर्ती त्यांच्या तत्त्वात बसत नव्हती. त्यांनी प्रकल्प सोडून दिला. या दोन मंत्र्यांविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार करावी, त्यांच्या विरोधात बातम्या पेराव्यात असं काहीही त्यांनी केलं नाही. करावं असं त्यांना वाटलंही नाही. मग त्यावेळी ‘जेट एअरवेज’ सुरू झाली. तिचं पुढे काय आणि कोणामुळे झालं हे सांगण्याची गरज नाही. जेट एअरवेज काळाच्या पडद्याआड जात असताना टाटा समूहाकडून अन्याय्य मार्गाने सरकारने हिसकावून घेतलेली ‘एअर इंडिया’ त्यांच्याकडे परत येत होती आणि टाटा-सिंगापूर एअरलाईन्सची ‘विस्तारा’ देखील विस्तारू लागली होती. एक वर्तुळ पूर्ण झालं.
पण त्या प्रवासात आलेल्या अनुभवांविषयी एका शब्दानं कधी रतन टाटा वाईट बोललेले नाहीत, की कधी ‘त्या’ राजकारण्यांना त्यांनी बोल लावले नाहीत. त्याविषयी फार विचारल्यावर… ‘‘इट्स ओके… सच थिंग्स डू हॅपन.’’इतकंच काय ते त्यांचं म्हणणं. एका माध्यमसमूहाने त्यांची… म्हणजे टाटा समूहाची… मध्यंतरी फारच बदनामी चालवलेली होती. त्याविषयीदेखील त्यांच्या तोंडून एक चकार शब्द कधी निघाला नाही. सायरस मिस्त्री यांची निवड आणि नंतर हकालपट्टी हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात कटू प्रसंग असणार. पण त्याविषयी नंतर कधी खुद्द ना रतन टाटा काही बोलले, ना कधी मिस्त्री कुटुंबीयांनी कधी काही प्रतिक्रिया दिली. हे असं वागायला कमालीची साधना हवी.
हे ही वाचा…कारवीचं फुलणं… एक क्लेशदायक अनुभव
ती त्यांनी कधी, कुठे केली कोणास ठाऊक. शक्यता ही की, तसं काही वेगळं त्यांना करावंच लागलं नसणार. तो त्यांच्यातल्या टाटापणाचा भाग. मध्यंतरी कुठे तरी वाचलं, रतन टाटांच्या मुंबईतल्या आधीच्या छोटेखानी फ्लॅटमध्ये कोणी नातेवाईक आले की रतन जातीनं कसे सगळ्यांची सरबराई करायचे ते. आजही त्यांच्या घराच्या आसपासचे शेजारी-पाजारी रतन टाटांविषयी इतके प्रेमाने बोलत असतात की ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ हा सल्ला रतन टाटा यांच्याबाबत कधीच पूर्ण झाला नसता. त्यांचं आयुष्य पाहिलं की रेमंड्सच्या जुन्या जाहिरातीतली एक कॉपी आठवते. त्या जाहिरात मालिकेतल्या पुरुषाचं वर्णन तीत असायचं- ‘द कम्प्लीट मॅन’.
ते बहुधा रतन टाटाच असावेत! girish.kuber@expressindia.com