मेघना भुस्कुटे

पद्मजा फाटक यांच्या लिहिण्यात आणि जीवनदृष्टीत एक प्रकारचा रसरशीतपणा, जीवनसन्मुखता, निकोपता दिसते, ती लोभस वाटते. बहुतांश स्त्रीवादी लेखिकांना त्यांच्या आविष्कारासाठी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर शहरी अवकाश उपलब्ध झाला, हे सत्य आहे. पण हा अवकाश पद्मजाच्या कथांचा- खरं तर सगळय़ाच लेखनाचा- आतलेपणानं हिस्सा झाल्याचं दिसतं. त्यांच्या अवघ्या लिहिण्यातून त्याच्या खाणाखुणा सतत दिसत राहतात.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
salman rushdi the satanic verses in india
The Satanic Verses: बंदीच्या चार दशकांनंतर सलमान रश्दींचं ‘दी सटॅनिक व्हर्सेस’ भारतात परतलं; १९८८ मध्ये जारी केले होते आदेश!
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
My Portfolio answer to finding right bearing NRB Bearings Limited
माझा पोर्टफोलिओ : सुयोग्य बेअरिंगच्या शोधाला उत्तर
Lokstta lokrang Journalism Law Director Documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…

एकेरीत उल्लेख करायला पद्मजा फाटक मला समवयस्क नव्हे. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर वगैरे लोकांसारखी आपोआप एकेरीतली जवळीक प्राप्त होण्याइतकी सुप्रसिद्ध आणि थोर कलावंतही नव्हे. पण तरीही तिच्याशी झालेल्या पहिल्याच पुस्तकभेटीनंतर तिच्याविषयी ‘आदरणीय लेखिका पद्मजा फाटक’ या जातीचं काही न वाटता मैत्रिणीसारखी जवळीक वाटली आणि वाटतच राहिली, त्यामागची कारणं किंचित गुंतागुंतीची आहेत.

ललित लेखिका म्हणून आज मराठीत ती फारशी प्रसिद्ध उरलेली नाही. ‘बाराला दहा कमी’ आणि ‘हसरी किडनी’ यांसारखी तिची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. पण ‘गर्भश्रीमंतीचं झाड’ आणि ‘सोनेलूमियेर’ हे सुरेख ललितलेखसंग्रह सहजासहजी मिळत नाहीत; मग तिच्या सुरुवातीच्या काळातले ‘राही’ आणि ‘दिवेलागणी’ हे कथासंग्रह कुठून मिळणार? मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं आणि नंतर एका मित्राच्या शोधक नजरेमुळे मला ‘दिवेलागणी’ हा कथासंग्रह मिळाला.

 या कथासंग्रहाविषयी सांगण्यापूर्वी पद्मजाची थोडी पार्श्वभूमी सांगणं भाग आहे. आज ती हयात असती तर ऐंशी वर्षांची असती. साधारण तिच्या विशीबाविशीपासून ती लिहीत होती असावी. आई-वडील दोघेही सुशिक्षित, नोकरदार. लहानपणापासून कायम शहरात झालेलं वास्तव्य. उच्चशिक्षण, लेखनप्रकल्प, सांस्कृतिक वर्तुळातला वावर, मुलाबाळांसकट सुफळसंपूर्ण संसार, पुरस्कार आणि वाचकप्रियता अशा दोन्ही आघाडय़ांवर लेखनात मिळालेलं यश.. अशा सगळय़ा प्रकारे ती चमकदार, पण चाकोरीतली व्यक्ती होती. पण लेखिका ऊर्फ स्त्रीलेखक म्हटल्यावर बंडखोरी वा बोल्डनेस वा स्त्रीस्वातंत्र्याचे झेंडे वाहण्याची जबाबदारी वा शोषित अबलांचा कळवळा अशा ज्या गोष्टी बघणाऱ्याच्या नजरेत आपोआप उमटतात, त्यांपैकी कुठल्याही गोष्टींच्या अभिनिवेशाची ओझी तिच्यापाशी मुळातच नव्हती. पण म्हणून ती झापडबंद होती असं मात्र नव्हे. स्त्रीवादाचं चोख भान तिच्यापाशी होतं. हे माझ्या मते तिचं सगळय़ांत मोठं वैशिष्टय़. विवेक, वैज्ञानिकता, तर्कशुद्धता, सर्वार्थानं कॉस्मोपॉलिटन नजर ही सगळी आधुनिक मूल्यं.. त्याखेरीज आलेली.

‘दिवेलागणी’ या कथासंग्रहात तिची ही सगळी वैशिष्टय़ं दिसतातच, शिवाय त्या-त्या मूल्यांना अनेकदा लगडून येणारा तर्ककठोरपणा न येता मानवी भावनांविषयी असलेलं कुतूहल आणि आस्था दिसत राहतात.

अंतर्बा शहरीपणा हा तिचा ठळकपणे जाणवणारा गुण. ‘बेस्ट’च्या बसमधल्या सहप्रवासिनीच्या इतिहास-भूगोलाविषयी आडाखे बांधणारी निवेदिका ‘मूर्त’ या कथेमध्ये आहे. त्यातून तिच्या शहरी अवकाशाची भौतिक खूण पटते. ‘सर्किट हाऊस’ या कथेत अस्तित्ववादी प्रश्नांमध्ये गुरफटलेला लेखक-निवेदक ऑटो-पायलट मोडवरून सराईतपणे मागे पडणाऱ्या उपनगरी स्टेशनांची नोंद घेताना दिसतो. ‘म्हाताऱ्या’ या कथेतली तरुण नायिका आपल्या म्हाताऱ्या आईच्या काश्मीर सहलीची तयारी करून देणारी. आपल्याला पाठमोरं बघणाऱ्या आपल्या आईला नि तिच्या मैत्रिणीला आपल्या ‘स्मार्ट’ दिसण्याची असोशी असेल हे उमजून दमले-भागलेपण विसरते आणि उंच टाचांमधली आपली आकृती बघता बघता ताठ करून आत्मविश्वासानं पावलं टाकत जाते. अशा कितीतरी शहरी आणि त्यातही मुंबईसारख्या आधुनिक शहराच्या खाणाखुणा या कथांमध्ये विखुरलेल्या आहेत. पण पद्मजाचा शहरीपणा या भौतिक आणि भौगोलिक खुणांपुरता मर्यादित नाही. तिचं खरंखुरं कॉस्मोपॉलिटन शहरीपण तिच्या नायक-नायिकांच्या मूल्यव्यवस्थेपर्यंत झिरपलेलं दिसतं. ‘हायड्रिला’ या कथेत कुठल्याच अस्मितांची आणि परंपरांची मुळं नसलेला विद्याधर हा नायक आहे. कुटुंबव्यवस्था, जातीचं वर्तुळ, भाषिक अस्मिता, प्रादेशिक लागेबांधे.. त्याला स्पर्शत नाहीत. त्याला मानवजातीशी जोडणारा धागा आहे, तो माणसाच्या पिढय़ानपिढय़ा चालत आलेल्या संतत ज्ञानतृष्णेचा.

‘पाहुणा’ या कथेची नायिका मध्यमवयीन पुरंध्री आहे. ध्यानीमनी नसताना पदरात आलेलं अवेळचं गरोदरपण खुडून टाकण्याचा तर्कशुद्ध, विचारी निर्णय ती घेते खरी. तो शांतपणानं पार पाडते. पण सगळं धडपणी झाल्यानंतरही कुठलंही दृश्य वैद्यकीय कारण नसताना शरीराला आलेलं घायाळपण आणि मनाची कासाविशी हटता हटत नाही म्हटल्यावर अंतर्मुख होत जाते. स्त्रीचा स्वत:च्या शरीरावरचा हक्क आणि पूर्ण निर्मितिक्षम शरीरापासून काहीतरी हिरावून घेतलं जाताना होणारी िहसा यांच्यातलं द्वंद्व निरखून पाहते. आधुनिक दृष्टी असलेल्या व्यक्तीमधली ही तरल संवेदनशीलता हे या सगळय़ाच कथांचं वैशिष्टय़ आहे. ‘अनअव्हॉइडेबल एक्स्पेंडिचर’ या कथेतली नायिका याच संवेदनशीलतेपोटी स्वत:ला आरोपी करून प्रश्न विचारते आणि सरतेशेवटी आपणही जगासारखे ‘सोयीस्कररीत्या’ संवेदनशील अशा औषधाच्या कडू गोळीसारख्या गिळाव्या लागणाऱ्या निष्कर्षांवर येणारी, तशीच ‘अनुभव’ आणि ‘दिवेलागणी’ या एकाच जातकुळीच्या कथांची नायिकाही. म्हटलं तर त्यांतलं ‘विवाहित स्त्रीचा मित्र’ हे सूत्र काहीसं सरधोपट आहे. पण त्याकडे बघण्याचा नजरिया मात्र खास पद्मजाचा. ‘मैत्रीची एक स्वतंत्र कमिटमेंट’ असते आणि ‘संपून गेलेल्या मैत्रीचीही डिग्निटी’ सांभाळायची असते असं मानणारी त्यातली नायिका पारंपरिक कौंटुबिक चौकटीविरुद्ध बंड करत नाही, पण मैत्र या अतिशय आधुनिक नात्याचं मोठेपण मात्र ती मनोमन मानणारी आहे.

‘विदुर’ या कथेतल्या नायिकेला एका उतरत्या दुपारी चक्क भूत दिसावं तशा एका वृद्ध आणि मृत परिचितांचं दृश्यरूप समोर साकारताना दिसतं. ‘आपण हे नक्की काय अनुभवतो आहोत?’ असा प्रश्न मनात उमटत असताना, पूर्ण जागेपणी आलेला हा अनुभव. पण नायिकेची त्याकडे पाहणारी दृष्टी सजगपणे विज्ञाननिष्ठ आहे. पण तसं असूनही ती तो अनुभव नाकारत नाही. चाकोरीबाहेरचं आयुष्य जगण्याची ओढ, त्याकरता घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांमधून अपरिहार्यपणे दुखावले जाणारे आप्त, वार्धक्यामधली असहायता, एकंदर मानवी आयुष्यातलं स्वयंनिर्णयाचं क:पदार्थ स्थान.. अशा मोठा आवाका असलेल्या प्रश्नांकडे वळण्याकरता एका अद्भुत अनाकलनीय अनुभवाचा माग वापरावा, तशी ती कथा.

दात विचकत आणि बाहू फुलवून दाखवत, एकमेकींसमोर गोल-गोल फिरून एकमेकींच्या शक्तिसामर्थ्यांचा अंदाज घेत धिम्या, पण निश्चित गतीनं, बाहेरच्या वर्तुळांतून अधिकाधिक आतल्या स्नेहवर्तुळांमध्ये शिरत जाणाऱ्या दोन टोकदार स्त्रियांविषयीची कथा म्हणजे ‘माझ्या मुलीचा गॉडफादर’. हिंदी सिनेमानं भावनातिरेकी केलेल्या मैत्री नावाच्या एका नातेसंबंधात किती प्रकारची सूक्ष्म राजकारणं, डावपेच, खेळय़ा-प्रतिखेळय़ा असतात त्याचं भान ही कथा आणवून देते. मात्र तिचा शेवट कडवट नाही. त्यात मैत्री या नात्याविषयीचा उमदा आशावाद आहे.

‘स्पर्शाची’ ही कथा पूर्णत: वेगळय़ा वाटेवरची. कुणी नेटके शब्द साठवावेत, कुणी सुरांचा छंद करावा, तशी निरनिराळे स्पर्श भोगून पाहणारी, साठवून ठेवणारी, त्यांद्वारे संवाद साधू पाहणारी एक मनस्वी स्त्री आणि तिच्या मैत्रीत पडलेली नायिका. या कथेच्या विषयात आणि कथानकात वेधक निराळेपण आहेच. पण त्याहूनही मला अतिशय आवडते, ती लेखिकेनं रेखाटलेल्या नायिकेची स्वत:च्या संकुचितपणाकडे हसत हसत लक्ष वेधणारी दृष्टी. मैत्रिणीच्या जगावेगळय़ा छंदावर आक्रमकपणे हल्लाबोल करताना नायिकेचा आवाज ‘चिरकतो’ आणि अखेर ती ‘धांदरटासारखी’ माघार घेत मैत्रिणीच्या बोलण्याचा खुल्या मनानं विचार करू बघते. तिला आपल्या चौकटी मोडायच्या नाही आहेत, पण त्याच वेळी त्याबाहेरच्या जगाविषयी तुच्छता नाही, उत्सुकता आहे.

हे मिश्रण सुरेख तर होतंच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे माझ्या िपडाला आणि जडणघडणीला जवळचं वाटणारं होतं. बहुतांश स्त्रीवादी लेखिकांना त्यांच्या आविष्कारासाठी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर शहरी अवकाश उपलब्ध झाला, हे सत्य आहे. पण हा अवकाश पद्मजाच्या कथांचा- खरं तर सगळय़ाच लेखनाचा- आतलेपणानं हिस्सा झाल्याचं दिसतं. तिच्या अवघ्या लिहिण्यातून त्याच्या खाणाखुणा सतत दिसत राहतात. तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून, सुशिक्षित-कमावती-प्रॅक्टिकल आई आणि नास्तिक-नि-प्रेमळ वडील लाभण्यातून, चौकोनी कुटुंब मिळण्यातून, शहरातला जन्म नि वास्तव्य असण्यातून, चिकित्सक नि विवेकी संवेदनशीलतेतून, अगदी उच्चवर्णीय उच्च-मध्यमवर्गीयपणातूनही – तिच्या लिहिण्याला जो विशिष्ट आकार आला, तो मधली चाळीस वर्ष ओलांडून माझ्यापर्यंत थेट येऊन पोचला, मला भिडला. कॉस्मोपॉलिटन शहरांमधल्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्था आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर्स, लेखन-वाचन-सिनेमे-नाटकं-शिक्षण-परिसंवाद इत्यादी सारस्वती वर्तुळं, उच्चवर्णीय समाजातल्या जन्मामुळे आणि सुधारकी कुटुंबांमुळे परंपरांशी झगडावं न लागता त्यांचे फायदे तितके मिळणं नि तरी त्यांकडे पाहायची जबाबदार नजर म्यान न करता येणं, स्त्रीत्वाचा अहं वा न्यून असा कुठलाच गंड नसणं.. हे सगळं मॅचिंग असल्यामुळे – वा निदान हवंहवंसं असल्यामुळे – ती मला एखाद्या समवयस्क मैत्रिणीसारखी भासली.

पुढे अतिशय आवडीनं मिळवलेल्या तिच्या सगळय़ा लेखनात तिचा हाच स्वभाव बर्करार राहिलेला जाणवला. उतारवयात किडण्या निकामी झाल्यावर करावं लागलेलं किडणीचं रोपण, त्यासाठी मित्रपरिवारातून आर्थिक बळ मिळवणं, ते करताना िमधेपण न येऊ देणं, सतत विवेकी दृष्टिकोनातून आपल्या कृतींची योग्यायोग्यता तपासत राहणं, तसं करताना किडणीच्या आजारपणाचे तपशील-त्याबाबतची सामाजिक-वैद्यकीय निरीक्षणं-आत्मपरीक्षण नोंदणं.. हे सगळं लीलया कवेत घेणारं ‘हसरी किडणी’ हे पुस्तक काय, किंवा अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास अशा ढोबळ वर्णनात कसंबसं(च) बसेल असं ‘बाराला दहा कमी’ हे पुस्तक काय. विवेकी-अभ्यासू-व्यापक-आधुनिक नजर आणि त्याच वेळी स्वभावातला गमत्येपणा ही तिच्या लिहिण्याची व्यवच्छेदक लक्षणं. बायका आणि दागिन्यांशी असलेले त्यांचे (आणि तिचे स्वत:चे) संबंध, दगडांची झाडं बनवण्याची खास अमेरिकी कला, तिच्या आजारपणात तिला आलेले काही अतींद्रिय अनुभव आणि खास पद्मजा-पद्धतीत शोधलेली त्यांची वैज्ञानिक स्पष्टीकरणं, लहान मुलांचं साहित्य, आइनस्टाइनचं घर.. यांवरचं तिचं लिहिणं आजारपणानंतर आणि वाढतं वय जमेस धरूनही विलक्षण ताजं-तरुण होतं. ‘स्मायली’, ‘टेडी बेअर’, ओरिगामीत भेटणारा जपानी करकोचा अशा गोष्टींवर लिहून त्यांच्याशी आधुनिक समाजांचे असलेले लडिवाळ संबंध उलगडून दाखवावेत, तर ते तिनंच.

मराठीत सशक्त स्त्रीवादी ललितलेखनाची परंपरा आहे. त्यांच्याशी तुलना करता काय दिसतं? गौरी जवळ जवळ परग्रहावरची वाटावी अशा जगातली भासणारी. तिच्या साहित्यातल्या विश्वाला मराठी मध्यमवर्गीय मर्त्य जगाचे नियम जणू लागूच नाहीत. सानिया कमाल गंभीर आणि अनेकदा वाचकावर विसंबून अनेक गोष्टी न उच्चारता सोडून देणारी. मेघना पेठेचं नातं मला गौरी वा सानिया यांच्यापेक्षाही जी. ए. कुलकर्णीशी अधिक जवळचं वाटतं. पद्मजाच्या लिहिण्यात आणि जीवनदृष्टीत एक प्रकारचा रसरशीतपणा, जीवनसन्मुखता, निकोपता दिसते – लोभस वाटते.

आमच्यात इतकं सगळं मॅचिंग नसतं नि मी एखाद्या खेडय़ात जन्मलेली, शिक्षण घेणाऱ्या पहिल्याच पिढीतली, पारंपरिक स्त्री – किंवा अगदी पुरुषच असते – तर आमची अशी नि इतकी मैत्री झाली असती का? कदाचित झाली असतीही. पण मी तिला एकेरीत संबोधू शकले नसते. तितकं अंतर तरी आमच्यात राहिलंच असतं.

व्यवसायाने जर्मन भाषातज्ज्ञ. छंदाने वाचक, ब्लॉगर आणि मराठी शुद्धलेखन तसेच व्याकरण अभ्यासक. समाजमाध्यमांवर जुन्या ठाणे शहरातील खाणा-खुणांची छायाचित्रे प्रसारित करण्यासाठी आणि सामाजिक प्रश्नांसाठी सर्वाधिक सक्रिय. ‘अजुनी या शहरात’ हा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित. ‘मराठी उपक्रम’ या फोरममधून ‘पुस्तक गप्पा’ हा अभिनव प्रयोग करणाऱ्या गटात सहभागी.

meghana.bhuskute@gmail.com

Story img Loader