या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनोहर पारनेरकर

samdhun12@gmail.com

गझलप्रेमी रसिकांच्या जगात मेहदी हसन ‘शहेनशहा-ए-गझल’ म्हणून ओळखले जातात. (यापुढे मी त्यांचा उल्लेख ‘खाँसाहेब’ म्हणून करणार आहे.) २०१२ साली खाँसाहेबांचं निधन झालं. या दु:खात काही क्षणांसाठी का होईना, पण भारत आणि पाकिस्तान एक झाले होते. त्यांच्या निधनाला आठ वर्ष झाली तरी आजही ते सर्वात प्रख्यात गझल गायक म्हणून ओळखले जातात. आजही अनेक ठिकाणी त्यांच्यावर भरभरून लिहिलं जातं. आणि अजूनही भारतीय उपखंडात गझलच्या या सुपरस्टारवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. भारतीय उपखंडातील संगीतप्रेमींपैकी काहींनी त्यांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं नसलं तरी आपल्या हयातीतच दंतकथा बनलेल्या या पाकिस्तानी गझल सुपरस्टारचं नाव मात्र निश्चितच ऐकलं असेल. त्यापैकी अनेकांनी त्यांची ‘रंजिश ही सही दिल को दुखाने के लिये आ..’ ही अतिशय लोकप्रिय गझल निश्चितच ऐकली असणार.

‘शहेनशहा-ए-गझल’ हा अतिशय समर्पक असा किताब खाँसाहेबांना मिळाला, त्याला त्यांचे अनेक गुणधर्म कारणीभूत आहेत. ते थोडक्यात असे : काठमांडू ते कोझीकोडे, मुंबई ते मुलतान, दिल्ली ते दुबई आणि लंडन ते लॉस एंजेलिसपर्यंत सर्वदूर पसरलेल्या चाहत्यांना मोहिनी घालणारा त्यांचा खर्जातला, मखमली, जरासा हस्की आवाज, सच्चा सूर आणि तालावरची पकड, उर्दू भाषेचे अस्खलित उच्चार, तान, मींड, गमक या सांगीतिक अलंकारांचा केलेला कौशल्यपूर्ण वापर रसिकांना मंत्रमुग्ध करतो. त्यांची उर्दू काव्यातल्या भावांची जाण, त्यांचं तोलूनमापून केलेल्या लयबद्ध आघाताने युक्त असं काव्यातील वाक्यांशाचं स्पष्ट उच्चारण, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं सखोल ज्ञान- जे रागदारीवर आधारलेल्या त्यांच्या गझलांच्या अनेक चालींवरून लक्षात येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे संगीताची जाण असलेल्या किंवा नसलेल्या- दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांना स्पर्शून आणि हलवून सोडण्याची त्यांची विलक्षण क्षमता. जाणीवपूर्वक असेल किंवा योगायोगाने झालं असेल, पण खाँसाहेबांच्या गझलांमध्ये उत्तम उर्दू काव्य आणि उत्तम रागदारी संगीत यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. त्यांच्या एकंदर गझलांच्या संदर्भातील या विलक्षण अंगाबद्दल या सदरात नंतर विस्ताराने लिहिणार आहेच; पण या लेखात त्यांचं जीवन आणि कला याबाबतीत जरा कमी माहिती असलेल्या अंगाबद्दल लिहिणार आहे.. ते म्हणजे त्यांची भारतीय असलेली मुळं. ती पिढीजात, सांस्कृतिक आणि अर्थातच सांगीतिक आहेत.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला अतूट दुवा बनलेल्या खाँसाहेबांचा जन्म राजस्थानातील शेखावती भागातल्या लुना नावाच्या छोटय़ाशा गावात झाला. १९४७ साली फाळणीनंतर ते जेव्हा पाकिस्तानात गेले, तेव्हा  २० वर्षांचे होते. त्यांच्या कलावंत घराण्याच्या बाराव्या पिढीचे ते प्रतिनिधी. कलावंत बिरादरी म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची, विशेषत: धृपद गायकीची पुरातन परंपरा जतन करून पुढे नेणाऱ्या उत्तर भारतीय कुटुंबातील गायक! खाँसाहेबांचे पूर्वज धृपदिये होते. त्यातले बहुतेक राजस्थानातील छोटय़ा छोटय़ा संस्थानांमध्ये राजगायक होते. जयपूर, उदयपूर, बिकानेर, ग्वाल्हेर यांसारख्या मोठय़ा संस्थानांच्या दरबारांतून त्यांना कधी कधी कार्यक्रमाची निमंत्रणं यायची. धृपद गायकीची समृद्ध परंपरा खाँसाहेबांना वारशाने मिळाली होती. याच परंपरेमुळे पुढे त्यांच्या गझल गायनाच्या शैलीला वैशिष्टय़पूर्ण आकार मिळाला.

खाँसाहेब आठ-नऊ वर्षांचे असताना त्यांचा पहिला कार्यक्रम झाला. यातली खास बाब अशी की, हा कार्यक्रम बडोदा संस्थानाचे सर महाराज सयाजीराव गायकवाड (१८६३-१९३९) यांच्यासमोर झाला. या कार्यक्रमाचे जे काही वृत्तांत उपलब्ध आहेत त्यावरून असं म्हणता येईल की, या विस्मयकारी लहान मुलाने वसंत रागातल्या दीर्घ आलापांनी महाराजांना मंत्रमुग्ध केलं होतं. आणि एक आश्चर्यकारक योगायोग असा, की या कार्यक्रमानंतर सुमारे चार दशकांनी लाहोरला १९७८ साली फत्तेसिंग गायकवाड यांच्यासमोर त्यांनी कार्यक्रम केला होता. (फत्तेसिंग हे उस्ताद फैयाज खान यांचे गंडाबंध शागीर्द होते. फैयाज खान हे बडोदा संस्थानात अनेक वर्ष राजगायक होते.) अर्थात हा कार्यक्रम त्यांच्या एकटय़ासाठी नसून त्यांच्याबरोबर पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठीही आयोजित केलेला होता. फत्तेसिंग हे या संघाचे व्यवस्थापक होते आणि बिशनसिंग बेदी कर्णधार.

खाँसाहेबांचा मुंबईमधला पहिला कार्यक्रम षण्मुखानंद हॉलमध्ये १९७७ च्या आसपास झाला. हा कार्यक्रम ऐकण्याचं भाग्य मला लाभलं होतं. या कार्यक्रमातील दोन गोष्टी आजही माझ्या स्मृतीत कोरल्या गेल्या आहेत. एक म्हणजे या कार्यक्रमाला जवळजवळ  सर्व बॉलीवूड हजर होतं. आणि दुसरी म्हणजे कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाला कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. आर. चोप्रा यांनी फटकारलं होतं, ती गोष्ट. सूत्रसंचालक बी. आर. चोप्रांकडे वळून बघत, ‘मी आता चोप्रासाहेबांना आजच्या मफलीत उस्ताद मेहदी हसनसाहेबांना पेश करावं अशी विनंती करतो..’ अशा अर्थाचं काहीतरी म्हणाला. यावर चोप्रासाहेब रागावलेले दिसत होते. त्या तरुण सूत्रसंचालकाला- ‘हे बघ, ते शहेनशहा आहेत. शहेनशहाला कोणीच कधीही, कुठेही पेश

करत नसतो. हे अपमानास्पद आहे. असं करू नकोस. शहेनशहासमोर नम्रपणे हात जोडून

उभं राहायचं असतं आणि आपल्या कलेने आम्हाला उपकृत करावं अशी विनवणी करायची असते..’ अशा काहीशा शब्दांत त्यांनी फटकारलं होतं.

लतादीदी आणि खॉंसाहेब यांची १९७० च्या दशकाच्या पूर्वार्धात ओटावा (कॅनडा) इथे पहिली भेट झाली. तेव्हापासून एकत्र कार्यक्रम करण्याची/ गाणं म्हणण्याची दोघांचीही इच्छा होती. (‘खाँसाहेबांच्या आवाजात ईश्वर वसतो..’ असं दीदी एकदा म्हणाल्याचं तुम्हाला आठवत असेलच.) पण कोणत्या ना कोणत्या कारणाने हा योग काही चाळीसेक वषर्ं जुळून आला नाही. आणि २०१० साली अचानक त्यांच्या लाखो चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मेहदी हसन आणि लता मंगेशकर यांचा ‘सरहदें’ नावाचा एकत्रित अल्बम प्रसिद्ध झाला. त्यामध्ये ‘तेरा मिलना बहोत अच्छा लगे’ हे द्वंद्वगीत होतं. त्यावेळी व्हीलचेअरवर असलेल्या मेहदी हसनसाहेबांचं रेकॉर्डिग कराचीमध्ये झालं आणि प्रकृती तितकीशी बरी नसलेल्या दीदींचं रेकॉर्डिग मुंबईत! ही दोन्ही रेकॉर्डिग्ज वेगवेगळी करण्यात आली आणि नंतर त्यांचं मिक्सिंग केलं गेलं. या अल्बममधली गाणी त्या दोघांच्या अत्युत्तम गाण्यांमध्ये कदाचित मोडणार नाहीत, पण त्यात एकही खोटा सूर सापडणार नाही. हा अल्बम म्हणजे उत्कृष्ट साउंड रेकॉìडग आणि मानवी चतन्य या दोघांचाही विजय आहे.

हरिहरन, पंकज उधास आणि तलत अझीझ या भारतीय गझल गायकांसाठी खाँसाहेब म्हणजे एक मोठी प्रेरणा होते आणि अजूनही आहेत. त्यातला तलत अझीझ हा त्यांचा एकमेव गंडाबंध शागीर्द आहे. खाँसाहेबांच्या उंचीजवळ पोहोचणारे एकमेव भारतीय गझल गायक जगजीतसिंग हे खाँसाहेबांचे मोठे प्रशंसक होते. खाँसाहेबांबद्दल ते एकदा म्हणाले होते की, ‘मेहदी हसन यांच्या कुवतीचा गझल गायक आजपर्यंत झाला नाही आणि यापुढे होईल अशी शक्यताही कमीच आहे.’

२००४ साली खाँसाहेबांना गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती. त्या सुमारास जगजीतसिंग हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. त्यांनी खाँसाहेबांची प्रेमादराने भेट घेतली आणि आपल्या एका कार्यक्रमाची संपूर्ण बिदागी त्यांनी खाँसाहेबांना अर्पण केली होती.

जाता जाता.. खाँसाहेबांच्या गंभीर आजाराच्या या काळात तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (ते त्यांचे निस्सीम चाहते होते.), तसेच लतादीदींसहित अनेक भारतीय कलाकार आणि राजस्थान सरकारने खाँसाहेबांच्या भारतातील वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखविली होती. भारतीय लोक  त्यांच्यावर किती प्रेम करत होते, त्याचं हे द्योतक आहे.

आणि जरा भावपूर्ण नोंदीवर या लेखाचा समारोप करतो.. ‘जिथे कुठे असाल तिथून गात राहा..’ या आपल्यासारख्या चाहत्यांच्या विनंतीला खाँसाहेब कदाचित अहमद फराज यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका प्रसिद्ध गझलेच्या शब्दांत उत्तर देतील. ते शब्द असे-

‘मं कब का जा चुका हूँ, सदाए मुझे न दो..’ (मी कधीचाच निघून गेलोय. आता मला बोलावू नका.) तर या त्यांच्या उत्तराला माझ्यासारखे असंख्य भारतीय चाहते या शब्दांत प्रतिसाद देतील-

‘तुम रूह का सुकून हो, धडकन दिलों की हो,

जाने न देंगे छोड के मेहफिल दिलों की हम..’

(गुडगाव येथील माझा मित्र आणि उर्दू कवी जगदीश प्रकाशने माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांच्या भावना आपल्या या शायराना अंदाजात व्यक्त केल्या आहेत. शुक्रिया जग्गी!)

शब्दांकन : आनंद थत्ते