महाराष्ट्रातील कोयना प्रकल्प हे महाराष्ट्राचे एक भूषण! प्रत्येकजण त्याच्याविषयी अभिमानाने बोलतो. त्याचे अतिविशाल रूप नजरेत साठवून घ्यायला आवर्जून जातो. त्याचे ते भव्यदिव्य रूप मनात कोरले जातेही; परंतु ते रूप नेमके कसे आकाराला आले, कोणी ते आव्हान पेलले, काय काय घडले असेल ते प्रत्यक्षात साकारताना.. हा कोयना धरणाचा रोमांचित करणारा इतिहास मात्र आपल्याला फारसा माहीत नसतो. ‘महाराष्ट्राचे शक्तिपीठ कोयना प्रकल्प’ या पुस्तकाच्या रूपाने तो वाचकांसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एखादा सरकारी प्रकल्प म्हटले की जगड्व्याळ कागदपत्रे, फायलींचा ढीग, खूपच तांत्रिक आणि किचकट लिखाणाची जंत्री असे सारे चित्र डोळ्यासमोर येते. पाहा कसा साकारला हा प्रकल्प! म्हणजे मग त्याच्याबद्दल जाणून घेण्याची सामान्यजनांची उत्सुकता तिथेच मान टाकते. पण तोच इतिहास कॉफी-टेबल बुक स्वरूपात समोर आला तर तो पाहायला आणि वाचायलाही रंजक होतो. कोयना धरणावरील अशा प्रकारचे नितांतसुंदर पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. त्यात कोयना प्रकल्पाची अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि त्याच्या इतिहासाबरोबरच अनेक तांत्रिक अंगांची माहितीही जलसंपदा विभागाने इमेज इंडियाच्या माध्यमातून मांडली आहे. त्यामुळे कोयनचा रोमांचकारी इतिहास वाचायला आणि पाहायलादेखील वाचकाला आवडेल. एखाद्या धरणाच्या माहितीकडे किंवा त्याबाबतच्या अहवालाकडे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांद्वारे एक अभ्यास म्हणूनच पाहिले जाते. मात्र, कोयना प्रकल्प याला अपवाद आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प ही महाराष्ट्राची भाग्यरेषा मानली जाते. त्याला सुमारे १०० वर्षांचा इतिहास आहे. या वाटचालीत अनेक अडथळे आले. त्याच्या पूर्ततेमागे लोकांचे अतोनात कष्ट आहेत. त्याच्या उभारणीच्या वेळी झालेल्या काही अपघातांमध्ये अनेक जण बळीही गेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे प्रेरणादायी नियोजन आणि उभारणी ही कोयना प्रकल्प समजून घेण्यासाठी येणाऱ्या पिढय़ांकरता निश्चितच मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकातील जुन्या-नव्या छायाचित्रांतून कोयनेचे विराट दर्शन घडते.
‘तुडुंबली ही इथे कोयना, विशाल जणूं मांडिला आयना
डोकावुनि हो यात पहा ना, भवितव्य महाराष्ट्राचे
या इथे निरखुनि घ्याया, आनंदवनभुवनी या..’
कवी यशवंतांनी कोयनेचे असे सार्थ वर्णन त्यांच्या कवितेत केले आहे. महाराष्ट्राचे भवितव्य कोयनेने घडवले आहे. १९०१-०२ पासून खरे तर कोयना प्रकल्पाच्या प्रवासास सुरुवात झाली. त्याकाळी सततचा दुष्काळ, पाण्याअभावी जळणारी पिके, वाढते दारिद्रय़, पसरणारी रोगराई, शेतसाऱ्याने पिचलेला शेतकरी अशी महाराष्ट्रात स्थिती होती. या परिस्थितीबद्दल ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेच्या मनात संताप धुमसत होता. सह्य़ाद्रीच्या कडेकपारीतल्या नद्यांनीच त्यावर काही अंशी दिलासा दिला असता. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी म्हणून एच. एफ. बील यांनी कोयनेची परिक्रमा सुरू केली. तेव्हाच्या मुंबई प्रांताचे ते सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता होते. मुंबई प्रांताची तहान भागविण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. कराड, सांगली, जतपासून विजापूपर्यंतच्या दुष्काळी पट्टय़ाला पाणी कसे देता येईल, याची पाहणी करण्यासाठी त्यांनी कृष्णा आणि कोयनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविले. महाबळेश्वरच्या दक्षिणेकडे वशिंडा पर्वतशिखरात सुमारे १३५० मीटर उंचीवर कोयना उगम पावते. तेथून ती १२५ किलोमीटर लांबीचा प्रवास करते. तिच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच डोंगररांगा आहेत आणि त्यात मुसळधार पाऊस पडतो, हे बील यांनी हेरले. कोयनेवर धरण होऊ शकते, हे बील यांनी १९०९ साली मुंबई प्रांताच्या सरकारला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले.
मात्र, प्रश्न फक्त पाण्याचाच नव्हता. मधल्या काळात विजेची मागणीही वाढू लागली होती. त्यादृष्टीनेही कोयना नदीचे स्थान यथोचित होते. कोयना खोऱ्याच्या एका बाजूस सह्य़ाद्रीची २००० ते ३००० फूट खोल दरी आहे. त्यामुळे कोयनेच्या खोऱ्यात जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी १९१७ ते १९२४ दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर १९४६ मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, निधीची अडचण उभी राहिली. त्यावर केंद्राने एक समिती स्थापन केली. अखेर १६ जानेवारी १९५४ रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते कोयना प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. १९५८-५९ मध्ये या प्रकल्पाचा टप्पा १ आणि २ ची कामे पूर्ण झाली आणि १६ मे १९६२ ला कोयना प्रकल्पातून प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू झाली.
कोयना प्रकल्पाचा हा प्रवास सोपा खचितच नव्हता. त्यात अनेकानेक अडचणी आल्या. तांत्रिक अडचणी तर होत्याच; शिवाय राजकीय अडथळेही होतेच. स्वातंत्र्यानंतर कोयना प्रकल्पाच्या मागणीला सरकारदरबारी ताकद मिळावी म्हणून अनेक उद्योजक पुढे आले. तेव्हा द्वैभाषिकप्रांतातील राजकारण, खर्च-मंजुरी आणि आंतरराज्य पाणीवाटपाचा मुद्दा अशा अडचणी या प्रकल्पाच्या आड येत होत्या. अशा अनेक समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने भाऊसाहेब हिरे, डॉ. धनंजयराव गाडगीळ, आ. रा. भट, शंकरराव किलरेस्कर यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान पं. नेहरूंची भेट घेतली. यानंतरच नियोजन मंडळाने कोयना प्रकल्पाला मंजुरी दिली.
तथापि त्यानंतरच सर्वाधिक अवघड टप्प्याला सुरुवात झाली. कोयनेच्या खोऱ्यात अक्षरश: डोंगर फोडून कोयना प्रकल्पाचे शिल्प साकारायचे होते. हे प्रचंड आव्हान अनेक अभियंत्यांनी मिळून स्वीकारले. अत्यंत विपरित परिस्थितीत नैसर्गिक संकटांशीही त्यांनी अनेकदा सामना केला. कोयना खोऱ्यातील अनेक गावे बुडिताखाली जाणार असल्याने त्यांचे पुनर्वसनही प्रकल्पाच्या कामाबरोबरच सुरू झाले.
मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मार्च १९५८ रोजी धरणाच्या कामास प्रारंभ झाला. कोयना धरणाच्या बांधकामात तब्बल ५३ स्तंभ उभारण्यात आले आहेत. १९६४ पर्यंत धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. १९६१ च्या पावसाळ्यात पहिल्यांदा धरणात पाणी साठले. यानंतरचा टप्पा जलविद्युतनिर्मितीचा होता. विद्युतगृह जमिनीवर की डोंगराच्या पोटात उभारावे, यावर १९५१ पासून खल सुरू होता. मात्र, बोगदे आणि विद्युतगृहही भूमिगत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. त्यामुळे अभियंत्यांची ती एक प्रकारे कसोटीच होती. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातील शक्तीची आराधना या अभियंत्यांनी केलेली असल्याने हे आव्हान त्यांनी लीलया पेलले.
कोयना प्रकल्पाने भूकंपासारखी भीषण नैसर्गिक आपत्तीही झेलली. तेव्हा अनेक चर्चाना ऊत आला होता. परंतु कोयनेच्या शिल्पकारांनी हाही धक्का पचवला आणि प्रकल्पाच्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले. पहिल्या दोन टप्प्यांनंतर कोळकेवाडीचा तिसरा टप्पा पार पडला. तेथेही भूमिगत वीजगृह बांधून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. नंतर अधिक वीजनिर्मितीसाठी चौथ्या टप्प्याचे कामही सुरू झाले. यातील लेक टॅपिंगच्या कामाने भारतीय अभियांत्रिकीचे श्रेष्ठत्व जागतिक पातळीवर सिद्ध केले. या टप्प्यातील मिशन ३१ मार्च १९९९ ला पूर्ण झाले आणि त्यामुळे कोयनेच्या वीजनिर्मितीत १००० मेगावॉटची वाढ झाली. आता ओझर्डे धबधब्यावरून १००० फूट कोसळणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी कोयनेचा पाचवा टप्पा आखण्यात आला आहे. भविष्यात असे अनेक टप्पे प्रत्यक्षात आकारास येतील.
कोयनेने महाराष्ट्राला खूप काही दिले आहे. १९६२ पासून आजपर्यंत कोटय़वधी युनिट वीजनिर्मितीबरोबरच हजारो हेक्टर जमीन या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली. कोयनेच्या जलाशयामुळे सह्य़ाद्रीच्या खोऱ्यातील पर्यावरणाचे संरक्षण झाले. नवे तंत्रज्ञान स्वीकारून कोयना प्रकल्पाने वैराण प्रदेश संपन्न केला गेला. हा सर्व रोमांचित करणारा इतिहास ‘महाराष्ट्राचे शक्तिपीठ कोयना प्रकल्प’ या जाडजूड ग्रंथामधून आपल्यासमोर उभा राहतो.
कोयनेचा पहिला आणि दुसरा टप्पा सुरू असताना या वाटचालीचा इतिहास लिहिण्याची तत्कालीन अभियंता पी. एम. माने यांची इच्छा होती. त्यावेळी त्यांनी एक मंडळ स्थापन करून दोन खंडांत अहवाल लिहिला. परंतु या प्रकल्पाचा इतिहास लिहिला जावा अशी त्यांची इच्छा होती. २०१२ मध्ये त्याला सरकारी मान्यता मिळाली. कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता (स्थापत्य) दीपक मोडक, म. दि. पेंडसे, वि. ज. वाघ, के. एस. देशपांडे यांच्या तज्ज्ञ समितीने पुस्तकाबाबत इमेज मीडियाला मार्गदर्शन केले. इमेज मीडियाच्या टीमने अनेक संदर्भ शोधून, प्रत्यक्ष प्रकल्पाला भेटी देऊन सारी माहिती मिळवली. सुमारे १०६ तांत्रिक शासकीय अहवाल, पुण्यातील विविध ग्रंथालये, तत्कालीन वृत्तपत्रीय वृत्त-लेख यांचाही धांडोळा घेतला आहे. सुमारे पाच हजार छायाचित्रे संकलित केली गेली. त्यापैकी अनेक छायाचित्रे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढली गेली आहेत. त्यापैकी अनेक चित्रांचा समावेश या पुस्तकात आढळतो. अशा प्रकारच्या पुस्तकात प्रथमच माहिती सोप्या पद्धतीने देण्यासाठी इन्फोग्राफिकचा वापर केला गेला आहे. तांत्रिक माहितीसोबतच तेव्हाच्या अनेक घटना यात मांडण्यात आल्या आहेत. कोयना प्रकल्प हा निव्वळ एक जलप्रकल्प नसून महाराष्ट्रातील लोकभावनांशी निगडित हृदयस्थ बाब आहे. कोयना प्रकल्पाचा १९०१ पासून जानेवारी २०१४ पर्यंतचा अखंड प्रवास या पुस्तकात उभा केलेला आहे.
‘महाराष्ट्राचे शक्तिपीठ कोयना प्रकल्प’ (कॉफी-टेबल बुक), निर्मिती- इमेज इंडिया,
पृष्ठे- २९५.           
जयवंत चव्हाण – jaywantnchavan@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा