उल्हास पवार

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून संसद, विधिमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा जाहीर सभांत संवादाची एक सुसंस्कृत परंपरा सत्ताधारी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी अनेक वर्षं पाळली होती. त्यातलं मांगल्य कसोशीने टिकवून ठेवलं होतं. पण आजचं चित्र काय़ दिसतं? हमरीतुमरी, दोन्ही बाजूने असंसदीय शब्दांचा, अपशब्दांचा वापर, सुडाची आणि द्वेषाची भाषा… भाषणभान विसरलेल्या आजच्या काळात म्हणून उरतात त्या चांगल्या आठवणी…

representative image
अन्यथा.. स्नेहचित्रे : नकोसा नैतिक!
memories balmaifal article
बालमैफल : कुपीचं गुपित
science school students loksatta news
ते काय असतं? : विज्ञानाची रंजक सफर!
readers reaction on lokrang article about Ajanthas PusatrehnaPadsad Indirabai
पडसाद : इंदिराबाई अधिक कळल्या
artist of human suffering Arpita Singh Neelima Sheikh Madhavi Parekh and Nalini Malani
मित्त : मानवी दु:खांच्या चित्रकार
What and how much do your children watch on social media
तुमची मुलं काय आणि किती पाहतात?
Biography of Rabindranath Tagore
रवींद्रनाथांचे रसाळ चरित्र
Screen Time Social Media YouTubers and Influencers
वखवख तेजाची न्यारी दुनिया…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

‘‘आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्नें।

शब्दांचींच शस्त्रें यत्ने करूं।।

शब्दचि आमुच्या जीवीचें जीवन।

शब्दें वांटूं धन जनलोकां।।’’

हे संत तुकाराम महाराजांनी शब्दांना दिलेलं महत्त्व… त्या शब्दांतून व्यक्त होते भाषासमृद्धी… भाषा संस्कृतीची वाहक आहे, असं मानतात. भाषेचं सौंदर्य, लालित्य, अर्थ, भाषार्थ या सर्वांचं भान ठेवून कसं बोलावं यासंबंधी माझी एक आठवण आहे. थोर गांधीवादी, देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी, भागवत धर्माचे व्यासंगी व्यक्तिमत्त्व बाळासाहेब भारदे यांच्या संदर्भातली. ते महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरचे विधानसभेचे पहिले निर्वाचित अध्यक्ष. त्यापूर्वी महाराष्ट्र द्विभाषिक मुंबई राज्याचे सहकारमंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी होती. १९६२ साली नवीन विधानसभा अध्यक्ष या नात्याने एकमताने सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी त्यांची अध्यक्षपदी (स्पीकर) निवड केली. सर्वांनी मिळून त्यांना अध्यक्षांच्या आसनावर बसवलं आणि दोन्ही बाजूंनी अभिनंदनपर भाषणं केली. सर्वप्रथम मुख्यमंत्री या नात्याने यशवंतराव चव्हाण यांच्यावर अभिनंदनपर भाषणं झाली. नंतर भारदे दादांचा गौरव केला गेला. सर्वांच्या भाषणांनंतर बाळासाहेब भारदे यांचं सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारं भाषण झालं- ते महाराष्ट्राच्या राजकीय विधिमंडळाच्या कामकाजासाठी दिशादर्शक आणि अतिशय मार्मिक असं भाष्य होतं. सभागृहातील सर्वोच्च स्थानावरून दोन्ही बाजूंना न्याय देऊन संसदीय लोकशाहीचं मांगल्य राखण्याच्या निरपेक्ष- नि:पक्षपाती न्यायाने कार्य करीन, असं ते म्हणाले. सभागृहातील वातावरण, चर्चा, संवाद कसा असावा, शब्द कसे असावेत यावर बोलताना त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘साच आणि मावळ/ मितुळे आणि रसाळ/ शब्द जैसे कल्लोळ/ अमृताचे।’ या ओवीचा दाखला दिला. ते पुढे म्हणाले, साच- सत्य, वास्तव मांडताना आक्रस्ताळेपणा सोडून मवाळ, सौम्यपणे पुढे मितुले- थोडक्यात (पाल्हाळ नाही) आणि रसाळ- गोड भाषा, शब्दसौंदर्यातला गोडवा आणि कल्लोळ- शब्दसमूहांतून सर्वांना आनंदकल्लोळ निर्माण व्हावा, असं वातावरण राहावं ही विनंती केली. तसंच वाद-प्रतिवाद करतानाच सुसंवादही साधावा हे सांगितलं. सभागृहाचं वर्णन करताना ‘विधिमंडळ हे लोकशाहीचं महामंदिर आहे. जनता जनार्दन ही त्याची स्वयंभू सार्वभौम देवता आहे. प्रतिनिधी (आमदार) हे त्या देवतेचे उपासक. या उपासकाचे सेवासाधनेचे माध्यम (जनकल्याणाची) म्हणजे विधिमंडळातील चर्चा, सत्ता आणि सेवा, विरोध आणि विनोद, शक्ती आणि युक्ती, वाद आणि संवाद, कर्तृत्व आणि वक्तृत्व, मान आणि इमान, नय आणि विनय, निष्ठा आणि प्रतिष्ठा, सवाल आणि जवाब, आवेश आणि आर्जव इत्यादी गोष्टींचा पावन संगम या विधिमंडळात अनुभवावयास मिळावा. तोल न सुटता बोल कसा लावावा, दुजाभाव सोडून सद्भाव कसा निर्माण करावा, वैर न करता वार कसा करावा याचं अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. अपेक्षाही व्यक्त केल्या. आज मात्र विधिमंडळ, संसद किंवा सभागृहाबाहेरील चर्चा, हमरीतुमरी, सूड, दोन्ही बाजूने असंसदीय शब्दांचा-अपशब्दांचा वापर होतो. सुडाची, द्वेषाची भाषा बोलली जाते. अगदी रस्त्यावरील भांडणासारखी परिस्थिती पाहून अस्वस्थ व्हायला होतं. गेल्या ६०/७० वर्षांपासून- १९५२ च्या पहिल्या निवडणुकीपासून दोन्ही ठिकाणी संसद व विधिमंडळ किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जाहीर सभा यांची एक सुसंस्कृत परंपरा काँग्रेस सत्ताधारी व इतर विरोधी पक्षनेते या सर्वांनी अनेक वर्षं पाळली होती. त्यातलं मांगल्य कसोशीनं टिकवून ठेवलं होतं; मात्र आजचं चित्र वेगळं दिसतंय. आज अशा अनेक नेत्यांची नावं घ्यावी लागतील- ज्यांनी आयुष्यात एकही असंसदीय शब्द वापरला नाही. त्यांच्या भाषणातला एकही शब्द वगळावा किंवा काढावा लागला नाही. उलटपक्षी विरोधी बाकांवरील नेते, प्रतिनिधींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उदा. १९५६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं खासदार म्हणून संसदेतलं पहिलं भाषण (मेडन स्पीच) झालं. त्यांचं अप्रतिम भाषण संपल्याबरोबर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अटलजींचं अभिनंदन करताना ‘‘भविष्यात पंतप्रधानपदी येण्याची पात्रता आपण सिद्ध केलीत,’’ असे गौरवोद्गार काढले.

हेही वाचा : बाइट नव्हे फाइट…

आजही या गोष्टीची चर्चा होते, पंडित नेहरूंची लोकशाहीवर अपार निष्ठा आणि विरोधकांचा सन्मान करण्याची मानसिकता याचा गौरव होतो. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात कोठेही गेले- अमेरिकेपासून द. आफ्रिकेपर्यंत- तरी म. गांधी व पं. नेहरू यांचा उल्लेख परदेशातील नेत्यांकडून होतोच. दुर्दैवाने भारताच्या संसदेत मात्र हे हयात नसतानाही त्यांची बदनामी, चारित्र्यहनन केलं जातं. खरं तर संसद किंवा विधिमंडळात हयात नसलेल्या कोणाचाही उल्लेख टाळावा याचं भानही सुटत चाललंय. याचं एकमेव कारण- संसदीय लोकशाहीवरील संशयास्पद निष्ठा, संवेदनशून्यता तसेच विवेकाचा अभाव व विचारशून्यता… लोकशाहीतील संवादाची, सुसंवादाची, परिसंवादाची भाषा संपून सूड, द्वेषाने पेटून अतिशय निम्नस्तरातील भाषेचा वापर सर्रास होतोय. हे भारतीय लोकशाहीपुढील भयचित्र आहे. अनेक नेते जाहीर सभांतून, विविध वाहिन्यांवर अक्षरश: एकमेकांना शिव्या देताना (तथाकथित) दिसतात. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात ही भाषा पोहोचली आहे हे दुर्दैव. अध्यक्षांना उद्देशून आणि विरोधकांकडे बोट दाखवून, ‘त्याचं संरक्षण काढा, एका मिनिटात तो दिसणार नाही…’ अशी भाषा वापरली जात आहे; आणि अशा प्रतिनिधींवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. घाऊक प्रमाणात घोडेबाजार, पक्षांतर केलं जातंय. कोण कोणत्या पक्षात जातो ते कळत नाही. पूर्वी काही नेत्यांनी पक्ष बदलले; परंतु ते वैचारिक भूमिकेमुळे. उदा. बँकांचं राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द, कमाल जमीन धारणा बिल… अशा निर्णयांमुळे अनेक पुरोगामी, समाजवादी कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांना एक वैचारिक बैठक होती. (मी स्वत: ५० वर्षं सक्रिय राजकारणात माझ्या विचारांशी, काँग्रेस पक्षाशी निष्ठा कायम ठेवली- अन्याय झाला तरीही) गेल्या काही वर्षांत मात्र अनेक पक्ष बदलून सत्तेत राहणं, ज्यांनी उपकृत केलं त्यांना नको ते बोलत राहून खालच्या पातळी गाठणं, प्रतिस्पर्ध्यावर टीका करणं हा स्थायिभाव झाला आहे. कधी कधी नेते म. गांधींकडून एकदम गोडसेकडे, फुलेंकडून मनूकडे, पुन्हा शाहू-फुले आंबेडकरांकडे पळताना दिसतायत. भाषा तर इतकी घसरलीय की, वय, ज्येष्ठता याबद्दल आदर सोडाच, महिलांबद्दलही- अगदी सोनिया गांधींबद्दल तर काय उद्गार काढले, ते लिहिताही येणार नाहीत. बाळासाहेब भारदेंनी ज्या महाराष्ट्रातील विधिमंडळात एकमेकांप्रति सद्भावना राखणारे विचार व्यक्त केले आहेत, तो धागा पकडून पूर्वीच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभेत (दोन्ही बाजूंच्या) एक वैभवशाली परंपरा राखली होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाणांपासून अगदी अलीकडे बॅ. अंतुले, शरदराव पवार, मनोहरपंत जोशी ते विलासराव देशमुख अशी किती तरी नावे घेता येतील- ज्यांनी संसदीय परंपरेचं मांगल्य राखलं. त्याच वेळी विरोधी बाकांवरील गोपीनाथराव मुंडे, एस. एम. जोशी, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, बी. सी. कांबळे, केशवराव धोंडगे अशी किती तरी नावं घ्यावी लागतील. वसंतराव नाईक यांनी अगदी १९७३ च्या भयानक दुष्काळावर मात करताना एकदिलाने त्यातील रोजगार हमी योजनेवरील (या योजनेचे जनक, स्वातंत्र्यसेनानी व विधान परिषदेचे २४ वर्षे सभापती) बिल पास करताना- कायदा करताना सर्वांनी केलेली भावस्पर्शी भाषणं सांगता येतील. एवढंच काय, निधीची चणचण असताना त्याची तरतूद करण्यासाठी काही कर लावून निधी उपलब्ध करण्यासाठी विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विनंती केली की आम्ही हे बिल मांडतो. म्हणजे कर लावताना साधारण टीका होत असते; पण इथं उलट चित्र पाहायला मिळालं. भारताच्या इतिहासात विरोधी नेत्यांनी मांडलेली सूचना आणि मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं बिल पास होणं, ही (पान २ वर) अभूतपूर्व घटना होती. आज हीच रोजगार हमी योजना, ‘मनरेगा’च्या रूपाने देशानं (इंदिरा गांधी पंतप्रधान असताना) व मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना अमलात आणली ही अभिमानास्पद बाब आहे. दुष्काळाच्या काळात विरोधकांशी व स्वकीयांशी रात्र रात्र चर्चा करणारे वसंतराव नाईक मी पाहिले आहेत. कापूस एकाधिकार योजना साकार होताना त्यावरील चर्चा आणि त्या वेळी मंत्री असलेले यशवंतराव मोहिते यांनी विधिमंडळात एकूण सात तास (पहाटे ४ पर्यंत विधिमंडळात केलेलं अभ्यासपूर्ण भाषण, तेवढ्याच मुक्तकंठानं गणपतराव देशमुख यांनी व इतरांनी केलेली गौरवपर भाषणं ग्रंथालयात उपलब्ध आहेत. अगदी अलीकडे खासगी विद्यापीठाला विरोध करताना बी. टी. देशमुख, ऐनापुरे व इतरांनी केलेली भाषणं, त्यांच्या मागणीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, खात्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संयुक्त चिकित्सक समिती नेमून त्यावर पूर्ण चर्चा करून बिल मागे घेतलं; व सर्व उपसूचनांचा स्वीकार करून बिल सादर केलं. विलासराव व गोपीनाथराव यांची सभागृहातील जुगलबंदी, शाब्दिक फेक, कोट्या, हास्यविनोद यांचा आनंद सर्व सभागृहानं घेतला आहे. त्यांची वैयक्तिक मैत्री ही सर्वश्रुत आहेच. वि. स. पागे साहेबांनंतर अगदी अलीकडे आर. एस. गवई, प्रा. फरांदे, जयंतराव टिळक यांच्यावेळीही खूप छान वातावरण होतं. जयंतराव सभापती असताना विलासराव व प्रमोद नवलकर यांची वरच्या सभागृहातील जुगलबंदी अजूनही स्मरणात आहे. विलासराव सांस्कृतिकमंत्री असताना नवलकर यांनी जयंतरावांकडे पाहून विनंती केली की, ‘‘मी प्रश्न विचारला की विलासरावांनी फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचंय.’’

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

‘‘ठीक आहे.’’ जयंतराव म्हणाले. नवलकरांनी १७ प्रश्न विचारले की तत्परतेनं उठून हो – नाही अशी उत्तरं सभागृह पाहात राहिलं. सभापती जयंतराव उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘सामना बरोबरीत सोडवला आहे.’’ ही सारी गंमत आता अभावानं आढळते. पत्रकारांनासुद्धा कशी उत्तरं द्यावीत याचं कौशल्य आहे. मला आठवतं, वसंतराव नाईक यांची १९७२ साली मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद झाली. एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकारानं विचारलं, ‘‘मि. नाईक, यू विल बी राइट ऑर लेफ्ट.’’ नाईकसाहेबांनी लगेच उत्तर दिलं – ‘‘आय शाल नॉट बी राइट ऑर लेफ्ट; आय शाल बी करेक्ट.’’ त्यांच्या या उत्तरानं वातावरणच बदललं. हा लेख लिहिताना खरं तर खूप साऱ्या आठवणी, उदाहरणं, भाषणं, संवाद यांची गर्दी माझ्या मनात आहे. खूप प्रसंग आहेत. प्रखर विरोध असूनही एकमेकांचं भावस्पर्शी नातं सांभाळणारी माणसं, नेते मी पाहिलेत. संकटकाळी एकमेकांच्या मदतीला धावून जाणारी माणसंही पाहिलीत. अगदी अलीकडेच, राजीव गांधींना श्रद्धांजली वाहताना अटलबिहारी वाजपेयी म्हणाले, ‘सभागृहात मी आज तुमच्यासमोर उभा आहे हे केवळ राजीव गांधींमुळे…’ आणि मग त्यांचा आजार समजल्यावर अमेरिकेला शिष्टमंडळात पाठवून त्यांच्यावर झालेले उपचार याचा उल्लेख केला. त्यावेळी सर्व सभागृह गहिवरलं. आज मात्र ही संवेदनशीलता हरवलेली आहे. वास्तव आणि विनोद यातलं अंतरही कळेनासं झालं आहे. महाराष्ट्राला फार मोठा इतिहासाचा वारसा, संत परंपरा, समतेच्या व स्वातंत्र्य लढ्यातील स्थान, हिमालयाच्या उंचीचे नेते तसेच अतिशय उत्तम संसदपटू, विचारवंतांचा वारसा आहे. सत्तेत अतिरेकी मोह, विधिनिषेधशून्य कृत्य, पराकोटीचा द्वेष मतभेदाला तर स्थानच नव्हते; त्याचं रूपांतर आता मनभेदांत, व्यक्तिद्वेषांत व पुढे व्यक्तिसूडापर्यंत पोहचलं आहे. परिणामी भाषेचा दर्जा रसातळाला गेलाय. भाषेची साधनशुचिता, सौंदर्य, आदरभाव, मांगल्य लुप्त होत चाललं आहे याचं भान प्रत्येकानंच ठेवावं ही अपेक्षा. आजची महाराष्ट्र विधानसभा म्हणजे भांडणे आणि वितंडवादाचा आखाडा झाला आहे असं दु:खानं म्हणावंसं वाटतं.

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!

प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा

किंवा

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥

असा महाराष्ट्र देश पुन्हा घडो एवढीच इच्छा!

विधानसभेत मृणालताई गोरे अनेक प्रश्नांवर संघर्ष करत सभागृह गाजवत असत. अशाच एका प्रश्नावर त्या एवढ्या आक्रमकपणे बोलत होत्या आणि रागावून म्हणाल्या, ‘‘हे सरकार नेभळट आहे. नपुंसक आहे, नामर्द आहे.’’ सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी आमदार खूप रागावले, जागेवरून पुढे आले. गोंधळ वाढला तेव्हा विधानसभा अध्यक्ष असलेले बॅ. शेषराव वानखेडे उठून म्हणाले, ‘‘त्या सरकार या संस्थेला उद्देशून बोलल्या आहेत, ते कोणीही वैयक्तिक घेऊ नये.’’ हे मार्मिक टिपण कळायला थोडा वेळ लागला. बॅ. अंतुलेसाहेबांवर सिमेंटप्रकरणी सभागृहात खूप चर्चा झाली. आरोपप्रत्यारोप झाले. खूप वेळ चर्चा झाल्यानंतर अध्यक्षपदी असलेले मधुकरराव चौधरी म्हणाले, ‘‘सिमेंटवर काँक्रीट चर्चा झालेली आहे. आता पुढील विषय घेऊ.’’

हेही वाचा : निमित्त: शिव्या-महापुराण

विधानसभेत दूध उत्पादन, डेअरी, गोपालन, दूध या पूरक व्यवसायांवर खूप चर्चा केली. सभासदांनी अभ्यासपूर्ण विचार व सूचना मांडल्या. चर्चा करता करता दुपारचे ४.३० वाजून गेले होते, पण चर्चा संपेना. मग अध्यक्षपदी असलेले शेषराव वानखेडे घड्याळाकडे बोट दाखवत म्हणाले, ‘‘ हे पाहा आता धारा काढायची वेळ झालेली आहे. आता मंत्री उत्तर देतील.’’
विधान परिषदेच्या कामकाजामध्ये अनेक संसदीय आयुधं, नियमांचा वापर केला जातो. प्रतिनिधी मंडळात औचित्याच्या मुद्द्याद्वारे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्या वेळी सभापती ना. स. फरांदे म्हणाले, ‘‘खरंच आपण इतकं अनुचित काम करतो का?’’ त्यावर सभागृहात हशा पिकला.

चर्चेचं गांभीर्य व सूचक विधानं हे बाळासाहेब भारदेंचं वैशिष्ट्य.
‘‘आताच्या आणि आमच्या काळात निष्ठा आणि सेवाभाव यांत अंतर पडलं. त्यात एका अक्षरानं तर फारच कमाल केली.’’ तो फरक सांगताना ‘प्र’ या अक्षरावर त्यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘‘आमचा काळ सिद्धीसाठी काम करण्याचा तुमचा प्रसिद्धीसाठी.’’ आणि त्यांनी सिद्धीप्रसिद्धीमधील अंतर स्पष्ट केले.
कनक, कांता आणि कीर्ती या मोहापासून लोकप्रतिनिधींनी दूर राहिलं पाहिजे असं ते नेहमी सांगत.
‘कनक’ म्हणजे धनसंपत्ती, सोने, हिरे, अघोरी संपत्तीचा मोह.
‘कांता’ मोह, व्यभिचार. चारित्र्यहीन वागण्याचा मोह.
‘कीर्ती’ अवाजवी प्रसिद्धी, कीर्तीनंतर दर्प, अहंकार यांपासून दूर असावे. ते म्हणत, ‘‘क कां की’च्या नादी लागलं की, कुकूची होण्यास वेळ लागत नाही.’’
पंडित नेहरूंचे विरोधक राम मनोहर लोहिया यांनी पंडितजींना अडचणीत आणण्यासाठी एका ग्रामीण महिलेला, मी तुला पंडितजींकडे भेटण्यासाठी नेतो. तू फक्त तुझी ओळख करून दिल्याबरोबर त्यांचा शर्ट पकडून ‘क्या किया आपने आजादी के बाद हमारे लिए.’ एवढंच म्हणायचं. ठरल्याप्रमाणं भेट झाली. त्या महिलेनं पंडितजींना हा प्रश्न विचारल्यावर पंडितजी लगेच तिला म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री का कॉलर पकड़ने की आज़ादी। यह तो किया मैने.’’

हेही वाचा : माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट

मतभेद हे लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आहे. परंतु मतभेदाला मनभेदाचं, मनभेदाला व्यक्तिभेदाचं, व्यक्तिभेदाला व्यक्ती द्वेषाचे, व्यक्तिद्वेषाला व्यक्तिसुडाचं रूप येतं आणि तेव्हाच लोकशाहीचं मांगल्य संपतं.- यशवंतराव चव्हाण

(लेखक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.)

lokrang@expressindia.com

Story img Loader