-श्वेता सीमा विनोद

चौथीला असेन. दहाबारा दिवसांपूर्वी पाऊस होऊन गेला होता. पावसाळा सुरू झाला आहे असं टीव्हीवर सांगत होते. त्यामुळे पहिला पाऊस झाल्या झाल्या लोकांनी कपाशी टोचली होती. एक दिवस आलेला पाऊस नंतर गायब झाला. कडक ऊन पडायचं. लावलेली कपाशी मरून जाईल अशी सगळीकडे चर्चा. दुपारी कडक ऊन पडलं की संध्याकाळपर्यंत पाऊस येईल, या आशेवर ओट्याओट्यावर बसलेले लोक. रेडिओवर, टीव्हीवर, पेपरात येणाऱ्या हवामानाच्या अंदाजावर गप्पा करणारे लोक. मग एका दिवशी गावातली एक आजी वारली. तिला ठेवायची वेळ होती संध्याकाळची. मी घरी होते. घरातले बाकी सगळे ठेवायला. अचानक जोरजोरात पाऊस सुरू झाला. जोरदार वादळ. विजा. भीती वाटावं असं वातावरण. ठेवायला गेलेले लोक धावपळ करत भिजत घरी येऊ लागले. मागच्या गल्लीत वाऱ्यामुळे कुणाच्यातरी घरावरचे पत्रे उडून गेले होते. मला भीती वाटत होती आपल्या घरावरचेही पत्रे उडून जातील. घरात जिथं जिथं गळत होतं तिथं तिथं भांडे ठेवून मी आई पप्पांची वाट पाहत बसले. दुसऱ्या दिवशी चर्चा होती की त्या आजीने गावासाठी पाऊस पाठवला. सगळ्यांच्या बोलण्यात आनंद जाणवत होता. लावलेली कपाशी मरणार नाही याचा आनंद. दुबार पेरणी करावी लागणार नाही याचा आनंद.

मलाही पाऊस पडल्याचं बरंच वाटलं. पण पाऊस पडल्यावर मला खरंच निखळ आनंद होतो का, ते अजूनही कळत नाही. आपलं घर पावसात गळतं किंवा रस्त्यावर घाण होते किंवा गावची हागणदारी वापरणं किती मुश्कील होतं हे सगळं एकीकडे अन् पिण्यासाठी शेतीसाठी पाऊस हवा हे वाटणं एकीकडे… या दोघांमधलं कोणतं पारडं जड असेल त्यावेळी हे आता नेमकं आठवत नाही.

delayed, arrival, rain, rain news,
दगाबाज ऋतूला पत्र…
Mumbai, rain, experience,
ज्याचा-त्याचा पाऊस.. : निळया ताडपत्रीचा दृष्टांत
Rain Memories, memories of rain, Emotional Landscape of rain memories, challenges in rain, rain memory story, lokrang article, marathi article,
कहाण्या तर ओल्याचिंबच राहतात…
story of hrishikesh palande about konkan rain
किती याड काढशील?
chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!
Parables of lok sabha election 2024 marathi news
निवडणूक निकालाच्या बोधकथा…!
chaturanga anti aging marathi news
कारी बदरी जवानी की छटती नहीं…
Rahul Gandhi marathi news
‘युवराज’ ते धीरोदात्त नेता!

हेही वाचा…विखंड भारत, अखंड लोक

असंच पुढे सातवी-आठवीत असताना पाऊस पडायची काहीच लक्षण दिसेनात. १५-१५ दिवस नळ येत नव्हते. धरणं नद्या कोरड्याठक्कं. घरी येणाऱ्या पेपरात पावसामुळे लोणावळा किंवा तत्सम ठिकाणी फिरायला जाणाऱ्या लोकांचे फोटो यायचे. भुशी धरणाजवळ पर्यटकांची गर्दी अन् खाली भरपूर पाण्यात मजा करताना लोकांचे फोटो. अन् तेव्हाच नेमकं आमच्या इथं ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत हातापायाला डोक्याला कमरेला कडुनिंबाचा पाला गुंडाळलेले लोक गावभर फिरायचे. प्रत्येक गल्लीत त्यांना थांबवून त्यांची पूजा केली आणि ग्लासभर पाणी त्यांच्या पायावर आणि डोक्यावर टाकलं तर पाऊस पडतो असं मनापासून मानणारे लोकं.

पण धोंडी नावाच्या देवाला साकडं घालूनही पाऊस काही लवकर आला नाहीच. (ही धोंडी धोंडी करत गावासाठी पाऊस मागत गावभर फिरणारी माणसं कशी एका जात समूहातून येतात आणि जातीची उतरंड कशी काम करते हे उमगायला अजून थोडा काळ जावा लागला). मग त्यावर्षी अशी चर्चा ऐकली की, ‘पिंपळगावात पोरगी देऊ नये. तिथे पाणी येत नाही १५-१५ दिवस’ पिंपळगावच्या म्हणजे माझ्या गावच्या मुलांना लग्नासाठी मुली न मिळल्याचं हेपण कारण वाटायला लागलं. गावात पाहुणे देखील मुक्कामी थांबायचे नाहीत. दुसऱ्या गावचे नातेवाईक ही बोलताना सहज पिंपळगावला नावं ठेवायचे. मग वाईट वाटायचं. त्यावर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पाऊस झाला. खूप पाऊस झाला. पंचक्रोशीत आमचं गाव प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. आषाढीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. आजूबाजूच्या गावातून मुक्कामी वाऱ्या येतात. त्यादिवशी पाऊस झाला. त्यानंतर लोकं म्हणायला लागले की आधी पाऊस पडो ना पडो आषाढीच्या दिवशी जरूर पाऊस पडणार. मग आषाढीची वाट पाहणं सुरू होतं. ते अजूनही तसंच सुरू आहे. आधी खूप पाऊस पडला नाही तरी आषाढीपासून नीट पाऊस येईल हे मानणं सुरू आहेच.

पाऊस आणि अफवा, वेगवेगळया श्रद्धा-अंधश्रद्धा हे एक समीकरणही मग होत गेलं. हळूहळू धरणाच्या पाण्याचं जरा नीट नियोजन, ठिबक सिंचन यामुळे बिनापाण्यामुळे कपाशी मरून गेलीय हे ऐकू येणं कमी होत गेलं. पण तरीही आजही मी कुठेही असले तरी पाऊस पडल्यावर ‘‘अरे वा, एकदाचा पाऊस पडला’’ आणि ‘आता कितीतरी लोकांची घरं गळतील’, अशा द्वंद्वात मन सापडलेलं असत. मला नेहमी वाटत आलंय की आपण कोणत्या परिस्थितीत, कुठे राहतो, काय करतो या सगळ्यावर पाऊस आवडणं न आवडणं ठरतं. नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेली ‘पावसाचा निबंध’ आणि ऑस्कर मिळालेला ‘parasite’ सिनेमातला पाऊस मला अधिक जवळचा वाटतो तो यामुळेच.

हेही वाचा…तवायफनामा एक गाथा

पावसाचा निखळ आनंद मी लहानपणापासून घेतला तो फक्त श्रावण महिन्यात. दर वर्षीच्या श्रावणातल्या एखाद्या सोमवारी (श्रावणातल्या सोमवारी डोंगरावर जाणं हा अलिखित नियम आजही पाळला जातो आणि आजही दर श्रावण सोमवारी सकाळची शाळा असते) वडिलांबरोबर अजिंठातल्या डोंगररांगेत फिरायला जाणं ठरलेलं असायचं. गल्लीतले वर्गातले भरपूर मित्रमैत्रिणी असायचे. एकेकावेळी ३५ -४० पोरापोरींची पलटण सकाळी डबे बांधून निघायची. गावातून दोन रिक्षांमध्ये बसून निघायचं. ‘वरासाडे तांडा’ म्हणून जवळ छोटं खेडं आहे. तिथे आमच्या गावच्याच संस्थेची एक निवासी आश्रमशाळा आहे. त्या आश्रमशाळेच्या बाहेर पाववड्याची गाडी लागते. पाववडा हा पदार्थ फक्त आमच्या भागात मिळतो. पॅटिससारखा प्रकार. पावाला बेसन लावून तळून काढणं, पण इथला पाववडा स्पेशल असतो. तळलेला वडा अर्ध्यात कापून त्यात वांग्याची किंवा बटाट्याची भाजी, लाल तिखट, चिंचेची चटणी असं भरलं जातं. ज्या डोंगरावर चढायचं आहे तो डोंगर समोर दिसतोय. आम्ही तिथल्याच एका झाडाखाली बसून पाववडे खातोय असा सीन असायचा. अन् मग तिथून थेट चालत निघायचं मुरडेश्वर डोंगराच्या खोऱ्याकडे. या प्रवासात पाऊस पडायला लागला की ट्रिप सक्सेस झाली म्हणायची. कधी आमच्या गावच्या नदीचा उगम शोध, कधी मोठा दगड उचलला की त्याखाली विंचूच निघू दे, कधी लोक जातात ती पायवाट सोडून थेट खडकाला धरून चढायचा प्रयत्न करू दे… हे सगळं आजही जसंच्या तसं आठवतं. अजिंठा डोंगर रांगेतले तीनचार ठराविक ठिकाणं सोडली तर बाकी सुंदर जागा लोकांना जास्त माहीत नाही. पप्पांनी अशा अनेक नवीन जागा आम्हाला दाखवून आणल्या. शिक्षणासाठी दहावीनंतर पुण्यात आले. पुण्याच्या आसपास फिरायला लागले तेव्हा कळलं की, आपली अजिंठा डोंगर रांग किती भारी आहे, पण लोकांना माहीत नाही. त्या डोंगररांगेला पण लोकप्रिय केलं पाहिजे असं वाटायचं. पण आता चांगल्या जागांवर झालेली गर्दी पाहून या जागा जगाला माहीत नाही याचं बरं वाटतं. तर हा, अजिंठा डोंगर बघायला मिळतो, वर्षभरासाठी डोळ्यात साठवून ठेवता येतो म्हणून श्रावण आवडतो. डोंगरावर जातोय अन् त्यादिवशी दिवसभर चटचट ऊन पडलं तर ट्रिप वाया जाईल, ही धारणा तेव्हा होती आणि आजही आहेच.

याव्यतिरिक्त पावसाळा आवडतो तो रानभाज्यांसाठी. चिव्वळची भाजी अन् फुनके, कटुल्याची भाजी, चांदणीच्या फुलांचे भजे आन् भाजी, चिंचेच्या फुलोऱ्याची भाजी, हाताग्याच्या फुलांचे भाजी अन् भजे… अजून बरंच काय काय.

गाव सोडून शहरात येऊन अनेक वर्ष झाली. तरी पहिला पाऊस पडला की गावाकडचाच पाऊस आठवतो. वाट बघायला लावणारा, न येऊन आणि जास्त येऊनही पिकांचं नुकसान करणारा, वीज पडून जीव घेणारा, अन् आठवत राहते कचऱ्याचं ओझं वाहणारी नदी अचानक खळखळ वाहू लागते तेव्हा पूर आला म्हणून उत्सुकतेने बघायला जाणं, झडी लागली की चार चार दिवस घरी अलगीकरण-विलगीरणात जाणं, खूप पाऊस पडतोय म्हणून लवकर सुटलेली शाळा, पाहिल्या पावसाचा गल्लीत खेळून भिजणं, कपाशी टोचताना सर कधी संपते याची वाट पाहणं… पाऊस दिसत असेल सारखा, पण प्रत्येकाचा वेगळा असतो हे माझं ठाम मत…

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जातवास्तवाचा शोध…

पाचवीला असताना राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाषणाला जायचं होतं, तेव्हा शिक्षकांनी भाषण लिहून दिलेलं. भाषणाची सुरुवात ना. धो. महानोरांच्या ‘या नभाने ह्या भुईला दान द्यावे’ कवितेने केली होती. आजही ती कविता आठवली की तो पाचवीतला पावसाचा काळ आठवत राहतो. मी पुढे येत गेले, माझं पाऊस समजणं मात्र तिथे अडकून पडलं असं सतत वाटत राहतं… अन् अजूनही कुणी पावसाबद्दल बोल म्हटलं की त्यातल्याच ओळी आठवतात.