सुनीताबाईंबद्दल त्यांना अधिक जवळून बघण्याचं भाग्य मिळालेले, अधिक नेमकेपणे सांगता येणारे, अधिक काळ त्यांना पाहिलेले… अनेक लोक आहेत. मी त्यांच्याहून वेगळं काय सांगणार? मी वेगळं सांगू शकीन ते बहुतेक माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेबद्दल आणि त्यातून मला मिळालेल्या गोष्टींबद्दल.
सुनीताबाईंचं लेखन मी वाचलं ते पुलंच्या भक्तीत पूर्णत: बुडून गेल्यावर. ऐन घडणीच्या वयात. चौदा-पंधराव्या वर्षी. आम्हांला दहावीत असताना ‘आहे मनोहर तरी’मधला एक अंश मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला होता. त्या निमित्तानं ‘आहे मनोहर तरी’ हातात आलं आणि मला माझ्या पिंडाला मानवणारं, अगदी जवळचं वाटणारं काहीतरी मिळाल्याचा भास झाला. त्या लेखनातली बंडखोरी, स्वातंत्र्यावरचं प्रेम आणि त्याकरता किंमत मोजण्याची तयारी, अतिशय नाजूक आणि सूक्ष्म भावनांचे पदर उलगडून बघण्याची हातोटी आणि त्यामागची अपरिहार्यता… हे सगळं माझ्या तोवरच्या वाचनापेक्षा पूर्ण वेगळं होतं. माझ्या संवेदनाखोर स्वभावाला ते लेखन फार जवळचं वाटलं.
त्यापेक्षाही निराळी आणखी एक गोष्ट घडली, असं आता जाणवतं.
आपण घडतो त्यात निरनिराळ्या बाबींचा हात असतो. प्रत्यक्ष आयुष्यातली उदाहरणं आणि बरावाईट वारसा असतो, तसाच नजरेसमोर वावरणाऱ्या समाजातल्या इतर प्रतिष्ठित उदाहरणांचाही भाग असतो. त्यातल्या कुणाचे प्रभाव आपण आपल्यावर पाडून घ्यायचे, हे निवडणारे आपणच असतो. पण मुळात अशा प्रकारची उदाहरणं भोवतालात असावी लागतात. सुनीताबाई तशा होत्या.
हेही वाचा : ‘रजनी’च्या पुनर्शोधासाठी ‘रजिया’चा लढा
त्यांचं स्वत:चं कर्तृत्व आणि गुणवत्ता नाकारण्याची आजघडीला कुणाचीही छाती होणार नाही. पण ‘आहे मनोहर तरी’ प्रकाशित झाल्याच्या अल्याड-पल्याडच्या काळात पुलंची लोकप्रियता वादातीतपणे त्यांच्याहून मोठी होती. ‘पुल’ या नावाला एक जादुई वलय होतं. तसं तर ते आजही आहेच. तेव्हा ते किती प्रभावी असेल, याची कल्पना आपण सहजगत्या करू शकतो. पुलंना आणि त्यांची पत्नी म्हणून सुनीताबाईंना मराठी माणसांच्या जगात मानाची जागा होती. मंगला गोडबोलेंनी सुनीताबाईंच्या चरित्रामध्ये पुल आणि सुनीताबाई यांना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ अशी अतिशय चपखल संज्ञा वापरली आहे. खरोखरच त्या दोघांचं स्थान तसंच होतं. अशा ठिकाणी असणाऱ्या सुनीताबाईंनी आपल्या लोकप्रिय कलावंत नवऱ्याच्या सोबत संसाराची धुरा निमूट वाहिली असती आणि मनोभावे त्याच्यासह मिरवलं असतं, तरीही त्यांचा उदो-उदोच झाला असता. पण त्यांनी हा सहज मिळू शकणारा मान नाकारला. त्यांनी या भूमिकेच्या बरोबर उलट वागून दाखवलं.
‘आहे मनोहर तरी’मधून त्यांनी नवरा म्हणून पुलंच्या वागण्याचं रोखठोक विश्लेषण केलं. आणि पुलंचे दोष त्यांच्या पदरात घातले. वास्तविक पुल हे अशा पिंडाचे होते, की त्यांनी सुनीताबाईंच्या कोणत्याही निर्णयांना कधीही काडीमात्र विरोध केला नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणं तर त्यांच्या स्वभावात नव्हतंच, पण सुनीताबाईंनी स्वत: पुलंच्या बाबतीत घेतलेले निर्णयही त्यांनी विनातक्रार मानले. या व्यवस्थेत सुनीताबाईंची दोन्ही अंगांनी सोयच होती. स्वातंत्र्य तर होतंच, शिवाय कर्कशा न व्हावं लागण्याची सोयही होती. ही व्यावहारिक सोय वापरून मूलभूत प्रश्नांना बगल देता येणं एखादीला सहज शक्य झालं असतं. पण सुनीताबाईंनी तसं केलेलं दिसत नाही. त्यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीबद्दलच प्रश्न उपस्थित केले. वेळोवेळी मी माझे आणि भाईच्याही आयुष्याबाबतचे निर्णय घेत गेले, हे जरी माझ्या पथ्यावर पडत असलं, तरी भाई मात्र वेळोवेळी एखाद्या जाणत्या सहचरासारखं न वागता एखाद्या लहान मुलासारखं आत्मकेंद्री पद्धतीनं वागला आहे, या आशयाचा सल त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणी बोलून टाकला. पुलंना गाडी चालवता येत नसतानाही निव्वळ पुरुष असल्यामुळे त्यांना मिळालेल्या ‘शिकिवनाऱ्या बाबा’च्या उपाधीबद्दलचा किस्सा प्रसिद्ध आहे. पण उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यात पुलंबद्दल कुठलाही कडवट सूर नव्हता. पुलंच्या प्रतिभेबद्दल सुनीताबाईंना आदर आणि अप्रूप होतं. तिला निगुतीनं जपण्याचं काम सुनीताबाईंनी जन्मभर केलं. पण आश्चर्य म्हणजे, पुलंच्या, एखाद्या लहान मुलासारख्या आत्मकेंद्री परावलंबित्वाबद्दल तक्रार नोंदवतानाही पुलंबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. त्वेष वा राग नव्हता. लग्नगाठीतून जन्माला येणारे स्त्रीवरचे अन्याय हे पुरुषसत्ताक व्यवस्थेची फळं कशी असतात, याबद्दलचं किंचित कडसर – कडवट नव्हे – भान त्या प्रकटनात भरून राहिलं होतं. दलित लेखकांना उद्देशूनही त्यांनी त्या आशयाचे प्रश्न विचारले होते. ‘तुम्ही शोषित. आम्ही स्त्रियाही शोषित. तुम्हांला तरी आमची दु:खं कळतील असं वाटलं होतं’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्या पुस्तकातली ‘आहे मनोहर तरी गमते उदास’मधल्या उदासरम्य भावाची एक छटा त्यातूनही आलेली होती. दुसरं म्हणजे स्त्री म्हणून स्वत:ला पडलेल्या शारीर मोहांबद्दल लिहिणं. सुनीताबाई चळवळीत काम करत असताना त्यांना ‘भय्या’ या आपल्या मित्राविषयी मोह पडला आणि काहीही चुकीचं पाऊल न उचलता त्या मोहातून पार झाल्या, याला कारण भय्याचा भलेपणा, असं त्यांनी प्रामाणिकपणानं नोंदवलं.
हेही वाचा : निरंकुश सत्ताधाऱ्यांचा धांडोळा
पुल-सुनीताबाईंना मूल नव्हतं. अगदी सुरुवातीच्या काळात एका अगदी साध्याशा प्रसंगी मन दुखावलं जाण्याचं निमित्त झालं आणि सुनीताबाईंनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. पुढे कारणाकारणांनी ते राहतच गेलं. हा किती मोठा निर्णय! पण सुनीताबाईंच्या त्या निर्णयामागे कुठलाही अभिनिवेश जाणवत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार न माजवता ते अगदी विनासायास वागवणाऱ्या व्यक्तीची सहजता त्यात दिसते. तसंच लग्नसंस्थेबद्दलच्या त्यांच्या चिंतनाचंही. ‘मला त्या बाह्य बंधनाची गरज नव्हती. भाईला हवं होतं, म्हणून लग्न केलं; त्याला ते नको असतं, तर मी सहज घटस्फोट देऊ शकले असते,’ असं त्या शांतपणे म्हणून गेल्या. त्यांना स्वत:च्या असामान्यत्वाची लख्ख जाणीव होती, पण त्याच वेळी पुलंच्या स्वभावातल्या मूलपणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सोडून जाण्यातलं क्रौर्यही जाणवत होतं. त्या काळातल्या – आणि खरं तर आजच्याही – स्त्रीस्वातंत्र्याच्या रूढ कल्पना पाहिल्या, तर कितीही मोठा सर्जनशील कलावंत का असेना, पण अशा कलावंत नवऱ्याच्या कारकिर्दीची व्यवस्था पाहणारी स्त्री, हे वर्णन त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या कर्तृत्ववान व्यक्तीला किती बोचणारं-सलणारं ठरू शकेल! पण त्यामध्ये त्यांनी कधीही कुठलंही शरमिंधेपण बाळगलेलं दिसत नाही. एखाद्या कवितेची निर्मिती मिरवावी तितक्याच अभिमानानं त्यांनी स्वत: निरीक्षणं करून बसवलेल्या तूप कढवण्यासारख्या खास कौशल्यांबद्दलही लिहिलं. मन लावून केलेलं, दर्जा राखून केलेलं कुठलंही काम श्रेष्ठच या मूल्यावरचा ठाम विश्वास त्यामागे होता. हे अशाच एखाद्या व्यक्तीला जमेल, जिच्या विचारांमध्ये लखलखीत स्पष्टता आहे. सुनीताबाईंनी ते सहजगत्या तोलून धरलं होतं.
हे जगावेगळं होतं.
सुनीताबाईंनी आपल्या नवऱ्याच्या प्रतिमेची तमा न बाळगता असं जाहीर लिहिण्यामुळे – आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पुलंनी ते अत्यंत उमदेपणानं स्वीकारण्यामुळे – फार वेगळा पायंडा पडला. अजिबात कडवट न होता, पण कुठलीही तडजोड न करता केलेला, स्त्रीवादी विचारांचा फार उन्नत आविष्कार बघायला मिळाला; तोही समाजात मानाच्या स्थानी विराजमान असलेल्या एका जोडप्याकडून. याचं मोल माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीनं फार मोठं होतं. स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रीचं आणि ते कुठल्याही अहंकाराशिवाय स्वीकारणाऱ्या पुरुषाचं असंही सहजीवन असू शकतं, असा एक महत्त्वाचा धडा त्यातून मला मिळाला.
पुढे सुनीताबाईंचं लिहिणं, त्यांची प्रश्नोपनिषद विणत नेणारी शैली, मित्रांच्या काळजी-प्रेमापोटी अतीव कोवळी होऊ शकणारी आणि स्वत:ला प्रश्न विचारताना मात्र धारदार शस्त्राचं रूप धारण करणारी त्यांची संवेदनशक्ती… या गोष्टी वाचनात आल्या. अधिकाधिक आवडत गेल्या. जी. ए. आणि सुनीताबाई या दोघांच्या पत्रव्यवहाराच्या रूपानं निराळ्याच उंचीवरच्या मैत्रीचा आविष्कार बघायला मिळाला, अतिशय कृतज्ञ वाटलं. पण ती सगळी पुढची गोष्ट.
हेही वाचा : खलनायकाचा ‘सच्चा’ चेहरा
पुलंच्या नाटकाची रॉयल्टी बुडवून नाटकांचे दडपून प्रयोग होत असत. अशा प्रयोगात सामील होणाऱ्या भल्या-भल्या लोकांना सुनीताबाईंनी कोर्टाच्या नोटिसा बजावल्या. मग ते प्रसिद्ध नट असोत वा पुलंचे मित्र असोत. तसंच दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे त्यांनी दिलेल्या एका देणगीचं. पी. एल. फाउंडेशनला भराव्या लागणाऱ्या कराच्या दृष्टीनं विचार करता ही देणगी पुढच्या आर्थिक वर्षात देणं सोयीचं होतं, म्हणून त्यांनी देणगी उशिरा दिली, पण देणगी देण्याचा निर्णय झाल्यापासूनच्या प्रत्येक दिवसाचं व्याजही देणगीत जमा करूनच. एकदा एखाद्या मूल्याविषयी संपूर्ण विचार करून त्याचा स्वीकार केला, की त्याच्या अंमलबजावणीत मागेपुढे पाहणं नाही. पदरी वाईटपणा येवो वा चांगुलपणा येवो.
न भिता आणि स्वच्छ विचार करता आला, की तो कुठल्याही टोकापर्यंत नेता येण्याचं धैर्य मिळत असेल? कुणास ठाऊक. मला तो विश्वास त्यांच्या लिहिण्यातून मिळाला खरा. त्यांचं स्थान बघता, तो त्यांच्यामुळे अनेकांना मिळाला असणार.
हेही वाचा : ‘लक्ष्मणरेषा’ पार करू देणारा बाउंड्रीवीर…
त्या स्वत: सिद्धहस्त प्रतिभावंत लेखक होत्या, असं म्हणता येत नाही. त्यांनी स्वत:ही तसं कधी मानलं नाही. पण तसं नसताही, आपली योग्यता आणि आपल्या मर्यादा नीट समजून घेतल्या आणि स्वत:शी निर्भयपणे प्रामाणिक राहिलं, तर किती प्रकारे निर्मितिशील असता येतं, याचा वस्तुपाठच जणू त्यांनी त्यांच्या जगण्यातून घालून दिला. इतर अनेक लेखकांबद्दल वाटतो तसा सहज मित्रभाव त्यांच्याबद्दल वाटत नाही, एक प्रकारचा धाक वाटतो. त्यांनी जगताना आखून दिलेली रेष तितकी मोठी होती, याचंच ते द्योतक मानलं पाहिजे!
बाकी कशापेक्षाही हे मला त्यांचं मोठं योगदान वाटतं.
meghana.bhuskute@gmail.com