सिद्धार्थ खांडेकर

जागतिक क्रीडा इतिहासात संभाव्य एकतर्फी निकाल पूर्णपणे उलटण्याची उदाहरणे फारच कमी, पण तरीही अशक्यप्राय विजयांच्या गाथा नोंदल्या गेल्या आहेत. विद्यमान बलाबल आणि पूर्वेतिहास आणि प्रतिस्पर्ध्याकडील आत्मविश्वास अशा तिहेरी अडथळय़ांना पार करून जिंकणारे दंतकथा बनतात. १९८३ सालच्या विश्वचषकात शेलका कुत्सितपणा पदोपदी अनुभवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने बलाढय़ वेस्ट इंडिजचा अंतिम सामन्यात पराभव करून क्रिकेट जगताला चकित केले. २५ जून १९८३ या दिवसाच्या स्मृतींसह क्रीडा क्षेत्रातील अशा विजयगाथांचे मासले..

Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
IND vs AUS 5 Big Reasons Why India Failed to Retain Border Gavaskar Trophy Against Australia
IND vs AUS: भारतीय संघावर १० वर्षांनी का ओढवली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की? वाचा भारताच्या पराभवाची कारणं
India Disqualified From WTC Final After Defeating in Border Gavaskar Trophy Australia vs South Africa
WTC Final: भारत WTC फायनलसाठी ‘नापास’; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही; ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकेत रंगणार अंतिम सामना

‘गूगल सर्च’सारखं काही तरी आम्हा भारतीयांनी शोधून काढलं असतं किंवा विकसित केलं असतं, तर क्रीडा जगतातील सर्वात अद्भुत आणि अशक्यकोटीतील विजयांच्या सर्चमध्ये ‘लंडन, २५ जून १९८३’ ही तारीख पहिल्या क्रमांकावर किंवा पहिल्या पाचात तरी झळकली असती. असा सर्च दिल्यानंतर ज्या तुरळक क्रिकेट सामन्यांचा उल्लेख होतो, त्यामध्ये कोलकाता २००१ आणि अ‍ॅशेस २००५ हेच प्रामुख्याने दिसतात. बाकी इतर उदारणांमध्ये क्रिकेट क्वचित आणि भारत तर अजिबातच नाही. क्रिकेट हा खेळ सध्या २५ पेक्षाही कमी देशांमध्ये गांभीर्याने खेळला जातो, पण रसिकसंख्येच्या बाबतीत तो केवळ फुटबॉलच्याच मागे आहे. स्पॉन्सरशिप आणि टीव्ही प्रेक्षकांच्या आकडेवारीत पहिल्या पाचात आहे. इंडियन प्री्रमियर लीग जगातील सर्वाधिक श्रीमंत स्पर्धामध्ये गणली जाते आणि विराट कोहलीसारखे खेळाडू श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहात सातत्याने झळकतात.

*****

क्रिकेटमधील ‘आयबॉल-मनिबॉल’ क्रांतीची बीजे ज्या घटनेने पेरली, ती घटना म्हणजे २५ जून १९८३ रोजी विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर मिळवलेला सनसनाटी विजय, हे नि:संशय! त्या घटनेमुळे भारतामध्ये आणि जगात क्रिकेटला कशी नवी दिशा मिळाली हा मुद्दा थोडा बाजूला ठेवू. परंतु अशक्यप्रायतेच्या निकषावर त्या विजयाची म्हणावी तितकी दखल आजही पाश्चिमात्य माध्यमे घेत नाहीत. पाश्चिमात्य म्हणजे अर्थात ब्रिटिश आणि अमेरिकी माध्यमे. पण ती आपण घ्यायला हवीच ना? १९८३ विश्वचषकासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला, त्यावेळी या संघाला गांभीर्याने घ्यावी अशी परिस्थिती अजिबातच नव्हती. ईस्ट आफ्रिकेविरुद्ध १९७९ मध्ये मिळवलेला एकमेव विजय आणि त्याच स्पर्धेत श्रीलंकेसारख्या त्यावेळच्या सहयोगी संघाकडून झालेला मानहानीकारक पराभव.. एवढीच भारतीय संघाची ओळखवजा शिदोरी होती. १९७९ ते १९८३ या चार वर्षांमध्ये भारतीय संघाने थोडीफार प्रगती केलेली असेलच. पण त्यांच्या विश्वचषकात किमान एखादा सामना जिंकण्याची तरी धमक होती का, याविषयी यजमानांना म्हणजे अर्थातच इंग्लिश क्रिकेट मंडळ आणि मेरिलिबॉन क्रिकेट क्लबला खात्री नव्हती. त्यावेळी तीन संघांचीच चर्चा सर्वाधिक होती. म्हणजे वेस्ट इंडिज तिसऱ्यांदा विजयी ठरणार, फक्त यावेळी अंतिम सामन्यात कोण खेळणार? ऑस्ट्रेलिया की इंग्लंड? अशी या तीन संघांची चर्चा होती. इंग्लंडमध्ये एखाद्या स्पर्धेतील संघाची ताकद जोखण्याचा त्यातल्या त्यात खात्रीशीर मार्ग म्हणजे अधिकृत सट्टेबाजांची पैज गुणोत्तरे. त्यात भारतासाठी ५०-१ आणि ६६-१ अशा एकतर्फी पैजा लावण्यात आल्या होत्या. म्हणजे भारतीय संघावर पैज लावणारा त्या जोखमीच्या दुनियतेही ठार वेडाच ठरेल, अशा पद्धतीचे ते ‘ऑड्स’ होते. भारतीय संघातील खेळाडू आणि व्यवस्थापनासाठी अंतिम सामन्याच्या प्रवेशिकाच छापण्यात आल्या नव्हत्या. भारताचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये कौंटी खेळत होते. त्यांच्यासाठी विश्वचषक स्पर्धा म्हणजे फुकटातली सुट्टी आणि हॉटेलनिवास ठरणार होता. भारताचे तीन सामने लीस्टर, चेम्सफर्ड आणि टनब्रिज वेल्स अशा तुलनेने छोटय़ा मैदानांवर खेळवले जाणार होते. भारतीय संघात गुंडप्पा विश्वनाथ नाही आणि सुनील गावस्कर या संघाचा कर्णधार नाही.. कपिलदेव या युवा अष्टपैलू क्रिकेटपटूकडे भारतीय संघाची धुरा आहे, तेव्हा तेथूनही फार अपेक्षा नाहीत.. रॉजर बिन्नी या त्यांच्या एका खेळाडूचे पणजोबा-खापरपणजोबा स्कॉटिश होते. ‘हा संघ जिंकला तर मी माझे लिखित शब्द खाईन.’ – इति एक इंग्लिश पत्रकार. वगैरे जुजबी माहिती आणि शेलक्या कुत्सितपणाव्यतिरिक्त भारतीय संघाच्या वाटय़ाला ब्रिटिश माध्यमांकडून काहीही आले नव्हते. पण हे सगळे केवळ भारतीयांविषयीच्या पूर्वग्रहातून किंवा माहितीच्या अभावातून व्यक्त होत नव्हते. त्या स्पर्धेचा संभाव्य विजेता ठरवला गेलेला वेस्ट इंडिजचा संघ सर्वशक्तिमान होता. पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धामध्ये जिंकण्यासाठी थोडीफार लढत द्यावी लागलेल्या या संघाला तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेत फार आव्हान असे नव्हतेच. ऑस्ट्रेलियन संघ उतरणीला लागला होता. इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजला टक्कर देऊ शकेल अशा योग्यतेचा नव्हता. बाकीच्या संघांची बातच नव्हती. भारत आणि झिम्बाब्वे हे तर खिजगणतीतही नव्हते.

भारताच्या त्या स्पर्धेतील विजयाकडे या अशक्यप्रायतेच्या दृष्टिकोनातून बघावे लागेल.

*****

जागतिक क्रीडा इतिहासात अशा प्रकारे संभाव्य एकतर्फी निकाल पूर्णपणे उलटण्याची उदाहरणे शोधावी लागतील. तशी ती शोधायचा प्रयत्न केल्यास अशा अनपेक्षित विजयांचे फार मासले हाती लागत नाहीत. बहुतेकदा अशी उदाहरणे शोधताना एक गल्लत होण्याची शक्यता असते. अशक्यप्राय विजयांच्या गाथा क्रीडा इतिहासात थोडक्या नाहीत. किंबहुना, क्रीडा क्षेत्राची खुमारी कमकुवतांनी बलाढय़ांवर मिळवलेल्या विजयांनीच वाढत असते. पण जेथे जागतिक अजिंक्यपद, जगज्जेतेपदाचा मुद्दा येतो आणि एखादा संघ किंवा खेळाडू जिंकण्याची शक्यता ९० ते १०० टक्क्यांच्या आसपास असते, अशा वेळी तो संघ किंवा त्या खेळाडूला हरवणे अत्यंत दुर्मीळ आणि म्हणून विशेष दखलपात्र ठरते. भारताच्या त्या विजयाची तुलना करायचीच झाल्यास तीन उदाहरणे समोर येतात – बर्न १९५४, टोक्यो १९९०, लंडन २०००. येथे एक सावधगिरीची नोंद. ही निरीक्षणे पूर्णत: व्यक्तिसापेक्ष आहेत आणि त्यामुळेच निर्विवाद ठरत नाहीत. पण साधे, सोपे-सरळ निकष लावायचे झाल्यास गुंतागुंत आणि त्यामुळेच मतमतांतरे व वादविवाद कमी होऊ शकतात. हे निकष म्हणजे, दोन प्रतिस्पर्ध्याच्या क्षमतेमधील दर्शनीय तफावत, दोन्ही संघांचा जागतिक स्पर्धेमध्ये खेळण्याचा पूर्वेतिहास आणि अनुभव या भांडवलावर निश्चित विजेत्या मानल्या गेलेल्या प्रतिस्पर्ध्यामधील निर्णायक ठरू शकेल असा आत्मविश्वास. अपेक्षा, विद्यमान बलाबल व पूर्वेतिहास आणि प्रतिस्पर्ध्याकडील आत्मविश्वास अशा तिहेरी अडथळय़ांना पार करून जिंकून दाखवलेले थोडकेच आढळतात. त्यामुळेच असे विजय दंतकथा बनून राहतात.

*****

 ‘मिरॅकल ऑफ बर्न’ म्हणजे १९५४च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीने हंगेरिविरुद्ध मिळवलेला २-१ असा सनसनाटी विजय. ती स्पर्धा स्वित्झर्लंडमध्ये खेळवली गेली आणि अंतिम सामना बर्न येथे झाला. हंगेरीचा संघ त्यावेळी अतिशय बलाढय़ होता. १९५२मधील ऑलिम्पिक सुवर्णपदक त्यांनी जिंकले होते आणि विश्वचषकापर्यंतच्या तीसेक लढतींमध्ये पराभव पाहिलेला नव्हता. याउलट पश्चिम जर्मनीच्या संघाची बांधणीच १९५० नंतर झाली. त्यांच्या संघातील सर्व खेळाडू हौशी होते. याउलट हंगेरीच्या संघातील बहुतेक सर्व व्यावसायिक होते. त्या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात हंगेरीने पश्चिम जर्मनीची ८-३ अशी धुलाई केली होती. अंतिम लढतीमध्येही पहिल्या आठ मिनिटांमध्येच हंगेरीने २-० अशी आघाडी घेतली होती. तरीही पहिल्याच हाफमध्ये बरोबरी साधून, दुसऱ्या हाफमध्ये तिसरा गोल करत पश्चिम जर्मनीने तो सामना आणि ती स्पर्धा जिंकली. अशी स्पर्धा ‘पाहुणा’ म्हणून पहिल्याच प्रयत्नात जिंकणारा पश्चिम जर्मनी हा विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला संघ. तत्पूर्वीच्या दोन्ही जगज्जेत्यांनी – उरुग्वे आणि इटली – आपापली पहिली अजिंक्यपदे घरच्या मैदानांवर मिळवलेली होती.

माइक टायसन विरुद्ध बस्टर डग्लस या लढतीमध्येदेखील अद्भुत आणि अकल्पित असे काहीसे घडले. जगज्जेता हेवीवेट मुष्टियोद्धा ‘आयर्न’ माइक टायसनने त्या लढतीपर्यंत एकदाही पराभव किंना नॉक-आउट अनुभवलेला नव्हता. त्यावेळी बॉक्सिंगच्या विविध संघटना असायच्या आणि प्रत्येकाचे वेगवेगळे जगज्जेते. हा पठ्ठय़ा त्या सगळय़ांच्या लढतीमध्ये जगज्जेता ठरला होता. अपराजित आणि वादातीत. त्याच्यासमोर अनेक मुष्टियोद्धे यायचे, उभे राहायचे आणि बहुतेकदा नॉक-आउट होऊनच माघारी जायचे. टोक्योमध्ये जगज्जेतेपदाच्या लढतीत बस्टर डग्लसचे असेच काहीतरी होणार, हे निश्चित होते. त्याच्या विजयासाठी सट्टेबाजांनी ५०-१ असा एकतर्फी अंदाज लावला होता. टायसन आक्रमक नव्हे, तर खुनशीदेखील होता. फेऱ्यांपाठोपाठ फेऱ्या लढवत गुणांच्या आधारे लढती जिंकण्याचे कसब त्याच्या गावी नव्हते. प्रतिस्पर्ध्याला रक्तबंबाळ करून नॉक-आउट करणे एवढेच त्याला ठाऊक होते. त्या लढतीआधीच्या सामन्यात टायसनचा प्रतिस्पर्धी ९३ सेकंद टिकला होता. अशी पार्श्वभूमी असताना बस्टर डग्लसने टायसनला झुंजवले. डग्लस सहजी हार पत्करणारा नाही, हे जाणवल्याने टायसन अस्वस्थ होऊ लागला. तरीही जोर दाखवत नवव्या फेरीमध्ये टायसनने केलेल्या प्रहारामुळे डग्लस गलितगात्र झाला नि कोसळला. पण दहा अंक मोजले जाण्याच्या आत कसाबसा उठला. दहाव्या फेरीत चमत्कार घडला. डग्लसच्या तुफानी प्रतिहल्ल्यांसमोर टायसन नामोहरम होऊ  लागला आणि त्याच्या एका प्रहाराने टायसन जो कोसळला, तो दहा अंक मोजले जाऊनही उठू शकला नाही. बस्टर डग्लसने त्यापूर्वी कधीही जागतिक स्पर्धेमध्ये लक्षवेधी कामगिरी केली नव्हती. लढतीच्या २३ दिवस आधी त्याच्या आईचे निधन झाले होते. लढतीच्या आदल्या दिवशी त्याच्या अंगात तापही होता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही डग्लसने टायसनवर बाजी उलटवली.

लंडनमध्ये २००० साली बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतींमध्ये तत्कालीन जगज्जेत्या गॅरी कास्पारॉव्हला त्याच्या पट्टशिष्याने- रशियाच्याच व्लादिमीर क्रॅमनिकने मात दिली. ती लढत झाली, त्यावेळी जागतिक बुद्धिबळ अवकाशात दोन तट पडले होते. पण कास्पारॉव्हच्या दर्जाविषयी कुणाचेच दुमत नव्हते. लंडनमध्ये त्याचा प्रतिस्पर्धी असलेला व्लादिमीर क्रॅमनिक आणि कास्पारॉव्ह यांच्या एलो रेटिंगमध्ये ७७ गुणांची तफावत होती- जी तोपर्यंतच्या जगज्जेतेपदाच्या इतिहासात सर्वाधिक ठरते. कास्पारॉव्हचे रेटिंग त्या काळात २८४९ इतके अत्युच्च होते. तो एकही दीर्घ लढत हरलेला नव्हता. क्रॅमनिक हा उत्तम आव्हानवीर होता हे खरे; परंतु दीर्घ लढतीमध्ये त्याची कामगिरी अत्यंत सुमार होती. या पार्श्वभूमीवर क्रॅमनिकने कास्पारॉव्हला दोन डावांमध्ये पराभूत केले आणि १६ डावांची लढत १५ डावांमध्येच संपवली. कास्पारॉव्हला एकही विजय मिळवता आला नाही. त्याच्यासारख्या मातब्बर बुद्धिबळपटूकडून जगज्जेतेपदाच्या लढतीत ही कामगिरी धक्कादायक आणि अभूतपूर्व होती.

*****

आजच्या २५ जून या दिवसाचे भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने दुहेरी महत्त्व. ९१ वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय संघ पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उतरला लंडनमध्ये लॉर्डसवरच. बरेचसे हवशे-नवशे-गवशे असलेला तो संघ आणि त्या दिवसानंतर ५१ वर्षांनी लॉर्डसवर अंतिम सामन्यात उतरलेला कपिलदेव यांचा संघ, यांमध्ये अर्थातच मोठी तफावत होती. परंतु त्या ५१ वर्षांमध्ये देशातले क्रिकेट जितके बदलले, त्यापेक्षा अधिक बदल गेल्या ४० वर्षांमध्ये झालेला दिसून येतो. यात सर्वात ठळक बाब ‘विश्वविजयाची नवलाई नसणे’ ही आहे. निव्वळ आयसीसी ट्रॉफींचा विचार करायचा झाल्यास ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड या प्रस्थापित देशांच्या आधी भारताने १९८३मध्ये विश्वचषक जिंकला. यानंतर आपण आणखी चार आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. एकदिवसीय आणि टी-२०मधील प्रत्येकी एकेक जगज्जेतेपद आणि दोन आयसीसी अजिंक्यपदे. आपल्यानंतर १९८७ मध्ये पहिल्यांदा जगज्जेते बनलेल्या ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ९ अजिंक्यपदे पटकावली. त्यात ५ एकदिवसीय जगज्जेतेपद, प्रत्येकी एकेक टी-२० आणि कसोटी जगज्जेतेपद आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफ्या. आज चाळीस वर्षांनंतरही भारताच्या पहिल्या क्रिकेट जगज्जेतेपदाच्या कथा जितक्या सुरस आणि अद्भुम्त भासतात, तितक्या इतर स्पर्धाच्या भासत नाहीत. भारतातच येत्या वर्षी होऊ घातलेल्या विश्वचषक स्पर्धेविषयी ती नवलाईतली अद्भुम्तता अशी राहिलेलीच नाही.

*****

१९५४ मधील विजयानंतरचा पश्चिम जर्मनी आणि १९८३ मधील विजयानंतरचा भारत यांना वेगवेगळय़ा परिप्रेक्ष्यात स्वत:ची एक ओळख प्रस्थापित करण्याची संधी मिळाली. जर्मनीत फुटबॉल आणि भारतात क्रिकेट हा समाजजीवनाचा आणि संस्कृतीचा भाग बनला. हे योग्य झाले की अयोग्य, यावर चर्चा-विश्लेषणे होत राहतील. त्यावेळच्या कपिलदेवच्या

संघात साधेपणा होता आणि उद्दिष्टाविषयी नेमकेपणा होता. आज तसा साधेपणा आणि नेमकेपणा साधनस्रोतांच्या अतिसमृद्धीत आणि डेटासायन्सच्या गुंतागुंतीमध्ये हरवून बसला आहे. अल्गोरिदमच्या भानगडीत ऱ्हिदमच सापडेना अशी गंमत. अशा गर्दीत, छनछनाटात निखळ विरंगुळा शोधायचा असेल तर तो २५ जून, १९८३ या दिवसाच्या स्मृतींमध्येच आजही भरभरून मिळेल!

siddharth.khandekar@expressindia.com

Story img Loader