अरुंधती देवस्थळे
मीटीओरा माझ्या आयुष्यात अक्षरश: योगायोगाने आली. कारण आदल्याच वर्षी ग्रीसमध्ये हिंडून आलो होतो तेव्हा मी हिचं नावही कोणाच्या तोंडून ऐकलं नव्हतं; पण नंतर झूरिक मुक्कामी घडलेली छोटीशी कहाणी सांगायचा मोह आवरून सरळ मुद्दय़ावर येणं श्रेयस्कर. हे घडून यायला कारण ठरला आमचा लेखक, अनुवादक ग्रीक मित्र थेओ! याच्या तीर्थरूपांच्या मालकीचं ग्रीसमध्ये एक बेट असून हा मात्र पुस्तकांच्या जगात रमलेला.. असो. लांबशा वीकेंडची शोधाशोध करून आजवर न घडलेली ही मीटीओरा सफर.
प्रथमदर्शनी दिसतात ते उंचच उंच मोनोलिथिक खडकाचे पिंडस पर्वतांजवळचे सुळके. त्यांच्यावर नवव्या शतकापासून ख्रिश्चन मंक्स राहत आले आहेत. तिथवर आपण पायऱ्या आणि पायवाटांनी चढून जाऊ शकतो हे केवळ अविश्वसनीय वाटावं. या निर्जन पहाडी भागात ५० हजार वर्षांपूर्वीचे मनुष्य वसाहतीचे पुरावे आहेत. बाराव्या शतकात मंक्स (ख्रिश्चन मठात राहणारे साधू-संन्यासी) इथे शिडय़ांनी किंवा दोराने चढून वर येत आणि कपारींच्या आडोशाने राहत, निवारा बनवत. दोरांनीच टोपल्यांमध्ये भरून अन्नधान्य त्यांना वर पाठवून देण्यात येई. पुढे तेराव्या आणि चौदाव्या शतकातल्या बायझन्टाइन साम्राज्याच्या दहशतीमुळे सत्ता आणि राजकीय उलथापालथींपासून दूर राहण्यासाठी मंक्स इथे येऊन राहू लागले आणि एकेक मोनॅस्टरीज बांधल्या जाऊ लागल्या. मीटीओराच्या मोनॅस्टरीज या आसपासच्या सुळक्यांवर थोडीशी सपाटी बघून बांधण्यात आल्या होत्या.. चौदाव्या शतकाच्या मध्यावर मंक्स आणि नन्सना ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचं धार्मिक शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी! त्यांची संख्या चौदाव्या ते सतराव्या शतकात २४ पर्यंत पोहोचली होती.. ती सध्या सहा इतकी आहे. दोन नन्ससाठी आणि चार मंक्सकरिता. पडझड तर असणारच. पण रहिवासी आणि देखभाल दोन्हीही कमी पडल्यानं ही संख्या कमी होत गेली असावी. आता मात्र युनेस्कोच्या हेरिटेज प्रकल्पात समाविष्ट झाल्याने त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. इथे रहिवासी फारच कमी; पण या ना त्या मोनॅस्टरीमध्ये सारखं काहीतरी बांधकाम चालू असतं असं ऐकलं.
अथेन्सहून मीटीओराला ट्रेन किंवा बसने जाता येतं. कालंबाका हे मीटीओराच्या पायथ्याचं गाव. इथून सहा कि. मी.ची पायी चढाई करून वर पोहोचता येतं. पण या मोनॅस्टरीज आसपासच्या कडय़ांवर असल्या तरी एकमेकांपासून बऱ्याच दूर आहेत. प्रत्येकीच्या उघडण्या- बंद करण्याच्या वेळा पुढेमागे. आठवडय़ात बंद असण्याचे दिवसही वेगळे. इथे खायला-प्यायला काही नसतं म्हणून बरोबर हलका आहार, एनर्जी बार्स आणि पाणी बॅकपॅकमध्ये ठेवावं.
‘दि ग्रेट मीटिऑरॉन’ ही इथली पहिली मोनॅस्टरी! सर्वात जुनी, सर्वात उंच आणि सर्वात चढायला कठीण. तीनशेहून अधिक पायऱ्या आणि अधूनमधून अरुंद, नागमोडी रस्ते. खाली पाहावं तर अगदी निबिड अरण्य. पिवळ्या, नारिंगी, लाल रंगांच्या इतक्या छटा जगात कुठेही अशा एकत्र पाहण्यात येत नसाव्यात. आठशे वर्ष मागे नेणाऱ्या मोनॅस्टरीजची ओढ असतेच, पण इथे पावलोपावली थबकायला होतं. वळणावळणावर भेटणारं हे जंगल तर त्याहूनही पुरातन. आणि त्याच्या भव्यतेत होणारी पडझड जंगलाच्या घनदाटपणात बेमालूम लपून जाणारी असावी.
इथे तुम्ही कुठलं प्रेक्षणीय स्थळ किंवा सहलीला यावं या भावनेने येऊ नये. अपरिचित धर्माचा आदर करणारं गांभीर्य मनोमन बाळगावं. (हे घडतंच आपोआप तिथे पोहोचता पोहोचता.) पवित्र धार्मिक वास्तूंची शांतता भंग करू नये. खालच्या पट्टीत बोलावं आणि स्वच्छता राखावी. मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं अंगप्रदर्शन करू नये. स्त्रियांनी पायघोळ सैल स्कर्ट्स आणि खांदे झाकलेले टॉप्स घालावेत. नसल्यास प्रवेशापाशी ते भाडय़ाने मिळतात. भर उन्हाळ्यात आले तरी पुरुषांनीही लांब पँट्स व शर्ट्स घालायचे. बार्बेक्यू, मद्यपानास बंदी वगैरे नियम तिकिटांवरच छापलेले असतात.
वरून पाहावं तर एका बाजूला जंगल, तर दुसऱ्या बाजूला पायथ्याजवळच पायनीओस नदी.. हा प्रदेश सुपीक करणारी.
मोनॅस्टरीत असलेलं चर्च सोळाव्या शतकात बांधलेलं. त्यावर अतिशय सुंदर नक्षीदार फ्रेम्समध्ये बसवलेले फ्रेस्कोज (भित्तिचित्रं) आहेत. ओल्या पृष्ठभागावर रंगवलेली ही रंगीबेरंगी चित्रं मुख्यत: बायबलमधील कथा आणि संतांच्या आयुष्यातील घटनांची. प्रत्येक चित्राखाली माहिती आणि जागोजागी तक्ते लावलेले. आम्हाला कोणी मंक तर भेटला/ दिसलासुद्धा नाही. पण आम्ही जगाच्या चार वेगवेगळ्या खंडांतून आलेले चौघे भाग्यवानच. कारण चर्च बघत असताना दुरून कुठूनतरी स्वच्छ घनगंभीर आवाजातली समूहप्रार्थना कानावर पडत होती. भाषा कळत नव्हती, पण त्यात स्वत:साठी काही मागणं नसावं. विश्वकल्याणासाठी परमेश्वराला मानवजातीच्या वतीने साकडं घातलं जात असावं असं वाटून गेलं. कोरीव लाकडीकामाने भरगच्च चर्च. कसं जमलं असेल इतक्या दुर्गम कडय़ावर मोठय़ा प्रमाणावर इतकं नाजूक काम घडवून आणायला? धर्म नावाचं एक गहन कोडं कधी कोणाला उलगडो- न उलगडो; पण त्याच्या झपाटल्यासारख्या ओढीनं, समर्पितभावाने एरवी शक्य न वाटणारं अद्भुत काहीतरी साकार होताना दिसतं. लाकडी छत, पिवळा, नारिंगी, निळा वगैरे प्रसन्न रंग योजून चितारलेली चित्रं आणि दगडी भक्कम बांधकामाला लाकडी फ्लोअिरग. भिंतींचा खालचा साधारण अर्धा भाग लाकडी नक्षीदार कोरीव पलपिट्स, कठडे वगैरेंनी भरीव वाटणारा आणि वरचा अर्धा रंगीबेरंगी लहान-मोठय़ा चित्रांनी व्यापलेला. काही संतांचीही चित्रं मागच्या तेजोमंडलासह. धर्म आणि कला यांचा अतिशय सुंदर मेळ. तो जाणायला तुम्ही सश्रद्ध की देव न मानणारे, असा प्रश्न पडू नये. आत फोटोंची परवानगी नसल्याने अनेक तपशील विसरले गेले असणार. इथे एक म्युझियमही आहे. त्यात काही अतिशयच सुंदर धार्मिक हस्तलिखित पुस्तकं, धर्मकृत्यांत वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत असं सांगितलं होतं. म्हणजे अमुक एका संताची जपमाळ वगैरे. काही पुस्तकांच्या प्रतिकृती आता बाहेरही उपलब्ध आहेत असं कळलं. बाहेरच्या इमारती म्हणजे मंक्सच्या खोल्या. स्वत:ला धर्माला समर्पित केलेल्या मंक्स आणि नन्सचं आयुष्य पूर्णपणे अपारदर्शक. त्यांच्यासाठी असलेले अभ्यास आणि मेडिटेशनचे प्रशस्त कक्ष, ग्रंथालय, छोटय़ा बागा वगैरे काहीही पाहायला मिळत नाही. फक्त आहेत असं कळतं. प्रवेशद्वारापासूनच सुंदर भित्तिचित्रांची सुरुवात होते. आत एक इतिहासाचं संग्रहालयही आहे. त्यात मोनॅस्टरीच्या सुरुवातीपासूनच्या नोंदवह्य, हस्तलिखित पुस्तकं, मंक्सचे कपडे, पायताणं असं सगळं आहेच. एक जरा विचित्र म्हणजे इथे वारलेल्या मंक्सच्या ओळीने मांडून ठेवलेल्या कवटय़ा आणि अस्थींचं शेल्फ आहे. इथे आधी रुग्णालय होतं म्हणे. भग्नावशेषात पूर्वीचं स्वयंपाकघर, भांडीकुंडी नीट सांभाळून ठेवलेली पाहता आली. मोनॅस्टरीच्या वेगवेगळ्या भागांतून हिंडताना खुल्या प्रांगणामध्ये बाहेरचं निळं आकाश आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर पाहून मन तृप्त होत होतं. सर्व मोनॅस्टरीज दुरून दिसत होत्या. इथे सगळ्यांचा धर्म एकच असावा. अलिखित.. मनोमन समजलेला.. इथल्या निसर्गासारखाच कुठल्याही व्याख्येत बंदिस्त न होणारा.. असं वाटून गेलं.
मधल्या पायवाटेने वृक्षांमुळे मिळालेल्या पानगळीच्या गालिच्यावरून भराभर रोसानौ बघायला निघालो. या कडय़ावरची सगळी सपाटी या मोनॅस्टरीने व्यापलेली आहे. हिचं दुसरं नाव आगिया बार्बरा (सेंट बार्बरा)! ननरी कशी असते हे फक्त सिनेमांत पाहिल्याने कमालीचं कुतूहल होतं. चौदाव्या शतकातली रौसानो मोनॅस्टरी आकाराने आटोपशीर. कडय़ाने पुढय़ात घेऊन बसवावी तशी. चोहीकडे जंगलच जंगल. हिला जरा कमी पायऱ्या म्हणून भराभर गेलो, पण थोडीच पाहता आली. बाहेर नन्सनी केलेल्या सुंदर, साचेदार बागा. आत वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत. सुरुवातीच्या मजल्यावर सोळाव्या शतकात तिथे एक कॅथ्रिडल बनवलं गेलं होतं. आतली सगळी चित्रं एकाच मंकने काढली आहेत. ही भित्तिचित्रं क्रेटन स्कूलच्या शैलीतली- म्हणजे धर्मातल्या वंदनीय स्त्री-पुरुषांची चित्रं. त्यात पौर्वात्य आणि पाश्चिमात्य वैशिष्टय़ांचा मेळ : चेहरे सावळे, सडपातळ देहयष्टी, आखीवरेखीव मांडणी, कपडे रंगीबेरंगी, पडदे किंवा गालिच्यांवर भौमितिक आकारांचे डिझाईन.. सगळं कसं जागच्या जागी. त्यात उत्स्फूर्तता कमी, पण उत्तम बेतलेलं- हे मागाहून समजलं. वरच्या मजल्यांवर मेडिटेशनचा हॉल आणि प्रदर्शन कक्ष. नियमानुसार भेटायला येणाऱ्यांना मोकळी जागा. खासगी भेटी नाहीत. बाजूला नन्सचं निवासस्थान. दुसऱ्या महायुद्धात इथे बरीच पडझड झाली. नंतर काही वर्षांनी ही नन्सना दीक्षा देऊन प्रशिक्षण देणारी कॉन्व्हेंट बनली. खरं तर जास्तकरून बाहेरूनच बघितल्याने नन्स आणि मंकसच्या मोनॅस्टरीत देवाच्या दारी काय फरक असतो हे कळूच नाही शकलं. गोरगरिबांना इथे आसराही मिळतो, हे विशेष!
इतकं प्रशांत पाहण्याचं ठिकाण (पर्यटन स्थळ म्हणवत नाही.) माझ्या आयुष्यात कधी आलं नव्हतं. आयुष्यात जगलेल्या एका सुंदर दिवसाची सांगता सोनेरी, नारिंगी, किरमिजी, जांभळ्या संध्याकाळनेच व्हायला हवी होती. निळ्या, शांत आकाशात रंगांची उधळण आणि खाली घनदाट वृक्षराजीच्या शरद ऋतूतल्या (फॉल) पिवळ्या ते गर्द लाल अशा विविध छटांच्या पर्णराजीचं दबल्या पावलांनी मावळत्या प्रकाशात शिरणं. कुठल्याही कॅमेऱ्यात हे विराट सौंदर्य आणि रंगवैभव टिपण्याचा प्रयत्न म्हणजे भव्यता आणि सौंदर्याची तौहीन करणं होतं.. नाही केली!!
arundhati.deosthale@gmail.com