‘हे नाटक लिही’ असे मला कोणी सांगितले नव्हते. त्याचा पहिला प्रयोग झाल्यालासुद्धा ८ डिसेंबर २०१३ ला चाळीस वर्षे झाली. आता ४० वर्षे लोटल्यावरही त्याविषयी लिहा असेही कोणी म्हणाले नाही. ही सगळी माझीच हौस! कारण हे माझे पहिलेच नाटक.. ‘मिकी आणि मेमसाहेब.’ १९७०-७२ दरम्यान मी बायोकेमिस्ट्रीमध्ये एम. एस्सी. करीत होतो. नाटक लिहून झाले होते १९७२ मध्ये. पण त्यावेळेस आमच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या तालमी चालू होत्या. संस्था होती पी. डी. ए.! (प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन. स्थापना- १९५२) ‘घाशीराम’चे प्रयोग डिसेंबर १९७२ मध्ये सुरू झाले आणि १९ प्रयोगांनंतर ‘हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे, नाना फडणवीसांची नालस्ती करणारे आहे..’ असा वाद निर्माण होऊन ‘पीडीए’ने ते थांबवले होते. त्यानंतर ‘घाशीराम’मधल्या ४०-४५ तरुण कलाकारांनी ‘पीडीए’मधून बाहेर पडून ‘थिएटर अॅकॅडेमी, पुणे’ या संस्थेची स्थापना २७ मार्च १९७३ रोजी केली, वगैरे. हौशी (‘प्रायोगिक’ हे बिरुद नंतर आले.) नाटय़संस्थेचे अस्तित्व असणे म्हणजे राज्य नाटय़स्पर्धेत भाग घेणे हे समीकरण १९७० च्या दशकात होते. आमच्या नव्याने स्थापना झालेल्या संस्थेला राज्य नाटय़स्पर्धेसाठी नाटक हवे होते. संस्थेत लिहिणारा मी एकटाच. त्यामुळे आपले पहिले लिहिलेले नाटक आता राज्य नाटय़स्पर्धेत होणार याचे मला अप्रूप होते. हा आनंद द्विगुणित होण्याचे कारण म्हणजे पं. सत्यदेव दुबे आयोजित नाटय़लेखन कार्यशाळेत त्याचे वाचन करण्याचे आमंत्रण मला मिळाले. हे आमंत्रण मिळण्यास मुंबईच्या एन. सी. पी. ए.च्या सहसंचालिका कुमुद मेहता या कारणीभूत होत्या. त्यांना नवीन लेखनाविषयी ममत्व होते.
नाटकाची गोष्ट सांगण्यात हशील नाही. कारण रूढार्थानं त्यात गोष्ट नाही. त्यात काही विस्कळीत पात्रे आहेत. विस्कळीत म्हणजे वास्तवापासून जरा उचललेली, किंचित गमतीशीर. पण त्यांची चेष्टा न होता ती खरी वाटतील अशी. पात्रांना नावे नावालाच आहेत. विद्यापीठातला एक वयस्क बुद्धिमान प्रोफेसर आहे. तो अजागळ आणि विक्षिप्त आहे. त्यांची बायको सुस्वरूप आणि तरुण आहे- मेमसाहेब. ती त्यांची पूर्वी पीएच. डी.ची विद्यार्थिनी होती. आता मेमसाहेब प्रोफेसरांच्या हाताखाली लेक्चरर आहे. प्रोफेसर मॉलेक्युलर बायोलॉजी विषयाचे हेड आहेत. सध्या त्यांचा गुळवणी नावाचा एका पायाने अधू असलेला पीएच. डी.चा विद्यार्थी आहे. त्याचा थेसिस रेंगाळलेला आहे. कारण प्रोफेसरांचे नीट लक्ष नाही. त्यांना मेमसाहेबांनी घरकामाला जुंपले आहे. स्वयंपाकाशिवाय प्रोफेसरांचे मुख्य काम म्हणजे बेल वाजली की घरच्या अंगणातला हौद कळशीने भरणे.. जो कधीच पूर्ण भरला जात नाही. कारण त्याला मेमसाहेबांनी भोक पाडून काळ-काम-वेगाचे गणित सतत सुरू ठेवले आहे. त्यांना मुलंबाळं नाहीत. मेमसाहेब नेहमी चिडलेल्या आणि असमाधानी आहेत. प्रोफेसरांचे प्रयोगशाळेत उंदरावर काही गूढ प्रयोग चालू आहेत. स्टेजवर पिंजऱ्यामध्ये एक पांढरा जिवंत उंदीर आपल्याला दिसतो. प्रोफेसर गुलामासारखा घरात वावरतो आहे. बेल वाजली की दचकून संशोधनाचे काम सोडून हातात कळशी घेऊन तो हौदात पाणी भरायला लागतो. पायाने अधू असलेला गुळवणी म्हणजे जणू मेमसाहेबांच्या सौंदर्याच्या गुंगीत लयास जात चाललेला प्रोफेसरांचा बुद्धय़ांकच आहे. म्हणून गुळवणीची पीएच. डी. लांबत चालली आहे. प्रोफेसरांना उंदरावरचा प्रयोग एक दिवस मेमसाहेबांच्या वर करायचा मानस आहे; ज्यायोगे त्यांच्या संसाराचे समीकरण बदलेल आणि मेमसाहेब प्रोफेसरांच्या वर्चस्वाखाली समाधानी होतील आणि मग त्या हौदात पाणी भरतील. म्हणून नाटकाच्या अखेरीस उंदरावरच्या इंजेक्शनची चाचणी प्रोफेसर गुळवणीवर करतात. उंदराला देण्याचे इंजेक्शन गुळवणीला टोचल्याने गुळवणी निपचित पडतो. आता हीच चाचणी मेमसाहेबांवर करण्याचे प्रोफेसर जाहीर करतात. तेवढय़ात बेल वाजते आणि प्रोफेसर परत कळशीने हौद भरायला लागतात..
असा सगळा प्रकार नाटकात असल्याने मुळात त्याचे फार प्रयोग होतील अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. त्याचे जे प्रयोग झाले त्यात प्रोफेसर झाला होता मोहन आगाशे, मेमसाहेब होत्या जुईली देऊसकर आणि गुळवणी झाला होता मोहन गोखले. दिग्दर्शन अर्थात माझेच होते. स्टेजवरचा जिवंत उंदीर दाखवण्यासाठी नंदू पोळने बी. जे. मेडिकल कॉलेजच्या अॅनिमल हाऊसमधून एक-दोन उंदीर पिंजऱ्यांसकट मिळवून रीतसर त्यांना घरी पाळले होते. नंदू नाटकात एक छोटी भूमिकाही करीत असे. तालमींच्या वेळी कधी मधूनच नंदू शर्टाच्या वरच्या खिशातून पांढरा उंदीर काढून स्त्री-कलाकारांना तत्काळ कर्कश्श वाचिक अभिनयाची तालीम करण्यास भाग पाडे. आठही प्रयोगांत विंगेत मांजर मात्र नियमित येत असे. जगभराच्या नाटय़गृहांत मांजरं- theatre cats ही असतातच. प्रयोगाच्या वेळी बाहेरचे प्राणी प्रयोगात अनाहूतपणे प्रवेश करू नयेत म्हणून संस्थेचे होतकरू नाटय़-बाऊन्सर्स विंगेत ठेवावे लागत. नाटकात आज जसे वापरतात तसाच मीडियाचाही वापर केलेला होता. प्रोफेसर आणि मेमसाहेब जेव्हा वर्गात लेक्चर देतात त्यावेळी मागच्या पडद्यावर मानवी हिमोग्लोबिन मॉलेक्युलच्या थ्रीडी एक्सरे क्रिस्टेलोग्राफी इमेजच्या रंगीत स्लाइड्स दिसायच्या. त्याकाळी कॉम्प्युटर नव्हते. स्लाइड् प्रोजेक्टरमध्ये एकेक स्लाइड हाताने दाखवावी लागे. हे सगळे जमवले बी. जे. मेडिकलच्या पॅथॅलॉजीचे डॉ. पराग खरे यांनी- जे आज नाहीत.. आणि रंगीत ट्रान्स्परन्सीज केल्या होत्या डॉ. मोहन अकोलकरने. हे सगळे जमू शकले कारण मी, मोहन आगाशे, नंदू पोळ सगळे बीजे मेडिकलमध्येच नोकरी करीत होतो. साऊंडचे काम बघितले होते आज प्रसिद्ध पाश्र्वगायक झालेल्या रवींद्र साठेने आणि सोबत दीपक ओक होता. प्रकाशयोजना समर नखाते आणि रमेश मेढेकर यांची. रवींद्र साठे आणि समर तेव्हा पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये विद्यार्थी होते. नेपथ्य होते दिलीप मंगळवेढेकरचे. ही नावे मुद्दाम घेतली, कारण आज हे सगळे आपापल्या क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. अन्य भूमिकांमध्ये दिलीप जोगळेकर, अजित दीक्षित, उदय लागू, मंजिरी परांजपे, सीमा धर्माधिकारी- शेंडे, विभा देशमुख आणि अन्य बरेच.
त्यावेळी आमचा अड्डा असायचा टिळक रोडवरच्या प्रकाश रानडे यांच्या नीलकंठ प्रकाशनाच्या दुकानात. एका संध्याकाळी दुकानात मा. का. देशपांडे आणि संस्कृतपंडित अरविंद मंगरुळकर आले. मंगरुळकरांनी तेव्हा ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाचे ‘घाशीराम : एक उपरूपक’ असे उत्तम परीक्षण लिहिले होते. मा. का. देशपांडे हे एक प्रस्थच होते. त्यांचे क्लासेस प्रसिद्ध होते. प्रकाशने माझी ओळख करून दिली. ‘मिकी आणि मेमसाहेब’चा प्रयोग नुकताच झाला होता. दोघे तो प्रयोग बघून आले होते. मला ते शेजारी असलेल्या देशपांडय़ांच्या क्लासमध्ये घेऊन गेले. मा. का. कायम थ्रीपीस सुटात असायचे, तर मंगरुळकर धोतर-कोटात. आतल्या ऑफिसमध्ये नेल्यावर त्या दोघांनी ड्रिंक्स घेता घेता माझ्या नाटकावर चर्चा सुरू केली. दोघांचे अफाट वाचन. विविध नाटकांचे दाखले, बघितलेल्या नाटकांची चर्चा. मी संकोचून गप्प.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नाटक दुसरे आले आणि अंतिम फेरीसाठी निवडले गेले. स्पर्धेचे एक परीक्षक होते कथाकार श्री. ज. जोशी. नंतर एकदा मी ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीत गेलो असताना ते भेटले. म्हणाले, ‘आळेकर, तुमचे नाटक आम्हाला काही समजले नाही. पण प्रयोग उत्तम झाला. परंतु उद्या ते जर गाजले तर घोटाळा नको म्हणून आम्ही ते मुंबईला पाठवले आहे. त्यांना ठरवू द्यात काय ते.’
आठवा प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी होता. सुटीचा दिवस होता. अंदाजे ५०-६० तिकिटे विकली गेली असावीत. सुटी असल्याने ‘मिकी’ या नावाने चकून काही पालक नाटक लहान मुलांचे असावे असे वाटून मुलांना घेऊन आले होते. त्यांनी तिकीट काढायच्या आत त्यांना पिटाळून लावणे हे काम संस्थेच्या एका होतकरू नाटय़- बाऊन्सरला दिले होते. तो माझ्यावर नाराज होता. कारण आधीच नाटकाला प्रेक्षक नाहीत, आणि जे ‘मिकी’ नावाने येतायत त्यांना तिकीट काढू द्यायचे नाही- हे त्याला पटत नव्हते. पण शेवटचाच प्रयोग होता. प्रयोग संपला. आम्ही बालगंधर्व नाटय़गृहाच्या कॅफेटेरियात बसलो होतो. रात्री बाळ कोल्हटकरांच्या नाटकाचा प्रयोग होता. ते आमचे नाटक बघायला आले होते. त्यांनी मला जवळ बोलावून चौकशी केली. म्हणाले, ‘तुम्ही नाटककार आहात. आमच्यासाठी नाटक लिहाल का? फक्त आमच्या बाजूचं नाटक लिहा. आम्ही नाटकावरच जगतो. आगाऊ रक्कम हवी तर सांगा.’ मी चकित झालो. शाळेच्या नाटय़महोत्सवात त्यांनी लिहिलेल्या ‘दुरिताचे तिमिर जावो’ नाटकाचे प्रयोग बघितलेले आठवले. गाणं आठवलं.. ‘आई, तुझी
आठवण येते..’ आता इतकी वर्षे झाली, पण मला मात्र त्यांच्या बाजूचं नाटक काही लिहिता
आलेलं नाही.
अखेर प्रयोग थांबले. पण मग नाटकातल्या त्या दोन जिवंत उंदरांचं पुढे काय झालं? सांगतो. एकाने प्राथमिक स्पर्धेचा प्रयोग उत्तम पार पाडला. अंतिम फेरी मुंबईत होती. तो प्रवास मात्र त्याला नाही मानवला. दुसरा मात्र आठही प्रयोग टिकला. आणि नंतर त्याचे नेमके काय झाले? तो परत कुठे गेला? लॅबमध्ये? की मुंबईतच स्ट्रगलर झाला? कोण जाणे. तसे दोघेही ‘प्रायोगिक’च. म्हणजे प्रत्यक्ष लॅबोरेटरीमधले.. प्रयोगाला सरावलेले होते. मग असे का व्हावे? परंतु याविषयीचा तपशील मात्र मला अद्यापि उपलब्ध झालेला नाही.
सतीश आळेकर
फक्त आठ प्रयोगांचे नाटक
‘हे नाटक लिही’ असे मला कोणी सांगितले नव्हते. त्याचा पहिला प्रयोग झाल्यालासुद्धा ८ डिसेंबर २०१३ ला चाळीस वर्षे झाली. आता ४० वर्षे लोटल्यावरही त्याविषयी लिहा असेही कोणी म्हणाले नाही.
आणखी वाचा
First published on: 15-02-2015 at 01:32 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Micki aani memsaheb