ह्या व्यवसायाने मला भरभरून दिले. पण त्याची सर्वात मौल्यवान देणगी म्हणजे त्याने मला माणूस उलगडून दाखविला. राजवाडय़ासारख्या घरात राहणाऱ्या सत्ताधीशांपासून झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांपर्यंत आणि उच्चविद्याविभूषितांपासून अंगठेबहाद्दरांपर्यंत अनेक लोक मला भेटले. नुसते भेटले नाहीत, तर मला त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. त्यांचे मन, त्यांचे आयुष्य, त्यांच्या प्रेरणा, त्यांची शक्तिस्थळे, त्यांचे हळवे कोपरे मी निरखत असे. आणि त्याच आरशात स्वत:लाही पाहत असे. या आरशाने मला माझ्यातील अस्सल तर दाखविलेच; पण हिणकससुद्धा दाखविले. तेव्हा जाणीव झाली-
‘नष्टदुष्टपण कवणाचे वाणू? मजपासी अणू अधिक त्याचे!’  
हे नष्टदुष्टपणाचे अणू नाहीसे करण्याचा प्रयत्नही केला. सहाशे शब्दांत साऱ्या आयुष्याचा लेखाजोखा कसा मांडू? वानगीदाखल दोन घटना सांगते फक्त!
बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलऱ्याची साथ आली होती. एक पोरगेलेशी आई वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन आली. ते मूल पूर्ण नागडे होते. त्याच्या शीचे ओघळ त्या बाईच्या कमरेवरून, साडीवरून फरशीवर ओघळत होते. बाळाने मान टाकली होती. त्याला खूपच डिहायड्रेशन झाले होते. क्षणभरही न दवडता सलाइन लावणे आवश्यक होते. त्याचवेळी खालची फरशीसुद्धा पुसणे गरजेचे होते. (कॉलरा संसर्गजन्य असतो.) त्या बाईजवळ एकही पैसा नव्हता. एकही कपडा नव्हता. जवळ मुळी नागडय़ा बाळाशिवाय काही नव्हतेच. आम्ही सगळेजण लगेच कामाला लागलो. त्या काळात समाजाचा डॉक्टरांवर विश्वास होता. ‘बाळाची तब्येत गंभीर आहे हे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आहे,’ वगैरे वगैरे लिहून घेण्याचा प्रघात तेव्हा नव्हता. बाळाला इमर्जन्सी रूममध्ये घेतले. जुनी बेडशीट्स शी पुसायला दिली. सलाइन लावायचा प्रयत्न केला. पण अंगातले पाणी इतके कमी झाले होते, की शिरा मिटूनच गेल्या होत्या. मला सलाइन लावताच येईना. आता आपल्या समोर बाळ जाते की काय, असे वाटू लागले. शेवटचा प्रयत्न म्हणून बोनमॅरो निडल (ही जाड सुई हाडातील मगज तपासणीसाठी काढायला वापरली जाते.) पायाच्या हाडांत घुसवली आणि उभे राहून एक बाटली सलाइन जाऊ दिले. तासाभरात शिरा दिसू लागल्या तेव्हा हाताला सलाइन लावले आणि केसपेपरवर माहिती लिहिण्यासाठी त्या बाईकडे वळले. तिला प्रश्न विचारले. परंतु ती काही बोलायलाच तयार होईना. तिने जी मान खाली घातली होती ती उचलून माझ्याकडे पाहिलेही नाही. खूप प्रयत्नांनंतर बाळाचे नाव ‘राहुल’ आहे, यापलीकडे मला कोणतीही माहिती मिळाली नाही. नंतर मग माझे प्रश्नच संपले आणि मी माझ्या कामाला निघून गेले.
पुढे तीन-चार दिवस बाळाची हगवण चालूच होती. जवळजवळ १०-१२ बाटल्या सलाइन लावले. या तीन दिवसांत तिने एकही औषध आणले नाही की एक शब्दही तोंडातून काढला नाही. आम्ही जुनी बेडशीटस् बाळाची शी पुसायला दिली होती ती धुऊन, वाळवून वापरत होती. आसपासच्या पेशंटचे नातेवाईक दयाबुद्धीने देतील ते थोडेफार खात होती. डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता करणारे कामगार आणि शेजारचे पेशंट यांच्याकडून येत असलेले रागाचे, चिडीचे, हेटाळणीचे शब्द, नजरा ती मूकपणे सोसत होती. चार दिवसांनी बाळ बरे झाले. घरी जाताना मी बिल मागितले नाही. तिने आभार मानले नाहीत. शून्यातून आली तशीच न बोलता ती शून्यात निघून गेली.
त्या तीन दिवसांत माझी स्वत:चीच फार चिडचीड झाली. सगळ्या नाकर्त्यां समाजाचा, मुलांची जबाबदारी न घेणाऱ्या समस्त पुरुषजातीचा, कसे का होईना मुलीचे एकदा लग्न केले की आपली जबाबदारी संपली असे समजणाऱ्या पालकांचा आणि पाळीव प्राण्याप्रमाणे खाली मान घालून मूकपणाने चाबकाचे फटकारे सहन करणाऱ्या सगळ्या बायकांचा मला संताप आला. तो सगळा संताप मी त्या पोरीवर काढला. तिने शब्दही न बोलता तो सोसला.
आज वाटते, मी तिच्याशी थोडय़ा कणवेने वागायला हवे होते. या सगळ्या प्रकरणात तिचा स्वत:चा दोष काय होता? पण मग कोणाचा दोष होता? कोणाचा तरी होता, नक्कीच! पण कोणाचा तरी दोष मी कोणावर तरी काढला होता, हेही खरेच होते.
बरेच दिवस राहुलची आई माझ्या मनातून जात नव्हती. हळूहळू मला समजू लागले- खरी जिंकली ती राहुलची आईच! जवळ पैसा नसताना, कोणाचाही आधार नसताना मरणाच्या दारात असलेल्या आपल्या मुलाला बरे करून ती घेऊन गेली. कशाच्या आधारावर? तिच्या स्वीकारशक्तीच्या आधारावर! सहनशक्तीच्या आधारावर! स्वाभिमान जसा जगण्यासाठी फायद्याचा असतो, तसा कधी कधी स्वीकार आणि सहनशक्तीसुद्धा जगण्यासाठी फायद्याची असते.
काही प्राण्यांना पाठीचा कणा असतो. ज्या प्राण्यांना कणा नसतो त्यांना कठीण कवचाचे आवरण. पाठीचा कणा जसा शरीराला आधार देतो, तसेच कठीण कवचही शरीराचे संरक्षण करते. राहुलच्या आईने माझे आभार मानले नाहीत; पण जाताना न बोलता एक धडा मात्र शिकवून गेली.
अशीच आणखी एक घटना. एक साधारण वर्षांचे बाळ न्यूमोनियासाठी अ‍ॅडमिट होते. चार दिवस झाले होते. आता ते बरेच बरे होते. राऊंड घेताना मला जाणवले की, आईच्या मांडीवर दुसरे एक बाळ नेहमी असते. ते साधारण सहा महिन्यांचे असावे. ते अंगावर दूधही पीत होते. मला कोडे पडले. मी पेशंटकडे पाहून विचारले, ‘हे बाळ कुणाचे?’ ती म्हणाली, ‘माझे.’ मग दूध पिणाऱ्या बाळाकडे बोट करून म्हटले, ‘हे कुणाचे?’ ती म्हणाली, ‘हेही माझेच!’ दोघं जुळी असण्याइतकी एकाच वयाची नव्हती, आणि सख्खी भावंडे असण्याइतके त्यांच्यात अंतरही नव्हते. शेवटी मी स्पष्टच विचारले, ‘हे वर्षांचे आणि हे सहा महिन्यांचे- असे कसे?’ तेव्हा तिला माझ्या प्रश्नाचा उलगडा झाला. ती म्हणाली, ‘हा! हे होय? हे आम्हाला उकिरडय़ावर सापडले.’
‘काय? उकिरडय़ावर?’ मी चकित!
‘होय. माझ्या दादल्याला मुलांची लई माया! हे उकिरडय़ावर रडत होते, तर त्याला घेऊन आला. माझं हे पोरही सहा महिन्यांचं झालं होतं. मला दूधही खूप होतं. दोघांनाही पाजवलं. काय, आपल्याजवळ एक भाकरी असली तर अर्धी याला द्यायची, अर्धी त्याला द्यायची.’
ही बाई अगदी सर्वसाधारण घरातली.. सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीतली होती. तिच्या कृतीपेक्षाही तिच्या वागण्या-बोलण्यात जी सहजता होती त्याने मी हलून गेले. आपण काही विशेष करतोय याची तिला जाणीवही नसावी. मी अंतर्मुख झाले. मला एकच काय, शंभर मुले सांभाळण्याचे आर्थिक बळ आहे. पण मला असे एखादे मूल उकिरडय़ावर सापडले तर मी त्याला सांभाळीन? माझे म्हणून वाढवीन? मनुष्यस्वभावाच्या एका अक्षावर मी किती सर्वसामान्य आहे, आणि माझ्यासमोरची ही स्त्री किती उंचीवर आहे, याची स्पष्ट जाणीव झाली. मनुष्यस्वभावाचे अजूनही कितीतरी वेगवेगळे अक्ष असतील!
घरी जाताना नवरा-बायको मला भेटायला आले. दोघांच्याही कडेवर एक-एक मूल होते आणि चौघांच्याही चेहऱ्यावर सहज असतो तसा आनंद! त्यांच्याकडे पाहून मला वाटले,
‘थोडा है, थोडे की जरुरत है।
जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है!’      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा