प्रिय तातूस,
‘मन की बात’ ऐकता ऐकता गेल्या आठवडय़ापासून ऑलिम्पिकमुळे आपण ‘तन की बात’मध्ये गुंग झालो. टीव्हीमुळे हे सगळं बघायला मिळतं बघ! अरे, या जगात काय काय खेळ आहेत- बघून आपण थक्क होतो. मुळात जगात इतके देश आहेत याचंच आश्चर्य वाटतं. लहानपणी मला फक्त आपल्याच गावात लोक राहतात असं वाटायचं. पण एवढी वेगवेगळी नाकी, डोळी, उंची अशी माणसं बघून गंमतच वाटत राहते. अरे, बास्केटबॉल खेळणाऱ्या बायका किती उंच असतात! आपल्या बायकांना साधा फळीवरचा डबा काढायचा तर स्टुल घ्यावं लागतं. या बायका किती अलगद एसटीत बॅगा वर ठेवत असतील! मला आश्चर्य वाटतं, ते म्हणजे माणूस वजन वाढवू शकतो, दाढी वगैरे वाढवतो, पण ताडमाड उंची कशी काय वाढवतात, काही कळत नाही. पण यामध्ये खरे तर अन्यायदेखील आहे असं मला वाटतं! कुस्तीत कसं वेगवेगळ्या वजनाचे गट असतात, तसे उंचीचे गट करायला काय हरकत आहे! आणि त्याप्रमाणे बास्केटची उंची पण कमी-जास्त करायला हवी. असो.
पण खरी मजा ‘जिम्नॅस्टिक्स’ बघताना येते. अरे, डोळ्यांचं पारणं फिटेल अशा शरीराच्या होणाऱ्या अद्भुत, लयबद्ध कसरती बघायला मिळतात. काय ते खेळाडू हवेत कोलांटय़ा मारून अलगद गादीवर पावले टेकतात! पण हा आनंद चार वर्षांतून एकदाच. आपल्याकडे पर्वकाळ कसा असतो, तसं मला हा पर्वकाळच वाटतो. अरे, हे जिम्नॅस्टिक्सचे खेळाडू आळसपण कसा लयबद्ध देत असतील असं वाटतं!
‘यात मिळणारा आनंद खूप दुर्मीळ आहे,’ असं नानाला मी म्हटलं, परंतु त्याच्या डोक्यात मात्र सतत अर्थशास्त्राचाच किडा असतो. त्यानं मला फॉर्च्यून मासिकातले संपादकीयच वाचून दाखविले. त्यात जिथे जिथे ऑलिम्पिक झाले ते देश खड्डय़ात गेल्याचं लिहिलंय. (आपल्याकडे हल्ली ‘खड्डय़ात गेला’ असं न म्हणता ‘रस्त्यात गेला’ असं म्हणतात म्हणे!) त्याचं म्हणणं- एवढी अब्जावधी रुपयांची बांधकामं करून ती नंतर फुकटच जातात. त्यानंतर तिथे कुत्रंदेखील फिरकत नाही. सगळे गर्दुल्ल्यांचे अड्डे जमतात. आता त्याचं म्हणणं अगदीच काही चूक आहे अशातला भाग नाही; पण हौसेला मोल नसतं. लग्नात शिवलेला कोट आपल्याकडे कोणी पुन्हा घातल्याचं आठवत नाही. तरीपण कोट शिवतोच ना आपण? अरे, जीवनात आनंद हवा की नुसतीच तूरडाळ हवी, असा संघर्ष यातून उभा राहतो.
अरे तातू, मागचं लंडनचं ऑलिम्पिक मी ‘याचि देही याचि डोळा’ बघितलं. ऑलिम्पिक ज्योत आली तेव्हा तिच्या मिरवणुकीच्या स्वागतालादेखील आम्ही गेलो होतो. यंदा ब्राझीलला जाणं मात्र काही जमलं नाही. अरे, आपल्या खेळाडूंना पाठवतानाच केवढय़ा आडकाठय़ा येतात; तर माझी काय कथा! आयुष्यात सगळ्या गोष्टी जमतातच असं नाही. इतकी वर्षे झाली, पण अजून मला ताजमहाल पाहायचा योग आलेला नाही. असो!
अरे, ती जिम्नॅस्टिक्समध्ये आपली दीपा कर्माकर! मी डोळ्यांत तेल घालून तिची प्रात्यक्षिकं बघत होतो. अगदी कांस्यपदक मिळणार म्हणताना ती अमेरिकेची जिम्नॅस्ट आडवी आली आणि सगळ्यावर पाणी फिरलं. काहीही असो, तिच्यामुळे आपला तिरंगा तर फडकला! अरे, तिचा चौथा नंबर हा मला सुवर्णपदकासारखाच वाटला. तात्याचं म्हणणं- ती मूळची ‘करमरकर’च असणार!
अरे तातू, एवढे छोटे छोटे देश इतकी पदकं मिळवतात आणि आपण सव्वाशे कोटींच्या पुढे गेलो तरीही तुरळक अपवाद वगळता आपण खाली हात येतो. अरे, मला खूपच वाईट वाटतं! आपल्या देशाचं काहीतरी खरोखरच चुकतंय असं वाटत राहतं. अरे, स्वातंत्र्य आता सत्तरीत आलं की रे! आपण नुसता फ्युज उडाला म्हणून नवीन फ्युज टाकतोय! अरे, या देशाचं वायरिंगच आतून बदलायला हवंय असं वाटत राहतं. मला असं मधूनच गंभीर व्हायला होतं. मग घरातले लोक गोळी घ्यायला सांगतात. पण मला काहीही झालेलं नाही. मी रोज गार्डनला व्यवस्थित पाच राऊंड मारतो.
जाऊ दे.. विषय भलतीकडे जायला लागला. तर- विचार करता करता मला आपलं वाटतं : आता एवढे देश वाढत चाललेत आणि लोकसंख्या पण वाढत चाललीय, तर आता पदकांची संख्या पण वाढवायला काय हरकत आहे? पुढारलेल्या देशांचे दोन-तीन गट करायचे, तिसऱ्या जगातले चार-पाच गट करायचे आणि त्यांच्यातून मग पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर काढले तर भाग घेणाऱ्यांना पण किती आनंद होईल. वाटलं तर पदकांचा आकार लहान करावा. पण त्यामुळे खेळाडूंना मायदेशी परतताना केवढा आनंद होईल! काळानुसार खरे तर सुधारणा व्हायला पाहिजेत.
अरे, ती एकेचाळीस वर्षांची कझाकिस्तानची महिला बघ.. तिनं ज्या विलक्षण सफाईने व्हॉल्ट केला ना, खरं तर तिला विशेष पारितोषिक आणि मेडल द्यायला हवं होतं. असो. आपल्याकडे आपण ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दरवर्षी देतो. आता दहा कोटींवर आपले मराठी लोक आहेत आणि एकच ‘महाराष्ट्र भूषण’- म्हणजे बरोबर नाही वाटत. खरे तर ‘विदर्भ भूषण’, ‘मराठवाडा भूषण’, ‘कोकण भूषण’ आणि ‘उर्वरित महाराष्ट्र भूषण’ असं द्यायला काय हरकत आहे? नाही तरी आपण महाराष्ट्राबाहेर फारसे नाहीच आहोत. गुजराती बघ कसे जगभर व्यापारासाठी गेलेत. नानाचं म्हणणं- गुजरातमध्ये सगळेच व्यापारी जन्माला येतात, त्यामुळे तिथे गिऱ्हाईक मिळणे फार कठीण असते. म्हणून मग गुजराती लोक अगदी केनियापासून अमेरिकेपर्यंत गेले म्हणे! आणि उडप्याचं पण असंच आहे. तिकडे मंगलोरकडे घरोघरी सगळे इडली-डोसा बनवतात. त्यामुळे ते विकत कोण घेणार? आणि म्हणून मग ते लोक मुंबई-पुण्याकडे आले असं म्हणतात. असो. माझा काही एवढा अभ्यास नाही म्हणा; पण विषय निघाला आणि ओघात आलं म्हणून तुला कळवलं. असो!
तुझा,
अनंत अपराधी
अशोक नायगावकर ashoknaigaonkar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा