प्रिय तातूस,
महाराष्ट्रावर यंदा पावसाने कितीतरी वर्षांनी मेहरबानी केलीय. सगळीकडे नुसते पाण्याने ओसंडून वाहतेय. तुडुंब म्हणजे काय असतं याचा अनोखा अनुभव येतोय. परवा नाना विनोदाने सगळी मराठी माणसे जणू काय एकमेकांना पाण्यात पाहतायत असे दिवस आलेत म्हणाला. नानाला नेहमी काहीतरी वेगळेच सुचते. त्याला आता बिचाऱ्या टँकरवाल्यांचं यंदा काय होणार अशी चिंता लागलीय. चांगल्यातून वाईट शोधायची जन्मजात सवयच असते बघ काहीजणांना! गेले काही दिवस मराठी माणसांमध्ये एक कोरडेपण आलं होतं. या पावसामुळे, संततधारेमुळे एक ओलावा समाजात निर्माण होईल असे वाटते. पुन्हा कवितेचे दिवस आले आहेत असे वाटायला लागलेय. ताडपत्रीच्या खाली एखादा मोत्यासारखा चमकत एक थेंब बराच वेळ थांबून असतो, तो कधी खाली पडतोय असं मी कित्येकदा बघत राहतो. मला असलं काही मंत्रचळ लागल्यासारखं बघतो म्हणून घरचे वैतागतात. पण आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे. लोकांना हे कळतच नाही. अरे तातू, सकाळी मंद आचेवर दूध तापवताना जी साय जमत जाते आणि हळुवार वर येते ना तेव्हा माझं मन भरून येतं! आता कामं रखडतात, पण आनंदाला मोल नाही. अवतीभवतीची सारी माणसे रूक्ष होतायत म्हणून ही संततधार सुरू आहे, असं मला वाटतं. अरे, काय आकाशमोगरा फुललाय सगळीकडे, त्याचा गंध नुसता वेडं करतोय. उगाचच आपले लोक त्याला बुचाचं झाड म्हणतात. चंद्रप्रकाशात सगळी पांढरी फुले विकासतात म्हणालो, तर नानाचं म्हणणं सगळी पांढरे कपडे घातलेली नेतेमंडळीपण चंद्रप्रकाशात विकासतात, असो! मला खरे तर साहित्यिक व्हायचं होतं, पण एकेक कामंच अशी निघाली आणि जबाबदाऱ्या अंगावर पडत गेल्या की ही गोष्ट राहून गेली! त्याला इलाज नसतो. अरे आपले पापण्णांचंच बघ ना! आयुष्यभर कोर्टकचेऱ्या करताकरता लग्नं करायचंच राहून गेलं असं परवा मला म्हणत होते.
माझ्या पत्रिकेत खरे तर कवी व्हायचा योग आहे असं मागे कुणीतरी म्हणालं होतं. पण शेवटी काय, तर मी क्लार्क झालो. आता मात्र मला असं काहीतरी व्हावं असं वाटायला लागलंय. मध्यंतरी मी शिकागोला ‘स्वामी विवेकानंद रोड’ पाटी लावलेल्या खांबापाशी फोटो काढून घेतला त्या वेळी आपलंपण असं नाव झालं पाहिजे असं वाटलं, पण आमच्या घराजवळ नाव द्यायचं तर विनानावाचा कुठला रस्ताच उरलेला नाही. आणि पुन्हा त्याला खूप खर्चही करावा लागतो म्हणतात.
पण तातू खरं सांगू, भले साहित्यिक जरी नाही होता आलं तरी निदान वाचक तरी व्हावं असं वाटतं. यावर्षीचे साहित्य संमेलन डोंबिवलीला आहे त्यामुळे दिवसभर कार्यक्रमाला हजेरी लावून घरी परतता येईल. अरे, डोंबिवली म्हणजे हल्ली मराठी माणसाचे हृदय आहे असे म्हणतात. नुसतं साहित्य संमेलन होणार म्हणताना तिथल्या जागांचे भाव एकदम वाढले असं सगळे म्हणताहेत.
डोंबिवलीत साहित्य संमेलन घेण्यामागे बिल्डर लॉबीचा खूप मोठा हात आहे असं सगळे म्हणतात. आता साहित्य संमेलन म्हटलं की वाद सुरू होतातच, त्यामुळे हे संमेलन डोंबिवली ईस्टला की वेस्टला घ्यायचे असा नवीनच वाद खदखदतोय असं म्हणतात. डोंबिवली ईस्टच्या लोकांना साहित्यातलं जास्त कळतं असा समज सर्वत्र पसरलाय आणि याची वेस्टच्या लोकांना खंत आहे. खरे तर ईस्ट आणि वेस्ट हा जागतिक स्वरूपाचाच खरे तर वाद आहे. पुण्याखालोखाल हल्ली मराठीची सांस्कृतिक राजधानी अशी डोंबिवलीची ख्याती आहे. आता पुणेकरांना अशी आपली तुलना केलेली आवडत नाही म्हणा! मुंबई- पुण्यातल्या अनेकांनी आपल्या मुली डोंबिवलीत दिल्याने तिथे सारखी गर्दी असते. तातू खरं सांगू, मला जेव्हा खूप एकाकी वाटतं तेव्हा मी डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन उभा राहतो. इतकी गर्दी बघून माझा जीव भांडय़ात पडतो. कुणीकडेही पाठ करून उभं राहिलं तरी आपल्या पाठीशी हजारो लोक आहेत असा दिलासा वाटतो. मर्ढेकरांनी ‘मी एक मुंगी’ ही कविता डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्मवर बसून लिहिली असं धोंडांनी कुठेतरी म्हटल्याचं आठवतं! मला तर बारा डब्यांची गाडी म्हणजे एक कविताच आशयाने गच्च भरलेली अशी आपल्या समोरून वाहतेय असं वाटतं! लोक निसर्गावर प्रेम करा म्हणतात, पण मला माणसावर प्रेम करायला आवडतं. अरे माणूस जिवंत आहे म्हणून साऱ्या सृष्टीला काहीतरी अर्थ आहे. मला अंकलिपी म्हणजेसुद्धा एक चिरंतन कविता वाटते. एक गुणीले एक केलं तरी आपण सगळे एकच राहतो. आपण गुणाकार- बेरीज करत मोठे विशाल होत जातो. वजाबाकी – भागाकार करत आपण सगळं जे मलिन आहे ते दूर करतो, वजा करतो आयुष्यातून!
सगळं बदलत राहिलं, सगळं जुनं झालं तरी पाढे तेच राहिलेत, त्यात तसूभरही फरक नाही. गेली ५० वर्षे मी अजूनही पाढे म्हणतो. आयुष्याचा हिशोब जमायचा असेल तर पाढे पाठ असावे लागतात. तात्या तर म्हणतात, अंतू तुझ्या रूपाने कधी कधी परमेश्वरच बोलत असतो. मला परमेश्वराबद्दल नेहमी वाईट वाटतं. आपल्याला कसा आधार असतो, परमेश्वराला कुणाचा आधार? त्याच्याजवळ तर आधार कार्डदेखील नाही! मी एकदा चिंतन करायला बसलो की माझी तंद्री लागते आणि असं काहीतरी गूढ बोलायला लागलो की घरातले लोक घाबरतात. असो. दरवेळी एखाद्या लेखकाला अध्यक्ष म्हणून निवडतात, पण तातू मराठी साहित्य संमेलनात कधीही एखाद्या वाचकाला रसिकाला अध्यक्षपद लाभले नाही ही माझी खंत आहे आणि म्हणून सगळ्यांचं म्हणणं मी निवडणुकीला उभं राहावं असं आहे? पण माझी फारशी ओळख नसल्याने मला कोण निवडून देणार?
दरवर्षी साहित्य संमेलनात फक्त कार्यक्रमांचीच पत्रिका छापतात. पण तीनचार दिवस जेवण, नाश्ता याची काय विविधता आहे ते छापत नाहीत. या वर्षीपासून सर्व प्रकारचा रोजचा मेनू असलेली स्वतंत्र पत्रिका निमंत्रणाला जोडून पाठवणार आहेत. काही वेळा जेवण खूपच छान होतं. परिसंवाद रंगला नाही तरी असं ऐकल्यावर आपल्याला उगाचच चुटपुट लागून राहते. खरे तर या संमेलनातील भोजनव्यवस्था कशी असावी यावर महाराष्ट्रातील रसिकांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रतिक्रिया मागवल्या आहेत. त्यामध्ये आगरी लोकांची लुसलुशीत शुभ्र तांदळाची भाकरी आणि दुर्मिळ असा ‘जिताडा’ मासा चाखायला मिळणार, असे सगळे म्हणतायत. आतापासूनच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलंय. तातू कार्यक्रमाचं सोड पण ३/४ दिवस तोंडाची चव बदलेल म्हणून तरी तू डोंबिवलीला यावंस असं आग्रहाचं आमंत्रण.
तुझा,
अनंत अपराधी
अशोक नायगावकर- ashoknaigaonkar@gmail.com