परवा रात्री दूरदर्शनवर बातम्या चालू असताना खाली चालू असलेल्या सरकत्या पट्टीवरच्या ब्रेकिं्रग न्यूजने माझे लक्ष वेधून घेतले.  पुण्यातल्या कोथरुड विभागात मत्रेयी पार्क हाऊसिंग सोसायटी.. सोसायटीची नावेही भारदस्त.. मत्रेयी, अगस्ती, भारद्वाज, वाल्मीकी.. शेवटी काही झाले तरी आमचे पुणे आहे ते! कमीत कमी एक जोडाक्षर आल्याशिवाय नाव पूर्ण होणे नाही. आणि ऱ्हस्व-दीर्घ..? तुम्हाला मराठी व्याकरणात चीतपट काढले नाही तर मग पुणेकर कसले? माझ्या सोसायटीचे नावही ‘स्वस्तिक.’ मराठीत औरंगजेब असलेल्या माझ्या एका भावाने पूर्वी पत्रावर पत्ता लिहिताना या जोडाक्षर आणि ऱ्हस्वतेचा इतका धसका घेतला होता, की तो अनेकदा शब्द लिहिण्याऐवजी स्वस्तिकचे चिन्ह काढून पुढे सोसायटी लिहायचा. ‘गृहनिर्माण मंडळ’ वगरे शब्द त्याला फेफरे आणायचे. असो.. तर अशा या माझ्या लाडक्या पुण्यात कोथरुड मुक्कामी वसलेल्या मत्रेयी पार्कमध्ये झाडावर बसलेल्या माकडांना घरातल्या लोकांचे आणि जाणाऱ्या-येणाऱ्यांचे मोबाइल पळविण्याचा नाद लागला होता. कल्पना करा- दात विचकत, चित्रविचित्र आवाज काढत कपिराज झाडावरून उडय़ा मारून तुमच्यावर चाल करून येताहेत आणि तुमच्या हातातील खाऊची पिशवी किंवा मॅक्-बर्गर बॉक्स, पेप्सीचा ग्लास किंवा जिलेटोचा कोन यापकी काहीही न उचलता तुमच्या दुसऱ्या हातातील नोकिया, ब्लॅकबेरी, आयबॉल किंवा सॅमसंग पळवून पुन्हा झाडावर पळ काढताहेत.
‘हा हन्त, हन्त नलिनीम् गज उज्जहार’च्या धर्तीवर ‘मोबाइल माझा सांडला गं, जाता बाजाराला गं बाई बाजाराला’ असा विलाप करण्यापलीकडे तुमच्या हातात काही नाही. सदोदित हस्त-कर्णाचा मिलाप घडविणारे तुमचे अद्भुत साधन ध्यानीमनी नसताना अदृश्य झाल्यामुळे आक्रोश करण्यापलीकडे तुम्ही काही करूही शकत नाही.
झाडावर मात्र इमर्जन्सी मीटिंग सुरू झाली आहे. वडावरचा झम्प्या आपली नवी उपलब्धी संशोधन करण्यात आणि न्याहाळण्यात गर्क आहे. परवा मिळालेल्या सोनीपेक्षा हा ब्लॅकबेरी जरा बरा वाटतोय. दात विचकल्यावर स्क्रीनमध्ये रिफ्लेक्शनही बरे येतेय. आणि फ्रंट कॅमेराची सोय असल्यामुळे फोटो काढून पलीकडच्या सोसायटीतील चिंकीकडे व्हॉट्स अप करता येईल.  गोडबोल्यांच्या किचनची खिडकी उघडी आहे. झूम करून ओटय़ावर वहिनी कोिशबीर करण्यासाठी टॉमेटो कधी काढताहेत हेही पाहता येईल. कांदा सध्या त्यांनाही परवडेनासा झालाय. त्यामुळे तो मिळणे दुरापास्तच. पण आपले चांगले आहे. आपण मोबाइल पर्सनल यूज करतो. कोरेगाव पार्कमधल्या त्या थोराड काळतोंडय़ा बंडय़ाने म्हणे प्री-यूज्ड (सेकंड हॅण्ड म्हणणे बॅकवर्ड) मोबाइल्सच्या पुनर्वापरासाठी (Re-circulate – सोपा मराठी शब्द!) चोरबाजारातल्या चिमणशेटची एजन्सी घेतल्याचे कळते. धंदा उत्तम सुरू असून, फ्रँचायझी खोलण्याचा मार्केट सव्‍‌र्हे चालू असल्याचे समजते. परवा एका झाडावरून पलीकडच्या शेवग्यावर डाइव्ह मारताना नोकिया पडता पडता वाचला. आपण पडलो तरी बेहत्तर; पण फोन पडू द्यायचा नाही. अरे, माणसांकडून एवढे तरी शिकायलाच हवे. ते तर रेल्वे लाइन क्रॉस करताना, हायवे ओलांडतानाही फोनवरचा हात काढत नाहीत. मग आपण का बरे िस्वग घेताना फोन ठेवायचा? आजोबा उगाचच ओरडतात. त्यांना फोनमधले काही कळत नाही. त्यांचे उभे आयुष्य गेले एलिफंटा केव्हज्मध्ये पिशव्यातली केळी पळवण्यात. केळी आणि बोरे खाणाऱ्यांना अ‍ॅपल आणि बेरीची चव कशी कळायची? अरे, आपल्या लालभाईंना स्वत:च्या लाल तोंडाची आणि गुलाबी पृष्ठभागाची इतकी वष्रे मोठी मिजास होती. पण आता या फोनमुळे फोटोशॉपमध्ये जाऊन मी माझे तोंड गुलाबीच काय, सप्तरंगीसुद्धा करू शकतो, म्हटलं! यू-टय़ूबवर अक्षयकुमार आणि प्रभुदेवा यांच्यामुळे चार-दोन नवीन स्टेप्स कळतात. ‘मानवचेष्टा’ असा फोल्डर तयार करून त्यात ते सेव्हही करता येते. माणसाने लावलेल्या अनेक शोधांपकी हे यंत्र जरा उजवेच म्हणायला हवे. कांगारू या अजागळ प्राण्याचा मात्र मला त्यामुळे नाही म्हटले तरी थोडा हेवा वाटायला लागलाय. त्यांच्या पोटाशी देवाने पाऊच प्रोव्हाइड केला. जेव्हा पोर नसेल तेव्हा फोन खुपसायची मोठी सोय. तो नवनिर्माण सोसायटीतला नवा प्लॅस्टिक.. नाही, चुकलंच (!) -रिकन्स्ट्रक्टिव्ह (Reconstructive) सर्जन त्यासाठी प्लॅप सर्जरी करण्याच्या बाता करत होता. ही आजकालची पोरे.. आधी माणसांच्या पंचवीस पोरांवर प्रयोग करून रिझल्ट सादर कर म्हणावं. मग पुढचे पुढे.. तोपर्यंत तरी फोन हातातच.
आंब्यावरची चंपीआजी परवा म्हणत होती, ‘या काळ्याबेंद्रय़ा गोष्टीला ना चव, ना वास.’ अगं आजी, फोन सलामत तो जिंदगी पचास. अरे रंग.. रूप.. नाद या सकल सद्गुणांचा दाता म्हणजे हा फोन आहे. शाळेत जाणाऱ्या माणसाच्या मुलापासून ते सरणावर निघालेल्या आज्यापर्यंत प्रत्येकाची जर ही मानवी गरज असेल, तर त्याची आदिमानवी प्रतिमा आपल्या वानरसंस्कृतीत रुजायला नको का? अगं, अशी प्रगती झाली म्हणून तर तो वानराचा नर झाला. पुढे ‘नारायण’ होणे त्याला जमले नाही. त्याऐवजी ‘नराधम’ होण्याकडेच त्याची प्रवृत्ती वाढली.  आपण तसे नाही करायचे. आपण वानरच राहायचे. पण इतके प्रगत व्हायचे, की एफ. एम.वरच्या हितेश गुरुजींना कन्सल्ट न करता एक अ‍ॅडिशनला ‘वा’ लावून आपण ‘व्वानर’ व्हायचे..
वाचकांना संभ्रम पडला असेल की, झम्प्याचे हे विचार अस्मादिकांना कसे कळले? त्याचे काय आहे की, जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत माँसाहेब.. दीदी.. गृहलक्ष्मी ही भारदस्त रूपे धारण करणाऱ्या आमच्या जवळच्या नातलगांनी आम्ही अद्यापि मर्कटच असल्याचा निर्वाळा वेळोवेळी दिला आहे. खरे तर झम्प्याचे मंकी-मेल मी हॅक केले आहे, त्याचा हा वृत्तान्त आहे.
..रात्र झाली. मत्रेयी सोसायटीत निजानीज झाली. सोसायटी नऊला शांत होते. शेवटी किती म्हटले तरी हे पुणे आहे.  झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येऊ लागली आणि अचानक पानांमधून आवाज आला.. ‘‘यह है एफ.एम. 91.1, म हूँ गौरव.. और सुनाता हूँ वो गाने- जो छूँ ले आपका मन..’’
..झम्प्या पायावर पाय टाकून, फोन कानाला लावून, पोटावरून दुसरा हात फिरवीत फांदीवर लवंडला होता आणि फोनमधून स्वर उमटला..
‘आज मदहोश हुआ जाएँ रे.. मेरा मन.. मेरा मन.. मेरा मन
 शरारत करने को ललचाएँ रे.. मेरा मन.. मेरा मन.. मेरा मन..’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा