अलकनंदा पाध्ये
‘‘स्वरांगी, खूप छान वाटतं गं बाळा तुझे केस पाहून. आजकाल एवढे लांब केस कुणाचेच बघायला मिळत नाहीत. तुझ्यासारख्या मुलींपासून मोठय़ा मोठय़ा बायकांचेसुद्धा बॉबकटच दिसतात.’’ आजोळी गेलेल्या स्वरांगीची आजी तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली. आज आज्जी तिने खास तयार केलेल्या रिठा-शिकेकाईनं स्वराला न्हाऊ माखू घालणार होती. मधेच आज्जी-नातीचा संवाद ऐकणाऱ्या स्वरांगीच्या आईनं तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली.
‘‘आई, तुझ्या नातीच्या केसांचं कौतुक आत्ता ४ दिवसांसाठी ती आलीय म्हणून करत राहा. पण मुंबईला माझी किती धांदल होते ते बघायला ये. सकाळी माझी ऑफिसची गडबड, नाश्ता-डब्याची घाई आणि शाळेची बस यायच्या आधी हिच्या केसांचा गुंता विंचरायचा.. शेवटपर्यंत रीबिनी बांधून आणि एक नाहीतर दोन वेण्या घालून वरती टांगायच्या. पुन्हा दर रविवारी साग्रसंगीत न्हाणं. कुठे कोंडा, उवा-लिखा होणार नाहीत याची काळजी. हजार वेळा सांगून पाहिलंय, तिच्या सगळय़ा मैत्रिणींचे केस छान सुटसुटीत कापलेले आहेत. एरवी त्या आर्यासारखा फ्रॉक हवा.. नेहासारखे बूट हवेत म्हणून हट्ट करेल, पण मग मी म्हटलं त्यांच्यासारखा तू केसांचा बॉबकट कर तर लगेच रुसून बसते. तिला म्हटलं, खूप नाही, पण माझ्यासारखा पोनीटेल बांधता येईल एवढे केस कापू, तर त्यालाही तयारी नाही. त्यापेक्षा एक करू या, आई तूच ये कशी आमच्याकडे राहायला, मग रोज करत बस नातीचे आणि तिच्या केसांचे लाड.. मला तरी थोडी फुरसद मिळेल.’’
त्यावर ‘‘आई, आता पुरे.. कित्ती वेळा सांगितलंय तुला माझ्या केसांबद्दल सारखं सारखं बोलायचं नाही. मला या आज्जीसारखेच माझे लांब केस खूप आवडतात. आज्जी, तुला माहितेय ना माझ्या या लांब केसांमुळे माझी काय वट असते सगळीकडे? तुला माहितेय आज्जी, शाळेच्या गॅदिरगमध्ये माझ्याशिवाय सरस्वतीवंदन होऊच शकत नाही. मस्तपैकी पांढरी साडी नेसून हातात वीणा घेऊन लांबसडक केस मोकळे सोडून मी कमळात बसते आणि बाकीचे हात जोडून प्रार्थना म्हणतात तेव्हा कसलं भारी वाटतं सांगू. शिवाय गणपती उत्सव झेंडावंदन अशा कुठल्या कुठल्या कार्यक्रमात हातात तिरंगा घेऊन मी केस सोडून भारतमाता होते ना तेव्हाही मला खूप मस्त वाटतं गं आज्जी. शिवाय कोळीनाच, वाघ्यामुरळी सगळीकडे माझ्या केसांचा खराखरा अंबाडा होतो म्हणून माझ्या टीचरपण खूश असतात माझ्यावर. आणि आज्जी एक सिक्रेट सांगू? मी केस फक्त एवढय़ासाठीच वाढवत नाही काही. मला ना त्या खूप लांब केसवाल्या रापुंझेलसारखे केस वाढवायचेत.’’
‘रापुंझेल? म्हणजे काय असतं गं ते.?’’
‘‘अगं आज्जी रापुंझेल एका राजकन्येचं नाव आहे.’’ स्वराने हसत उलगडा केला.
‘‘थोडय़ा दिवसांपूर्वी आम्ही एक सिनेमा पाहिला त्यात रापुंझेल नावाची एक राजकन्या असते. तिचे केस तर खूप खूप लांब असतात. स्वराने आपले दोन्ही हात लांब करत आज्जीला रापुंझेलच्या केसांची कल्पना द्यायचा प्रयत्न केला. अगं आज्जी, त्या सिनेमात किनई रापुंझेलला एक वरदान मिळालेले असते. म्हणजे ना, तिचे लांब केस खूप जणांना पुष्कळ कामांसाठी उपयोगी पडतात. आपल्या लांबलचक केसांमुळे ती सगळय़ांना मदत करते. तेव्हापासून मलाही वाटायला लागलं की आपल्या केसांचा कुणाला चांगला उपयोग होणार असेल तरच मी माझे केस कापायला तयार होईन. नाहीतर तुझ्याएवढी म्हातारी होईपर्यंत मी माझे केस मुळ्ळीच कापू देणार नाही कुणाला.’’
आईकडे सूचक नजर टाकत स्वरांगी म्हणाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आज्जीबरोबर स्वरांगी आणि तिची आई आज्जीच्या मैत्रिणीकडे- कमाआज्जीकडे भेटायला गेल्या होत्या. तिथे झोपाळय़ावर वाचत बसलेल्या एका ताईकडे खासकरून तिच्या केसांकडे पुन्हा पुन्हा स्वरांगीची नजर जात होती. पण नेहमीसारखे काही प्रश्न न विचारता ती गुपचूप आईबरोबर आतल्या खोलीत गेली. थोडय़ा गप्पाटप्पा झाल्यावर कमाआज्जीने कांदेपोहे आणले आणि बाहेर अभ्यास करत बसलेल्या आभाला म्हणजे तिच्या नातीला बोलावले. तिची सगळय़ांशी ओळख करून दिली. बोलता बोलता कमाआज्जीने आभाला गेल्या वर्षी कॅन्सर झाल्याचं सांगितलं. केमोथेरपी आणि इतर उपचारांनी ती आता एकदम बरी झाली होती आणि आता ती १२ वीच्या परीक्षेची तयारी करत होती. थोडय़ाच वेळात स्वरांगीची तिच्याशी मैत्रीची तार छानच जुळली. स्वरांगीने मग हळूच आभाच्या वेगळय़ा दिसणाऱ्या केसांबद्दलचा तिला प्रश्न विचारला. तेव्हा ‘‘हात्तिच्च्या.. अगं हे काही माझे खरे केस नाहीत. हा तर खोटय़ा केसांचा विग वापरतेय मी. म्हणजे माझेही केस तुझ्याएवढे नाही, पण बऱ्यापैकी लांब होते गं. पण कॅन्सरसाठी केमोथेरपीची ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि त्यामुळे माझे सगळे केस गेले. अर्थात थोडे दिवसांसाठीच हं.. आता तर मी बरीपण झाले आणि हळूहळू आता माझे केसही पहिल्यासारखे वाढतील पण मला डोक्यावर केस असलेले आवडतात. म्हणून आईबाबांनी अशा विगसाठी चौकशी केली आणि तो मिळाल्यापासून माझे केस वाढेपर्यंत मी हा विग वापरणार,’’ आभाने सहजपणे सांगून टाकलं.
‘‘हो का? कुठे मिळतात असे विग?’’ आज्जीनं कुतूहलानं विचारलं. एवढय़ात कॉफी घेऊन आलेल्या आभाच्या आईनं संभाषणात भाग घेतला.’’
‘‘अहो आज्जी, आपल्याकडे अशा अनेक सेवाभावी संस्था आहेत- ज्या कॅन्सर पेशंटसाठी मदत करत असतात. ज्यांचे केस या स्वरांगीसारखे लांब आहेत ना ते आपले केस अशा पेशंटसाठी कापून द्यायला तयार असतात. आपण केस द्यायची तयारी दाखवली की संस्था आपल्याला किती लांबीचे किंवा कशा प्रकारचे हवेत याची सर्व माहिती पुरवते. त्यांना विग करण्यासाठी किमान ७-८ इंचापासून २० इंच लांबीपर्यंतचे केस हवे असतात. आपल्या भारतात अशा बऱ्याच संस्था हे काम करतात. केमोच्या उपचारांमुळे केस गमावलेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढायला अशा विगमुळे, इतरांनी त्यांना अशा प्रकारे मदत केल्यामुळे नक्कीच मदत होते.’’
आभाची आई हे सर्व सांगत असताना स्वरांगीचे डोळे एकदम चमकले. ‘‘मावशी, आम्हाला त्या संस्थेचा फोन नंबर द्याल का प्लीज. मला आवडेल माझे केस त्यांना द्यायला. घेतील ना माझेही केस ती माणसं?’’ कॉफीचा कप खाली ठेवताना तिने एका दमात आपला मनोदय सांगून टाकला, त्याबरोबर तिच्या आईनं चमकून विचारलं, ‘‘स्वरा.. नक्की तुझी तयारी आहे केस कापायची?’’
‘‘होयच मुळी.. मी आधीपासूनच सांगत होते ना माझ्या केसांचा उपयोग मला त्या रापुंझेलसारखी कुणाला तरी मदत करण्यासाठी करायचाय. आता मी केस कापायला एका पायावर तयार आहे.’’ स्वराने दोन्ही हात उंचावत आनंदाने जाहीर केलं. अर्थातच तिचा निर्णय ऐकून सगळय़ांच्या डोळय़ांत तिच्याबद्दलचे कौतुक स्पष्ट दिसू लागलं.
alaknanda263@yahoo.com