डॉ. राजेन्द्र मलोसे

‘भुरा’ हे डॉ. शरद बावीसकरांचं आत्मचरित्र. एका खेडय़ातल्या दहावी नापास मुलाच्या मनात शिक्षणाची ओढ लागल्यानंतर कष्ट आणि मेहनतीच्या बळावर इंग्रजीसह फ्रेंच शिकण्याची, त्यानंतर युरोप पालथा घालून भारतात परतण्याची गोष्ट. आत्मचरित्रात घडलं ते खरं लिहावं लागतं. सत्य लिहिणं ही बाब ही पृथ्वी पेलण्यासारखी आहे. शरद बावीसकर या परीक्षेत अव्वल ठरतात. गेल्या वर्षभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या आत्मचरित्राविषयी..

nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
struggle story of painters daughter Pallavi Chinchkhede passes Indian Administrative Service exam
रंगकाम करणाऱ्याच्या मुलीची संघर्ष कहाणी, आयएएसची उत्तीर्ण…
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली

मराठीत खूप आत्मचरित्रं आली आहेत, पण प्रचलित शिक्षणव्यवस्थेवर कठोर भाष्य, तेही मऊ भाषेत, ‘भुरा’त आहे. पुस्तकी, पारंपरिक आणि अपारंपरिक शिक्षणव्यवस्था यातल्या चांगल्या आणि कीड लागलेल्या गोष्टीही हे आत्मचरित्र दाखवतं. त्यात परत लेखकाने शिक्षणासाठी केलेला संघर्ष फारच वाचनीय आहे. तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही, गरिबीसुद्धा, हा संदेश हे आत्मचरित्र देतं.

हे आत्मचरित्र वाचताना जाणवलं की, लेखकाची मराठी भाषा, त्यांच्या इंग्रजी आणि फ्रेंच भाषेपेक्षाही प्रवाही आणि भावनिक सुंदर असावी. त्या भाषेत दांभिकता नाही. याचं कारण लहान खेडय़ातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा. अजूनही काही शाळा आणि काही शिक्षक खूप चांगले आहेत. लेखक खेडय़ात दहावीपर्यंत शिकलाय. हे पण एक कारण आहे की, मला ‘भुरा’ आवडलं. कारण मी गेले पंचेचाळीस वर्ष खेडय़ात राहतो आणि ग्रामीण भागातल्या सगळय़ाच गोष्टींकडे आणि दुरवस्थेकडे सजगपणे पाहातो म्हणूनही हे आत्मचरित्र मला महत्त्वाचं वाटतं. ग्रामीण भागातल्या प्रत्येकाने ते वाचावं. महानगरीय लोकांना जर का ग्रामीण जीवन, त्यांचं झिजणं, त्यांचं थिजणं समजून घ्यायचं असेल तर ‘भुरा’सारखं अलीकडलं दुसरं पुस्तक नाही.

‘कोसला’ची अर्पणपत्रिका आहे ‘शंभरातल्या नव्याण्णवांना..’

‘भुरा’ हे आत्मचरित्र, रावेर या धुळय़ाजवळच्या, खेडय़ात राहणाऱ्या नव्याण्णव तरुणांचं आहे किंवा महाराष्ट्रातल्या ग्रामीण तरुणांचं आहे.. आणि यातला शंभरावा तरुण आहे ‘भुरा मास्टर’ म्हणजेच शरद. त्याचं हे आत्मचरित्र आहे. एकूण काय, तर सगळा समाज यात आला आहे, कारण असे बरेच शरद खेडय़ात शिकतात आणि उत्तुंग होतात, पण सगळेच असं ‘भुरा’ लिहू शकत नाहीत. बावीसकर लिहू शकतात. हे आत्मचरित्र एक सामाजिक दस्ताऐवज आहे. समाजाचा आरसा आहे, खेडय़ापासून ते लखनौ ते युरोप ते जेएनयू ते परत धुळय़ाच्या लळींग, रावेपर्यंत. 

भुरा ऊर्फ शरद हा शेतकरी कुणबी कुटुंबातला. खूप मुलांना शाळेत जायचा कंटाळा, त्यातला एक शरद. फुटकी पाटी तोडायची, त्यामुळे आई याला झोडायची, शाळेत नेऊन सोडायची. शाळा सोडून बाकीचे खेळ आवडायचे. दहावीला नापास होतो. इंग्रजीत नापास. कारण काय? तपासणी पथक येतं. कुणालाच कॉपी करता येत नाही. वडील मद्यपी ट्रक ड्रायव्हर. आई मजुरी करते; पण सांगत राहाते, तू शिक. शिक्षण सोडू नकोस. नापास झालेला शरद मजुरी करायला लागतो; पण गावातले एक शिक्षक, शरदला ‘भुरा मास्टर’ म्हणणारा भला माणूस आणि आई, त्याला ऑक्टोबरला परीक्षेला बळजबरीने बसवतात. शरद  पास होतो. तरी  वर्ष वाया जातं. म्हणून क्रेनवर काम करायला लागतो. तो म्हणतो, इंग्रजी ‘डाखीण’. खेडय़ातल्या मुलांची शत्रू नंबर एक; पण या शिक्षणाच्या व्यवस्थेत घुसण्यासाठी शरदला कळतं ती इंग्रजी डाखीण आलीच पाहिजे. घरात डिक्शनरी सापडते. हा क्रेनच्या ऑफिसमध्ये बसून ती पाठ करायला लागतो. त्याला वाटतं की, इंग्रजी शब्द पाठ करणे म्हणजे इंग्रजी भाषा; पण हा पठ्ठय़ा सगळी डिक्शनरी पाठ करून टाकतो. ‘शरद म्हणजे तरबेज बुद्धी.’ असं एक शब्दकोडी सोडवणारा शेठ म्हणतो आणि शरद डोंगराच्या बारीत आणि समाजमंदिराच्या धाब्यावर बसून, चांदण्याकडे पाहात शिक्षणाचं स्वप्न पाहातो. त्याला शेठचं वाक्य आठवत राहातं ‘शरद म्हणजे तरबेज बुद्धी’. तो स्वप्न पाहातो. स्वप्नं पाहावीत आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी झिजावं, खूप प्रयत्न करावेत हे त्याची आई त्याला गोड ऐराणी भाषेत सांगते.. ‘झिजीन मराणं, पण थिजीन नही मराणं.’ हे किती मोठ्ठं तत्त्वज्ञान आहे. खेडोपाडी, अशा किती तरी बहिणाबाई असतात, त्या मुलांना घडवू पाहातात. त्यांची नोंद हे आत्मचरित्र घेतं.

भुरा बारावीत केंद्रात पहिला येतो. जुनी सायकल घेऊन ‘जयहिंद’ कॉलेज, धुळे येथे जातो.  हजारो मुलांना घडवणारे डॉ. के. बी. पाटील सर त्याला तिथे भेटतात. हे पाटील सर त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांनी खूप विद्यार्थी घडवले. शरद इतिहास विषय घेतो. इंग्रजी स्पेशलसाठी अहिरे मॅडम मदत करतात. त्या पुढेही खूप मदत करतात. मिळतं ते फंक्शनल इंग्रजी. ते काय असतं हेही माहीत नसताना घेतलं जातं. इंग्रजीतच बोलायचं, शरदला अवघड वाटतं. आई म्हणते, ‘त्यात काय इंग्रजीले चारी कोपराथाईन आसं घेराणं ना, ह्या खेपले इंग्रजी निसटालेच नको.’ 

शरद तर सगळय़ा जगण्यालाच घेरायला सज्ज होतो. इतिहास हा तर आवडता विषय. आता काय करायचं? अहिरे मॅडमला भेटणं. इतिहासाच्या मॅडम म्हणतात, ‘अनौपचारिकपणे माझ्या वर्गात बसत जा.’ आणि शरदच्या अनौपचारिक शिक्षणाची सुरुवात इथंच होते.

‘कमवा आणि शिका’ या योजनेचा तो भाग होतो. या योजनेचा भाग होईपर्यंत हे आत्मचरित्र शंभरातल्या नव्याण्णव जणांचं असू शकतं. पुढे मात्र ते स्वत:ला अनौपचारिकपणे घडवत जाणाऱ्या असाधारण शरद आणि शरदचं आहे. जी वाट अवघड आहे ती त्याची आहे. शिकता येतं, जगता येतं, जिंकण्याला घेरता येतं हे भुरा मास्टर आपल्याला पुढे सांगत राहातो आणि तेही  तत्त्वज्ञान पातळीवर. हेही या आत्मचरित्राचं वैशिष्टय़.

इंग्रजी ही प्रभावीपणे व्यक्तिमत्त्व घडवण्याचं साधन आहे असं नेहमी शरदला वाटत आलं. विद्यापीठातील अद्ययावत ‘लँग्वेज लॅब’ जिथं बीबीसी, ऑक्सफर्ड, केंब्रिज आणि ‘सीआयईएफएल’ अशा संस्थांतून चांगले ऑडिओ व्हिज्युअल साहित्य मागवण्यात आलं होतं ते सारं त्यानं शिकून घेतलं.

या ‘भुरा’मध्ये ‘सीआयईएफएल’, ‘युरोप’ आणि ‘जेएनयू’ हे तीन शब्द फार महत्त्वाचे आहेत, त्यामुळेच हा भुरा मास्टर खरा ‘शरद’ होतो.  इंग्लिश लॅबची किल्ली हाती आल्यानंतर तो सगळय़ा कॅसेटचा अभ्यासच करून टाकतो. डिक्शनरी पाठ करण्याच्या प्रकारासारखाच हाही. एक एक कॅसेट तो खूप वेळा ऐकतो. त्याचे उच्चार तसेच करण्याचा प्रयत्न करतो.  ‘हॅम्लेट’, ‘मॅकबेथ’, ‘किंग लिअर’सारखी नाटकं खूप वेळा ऐकतो.  

भुरा मास्टर हैदराबादच्या ‘सीआयईएफएल’ या संस्थेत शिकायचं स्वप्न पाहातो. प्रवेश परीक्षा पास होतो; पण शिकायसाठी पैसे? पाटील सर पंचवीस हजारांची मदत मिळवून देतात. मग तो लखनौच्या संस्थेत जातो, कारण तिथे खर्च कमी येणार असतो. या संस्थेत सगळी शहरी पोरं, हा खेडूत एकाकी पडतो; पण एकटा राहत नाही, अंतर्मुख होतो. कमी बोलायला लागतो. आत आत जगायला लागतो. एकटं असणं आणि खूप झोप मिळणं ह्यामुळे मला यश मिळालं, असं भुरा मास्टर म्हणतो.

तिथं जाऊन कळतं की, हा कोर्स सोपा आहे. अजित कन्ना या होस्टेलला राहणाऱ्या सरांचे ‘फ्रेंच फॉर बिगिनर्स’ या संध्याकाळच्या वर्गात अनौपचारिक पद्धतीने बसायला लागतो. पाय ओढणारे असतात. अशी परवानगी नाही म्हणून त्याला बसू दिले जात नाही. मग हा  भुरा मास्टर फ्रेंच भाषा घेरायची तयारी करतो. त्याला वाचनालयात चार फ्रेंच कॅसेट आणि एक पुस्तक सापडतं, अजित कन्नाकडून डिक्शनरी मिळवतो. हे पाठ करायचं. फ्रेंचला आठ तास. बाकीच्या विषयाला चार तास. तीन महिन्यांत आयआयएममध्ये शिकवणारी शिक्षिका म्हणते, ‘अरे वा! तुम्हाला फ्रेंच चांगली येते.’ काही महिन्यांत फ्रेंच तत्त्वज्ञान त्याला अवगत होतं. त्याच शिक्षिकेमुळे गुप्ताजीच्या प्रायव्हेट क्लासमध्ये फ्रेंच शिकवायची संधी मिळते. कमवा आणि शिका परत सुरू होतं. पैसे मिळू लागतात. त्याचं हे शिकवणं काही लोकांना विद्रोही वाटायला लागतं. बरेच लोक त्याला त्रास द्यायला लागतात. एक सर सल्ला देतात की, लोकांकडे लक्ष देऊ नकोस. याच वेळी औपचारिक शिक्षण घेण्यासाठी जेएनयूमध्ये जाण्याचे वेध लागतात, कारण अजित कन्ना जेएनयूला गेलेला असतो. एमए होतो. दिल्लीला फ्रेंच सांस्कृतिक केंद्रात अभ्यास करून जेएनयूत प्रवेश मिळतो, पण त्यासाठी तो शंभरच्या वर फ्रेंच सिनेमे पाहातो. जेएनयू प्रवेशपरीक्षेत भुरा मास्टर पहिला येतो. आता तो औपचारिक फ्रेंच एमए होणार असतो. फ्रेंच सांस्कृतिक केंद्रात कामही मिळतं.

जेएनयूबद्द्ल त्याने लिहिलंय की, ‘जेएनयू सरकारी कॉलेज. पैसे नसताना कुणीही इथे फुकट शिक्षण घेऊ शकतं. अनुसूचित जातीजमाती आणि इतर मागासलेल्या श्रेणीसोबत, मुलींना पाच वाढीव मार्क दिले जातात, त्यामुळे ५५ टक्क्यांपेक्षा अधिक मुली असायच्या. चार हजार विद्यार्थ्यांपैकी हजार मुलेच राजकारणात भाग घेतात. वेगवेगळय़ा डाव्या, उजव्या संघटना इथे कार्यरत. विसंवाद घडणं अटळ; पण त्यामुळे इथे मुलामुलींची व्यक्तिमत्त्व वेगळी घडतात. विषमतावादी समाजाचं लोकशाहीकरण जेएनयूमध्ये होतं. विद्यापीठाच्या प्रत्येक निर्णयप्रक्रियेत विद्यार्थी सहभागी,त्यामुळे निवडणुकीला महत्त्व. व्यवस्थेला प्रश्न विचारायचं धाडस इथे विद्यार्थी शिकतो. लोकशाहीत सरकार मायबाप नसून जनता मायबाप आहे हे इथं कळतं. काही प्राध्यापक कोत्या मनाचे; पण आता २०१४ नंतर जेएनयूचं वातावरण खूप बदललं आहे, असं भुरा मास्टरचं मत आहे. लेखकाचं, अजून एक मत आहे- जसं दिल्लीकडे जातो तसं तसं सरकार दिसायला लागतं म्हणजे जनता मायबाप वाटायला लागते. गावाकडे जातो तर सरकार दिसेनासं होतं. जेएनयूत शिकणारे पोरं शेती न पाहाता शेतीवर बोलतात आणि शीघ्र-मार्क्‍सवादी होतात. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, ‘भुरा’मधलं.

‘फ एम्बसीत औपचारिक पोशाखाऐवजी  मुलाखतीला जातो भुरा मास्टर.  बाकीचे सूट-बूट आणि टायमध्ये; पण जेव्हा फ्रेंच तत्त्वज्ञानावर बोलायला लागतो तेव्हा मुलाखत घेणारे सगळे अवाक् होतात आणि नोकरी मिळते. त्या नोकरीमुळे लगेच पॅरिसला ट्रेिनग आणि पासपोर्ट दोन दिवसांत हाती पडते. शिक्षण तुम्हाला काय काय देतं? ही अशी सुविधा देतं, पण लेखक म्हणतो, ज्ञान अन्नासारखं असतं, अन्न खाणं आणि ते पचवणं या दोन गोष्टी आहेत. ज्ञान पचवलं पाहिजे आणि त्याचं रूपांतर ऊर्जेत केलं पाहिजे.

शेवटच्या वर्षांत शिष्यवृत्ती मिळवून युरोपला जाणं येतं. आपल्याकडे डॉक्टर, इंजिनीयर हेच मोठ्ठे मानले जातात. तिकडे त्याला वेगळंच दिसतं. काही तिकडचे विषय तर शरदनेपण ऐकलेले नसतात. सिमिऑटीक्स, हेटरॉलॉजी हे विषय. तिथले शैक्षणिक विचार आणि शैक्षणिक पद्धत मुळातूनच ‘भुरा’त तपशिलात वाचावेत. त्यातल्या एक-दोन गोष्टी अशा की, फ्रेंच तत्त्वज्ञान म्हणजे वैश्विक मनुष्यविषयक चिंतन. इटालियन संकल्पना म्हणजे काहीच न करणे. ही एक कला आहे, जी सर्वानाच जमत नाही.

परत आल्यानंतर अ‍ॅमिटी या खासगी संस्थेतला लाळघोटेपणा न आवडणं. अशा संस्थेत शिक्षणाचा विपर्यास होतो, असं त्याचं पक्कं मत बनत जातं.

 भुरा मास्टरकडे हे सगळं आईकडून आलं आहे का? जी पाचवी पास असून ‘विद्रोही तुकाराम’ वाचून पचवते. आई सांगत राहाते, किंमत मोजावी लागली तरी स्वत:शी प्रामाणिक राहायला पाहिजे. याच तत्त्वज्ञानाला जागून ‘भुरा’ हे आत्मचरित्र अत्यंत प्रामाणिकपणे उतरलं आहे. ते लोकांना पटतंय आणि आवडतंय, याची साक्ष गेल्या वर्षांत वाचकांनीच या पुस्तकाला लोकप्रिय बनवून दिली आहे.
maloserajendra@gmail.com

Story img Loader