शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये (बी.एड) शैक्षणिक तत्त्वज्ञान या विषयात देशविदेशातील ज्या शिक्षणपद्धती आणि त्या पद्धती शोधून काढणाऱ्या ज्या मोजक्या शिक्षणतज्ज्ञांची ओळख करून दिली जाते, त्यात इटलीच्या मारिया माँटेसरींचा समावेश असतो म्हणजे असतोच. लहान मुलं मोठय़ांचे ऐकत नाही म्हणजे ऐकण्यासाठी त्यांना फक्त बदडूनच काढले पाहिजे असा जो सर्वसामान्य आणि सर्वमान्य समज होता, त्या काळात वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेली एक मुलगी सहा वर्षांखालील मुलांच्या शिक्षणासाठी काही करू पाहते. या वयोगटातील मुला-मुलींसाठी शिकणे आणि शिकवणे हे सहज कसे होईल यासाठी धडपडते, म्हणजे हे एक प्रकारे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखीच गोष्ट झाली. सहा वर्षांखालील मुलांना सहज सुलभ शैक्षणिक साहित्य तयार करणे ही त्या काळाच्या मानाने फारच पुढची गोष्ट होती. जिथे जन्मदाते वडील आपल्या शिक्षणाला विरोध करत होते (पुढे हा विरोध मावळला) तिथे काळाच्या बरीच पुढे असलेली ही शिक्षण पद्धती समाज सहज स्वीकारेल हे होणं शक्य नव्हतं. या सगळय़ासाठी डॉ. मारिया माँटेसरी यांना करावा लागणारा संघर्ष, त्यांच्या मार्गात आलेले खाचखळगे तसेच नंतरच्या काळात त्यांनी शोधलेली व जगमान्य झालेली बालशिक्षण पद्धती. डॉ. मारिया माँटेसरींचा असा हा विस्तीर्ण जीवनपट उलगडला आहे ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकरांनी. आपल्या ‘डॉ. मारिया माँटेसरी’ या पुस्तकात. इंडस सोर्स बुक्स प्रकाशनातर्फे हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे.

या पुस्तकात एकूण दहा प्रकरणे आहेत. यात मारिया माँटेसरींच्या बालपणापासून ते भारतातील वास्तव्यापर्यंतचा प्रवास वीणाताईंनी रेखाटला आहे. ‘अभ्यास बौद्धिक क्षमतेचा’ या प्रकरणात लिहिल्याप्रमाणे मारिया या एकदा एका मनोरुग्णालयात गेल्या असताना त्यांना दिसलं की, तिथली सर्व मानसिकदृष्टय़ा दुर्बल मुलं कैद्यांसारखी एका मोठय़ा खोलीत कोंडून ठेवली गेली आहेत. त्या खोलीत काहीच नाहीये. जेवल्यावर ही मुलं खाली सांडलेलं खरकटं चिवडत बसत. मारिया यांनी या गोष्टीवर विचार केला की, ही मुलं जमिनीवरचे अन्नकण का शोधत असतील? मुलांना कोंडून ठेवणारी ती सर्व खोली रिकामी होती. मुलांना स्पर्श करून पाहावे, उचलून पाहावे अशी एकही वस्तू तिथे नाहीये. अन्नाचे कण वेचणं ही त्या मुलांसाठी कंटाळा घालवण्यावरचा मार्ग होता. बौद्धिक विकासाचा मार्ग हा असा कृतीयुक्त गोष्टीच्या माध्यमातून हाताळण्यातून सुरू होतो हे सूत्रच जणू माँटेसरींना यात सापडले. माँटेसरी यांनी निश्चितच केलं की, लहान मुलांचे शिक्षण हे आनंदी कसे होईल या गोष्टीला वाहून घ्यायचे म्हणून! त्यासाठी त्यांनी त्यांच्या अगोदर ज्या ज्या लोकांनी या क्षेत्रात काम केलंय त्यांचं संपूर्ण अध्ययन केलं. त्यामधल्या एदुवार्द सेग्यान, फ्रेडरिक फ्रबल यांच्या बालशिक्षण पद्धतीचा माँटेसरींवर विशेष प्रभाव पडला. फ्रबल यांनी १८१६ मध्ये बालकांसाठी किंडरगार्टन (बालोद्यान) सुरू केलं होतं. या प्रयोगाला लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. मारिया या तरुण वयापासूनच शिक्षणाबाबतीत किती सजग, संवेदनशील होत्या हे सुरुवातीच्या तीन प्रकरणांमधून दिसून येतं. पुस्तकाची भाषा ही अतिशय लालित्यपूर्ण आहे.

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Success story of Richa Kar the owner of Zivame company her family was ashamed from her business where she earned crores
ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?

हेही वाचा : निवडू आणि वाचू आनंदे..

‘बालभवन’ या प्रकरणात मारिया यांनी लहान बालकांवर काय शैक्षणिक प्रयोग केले. हे प्रयोग करताना बौद्धिक अक्षमता असणाऱ्या मुलांना फ्रबलच्या शिक्षण पद्धतीनं शिकवता येऊ शकतं हे स्पष्ट झालं. मग अशा असक्षम मुलांना शिकवायला प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता भासू लागली. माँटेसरींनी समाजाची ही गरज वेळीच ओळखली. इटलीत अशा शाळाही सुरू व्हायला लागल्या होत्या. इतार्द आणि सेग्यान यांना अभिप्रेत असणाऱ्या ऐंद्रिय जाणिवा सजग करणाऱ्या साधनांचा माँटेसरींना उपयोग करून पाहायचा होता. जसे की आकार साच्यात बसवणे, मणी ओवणे, काजात बटन घालणे इ. या कृतीयुक्त प्रयोगामुळे माँटेसरींनी सेग्यान आणि इतार्द यांच्याही एक पाऊल पुढे टाकलं. या कृतीयुक्त शिक्षणामुळे समाजाने ज्यांना ‘ढ’, ‘गतिमंद’ वगैरे शिक्का मारला होता ही मुलं आता सर्वसामान्य मुलांप्रमाणे वाचून लिहू शकतात, ही गोष्ट काय एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती! पण या सगळय़ांसाठी शिक्षक मिळणं आवश्यक होतं, माँटेसरींनी आपल्या शिक्षण प्रणालीचे सर्वाधिकार स्वत:कडे राखून ठेवलेले होते. त्यात बदल केलेलेही त्यांना चालत नसत. या स्वामित्व हक्कामुळे ही शिक्षण पद्धती बऱ्यापैकी बंदिस्त अवस्थेत होती.

हेही वाचा : आदले । आत्ताचे: एका पिढीच्या अवस्थांतराची नोंद

आज वर्तमानपत्रात आपण वाचतो की, चौथीच्या वर्गातील मुलांना पहिलीच्या वर्गातलं काही येत नाही. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण व्यवस्थेनं बाल शिक्षणाकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष. भारतातील सर्व अर्थतज्ज्ञ म्हणतात की, शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च करायला हवा. भारत सरकार शिक्षणावर जेमतेम अडीच टक्के खर्च करत आहे. अमर्त्य सेन आपल्या ‘द कंट्री ऑफ द फर्स्ट बॉईज्’ या पुस्तकात म्हणतात की, ‘‘आपल्या देशातील अकार्यक्षम व अतिशय सुमार प्राथमिक शिक्षणामुळे कोटय़वधी मुले शिक्षणापासून दुरावतात. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यातील हा मोठा अडसर आहे.’’ भारतात प्राथमिक शिक्षणाची सार्वत्रिक पीछेहाट होण्यामागे अपुऱ्या पायाभूत सुविधा असणं हेच कारण आहे. कित्येक भटक्या विमुक्त जाती, आदिवासी जाती या प्राथमिक शिक्षणाची पहिली पायरीही चढू शकत नाही. त्यांच्यासाठी उदार लवचीक धोरणं आखणे गरजेचं आहे. ही सर्व वर्तमान स्थिती पाहता माँटेसरी यांनी ही काळाची पावलं किती अगोदर ओळखली होती!
‘अमेरिकेत चर्चा’, ‘विश्वसंचार’ या दोन प्रकरणांत माँटेसरी यांचा कृतीयुक्त शिक्षणासाठी इतका आग्रह का होता याबद्दल वाचायला मिळतं. कृतीयुक्त शिक्षणानं मुलांना आपल्या शक्तीचा अंदाज समजतो, असं मारिया यांचं मत होतं.

उदा. एखादी वस्तू मुलांना उचलता येते की नाही, ती वस्तू ते मूल किती अंतरापर्यंत फेकू शकते, इ. अशा कृत्या केल्यानं जर बालकाला अपेक्षित यश मिळालं तर बालकाचा आत्मविश्वास दुणावला जातो. आत्मविश्वास वाढला की शिकण्यातला रस वाढतो. माँटेसरींनी स्थापन केलेल्या ‘कासा देई बाम्बिनी’ म्हणजेच बालभवन यात मुलांना पूर्ण मोकळीक असे. माँटेसरींची शिस्तीची व्याख्या ही फार अनोखी होती, ‘‘ज्या वर्गात मुलं कोणतीही गैर वा धांदलीची कृती न करता आपल्या गरजेच्या पूर्तीसाठी स्वेच्छेने आणि बुद्धीपुरस्सर मोकळेपणाने वावरू शकतात तो वर्ग माझ्या दृष्टीने शिस्तीचा!’’ बालभवनासाठी माँटेसरींनी जे नियम घालून दिले होते ते आज तंतोतंत पाळायचे म्हटल्यास आपल्याकडे कोणतीही अंगणवाडी सेविका नकारच देईल. नकारही का नको द्यायला? अंगणवाडी सेविकांइतकं जटिल काम आपल्याकडे शिक्षण क्षेत्रात कुणीही करत नाही.
बालभवनात मुलांसोबत त्या किती लवचीक होत्या. मुलांना एखादी कृती वारंवार करून पाहावी वाटत असेल तर त्या मुलांना ते करू देत. कारण कृती वारंवार करण्याने त्या बालकात कृती करण्याचे कौशल्य विकसित होत असतं; पण आज पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये इतका संयम आहे का, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. बालभवनातील मुलांना नाकाला आलेला शेंबूड पुसायचा कसा हे शिकवायचे होते. याबद्दल पुस्तकात एक फार रोचक प्रसंग आलेला आहे. पुस्तकात तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे. सर्वसामान्य कुटुंबात अशी समज असते की, मुलं काही कौशल्य घरच्यांना पाहूनच शिकतील; पण असे प्रत्येक वेळी घडत नाही. मुलांना नखं काढणे, बुटांच्या लेस बांधणे या गोष्टी प्रात्यक्षिक दाखवल्याशिवाय कशा जमणार? पुस्तकाच्या शेवटी निलेश निमकरांनी जी टिप्पणी केली आहे त्यात त्यांनी एक महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : आदरणीय श्रीपु..

ते म्हणजे, माँटेसरी यांच्या शाळेत, शिक्षणप्रणालीत बक्षीस किंवा शिक्षा यांसारख्या बाह्य प्रेरणांना जरादेखील स्थान नव्हते. लालूच देऊन, भीती न दाखवता मुलं शिकू शकतात यावर त्यांचा विश्वास होता. माँटेसरींचं भारतातही दीर्घकाळ वास्तव्य होतं. त्यांच्याकडून बालशिक्षणाची प्रेरणा घेऊन आपल्याकडे गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांनी महाराष्ट्रातही बालशिक्षणाचं मोठं काम केलं होतं. असं असलं तरी माँटेसरींच्या पद्धतीतील शिकण्याचं हे मॉडेल आता कालबाह्य झालं असलं तरी पद्धती मात्र कालबाह्य झालेली नाही. आज अशी धारणा आहे की मुलं हे रिकाम्या पाठीसारखे नसून, ज्ञानाच्या निर्मितीत भाग घेणार क्रियाशील घटक आहेत. बालमानसशास्त्र, बालसंगोपन, बालशिक्षण या गोष्टी किती गांभीर्याने घ्यायच्या असतात हे वाचकांच्या मनावर ठसवण्यात हे पुस्तक पूर्णपणे यशस्वी झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
‘डॉ. मारिया माँटेसरी’, – वीणा गवाणकर, इंडस सोर्स बुक्स, पाने- १६४, किंमत- २९९
ajjukul007@gmail.com