गणेश मतकरी
१९९८ साली राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ विजेता ठरलेला चित्रपट होता श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘समर’! मध्य प्रदेशातल्या एका गावातल्या वर्गसंघर्षांची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते किशोर कदम. यंदा ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ या दोन चित्रपटांतील कामांसाठी त्यांची राष्ट्रीय पुरस्कारांत ‘विशेष दखल’ घेतली गेली आहे. त्यानिमित्ताने..
१९९८ साली आपल्या ४६ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ विजेता ठरलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट होता श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘समर’! मध्य प्रदेशातल्या एका गावातल्या वर्गसंघर्षांची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होता किशोर कदम. मराठी चित्रपटांत तो अजून खूप प्रमाणात दिसायला लागला नव्हता. आणि ज्येष्ठ नाटय़-दिग्दर्शक पं. सत्यदेव दुबेंच्या तालमीतून आलेला नाटय़कर्मी असल्याने त्याचं समांतर चळवळीशी जोडलेल्या चित्रपटांत दिसणं हे स्वाभाविकच होतं. त्यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी जी मोजकी नावं चर्चेत होती, त्यात एक नाव किशोरचंही होतं. इतक्या आधीपासून आपल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी विचार होत असूनही आजवर या गुणी अभिनेत्याचं नाव या पुरस्कारांमध्ये प्रत्यक्ष दिसलं नव्हतं, ही अतिशय आश्चर्याची गोष्ट! या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी ही त्रुटी काही प्रमाणात भरून काढून किशोर कदमची महत्त्वाचा अभिनेता म्हणून (उशिरा का होईना, पण) दखल घेतली आहे. ‘अवांछित’ आणि ‘गोदाकाठ’ या दोन चित्रपटांतल्या भूमिकांसाठी तो ‘विशेष उल्लेखनीय’ अभिनेता ठरला आहे.
मी काही अजून ‘गोदाकाठ’ पाहिलेला नाही, पण शुभो बसू नाग दिग्दर्शित ‘अवांछित’ मात्र पाहिला आहे. किशोरने साकारलेली आपल्या मुलाबरोबर विसंवाद असलेल्या वृद्धाश्रम संचालकाची भूमिका ही चित्रपटातल्या दोन मुख्य भूमिकांतली एक आहे. व्यक्तिमत्त्वातली भावनिक गुंतागुंत संयत, पण तरीही परिणामकारकरीतीने मांडणं हे या भूमिकेचं आव्हान आहे.. जे किशोरने आपल्या कामातून पेललं आहे. खरं तर यंदा एक सोडून दोन लक्षवेधी भूमिका करणाऱ्या किशोरचं नाव ‘स्पेशल मेन्शन’ऐवजी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या विभागातच येणं योग्य ठरलं असतं. पण असो. किशोरने गेल्या काही वर्षांत केलेल्या ताकदीच्या भूमिका पाहता त्याला लवकरच तो मानही मिळेल याविषयी माझ्या मनात शंका नाही.
नाटकाची पार्श्वभूमी असलेल्या नटांना टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत मान दिला जातो, याचं कारण नट म्हणून जशी जडणघडण रंगभूमीवर होऊ शकते, तशी अपवाद वगळता या माध्यमांमध्ये ती शक्य होत नाही. व्यावसायिक चित्रपटांमध्ये तर नाहीच नाही. एका भूमिकेला पुरेसा वेळ देणं, तिला जिवंत करताना सापडणाऱ्या पैलूंचा विचार करणं, विशिष्ट दिग्दर्शकाबरोबर अधिक काळ काम करत असल्यास त्याच्या दृष्टिकोनाचा आपल्यातला कलाकार घडवताना फायदा करून घेणं, आवाजाचा वापर, फेक यावर काम करणं या गोष्टी सहसा थेट मालिका वा सिनेमात गेलेल्या नटवर्गाच्या अनुभवाचा भाग नसतात. हे बरोबरच आहे की नाटकातला अभिनय हा चित्रपटापेक्षा वेगळा आहे आणि त्याची स्वतंत्र गुणवैशिष्टय़ेही आहेत. पण तरीही रंगभूमीवर आत्मसात केलेली अभिनयाच्या मूलभूत अंगांची तालीम आणि भूमिकेचा विचार करण्याची क्षमता अभिनेत्यांना तिथे कायम उपयोगी पडते. पं. सत्यदेव दुबेंसारख्या मोठय़ा आणि परखड दिग्दर्शकाच्या हाताखाली अभिनयाचे धडे गिरवल्याने किशोरला मुळातच आपल्या कामाकडे पाहण्याची एक सखोल दृष्टी आहे, हे त्याला पडद्यावर पाहताना लक्षात येतं. भूमिकांची लांबी किती मोठी किंवा किती लहान आहे, यावरून त्याच्या कामाचा गुणात्मक दर्जा ठरत नाही.
श्याम बेनेगलांच्या ‘अंतर्नाद’ (१९९१) चित्रपटातली भूमिका हे किशोरचं पडद्यावरलं पहिलं लक्षात येण्यासारखं काम आहे. ही भूमिका लांबीने फार मोठी नसली तरी हा अभिनेता तेव्हाच जाणकारांच्या लक्षात आला; आणि पुढल्या काही वर्षांमध्ये त्याला बेनेगलांबरोबरच समांतर चित्रपटांत महत्त्वाचं काम करणाऱ्या अमोल पालेकर, सुधीर मिश्रा, नचिकेत-जयू पटवर्धन अशा दिग्दर्शकांनी कास्ट केलेलं दिसतं. ‘समर’मधल्या मोठय़ा भूमिकेनंतर किशोर या क्षेत्रात स्थिरावला असं म्हणता येईल. पुढल्या काळात समांतरसह व्यावसायिक चित्रपटांमध्येही तो दिसायला लागला. २०१० साली आलेल्या रवी जाधव दिग्दर्शित ‘नटरंग’मधल्या पांडोबा या पात्रापासून त्याचा मराठी चित्रपटांमध्येही चांगला जम बसला.
किशोर व्यावसायिक चौकटीतल्या पारंपरिक नायकांची कामं करत नसल्याचा एक फायदा आहे. व्यावसायिक चित्रपटांमधल्या प्रमुख भूमिका बऱ्याचदा एकसुरी असतात. एका विशिष्ट पठडीतली त्यांची रचना असते आणि अनेकदा त्यांचं सादरीकरणही विशिष्ट साच्यात बसणारं अपेक्षित असतं. किशोरने अनेक चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या, पण तो विशिष्ट ढाच्याच्या भूमिकांमध्ये अडकून राहिला नाही. अमोल पालेकरांच्या ‘ध्यासपर्व’ चित्रपटातली समाजसुधारक र. धों. कर्वेची भूमिका, सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर द्वयीच्या ‘एक कप च्या’मधला बस कंडक्टर काशीनाथ, दि. बा. मोकाशींच्या ‘आता आमोद सुनासि आले’ कथेवर आधारीत असलेल्या सुमित्रा भावेंच्या ‘दिठी’मधला पुत्रशोकाने व्याकुळ झालेला रामजी किंवा आता ज्यासाठी किशोर पुरस्कारप्राप्त ठरला आहे त्या ‘अवांछित’ चित्रपटातला मधुसूदन अशा त्याने रंगवलेल्या व्यक्तिरेखा या निव्वळ नायकाच्या नाहीत, तर ती हाडामांसाची माणसं आहेत. त्यांचे गुणदोष, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले चढउतार, त्यांच्यासाठी जीवनमरणाचे असलेले त्यांचे प्रश्न हे केवळ कल्पित नाहीत. प्रेक्षकांतल्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात या प्रकारची व्यक्तिमत्त्वं कधी ना कधी पाहिलेली आहेत. त्यांची आयुष्यं त्यांना परिचित आहेत. त्यामुळेच ती अस्सल वाटतीलशी उभी करणं वाटतं तितकं सोपं नाही. अर्थात केवळ प्रमुख भूमिकांमध्येच किशोर आपल्या लक्षात राहतो असं नाही. ‘फॅंड्री’मधला वर्गसंघर्षांच्या शेवटच्या पायरीवरला जब्याचा बाप कचरू, ‘बालक पालक’मधले चाळीतल्या मुलांना शिस्त लावणारे कदमकाका, ‘झुंड’मधला कोच आणि अशा अनेक चित्रपटांमधून किशोर आपल्याला भेटत आला आहे. खलनायकी, इरसाल छापाच्या काही भूमिकाही त्याने केल्या आहेत, पण त्यांच्यापेक्षा गुंतागुंतीची व्यक्तिमत्त्वं असलेल्या सामान्य माणसांच्या पात्रांमध्ये तो अधिक रमतो असं मला वाटतं.
किशोर हा आपल्याकडला महत्त्वाचा कवी असल्यामुळे असेल, त्याचं वाचन उत्तम असल्याने असेल, किंवा इतर काही कारणांनी- पण त्याला शब्द समजतो. वाक्याचं वजन, त्याची रचना, त्याची फेक यावर त्याची अचूक पकड आहे. तो गोळाबेरीज बोलताना दिसणार नाही. त्याची संहितेची जाण ही त्याच्या संवाद घेण्याच्या पद्धतीत स्पष्ट उमजते.
अलीकडे काही दाक्षिणात्य नटांचं कौतुक करण्याच्या निमित्ताने आपल्याकडे शिरलेला ‘डोळ्यांनी अभिनय करणं’ हा शब्दप्रयोग सतत (आणि थोडा निष्काळजीपणेही!) वापरला जातो. खरं तर त्यात काय नवं आहे! कोणताही चांगला अभिनेता आपल्या डोळ्यांचा वापर हा करणारच.. करायलाच हवा. मात्र केवळ तो वापर पुरेसा नाही. संपूर्ण बॉडी लॅंग्वेज, त्या पात्राची मानसिकता, त्याची विचारसरणी, त्याच्या भावमुद्रा, त्याचं एकूण व्यक्तिमत्त्व या साऱ्यालाच आपलंसं करत त्याने तो माणूसच बनून जायला हवं. किशोर आजवर आपल्या डोळ्यांसमोर अशी अनेक माणसं बनला आहे, आणि यापुढे अनेक वर्ष बनत राहील. त्याच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली याचा आनंद आहे; पण त्याच्यासारख्या जाणत्या चित्रकर्मीने आता अभिनयाबरोबर दिग्दर्शनाकडेही वळावं असं वाटतं. त्याच्या डोक्यात तसं काहीतरी चालू असल्याचं त्याने वेळोवेळी बोलून दाखवलेलं आहे. त्याला ही संधी लवकर मिळावी अशी अपेक्षा आहे. रुळलेल्या आणि नव्या अशा दोन्ही वाटांवरून होणाऱ्या पुढल्या प्रवासासाठी आपल्या साऱ्यांच्या शुभेच्छा किशोरबरोबर असतीलच.
ganesh.matkari@gmail.com