मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com
डॉन कॅम्पबेल या मुळात शास्त्रज्ञ नसलेल्या अमेरिकन संगीतवादकाला ‘मोझार्ट इफेक्ट’मध्ये व्यापाराची प्रचंड क्षमता दिसली. आणि त्याने या संज्ञेचं वेळ न दवडता ट्रेड मार्केटिंग केलं. त्याने मग अगोदरच लोकप्रिय झालेल्या या संकल्पनेवर लगोलग दोन बेस्टसेलर पुस्तकं आणि जवळजवळ डझनभर सीडीज् प्रकाशित केल्या; ज्यात त्याने मोझार्टच्या संगीताचे काही अचाट आणि अविश्वसनीय फायदे असल्याचा दावा केला. (अर्थात हे दावे नंतर गंभीररीत्या वादाच्या भोवऱ्यात सापडले.) कॅम्पबेलच्या अचाट दाव्यांनुसार, मोझार्टचं संगीत ‘ताबडतोब तुमच्या मनाला उभारी देतं. तुमच्यात प्रार्थनेची इच्छा, करुणा व प्रेम जागृत करू शकतं आणि तुमचं मन स्वच्छ करू शकतं.’ पण सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याच्याभोवती त्याने आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बांधली तो दावा म्हणजे ‘मोझार्टचं संगीत तुम्हाला अधिक स्मार्ट कसं बनवू शकतं!’
‘मोझार्ट इफेक्ट’च्या मिथकामुळे मोझार्टचं रूपांतर एक कॅश-काऊ किंवा पैसे देणाऱ्या दुभत्या गायीमध्ये झालं. आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ‘मोझार्ट इफेक्ट’ म्हणावा तसा परिणामकारक ठरला नाही. पण त्यामुळे सामाजिक धोरणाच्या क्षेत्रात त्याचे काही इंटरेस्टिंग परिणाम मात्र दिसले. अमेरिकेतील जॉर्जिआ आणि टेनेसीच्या गव्हर्नर्सनी आपल्या राज्यांमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला मोझार्टच्या संगीताची सीडी देण्याचा उपक्रम सुरू केला. पण त्यापेक्षाही या संशयास्पद संकल्पनेच्या परिणामाचा सर्वात जास्त फायदा व्यापारीवर्गाने घेतला आणि आपल्या पोतडय़ा भरून घेतल्या. (त्यामध्ये ऑस्ट्रियामधल्या दोन ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालणाऱ्या संस्था, त्या देशाचे पर्यटन खाते आणि मोझार्टचे जन्मगाव साल्झबर्ग या नगराचे मेयर यांचाही समावेश होता.) त्यांना मॅडिसन अॅव्हेन्यूवाले आणि अटलांटिक महासागराच्या दुसऱ्या बाजूचे त्यांचे भाईबंद यांनी मदत केली. त्यांना या संशयास्पद उपक्रमांसाठी प्रोत्साहितदेखील केलं. आणि लवकरच मोझार्ट इफेक्टपासून स्फूर्ती घेतलेल्या अनेक बोगस प्रॉडक्टस्ची बाजारात रीघ लागली. (यांत ज्याला इंग्रजीमध्ये snake oil प्रॉडक्ट्स म्हणता येतील असेही बरेच होते.) त्यांत काय काय होतं? वॉल्ट डिस्ने कंपनीची ‘बेबी आईनस्टाइन’ या नावानं काढलेली (तीन महिने ते तीन र्वष या वयोगटातल्या लहान बाळांसाठीची) उत्पादनं होती. तसंच तुमचा विश्वास बसणार नाही, पण ब्राचा हूक काढला की Eine Klein Nachtmusik टय़ून वाजणाऱ्या ‘मोझार्ट ब्रा’देखील त्यात आल्या. शिवाय मोझार्ट निकर्स, मोझार्ट केक आणि मोझार्ट गोल्फ बॉल्स यासारखी उत्पादनेदेखील आली. अशा या चतुर धंदेवाल्यांनी या मोझार्ट-गंगेत आपले हात धुऊन घेतले.
एकीकडे सर्व व्यावसायिक या मिथक कल्पनेतून आपलं उखळ पांढरं करण्यात आणि अमाप फायदा कमावण्यात व्यग्र होते, तर दुसरीकडे या कल्पनेबद्दल असलेल्या संशयाचं हळूहळू उपाहासात आणि नंतर अविश्वासात रूपांतर व्हायला सुरुवात झाली होती. जगभरातल्या संशोधकांनी एकामागोमाग एक असा या ‘मोझार्ट इफेक्ट’चा दंभस्फोट करायला सुरुवात केली. त्यांनी असं दाखवून दिलं की, हा जो दावा आहे त्यासाठी दिलेले पुरावे फारच तुटपुंजे आहेत.. ते बहुतकरून किस्सेवजा (Anecdotal) आहेत. थोडक्यात, ‘ही संकल्पना बोगस आहे’ असं थेट न म्हणता त्यांनी सगळं म्हणून टाकलं आणि अखेर जगभरातील संशोधकांनी या दंतकथेला कायमची समाधी दिली.
‘मोझार्ट इफेक्ट’ या मूळ संकल्पनेची एक जनक फ्रान्सेस रॉशरने मात्र हे सपशेल नाकारलं आणि आपल्या संशोधनातल्या निष्कर्षांचं योग्य मूल्यांकन केलं गेलं नाही, असं ती म्हणाली. तिच्या म्हणण्यानुसार, मोझार्टचं संगीत ऐकल्याने लोक स्मार्ट बनतात असा तिचा दावा कधीच नव्हता, तर काही विद्यार्थ्यांच्या Spatial temporal reasoning मध्ये (अवकाश-अवधी तर्कबुद्धीक्षमता) मर्यादित आणि तात्पुरती सुधारणा होते, एवढंच माझ्या संशोधनातून मी दाखवलं होतं. त्यात सातत्यपूर्ण आणि ‘आयक्यू’मध्ये सर्वसाधारण वाढ कधीच दिसली नव्हती. एमोरी युनिव्हर्सिटीतील सायकॉलॉजिस्ट आणि २००९ साली प्रकाशित झालेल्या ‘फिफ्टी ग्रेट मिथ्स ऑफ पॉप्युलर सायकॉलॉजी’ या पुस्तकाचा सहलेखक स्कॉट लिलिअनफिल्ड याने मोझार्ट मिथकाला सहावा क्रमांक दिला आहे. पण या कल्पनेच्या थडग्यावर शेवटचा हातोडा मारला तो युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रियाच्या जेकब पिएटशिंग, मार्टिन व्होरासेक आणि अँटन के. फोरम यांनी! पिएटशिंग हे या व्हिएनीज संशोधन टीमचे प्रमुख लेखक होते. त्यांनी अत्यंत अधिकारवाणीने लिहिलंय- ‘मोझार्टचं संगीत ऐकण्याची शिफारस मी सगळ्यांना करतो. पण त्यामुळे मानसिक क्षमता वाढेल ही तुमची अपेक्षा अजिबात पूर्ण होणार नाही.’
‘‘मोझार्ट इफेक्ट’ ही मुळातच बोगस असलेली संकल्पना आधी स्वीकारलीच कशी गेली?’ हा प्रश्न कोणीही हुशार वाचक नक्कीच विचारेल. अमेरिकेतल्या जेम्स एस. मॅकडोनेल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जॉन ब्रुअर यांनी आपल्या ‘द मिथ ऑफ द फर्स्ट थ्री इयर्स’ या १९९९ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात याचं स्पष्ट उत्तर दिलंय. या मान्यवर लेखकाच्या शब्दांत सांगायचं तर- ‘‘आपल्या जगात विज्ञान आणि प्रसार माध्यमं यांचं मिश्रण कसं होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोझार्ट इफेक्ट आहे. एका सायन्स जर्नलमधले काही परिच्छेद काही महिन्यांच्या अवधीत वैश्विक सत्य बनून गेले. आणि आपल्या कामाचा सुरुवातीच्या काळात या माध्यमांनी कसा अतिशयोक्त विपर्यास केला होता याची जाण असलेले वैज्ञानिकदेखील मग या ‘सत्या’वर विश्वास ठेवू लागतात. इतर लोकांना यात मुबलक पैसा आहे याची जाण असतेच. ते मग या वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी म्हणून उडय़ा मारतात आणि लोकांना जे जे काही हवंय ते देतात, त्यात संशयास्पद दावे व विपर्यास यांचं मिश्रण करून आपल्या नवीन दंतकथा निर्माण करतात. या दंतकथेच्या बाबतीत टीका न करता उलट तिचं समर्थन करण्यासाठी अनेक लोक सरसावले. कारण यात त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न गुंतलेला होता. आणि मग पुस्तकं, टेप्स, सीडीज्, सरकारी कार्यक्रम इत्यादी गोष्टींनी त्यात भर घातली. आणि हे मिथक लाखो-करोडो लोकांनी वैज्ञानिक वस्तुस्थिती म्हणून स्वीकारली. या गोष्टीला गंभीरपणे विरोध झाला नाही, याचं कारण संगीत आपल्या भावना आणि मूड यावर परिणाम करतं, हे आपल्याला आधीपासूनच माहीत होतं. मग मोझार्ट संगीत अगदी तात्पुरता परिणाम तरी का करू शकणार नाही? हे अगदी सामान्य व्यवहारज्ञान आहे, नाही का? हो. आहे ना. पण म्हणूनच आपण संशयी असायला हवं. नाही का?
(उत्तरार्ध)
शब्दांकन : आनंद थत्ते