श्रद्धा कुंभोजकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘गवर्नरें मग छत्रपतींते सिंहासिन स्थापिला।
राजसूत्रें ती अर्पण करुनी तुष्टवि सकल जनांना।।’
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असणाऱ्या कोल्हापूर संस्थानाच्या छत्रपतिपदावर राजर्षी शाहू महाराजांची वयाच्या विसाव्या वर्षी- १८९४ मध्ये स्थापना होणे ही आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातली महत्त्वाची घटना आहे. या घटनेचं प्रत्यक्षदर्शी वर्णन करणारं ‘मुक्त्यारीसमारंभ’ नावाचं काव्य १८९६ मध्ये पट्टणकोडोलीच्या शाळेचे हेडमास्तर बाळाजी महादेव करवडे यांनी लिहून प्रसिद्ध केलं. गतकालाचा धांडोळा घेणारे अभ्यासक यशोधन जोशी यांना जुन्या पुस्तकांच्या दुकानात सव्वाशे वर्षांनी या पुस्तकाची प्रत मिळाली. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास समजून घेण्यासाठी या पुस्तकाचं असाधारण मोल जाणून जोशी यांनी या विषयातले अधिकारी प्रा. रमेश जाधव यांची साक्षेपी प्रस्तावना आणि पूरक दस्तावेज जोडून संदर्भमूल्य असणारं एक स्वतंत्र पुस्तक निर्माण केलं आहे.
इंग्रजी साम्राज्याच्या अंतर्गत संस्थानांचं काम कसं चालत असे आणि तरीही राजर्षी शाहू महाराजांनी कालसुसंगत कारभार करत लोककल्याणाचा वारसा कसा जपला याची कल्पना येण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. अनेक वर्षांनी होणाऱ्या राज्याधिकारग्रहण समारंभासाठी कोल्हापुरातील जनतेला आठ दिवस सुट्टी दिली होती. करवडे मास्तरांनी तिचा पुरेपूर वापर करून पाच भागांत हे काव्य रचलं आहे. शाहू महाराजांच्या पूर्वजांचं वर्णन, महाराजांचं शिक्षण, अधिकारग्रहण समारंभाची तयारी, प्रत्यक्ष समारंभ आणि त्यानिमित्त जनतेचा आनंदोत्सव यांचं वर्णन या काव्यात येतं.
चौथ्या शिवाजी महाराजांचा दुर्दैवी अंत झाल्यावर दत्तकपुत्र शाहू महाराजांना राज्यकारभार सोपवला जाणार हे ठरल्यापासून इंग्रज सरकारने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती.
‘राजगुरू फ्रेजर तो मित्र जाहला, विद्या कला चट् सारे दािन शोभला।’ अशा पद्धतीने महाराजांचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना इंग्लंडच्या राणीच्या इच्छेनुसार मुंबई इलाख्याचे गव्हर्नर हॅरिस यांच्या हस्ते राज्याधिकार प्रदान केले जाणार, हे निश्चित झालं. सर्वत्र सजावट केली गेली. इतकंच नव्हे तर स्तंभविद्युद्दीप म्हणजे विजेचे दिवे खांबांवर लावून रोषणाई केली गेली. करवडे मास्तरांचा चौकसपणा इतका, की समारंभाला येणाऱ्या गोऱ्या आणि प्रतिष्ठित भारतीयांच्या जेवणाचं कंत्राट माणशी तीस रुपये दराने दिलं होतं हेदेखील ते नोंदवतात. यावर केसरीने ‘गोऱ्या पाहुण्यांच्या या स्वागतासाठी बरीच रक्कम खर्च पडली असावी; असो.’ अशी टिप्पणी केली होती. जेवणाचंही अप्रूप होतं.
‘नयिन दिसती इंग्लंदाचीं महींत तशीं फळें।
किध न दिसलीं आह्मांलाही सभेतचि भासलें।।’
आलेल्या पाहुण्यांमध्ये सरदार, संस्थानिक तर होतेच; पण भांडारकर, गोखले, आगरकर असे १८९४ मध्ये सुप्रसिद्ध असणारे नेतेही आले होते.
‘निस्पृहांतचि जो शिरोमणी साजे। टीळकाचा जो परम मित्र गाजे।’ अशा शब्दांत त्यांनी आगरकरांचं वर्णन केलं आहे. शिवाय यानिमित्ताने झालेल्या ब्राह्मण भोजन आणि ‘लंका’ म्हणजे फटाक्यांच्या आतषबाजीचंही यथातथ्य वर्णन आहे. कुण्या कृष्णरावांना लंका बघायला त्यांचे मित्र बोलावू लागले तेव्हा त्यांची पत्नी राधाबाई कोल्हापूरचा ठसका दाखवत म्हणते, ‘‘पुरुषांनी सर्व समारंभ बघावेत आणि बायकांनी चुलीपाशीं सर्वकाळ काम करीत रहावें! तुमच्या अगोदरच ही मी तयार झालें पहा!’’ नव्या राजवाडय़ात झालेल्या बॉल डान्सलाही ‘धरुनी हस्तपरस्पर इंग्लिश स्त्रीपुरुष रम्य ते दिसती’ असं या वर्णनात स्थान आहे. एकूण मुक्त्यारीसमारंभानिमित्त कोल्हापुरात असणारा माहौल करवडे मास्तरांनी कौशल्यानं टिपला आहे.
यशोधन जोशींनी या मूळ काव्याच्या संहितेला अनमोल संदर्भाचं कोंदण दिलं आहे. महाराजांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना राज्याधिकार द्यावेत की नाही, यावर इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा, या संपूर्ण समारंभात इंग्रजी राज्याचा वरचष्मा दिसावा यासाठी गव्हर्नर आणि प्रशासनाने केलेली धडपड, मेजवानीच्या आसन व्यवस्थेपासून ते संपूर्ण कार्यक्रमाच्या तपशिलांची काटेकोर आखणी आणि तरीही साम्राज्य यंत्रणेतल्या अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचे शाहू महाराजांसोबत असणारे हृद्य संबंध यांचं समतोल चित्रण ते वाचकांना घडवतात. अमेरिकेतल्या ‘आरिझोना स्पेक्टेटर’ या वृत्तपत्रातली याबाबतची बातमी, ‘यॉर्कशायर इन्फन्ट्री’च्या संग्रहातली छायाचित्रं असे अनेक संदर्भ त्यांनी कष्टानं मिळवले आहेत. हंटर यांचा इंग्रजीतील उल्लेख छापताना झालेल्या मुद्रणदोषासारखे अपवाद वगळता पुस्तक देखणं केलं आहे. गतकालाच्या नोंदींचा अन्वयार्थ लावणारे इतिहासकार आणि गतकालाचे ठसे ज्यावर उमटलेले असतात ती संदर्भ साधनं शोधणारे संशोधक यांदरम्यान संवाद साधणारं यशोधन जोशी यांचं हे पुस्तक मराठी इतिहास विश्वात मोलाची भर घालतं.
‘मुक्त्यारीसमारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहूछत्रपति सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव’- बाळाजी महादेव करवडे, संशोधन व संपादन- यशोधन जोशी, कृष्णा पब्लिकेशन्स,
पाने- १६८, किंमत- ३०० रुपये.
shraddhakumbhojkar@gmail.com