मुकुंदराव चित्रकार होते, हे माहीत होतं. त्यांच्या शैलीशीही ओळख झालेली. एकच एक ठाशीव रेघ. पण वळणदार. डोळ्यांच्या जागी नुसते ठिपके. पण तरीही त्यातनं भाव कळेल इतके जिवंत. चित्रातनं त्यातला स्नेहाळपणा सहज झिरपायचा. ते गाण्याचं चित्र शब्दांत रंगवायचे. गोविंदरावांकडे जशी पुस्तकांची फडताळं असायची तशी मुकुंदरावांकडे गाण्याची स्पुल्स होती. जमिनीपासनं हात पोहोचणार नाहीत इतक्या उंचीची… वयानं आणि कर्तृत्वानं माझ्यापेक्षा किती तरी मोठे मित्र मला माझ्या लहानपणी मिळत गेले. मी यातल्या अनेकांकडे त्या वयात आकृष्ट होणं यात आश्चर्य नाही, पण त्या वेळी ही नावारूपाला आलेली माणसं मला का जवळ करत गेली हे तसं अप्रूपच म्हणायचं! ही मोठी माणसं माझं बोट धरून मग आणखी मोठ्यांकडे घेऊन गेली.
या अशा मित्रांतले एक मुकुंदराव तळवलकर. चित्रकार. डोंबिवलीला राहायचे. त्या शहरात वाचनाची भूक भागवायला तीन वाचनालयं होती.
नगरपालिकेचं, ज्ञानदा नावाचं दुसरं आणि तिसरं श्रीकांत टोळ यांचं. नगरपालिकेच्या वाचनालयाचा मी मेंबर होतोच. विश्वास मेहेंदळे डोंबिवलीचे. त्यांनी शब्द टाकून मला सदस्यत्व मिळवून दिलेलं. लोकमान्य टिळकांच्या समग्र लेखनाचे सात खंड तिथेच पहिल्यांदा वाचायला मिळाले. दुसरं ज्ञानदा. लोकप्रिय, वाचकस्नेही असं. फारच मागणीतली पुस्तकं असायची तिथे. ते काही मला झेपलं नाही. म्हणून मग ‘विकास’कडे मोर्चा वळला. सातवी-आठवीत होतो तेव्हा. पहिल्यांदा श्रीकांत टोळ यांनी अगदीच हाडत-हुडुत केलं माझ्याकडे पाहून. ‘‘तू ज्ञानदात जा’’ वगैरे म्हणाले. काय वाचणारेस विचारलं. मी तेंडुलकर, कुरुंदकर वगैरे नावं सांगितल्यावर टोळांना माझ्याविषयी जरा सहानुभूती वाटली असावी. त्यांनी (श्रीकांत टोळ थेट ‘वल्ली’तले… त्यांच्याविषयी नंतर स्वतंत्रपणे) मग मला मेंबर करून घेतलं. तिथं काउंटरच्या जवळ एक गृहस्थ बसलेले. अनेकदा त्यांना डोंबिवलीत पाहिलेलं वेगवेगळ्या गाण्यांच्या वगैरे कार्यक्रमांत. ‘‘आपण मुकुंदराव ना…’’ मी त्यांना म्हटलं. ‘‘नाही… मी मुकुंद…’’ इतकंच ते म्हणाले. मितभाषी वाटले. ती त्यांची पहिली ओळख. पुढची चार-पाच दशकं ती चढत्या भाजणीत घट्ट होत गेली.
कॉलेजच्या काळात शहरात उचापती खूप वाढल्या. ‘कोवळीक’ ही संस्था आम्ही सहा-सात जणांनी स्थापन केली. त्यानिमित्तानं शहराच्या सांस्कृतिक वर्तुळात सहज प्रवेश मिळाला. त्या वेळी दर शनिवार किंवा रविवार सकाळी ‘विकास’मध्ये गप्पांचा फड जमायचा. (सुरेंद्र) बाजपेयी सर, (आबासाहेब) पटवारी, बंकीम खोपकर असे कोण कोण. त्यात मुकुंदराव एक. अत्यंत कमी बोलणं. तेही हळू आवाजात, पण मार्मिक. त्यामुळे ते बोलायला लागले की सगळे कान देऊन ऐकायचे. मुकुंदराव चित्रकार होते, हे माहीत होतं. त्यांची ती चित्राखालची ‘मुकुंद’ अशी सही परिचित होतीच एव्हाना; पण त्यांच्या शैलीशीही ओळख झालेली. एकच एक ठाशीव रेघ, पण वळणदार. डोळ्यांच्या जागी नुसते ठिपके. पण तरीही त्यातनं भाव कळेल इतके जिवंत. चित्रातनं त्यातला स्नेहाळपणा सहज झिरपायचा. या शनिवारच्या गप्पांत कळलं मुकुंदराव हे गोविंदरावांचे धाकटे भाऊ. मग तर आदर आणखीनच आणि आपसूकच वाढला. पण कधी गप्पांत त्यांनी गोविंदराव मोठे भाऊ असल्याचं मिरवलंय असं एकदाही घडलेलं नाही.
एकदा त्यांना विचारलेलं मी… ‘‘चित्राखाली नुसतंच मुकुंद का?’’ तर ते म्हणाले… ‘‘अण्णानं तसं सुरुवातीलाच सांगून ठेवलं… तू माझा भाऊ आहे असं कळलं तर उगाच तुझ्यावर अन्याय होईल… माझ्यामुळे तू ‘टाइम्स’मध्ये आहेस असं लगेच लोक म्हणायला लागतील. तेव्हा तू आडनाव लावू नकोस…’’ हे अण्णा म्हणजे गोविंदराव. त्यांच्याविषयी मुकुंदरावांच्या मनात कोण आदर. आमच्या गप्पांत त्यांना कोणी कधी छेडत म्हटलं… ‘‘तुम्ही इतके गप्पिष्ट… पण गोविंदराव असे तुसडे कसे?’’ त्यावर मुकुंदरावांचं उत्तर फार छान असायचं. ते म्हणायचे, ‘‘अण्णाही चांगला गप्पिष्ट आहे… फक्त त्या गप्पा कोणाशी मारायच्या याबाबत तो फार जागरूक असतो. उगाच शिळोप्याच्या गप्पांत, गॉसिपिंगमध्ये त्याला अजिबात रस नाही… त्यापेक्षा पुस्तक वाचत बसलेलं बरं हे त्याचं मत, त्यामुळे त्याच्या गप्पांच्या वर्तुळात ज्यांना प्रवेश नसतो ते त्याला तुसडा म्हणतात…’’ मुकुंदरावांच्या उत्तरानं समोरचा खजील व्हायचा, कारण सगळ्यांच्या देखत एक बाब सिद्ध व्हायची- गोविंदरावांबाबत असं विचारणारा त्यांच्या बैठकांत सहभागी व्हायला पात्र नाही. आणि हे सगळं मुकुंदराव इतक्या हलक्या आवाजात, हलक्यानं सांगायचे की समोरच्याला वाटून जायचं उगाच विचारलं आपण हे. असं करत करत शनिवारच्या त्या गप्पागटांत मुकुंदरावांशी गोत्र जरा जास्त जुळलं. त्याला आणखी एक कारण होतं…
त्यांचं गाण्याचं प्रेम. खरं तर त्या गप्पागटांत सगळेच सकल-कलाप्रेमी होते. पण मुकुंदरावांचा चित्रकलेइतका संगीतातला तपशील जरा जास्त खोल असायचा. मला गाणं आवडत होतंच. डोंबिवलीत ‘शिवानंद’ महोत्सवानं, त्या वातावरणानं गाण्याकडे खेचलेलं. त्यात मितभाषी मुकुंदराव मध्यभागी असायचे. बोट धरून मग पहिल्यांदा तेच घेऊन गेले गजाननराव जोशींकडे. व्हायोलीनच्या दुनियेत गजाननराव जोशी हे गाण्यातल्या भीमसेनांइतकं अत्यंत बिनीचं नाव. मुकुंदरावांमुळे एका अद्भुत जगात प्रवेश मिळाला. शनिवारच्या गप्पागटांत बच्चुकाका जोशीही असायचे. ते गजाननरावांचे चिरंजीव. पण त्यांच्या घरी गेलो मुकुंदरावांचं बोट धरून. बडे बडे कलाकार यायचे त्यांच्याकडे. पूर्वी थिरकवाँसाहेब येऊन गेलेले त्यांच्याकडे. अशोक रानडे तर शिष्यच. थोरले कशाळकर. सुरेश तळवलकर. पद्मा तळवलकर. ओंकार गुलवडी. किती नावं सांगावीत. गजाननरावांचं वजन होतंच तसं. आणि मग त्यांच्याकडे गाण्याच्या अनौपचारिक बैठका. एकमेकांना साथ देत, संगत करत करत ही गजाननरावांची शिष्य मंडळी गाण्याची मजा घ्यायची. या अनौपचारिक बैठका या प्रेक्षकांसाठीच्या कार्यक्रमांपेक्षा जास्त रसरशीत असतात, हे माझं मत बनायला तिथूनच सुरुवात झाली असावी. एका अशाच बैठकीत गजाननरावांचा दुसरा मुलगा तबल्यावर होता आणि थिरकवाँसाहेब पहुडले होते गाणं ऐकत. नंतर त्यांना राहावलं नाही… ‘उंगलिया सताने लगी,’ असं म्हणत उठले आणि स्वत:ही तबल्यावर बसले… हा किस्सा खूप पूर्वीचा. नंतर मी मुकुंदरावांकडून शब्दश: ऐकला. म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं.
मुकुंदरावांनी त्या बैठकीचं रेकॉर्डिंग केलेलं. ते ऐकवताना मग मुकुंदरावांचं थिरकवाँसाहेबांच्या शैलीवर, देहबोलीवर चित्रकाराच्या नजरेतनं भाष्य. ते तबला वाजवताना त्यांच्या फक्त मनगटांच्या पुढच्या हातांचीच तेवढी हालचाल व्हायची. असं का? तर तबल्याच्या तालमीच्या वेळी त्यांच्या मनगटांत लोखंडी कडी अडकवली जायची… त्यामुळे आपसूकच तशी सवय लागली. मुकुंदराव गाण्याचं चित्र शब्दांत रंगवायचे. गोविंदरावांकडे जशी पुस्तकांची फडताळं असायची तशी मुकुंदरावांकडे गाण्याची स्पुल्स होती. जमिनीपासनं हात पोहोचणार नाहीत इतक्या उंचीची कपाटं. त्यात पुस्तकं लावावीत तसे गाण्याचे स्पुल्स लावलेले. प्रत्येक टेपच्या दर्शनी भागावर कलाकारांचं नाव, बैठकीचा तपशील सुवाच्य अक्षरात नोंदवलेला. इतकं प्रचंड रेकॉर्डिंग. अंजनीबाई मालपेकर, अंजनीबाई लोलेकर, सरस्वतीबाई राणे, मोगूबाई, बडे गुलाम अली खाँ आणि मुख्य म्हणजे बालगंधर्व. गोविंदराव आणि मुकुंदराव यांच्यातला बालगंधर्व हा एक समान धागा. शनिवारी-रविवारी सकाळी ‘विकास’च्या नाक्यावर एखाद्या शनिवारी समजा कधी भेट झाली नाही की मग मी संध्याकाळी त्यांच्या घरी जायचो. मुकुंदराव बाहेरच्या खोलीत टेपवर गाणं ऐकत निवांत बसलेले असायचे. एकटे. थोरले तळवलकर पुस्तकांच्या सहवासात रमायचे. हे गाण्याच्या. जुन्या शैलीच्या छान वाड्यात त्यांचं घर होतं. तळमजल्यावर. तेव्हा डोंबिवलीचं वातावरण आणि डोंबिवलीकर सभ्य, सुसंस्कृत ठाय लयीत जगायचे. जगण्याची घाई होती. पण ती लोकल गाठण्यापुरती. शरीरांना पळवणारी ती घाई मनांना स्पर्श करू धजत नव्हती तेव्हाचा तो काळ.
मग त्या काळात डोंबिवलीत ‘शिवानंद’च्या उत्सवासाठी औंधला जायचा बेत ठरायचा. हे शिवानंद गजाननरावांचे गुरू. ते औंधचे. त्यांच्या स्मरणार्थ औंधला दत्ताचं मंदिर वगैरे उभारलंय त्यांच्या भक्तांनी. तिथं नोव्हेंबराच्या आसपास संगीत महोत्सव गजाननरावांनी सुरू केला. आजही तो भरतो. त्या महोत्सवाचा बेत ठरला की दोनेक आठवड्यांचे शनिवार त्याच्या चर्चेत. मी, मुकुंदराव दोघेही टाइम्स इमारतीत. ड्युटी वगैरे अॅडजस्ट केलेली असायची. संध्याकाळी लवकर मग परळला जायचं. तिथे आणखी कोणी दोघे-तिघे आलेले असायचे. रात्रीच्या एसटीनं औंधकडे. त्यातली एक भेट विशेष अजूनही कानात साठून आहे. आम्ही कुडकुडत औंधला पोहोचलो. नुकतंच कुठे फटफटत होतं. मजलदरमजल करत, बिलगत्या थंडीला चहा सिग्रेटींनी आंजारत-गोंजारत महोत्सवस्थळी पोहोचलो आणि सगळेच एकदम गप्प. कोणीतरी गात होतं. गाण्याची जातकुळी कळत होती, पण आवाज परिचयाचा नव्हता. पहाटेच्या रम्य वातावरणात उमटत असलेल्या त्या सुरेल ठशांचा माग घेत पुढे जात जात एका खोलीपाशी पोचलो. एक तरुण गायिका काहीही सिद्ध न करण्यासाठी गात होती. कसलीही साथसंगत नाही. कोणत्याही क्षुद्र प्रश्नानं रसभंग करणारं तिथं कोणी नव्हतं. आम्ही रात्रभराचा बस प्रवास करून आलेलो. पण ‘फ्रेश’ व्हायला हवं वगैरे मर्त्य शहरी गरजा नव्हत्या कोणाच्या त्या वेळी. समोर जे काही होतं तेच इतकं उदात्त फ्रेश होतं की शारीर फ्रेशनेसची गरज वाटणं हाच कपाळकरंटेपणा ठरला असता. आम्ही सगळेच बसलो ऐकत. आणखीही काही आले. गाणं थांबल्यावर मुकुंदरावांनी ओळख करून दिली… ‘‘वीणा सहस्राबुद्धे. शंकरराव बोडसांची कन्या… गजाननरावांची शिष्या.’’ तेव्हापासून वीणाताईंचं गाणं कधीही, कुठेही ऐकताना ती औंधची पहाट आपोआप उगवते…
या औंधच्या फेरीचं आकर्षण आणखी एका कारणासाठी असायचं. मुकुंदरावांच्या बरोबर औंधच्या म्युझियमची भेट. मुळात हे म्युझियम आहेच अद्भुत. तिथे रवींद्रनाथ टागोर आहेत. नंदलाल बोस आहेत. रावबहादूर धुरंधर आहेत. बाबुराव पेंटर आहेत. राजा रविवर्मा तर भरपूर आहेत. अगदी हेन्री मूरचं शिल्पही आहे. इतकं सगळं काय काय आहे तिथे. अगदी ओरिजिनल. आणि हे सगळं मग मुकुंदरावांकडून समजावून घ्यायचं. एरवीचे तसे अबोल मुकुंदराव औंधच्या म्युझियममध्ये बोलके व्हायचे. अनेक चित्रं, चित्रकार आणि मुख्य म्हणजे चित्रकला वगैरेंतली गोडी अधिकच वाढली त्यांच्यामुळे. मुकुंदराव त्यांच्या अप्रत्यक्ष गुरूंविषयीही सांगायचे. चित्रकार व्ही. एन. ओक यांचा त्यांच्यावर फार प्रभाव होता. मुकुंदराव, सत्यनारायण वडिशेरला वगैरे मंडळी एकत्र असत त्या वेळी. त्यांच्याकडून चित्रकला समजून घेणं म्हणजे मजा होती. आम्ही मित्रमंडळींनी त्यांची काही प्रदर्शनं भरवली मग डोंबिवलीत.
पुढे माझी गोव्याला बदलीहून जायची वेळ आली तेव्हा मुकुंदरावांनी एक बैठक ठेवली. मग असं ठरलं एक नको, दोन करूयात. एक तुमच्याकडे आणि दुसरी माझ्याकडे. इतकं वयाचं अंतर खरं तर आमच्यात. त्यांचा मुलगा माझ्यापेक्षा लहान काही वर्षांनी. पण मुकुंदरावांचं वागणं-बोलणं अगदी बरोबरीचं असल्यासारखं. रात्रीच्या बैठकीनंतर चहाच्या टपरीवर आमच्याबरोबर सहज यायचे. गोव्यात असताना घरीही आले होते एकदा. पुढे माझी डोंबिवली सुटली आणि मुकुंदरावांनीही ती सोडली. पुण्याला राहायला गेले. एकुलता एक मुलगा अमेय. तो अमेरिकेला गेला. तिकडे त्याचा मोठा व्यवसाय आहे. मला आठवतंय, एकदा पुण्याच्या घरी गेलो होतो त्यांना भेटायला. सहज विचारलं… ‘‘अमेय कधी येतोय?’’ तर म्हणाले… ‘‘आता एकदम आमच्यासाठी वैकुंठाच्या वेळी…’’
पण ती वेळ मुकुंदरावांनी आणली नाही. ते आणि पत्नी दोघेही गेले अमेरिकेत अमेयकडे. ‘लोकसत्ता’चा संपादक झाल्यावर त्यांनी आवर्जून फोन केला अभिनंदनासाठी. ‘‘अण्णाला कळवलंस का?’’ विचारत स्वत:च म्हणाले, ‘‘फोन करतो त्याला.’’ एव्हाना गोविंदरावही अमेरिकेत स्थिरावलेले होते. त्यांचं येणं व्हायचं भारतात, पण मुकुंदरावांचं काही तितकं येणं झालं नाही. ‘लोकसत्ता’त लिहितात आवर्जून. गोविंदरावांवरही छान आठवणींचा लेख लिहिला त्यांनी. दिवाळी अंकासाठीही लिहिलं.
फोनवर बोलणं होतं अधेमधे. एकदा विचारलं, ‘‘काय करता वेळ घालवायला?’’ तर टिपिकल तळवलकर-शैलीत म्हणाले, ‘‘अमेरिकनांची चित्रसाक्षरता वाढवतोय… येतात दुपारी अनेक जण, मीही जातो सकाळ-संध्याकाळी शेजारच्या बागेत… म्हातारेच म्हातारे आहेत इथे भरपूर.’’ लक्षात आलं, इकडे मित्रांत होते तेव्हा मुकुंदरावांचं वय वाढलेलं. पण म्हातारे नव्हते झाले ते. मोठ्या झाडांचं पुनर्रोपण तसं अवघडच म्हणायचं!