साहित्याबरोबरच इतर कलांची जाण असलेले आणि विविध कलांमधील आंतरिक नात्यांचा सातत्याने शोध घेणारे जे काही मोजके साहित्यिक आहेत, त्यापैकी वसंत आबाजी डहाके हे एक प्रमुख नाव आहे. ‘दृश्यकला आणि साहित्य’ या त्यांच्या नव्या लेखसंग्रहात त्यांच्या या शोधवृत्तीचा प्रत्यय येतो. कोणत्याही कलाकृतीचा, कलावंताचा शोध घेताना कलेच्या एकंदर स्वरूपाचा, माध्यमांतरणातून प्रत्ययास येणाऱ्या बदलत्या अनुभवरूपांचा आणि कलेमागच्या सामाजिकतेचा मूलगामी विचार त्यांनी केलेला आहे. सर्वच ललित कलांचे ‘वाचन’ अर्थनिर्णयन आणि मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या कलांच्या काव्यशास्त्राचा विचार या संग्रहात अप्रत्यक्षपणे आलेला आहे. साहित्यसमीक्षा करताना विशिष्ट परिभाषा वापरली जाते. काव्यशास्त्रातल्या संकल्पना वापरल्या जातात. चित्रकला, छायाचित्रकला, रंगभूमी, चित्रपट यांच्या समीक्षेसाठीही एक काव्यशास्त्र असायला पाहिजे, या कलांची दृश्यभाषा तिच्या संकेतांसह वाचता आली पाहिजे अशी डहाकेंची यामागची भूमिका आहे.
या संग्रहातले लेख विविध नियतकालिकांमधून यापूर्वी आलेले आहेत अथवा एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना म्हणून यातील एखादा लेख लिहिला गेला आहे. ‘दुसरा पक्षी अथवा बोर्हेस आणि मी’, ‘रहस्यकथेचा रूपबंध’ कादंबरीवरचे दोन लेख हे साहित्याशी संबंधित लेख आहेत, तर सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांवरचे तीन लेख, व्हॅन गॉगच्या चित्रावरचा ‘गव्हाच्या शेतावरचे कावळे’, ‘काही चित्रकृतींचे वाचन’ हे चित्रकलेवरचे लेख आहेत. याशिवाय छायाचित्रणाशी संबंधित तीन लेख आहेत. ‘माध्यमांतर : कथात्म साहित्याचे चित्रपट- रूपांतर’, ‘कादंबरी, नाटक आणि चित्रपट’, ‘दृश्यकला आणि साहित्य’ हे तौलनिक स्वरूपाचे लेख आहेत. ‘माझा कलाविचार’ ‘काव्यभाषा व चित्रभाषा’ या लेखांमधून काही मूलभूत विचार मांडलेले आहेत.
‘दुसरा पक्षी अथवा बोर्हेस आणि मी’ आणि ‘कादंबरीच्या जन्माची कहाणी’ हे ललित अंगाने जाणारे लेख आहेत. जॉर्ज लुई बोर्हेस या प्रसिद्ध लेखकाची एक छोटी कथा डहाकेंनी दिली आहे. लेखक बोर्हेस आणि व्यक्ती म्हणून प्रत्यक्ष जीवन जगणारा बोर्हेस अशी स्वत:ची दोन रूपे कल्पून बोर्हेसने ही कथा लिहिली आहे. ‘मी जगतो, मी स्वत:ला जगू देतो, म्हणजे बोर्हेसला त्यातून साहित्य कातून काढता येईल, आणि ते साहित्य हीच माझी मुक्ती आहे’ असे तो म्हणतो. जीवनातलं सत्य प्रत्यक्ष जगण्यात गवसतं की लिखित स्वरूपातल्या आभासी विश्वात गवसतं असा एक मूलभूत प्रश्न आहे. डहाके यांच्या मते लिहिणारा/जगणारा ही दोन्ही रूपं एकमेकांना पूरक आहेत. लेखकाचे व्यक्तिगत अनुभव लिखाणात आले की ते सर्वाचे होतात. एकटय़ा लेखकाचे नव्हे तर लोकसमूहाचे चरित्र त्यात येते.
‘कादंबरीच्या जन्माची कहाणी’ या लेखात शंकर -पार्वतीच्या कहाणीतून डहाके यांनी कादंबरीचे सुप्त सामथ्र्य आणि कादंबरीचा प्रवास सूचक संदर्भ देत, नर्मविनोदी उपरोधासह मांडलेला आहे. लेखाच्या शेवटी बोर्हेसचा स्पर्श असलेली वाक्ये येतात, ‘श्री भगवान आतल्या आत म्हणत होते, आम्ही तरी काय, मी, देवी पार्वती, हे सगळे ‘लिहिलेलेच’ आहोत. त्या ‘न लिहित्यानंच’ आम्हाला लिहिलेलं आहे. तो न लिहून सगळं काही लिहीत असतो.’ जो देश कुणाचेही शोषण करत नाही, विनाशाच्या यातना अनुभवत राहतो, अशा देशात कादंबरीला प्रकट व्हायचं आहे असं डहाके म्हणतात, तेव्हा ते स्वत:ची कलाविषयक भूमिका मांडत असतात. ‘माझा कलाविचार’ या लेखात त्यांनी ती मांडलेली आहे.
डहाके यांना कलेमधला सामाजिक-सांस्कृतिक आशय महत्त्वाचा वाटत असल्याने सुधीर पटवर्धन यांची चित्रं, संदेश भंडारे आणि सुधारक ओलवे यांची छायाचित्रं याचं ते रसग्रहण आणि विश्लेषण करतात. हे करत असताना शब्द आणि साहित्य हे माध्यम केंद्रस्थानी असलं तरी दृश्यमाध्यमांची भाषा आणि त्याचा वेगळा परिणाम याबद्दल ते तितकेच सजग आहेत. त्यामुळे अबोल अशा दृश्यप्रतिमांना जाणून घेण्याची एक मर्मदृष्टी वाचकांना लाभू शकते. ‘जवळ आणि दूर’ या लेखात सुधीर पटवर्धन यांच्या ‘इराणी रेस्टॉरंट’, ‘स्ट्रीट कॉर्नर’, ‘लोअर परळ’ अशा काही प्रसिद्ध चित्रकृतींकडे डहाके यांनी एक संहिता म्हणून पाहिलं आहे. कथनात्मक अंगाने त्यांचं ‘वाचन’ केलं आहे. ‘लोअर परळ’ या चित्रात गिरणगावचं आधुनिक शहरात होणारं अवस्थांतर आलेलं आहे, तर ‘स्ट्रीट प्ले’ या चित्रात वास्तव, नाटय़गत वास्तव आणि प्रतिबिंबात्मक वास्तव असं तिहेरी वास्तव आलेलं आहे. पटवर्धनांच्या चित्रांमधली रोजच्या जीवनातील चिरपरिचित माणसं आपलं लक्ष वेधून घेतात. जवळचं आणि दूरचं असं द्वंद्व पटवर्धनांच्या चित्रांमध्ये असतं तसंच आत-बाहेर असं मनातलं आणि बाहेरच्या वास्तवातलं द्वंद्व त्यांच्या चित्रांमध्ये असतं असं डहाके सांगतात. आणखी एका लेखात डहाकेंनी ‘पटवर्धन यांच्या चित्रांतील नागरी भूगोल हा स्वतंत्रच अभ्यासाचा विषय’ असल्याचं सांगितलं आहे.
चित्रकलेप्रमाणे छायाचित्रणकला हीसुद्धा समाजवास्तव समर्थपणे प्रकट करणारी कला आहे. पण त्याकडे गंभीरपणे कधी पाहिलं जात नाही. डहाके यांचे छायाचित्रांवरचे तीन लेख या संग्रहात आहेत. नितीन दादरावाला यांच्या ‘प्रतिमा प्रचीती’ पुस्तकात जगप्रसिद्ध छायाचित्रकारांची छायाचित्रं आहेत. तसेच संदेश भंडारे आणि सुधारक ओलवे यांची छायाचित्रं महाराष्ट्रातलं सामाजिक वास्तव टिपणारी आहेत. डहाके या छायाचित्रांकडे एक संहिता म्हणून पाहतात. छाया-प्रकाशाने लिहिलेली भूतकाळ-वर्तमानकाळ, सामाजिक वर्तन, स्थळ-काळ यांना दृश्य भाषेत व्यक्त करणारी एक संहिता. सुधारक ओलवे यांची सफाई कामगारांची छायाचित्रं म्हणजे महानगरातल्या कचऱ्याने भरलेल्या नरकपुरीची अस्वस्थ करणारी उपेक्षित दुनिया आहे. सौंदर्य निर्मितीपेक्षा जीवनातल्या कुरूपतेला सामोऱ्या जाणाऱ्या, सामाजिक न्यायासाठी कलेच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या कलाकृती म्हणून डहाके या छायाचित्रांकडे आपलं लक्ष वेधतात.
विविध कलाप्रकारांमधून तयार होणाऱ्या कलाकृतींचं स्वरूप, त्यातल्या चिन्हार्थाची आणि प्रतीकांची भाषा साहित्य, दृश्यकला, चित्रपट अशा कलाप्रकारांमधील साम्य विरोध याची तुलनात्मक चर्चा काही लेखांमध्ये येते. ‘प्रत्येक कलाकृतीत माग, चिन्हे, खुणा, प्रतिमा असतात. रसिकांनी तो माग काढत जायला पाहिजे,’ असं डहाके म्हणतात. प्रत्येक कलाकृतीला माध्यम असतं, आकार असतो आणि आशय असतो. कला भिन्न असल्या तरी त्यांच्यात कोणतं तरी एकमेकींना जोडणारं कलातत्त्व अंतर्भूत असतं. जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘कैरी’ कथेवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाचं उदाहरण घेऊन डहाके यांनी माध्यमांतराविषयी लिहिलं आहे. भाषिक संहितेचं तंतोतंत रूपांतर चित्रपट संहितेत करणं अशक्य असतं. त्यामुळे त्या दोन वेगळ्या कलाकृती आहेत असं समजूनच त्यांचा आस्वाद घेणं चांगलं असं डहाकेंचं मत आहे.
‘दृश्यकला आणि साहित्य’ या संग्रहातील लेखांचं वैशिष्टय़ सांगायचं तर ते असं सांगता येईल- कलाप्रकार अथवा माध्यम कोणतंही असो, कलाकृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बहुकेंद्री आणि कलाविषयक ‘भाषां’ची जाण असणारा असावा. चित्र असो वा साहित्य, प्रत्येक कलाकृती ही एक संहिता असते आणि तिच्या अंतरंगात शिरायचं तर या संहितेतील भाषिक चिन्हांचं अथवा दृश्य प्रतिमांचं वाचन करता आलं पाहिजे. अशा एका बहुसांस्कृतिक सर्वकलासमावेशक अशा काव्यभाषेचा शोध या पुस्तकातील लेखांमधून जाणवतो. संहितावाचन हा कलाकृती समजून घेण्याचा एक मार्ग आहे, तो एकमेव मार्ग नाही. असं असलं तरी त्याचं महत्त्व कमी होत नाही.
‘दृश्यकला आणि साहित्य’
– वसंत आबाजी डहाके,
लोकवाङ्मय गृह, मुंबई,
पृष्ठे – २००, मूल्य – २५० रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा